डिजिटल युगातील ’मनोरंजन’

अमृता देसर्डा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

शब्दांची सावली    
सुट्टी कुणाला नको असते? उलट ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी घड्याळांनी बंद पडून जावे, आणि काळ तिथेच त्या दिवशी थांबून जावा. तो दिवस इतका मोठा असावा, की कधीच संपू नये. घरात एकदम आनंदी आनंद असावा. गप्पा, धम्माल, मस्त पदार्थ यावर ताव मारावा. दुपारी खूप लोळावे. सकाळी खूप खेळावे, आणि रात्री मस्त दमल्यावर वाचत झोपून जावे. असं पूर्वीचं मनोरंजन असायचं.

रविवार, म्हणजे सुट्टीचा दिवस. त्या दिवशी ऑफिस नाही, कामे नाहीत. घर, निवांतपणा आणि मोकळा वेळ हे बहुधा प्रत्येक माणसाच्या जगण्यात असावं, म्हणजे शहरात राहणारी माणसे तरी, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत निवांतपणाने गजबजून गेलेली असतात. त्यांना हे दोन दिवस काय करू आणि काय नाही असे होते. काहींना फक्त रविवार मिळतो, तर काहींना दोन्ही दिवस सुट्टीचे मिळतात. पण प्रत्येकाला हा रविवार खूप हवाहवासा वाटतो.

मला आठवतं, शाळेत असताना आम्ही महिन्यातला एक बुधवार आणि आठवड्यातला प्रत्येक रविवार, या दोन दिवसांची अगदी आतुरतेने वाट पाहायचो. महिन्यातल्या एकाच बुधवारी आम्हाला गणवेशाला सुट्टी असायची. त्या दिवशी रंगबिरंगी कपडे घालून आम्ही शाळेत जायचो. सगळी शाळा रंगांनी अगदी सजून जायची. आम्ही मुली तर खूप धम्माल करायचो. आणि रविवार आमच्या सुट्टीचा वार. त्या दिवशी शाळा नाही या आनंदात सोमवार अगदी पटकन यायचा आणि मग सोमवारी सकाळी शाळेत जायला जिवावर यायचं. आणि हे प्रत्येक आठवड्यात व्हायचे. मग रविवारी आम्ही काय करायचो? म्हणजे आमची सुट्टी खूप मस्त जावी म्हणून शाळेत दिलेला गृहपाठ आम्ही शनिवारीच करायचो. त्यामुळे आमच्यासाठी मोकळा वेळ मिळेल आणि रविवार पूर्ण मजेत घालवता येईल म्हणून प्रयत्न करायचो. आणि त्या दिवशी आमच्या घरात भाजी पोळी नसायची. मग आई इडली, डोसा, पाव भाजी, वडा असे मस्त पदार्थ बनवायची, आणि तिन्ही त्रिकाळ आम्ही त्या पदार्थांवर ताव मारायचो. मी तर तेच तेच पदार्थ इतक्‍यांदा खायचे, की आई ओरडायची. आता बास असा नजरेने इशारा द्यायची. संपूर्ण रविवार मैदानात, इमारतीतल्या झाडांच्या सावलीत आणि दुपार आराम करण्यात घालवायचो. कधी घर-घर खेळायचो, तर कधी शिवणापाणी. अगदीच बोअर झाले तर लपाछपी नाहीतर गोल्डस्पॉट खेळायचो. पूर्ण संध्याकाळ बाहेर घालवायचो. इतके दमून जायचो, की कधीकधी न जेवताच झोपून जायचो. 

सुट्टी कुणाला नको असते? उलट ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जगातल्या सगळ्या घड्याळांनी बंद पडून जावे, आणि काळ तिथेच त्या दिवशी थांबून जावा असं मनातल्या मनात मी घोकायचे. तो दिवस इतका मोठा असावा, की कधीच संपू नये. घरात एकदम आनंदी आनंद असावा. गप्पा, धम्माल, मस्त पदार्थ यावर ताव मारावा. दुपारी खूप लोळावे. सकाळी खूप खेळावे, आणि रात्री मस्त दमून झोपून काहीतरी वाचत बसावे. असं व्हायचं.आमच्यासाठी हेच मनोरंजन असायचं. 

