पुरुष (’अ’)संवेदनशील?

अमृता देसर्डा
गुरुवार, 10 मे 2018

शब्दांची सावली
पुरुष त्याच्या भावना व्यक्त करण्यास बऱ्याचदा असमर्थ ठरतो. आपल्याकडे पुरुषाने त्याच्यातला हळवेपणा दाखवणे हे समाजमान्य नाही का? तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे? असे भाबडे प्रश्न मला कायम पडतात. 

मागच्या काही दिवसांत मी तीन चित्रपट पाहिले. ते म्हणजे ’बबन’, ’ब्लॅकमेल’, आणि ’न्यूड’. या तिन्ही चित्रपटांचा एक सामान्य प्रेक्षक म्हणून मी विचार करत होते, या तिन्ही चित्रपटांत एक समान गोष्ट जाणवली, ती म्हणजे पुरुषांची एक माणूस म्हणून असलेली असंवेदनशीलता. शहर असो किवा खेडेगाव. इथून तिथून पुरुषीवृत्ती ही सारखीच असते, असे या चित्रपटांच्या गोष्टीतून दिसून येते. स्त्रिया या एकूणच भारतीय समाजात एक वस्तू म्हणून पाहिल्या जातात, आणि वस्तूंची जशी किंमत असते तशीच स्त्रियांच्या माणूसपाणाची असते का असा प्रश्न हे चित्रपट पाहून मनात आले.  याचा अजून विचार केला तर काय जाणवते, अर्थात चित्रपटातून दाखवलेली कथा ही काल्पनिक असली तरीही एक संवेदनशील प्रेक्षक म्हणून मी त्या कथेचा एक भाग होते, आणि त्या चित्रपटात इतकी मग्न होते, की वास्तव थोडावेळ विसरून त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने जगू पाहते. असे कदाचित खूप कमी लोकांच्या बाबतीत होऊ शकेल. पण तरीही या तिन्ही चित्रपटांनी मला माझ्यातील अस्वस्थता पाहण्यास भाग पाडले. ही अस्वस्थता पाहत असताना मनात प्रश्न आले, ते म्हणजे पुरुष इतके क्रूर असतात? त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल अजिबात आदर नसतो? 'बबन' चित्रपटामध्ये जो नायक आहे, तो आणि त्याची प्रेयसी एकांतात असताना, त्यांच्या गावातले काही लोक त्यांना पाहतात, आणि त्याची प्रेयसी तिच्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या माणसाला अचानक गोळी मारते, आणि ते दोघे नंतर तिथून निघून जातात, आणि चक्क मुर्खासारखे तो नायक तिला तिच्या घरी एकटीला सोडतो, आणि तिथून सुसाट वेगाने निघून जातो. जणू काही तिच्यावर कुठलाच वाईट प्रसंग येणार नाही. सगळे काही ठीक होईल असा समज करून तो तिला त्या गावात एकटीला सोडतो. अर्थात तो चित्रपट आहे. पण तरीही मनात आले, नायक इतका अविचारी कसा? जी पुरुषांची झुंड त्याच्या प्रेयसीकडे वाईट नजरेने बघते, ती झुंड सुडाने तिच्या घरी जाणार नाही कशावरून? पुढे चित्रपटात ती झुंड तिच्या घरी जाऊन काय करते ते दाखवले पण आहे. एका असहाय, आणि कुठल्याच प्रकारचे बळ नसलेल्या मुलीला ते ज्याप्रमाणे वागणूक देतात ते पाहून पुरुष इतक्‍या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ही कल्पना करणे अवघड होते. हे झाले चित्रपटाचे. वास्तव तर खूप भयंकर आहे, मग तो उन्नाव मधील बलात्कार असो, नाहीतर काश्‍मीर मधील त्या कोवळ्या आठ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि खून असो. म्हणजे आजच्या समाजातले पुरुष हे राक्षस झाले आहेत. त्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त आपल्या इच्छा आणि वासना शमवून जगायचे आहे, मग त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.