मे महिन्याची सुट्टी तर खजिनाच असायची. एक एक दिवस आम्ही मोजायचो. कॅलेंडरवर पेन्सिलीने गेलेला दिवस आणि राहिलेल्या दिवसांचे हिशोब करायचो. शाळा, कॉलेज मे मध्ये बंदच असायची. शिबिरे, कार्यशाळा असले प्रकार आम्हाला तेव्हा माहितीच नसायचे. आता मात्र शाळेतली मुले, परीक्षा संपली, की शिबिरांना पळतात. शाळेतच त्याची फी भरतात. संपूर्ण सुट्टीत काहीतरी शिकतच राहतात. कुठे नाच, कुठे गाणी, तर कधी स्वीमिंग, नाहीतर कराटे. सुट्टीत पण त्यांना निवांतपणा असा नाही. अगदीच बोअर होत असेल तर मग घरातच टीव्ही, व्हिडिओ गेम खेळायचा.नाहीतर मोठ्या मॉल्समध्ये जाऊन फनसिटी सारख्या गेम्सझोन मध्ये पैसे खर्च करून दिवस घालवायचा. मोठ्या मोठ्या मशिनी असतात तिथे, एक तर ’व्ही आर’ नावाची ’व्हर्चुअल टूर’ आहे. अगदी चार वर्षांपासून ते मोठ्या माणसांसाठी. त्यातले एक मशिन डोळ्यांना लावायचे, तिथल्या तबकडी सारख्या हलत्या खुर्चीवर बसायचे आणि अडीच मिनिटे त्या आभासी जगाचा अनुभव घ्यायचा.बापरे, वेगळाच अनुभव येतो. जणू काही आपण त्या प्रदेशात प्रवेश केला आहे आणि तिथे आपण आपले असणे अनुभवतो आहे.... असं वाटतं त्या फनसिटी मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा चक्क अवाक झाले, माझ्यापेक्षा खूप लहान मुले, अगदी सहा-सात वर्षांची, एकदम बिनधास्त वावरत होती. त्यात ती मुले इतकी मश्‍गूल झाली होती,  की मी त्यांच्यात एकदम मला अडाणीच वाटले. माझ्यासाठी तो अनुभव खूप वेगळा होता. ते विश्व पूर्ण वेगळे होते. मी जेव्हा त्या मुलांच्या वयाची होते तेव्हा अशा प्रकारचं आभासी जगातलं शहर नव्हतं, अशी एकदम गतिमान दुनिया नव्हती. तिथे आलेल्या मुलांसाठी ते अगदी सामान्य होते. ती अगदीच सहजपणे तिथं वावरत होती. 

हे सगळे पाहून, त्या मॉलमधले वातावरण पाहून, जणू काही तो मॉल एक वेगळेच शहर होते आणि ते शहर जणू फक्त मनोरंजनासाठी बनवलेले एक आभासी, चकाकी, कल्पनेच्या पलीकडचे जग होते. असे वाटायला लागले.  तिथे संपूर्ण जगातील सुखे आहेत, जणूकाही मॉल म्हणजे स्वर्ग आहे, आणि तिथे येणारी माणसे फक्त मनोरंजन या एका गोष्टीसाठी तिथे येतात. काळ किती बदलतो, तो नुसता बदलत नाही तर, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये देखील  बदल करतो, रोजच्या जगण्यावर त्याचा परिणाम होतो. पन्नास वर्षांपूर्वी ज्या जागेवर काहीही नव्हते, त्या जागेवर टोलेजंग इमारती, सडसडीत रस्ते, वाहनांची गर्दी असते. पन्नास वर्षांपूर्वीचे जाउदे, अगदी दहा वर्षांपूर्वी देखील तिथे इतकी वर्दळ नसते तिथे वेगळेच चित्र दिसते. म्हणजे प्रत्येक आठवड्याला रविवार हा येतोच, तो पन्नास वर्षांपूर्वी येत होता, तसा आताही येतो, आणि पुढच्या शंभरवर्षानंतर देखील येणार आहे. त्याचा काळ हा तेवढाच राहणार आहे, म्हणजे चोवीस तास. किंवा बदलूही शकतो. पण तो कसा याचा अभ्यास करायला हवा. (त्यासाठी शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे. असो.) आणि मुख्य म्हणजे तो रविवार हा आठवड्यातून एकदाच येणार आहे. पण तो वार कसा घालवायचा, कोठे घालवायचा, आणि कुणाबरोबर घालवायचा याचे ठोकताळे हे सतत बदलत राहणार. मनोरंजनाची साधने बदलणार.  आज टीव्ही, सिनेमा थिएटर, मॉल्स, रिसोर्ट आहेत, व्हर्चुअल गेम झोन्स आहेत, व्हिडिओ पार्लर आहे, सायबर कॅफे आहेत, बरिस्ता आहेत. पूर्वीच्या काळी सुट्टी असेल तेव्हा नाटक पाहायला कुटुंबच्या कुटुंब जात असे, नंतर सिनेमा आला आणि मनोरंजनाची ठिकाणे बदलली.लोक मोठ्या पडद्यांवर, कधीकधी घरात टीव्हीवर सिनेमे पाहू लागली, आता तर मालिका आल्या आहेत. आजही नाटके पाहिली जातात, पण तरुण वर्ग नाटकांना कितपत  जात असेल याचे खरेतर सर्वेक्षण करायला हवे. कदाचित माझ्या मनात जी शंका आहे ती चुकीची सुद्धा असू शकेल. पण नाटक, सिनेमा यांना प्रत्येकवेळी म्हणावी तशी गर्दी होत नाही. काही अपवाद वगळले तर बाकीचे सिनेमे आणि नाटक फार काळ चालत नाही, कारण त्यांना गर्दी नसते. प्रेक्षक नसतात. तरीही आज शहरांमध्ये खूप ठिकाणी मल्टीप्लेक्‍स आहेत, प्रेक्षागृह आहेत. मनोरंजन हा मानवी जगण्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या कामांच्या धबडग्यातून जेव्हा माणूस थोडा मोकळा वेळ काढतो आणि स्वतःचे रंजन करतो तेव्हा तो काढलेला वेळ वाया न घालवता सत्कारणी जातो. त्या वेळेमुळे काम करण्यास हत्तीचे बळ येते. म्हणून मला वाटते, मनोरंजनाची साधने बदलतील, पण मनोरंजन ही कल्पना तशीच राहीन. तिला अनेक पर्याय उपलब्ध होतील, त्या संकल्पनेत अनेक नवीन कल्पना जन्म घेतील, पण मूळ मनोरंजन करण्याची भावना तशीच राहील. पुढे अजून लाखो वर्षेतरी.. अशी कितीतरी ठिकाणे आहेत ज्यांची कदाचित मला नावे माहीत नाहीत. किंवा मी त्यांचा अनुभव घेतला नसेल. पण ती अस्तित्वात आहेत. पुढे ही सगळी ठिकाणे असतील , की मनोरंजन ही संकल्पना खूप वेगळ्या प्रकारे असेल? असा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा मी विचार करते, की पुढच्या शंभर वर्षांत सिनेमा हे माध्यम असेल? आणि ते जर असेल तर ते कसे असेल? डिजिटल गोष्टी आणि जगण्यातला डिजिटलपणा आज इतका वाढला आहे , की पुढच्या काही शंभर वर्षांत ते कुठल्या रूपाने, येऊ पाहणाऱ्या पिढीपुढे असेल असा विचार जरी केला तरी चक्कर येईल असे वाटते. कदाचित आपण हवेतून उडणाऱ्या, पाण्यातून धावणाऱ्या गाड्या अगदी आता जशी दोन चाकी आणि चार चाकी वापरतो तशी सर्रास वापरू. आपल्या घराघरात आपण फनसिटी निर्माण करू, मॉल असतीलच त्या काळात, पण ते उडणारे असतील, कदाचित जमिनीखालचे पण असतील. आज जशी आपल्या घराच्या जवळ रिक्षा येते, कार येते, बस येते, तशी उद्या आपल्या घराच्या अगदी, हाकेच्या पावलांवर रेल्वे, आणि विमान असेल. अगदी रोज आपण पुणे-दिल्ली प्रवास विमानाचा पास काढून करू शकू, जसे आत्ता काही लोक रोज पुणे-मुंबई हा प्रवास रेल्वेने रोज करतात तसा. कल्पना करू तितकी कमी आहे. कदाचित आपण स्वतः हवेत उडायचा प्रयत्न करू, किंवा अशी काही साधने बनवू ज्याने आपण एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकू. आणि हवे तेव्हा हवे तसे जगू शकू. म्हणजे मनोरंजनासाठी आपण काहीही करायला तयार असू, कुठल्याही प्रकारचे शोध लावू शकू. जे अशक्‍य आहे ते शक्‍य करून दाखवू शकू. किती अफाट आणि अमर्याद आहे हे सगळं. आपण आपली कल्पनाशक्ती वापरून आपला वेळ आपल्याला हवा तसा घालवून पहायला काय हरकत आहे? प्रयोग किमान करून पाहायला काय हरकत आहे? पण एक खरे, मनोरंजन हे सगळ्यांसाठी हवे, अगदी गरीब, श्रीमंत, रस्त्यावर राहणारे, बंगल्यात राहणारे, शहरात राहणारे, गावात राहणारे, अगदी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहणारे असोत, या सर्वांची ती मूलभूत गरज आहे. मग फक्त ते आपल्या खिशाला आणि मनाला जर पटत असेल तर आपल्याला मिळणारा जो मोकळा वेळ आहे तो सत्कारणी लागून त्यातून आपल्याला समाधान मिळावे एवढीच इच्छा मनात येते.

संबंधित बातम्या