  ’बबन’ मधला नायक रस्त्यावर राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला दूध देतो, पैसे देतो, आणि एकीकडे गावातल्या राजकारणात पडून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी साम,दाम, दंड, भेद वापरून स्वतःचा फायदा करून घेतो. एकाच पुरुषामध्ये इतक्‍या विसंगती असू शकतात? क्रूरता आणि दयाळूपणा या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीत असतात असे जर म्हटले तर, आणि माणूस म्हणून जर त्याला त्या तराजूत तोलले तर काय होईल? हा विचार मनात येऊन सुन्न व्हायला होते.  मग ब्लॅकमेलमधला नायक ज्या पद्धतीने त्याच्या बायकोच्या प्रियकराला हैराण करतो, आणि तो प्रियकर ज्या पद्धतीने त्याच्या बायकोला आणि चक्क त्या प्रेयसीला हैराण करतो ते पाहून डोकं सुन्न होते. विवाह होऊनही दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवणे ही गोष्ट आज समाजात अनैतिक ठरवली जाते, आणि स्त्रीने जर असे केले तर ते मोठे पाप समजले जाते. कारण चित्रपटात तो नायक शेवटी जिंकतो आणि सरळ त्याच्या बायकोचा नंबर त्याच्या मोबाईलमधून डिलीट करून तिला अगदी सहजपणे त्याच्या आयुष्यातून काढून टाकतो. इतक्‍या सहजपणे एखादा पुरुष आपल्या स्त्रीला त्याच्या आयुष्यातून वगळू शकेल? किंवा जी आई स्वतःच्या लेकरासाठी नवऱ्याचा व्यभिचार सहन करते, फक्त मुलाच्या भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी गाव सोडून, घर सोडून, नवरा सोडून मुंबईत येते, अगदी कणखर होऊन चार-चौघात नग्न होऊन मॉडेल बनते, आणि पोरासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवते, तिच्याविषयी कुठलाच हळवा कोपरा तिच्या मुलाच्या मनात असू नये? आणि तिने फक्त पैसे नाही दिले, तर ती शरीर-विक्रीचा व्यवसाय करते, असे तिच्यावर नाही नाही ते आरोप करून; मुलगा आईचा अपमान करतो तेव्हा त्या पुरुषाच्या मनात काहीच खळबळ माजत नाही? 

 पुरुषाला नक्की काय हवे आहे? स्त्रीचे असणे त्याला इतके त्रासदायक आहे? किंवा स्त्री ज्या संघर्षाने पुढे येते आहे, हे पुरुषाला पाहवत नाही? सगळे पुरुष नक्कीच असे नसतील. मग न्यूड मधला तो जयराम आहे, जो सावलीसारखा यमुनेबरोबर राहतो, पण त्याचे तिच्याविषयी वाटणारा हळवेपणा व्यक्त करत नाही, ती जाताना तिला चित्रा म्हणून हाक मारतो, आणि ती गेल्यावर तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरवतो. यातून काय निदर्शित होते? पुरुषाची संवेदनशीलता? की जो त्याच्या भावना स्वतः प्रेम करणाऱ्या व्यक्तीसमोर मांडण्यास असमर्थ ठरतो. अशी न व्यक्त होणारी संवेदनशीलता पुरुषात जर पाझरत असेल तर ती तो व्यक्त का करत नाही? आणि त्यात त्याची हार का होते, किंवा त्याने त्याच्यातला हळवेपणा दाखवणे हे समाजमान्य नाही का? तो पुरुष आहे म्हणून त्याने सदैव रांगडे, कडक आणि कोरडे राहिले पाहिजे ? हे भाबडे प्रश्न मला पडतात. 

लहानपणापासून वडील म्हणून आणि जर भाऊ असेल तर भाऊ म्हणून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे दोन पुरुष अनिवार्य अगदी जवळून येतातच. बाप आणि मुलीचे नाते, भाऊ आणि बहिणीचे नाते, हे पूर्णतः संवेदनशीलतेवर अवलंबून असते. मला नेहमी आठवते, मी शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी म्हणून जेव्हा मुंबईला जायचा विचार घरी मांडला, तेव्हा सगळ्यात जास्त काळजी वडिलांना वाटली. ते जेव्हा मला सोडायला आले, तेव्हा खूप रडले. मी एकटी कशी एवढ्या मोठ्या शहरात राहणार म्हणून त्यांचा जीव खालीवर झाला. एक पुरुष म्हणून तर त्यांनी कणखर असायला हवे, त्यांनी रडणे म्हणजे त्यांची संवेदनशीलता प्रकट करणे चुकीचे आहे काय? किंवा आपल्या मुलीला जे योग्य वाटते ते करू देणे आणि तिच्यावर विश्वास ठेवून तिला साथ देणे ही एक वडील म्हणून त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आमच्या बाप-लेकीच्या नात्याला किती वर नेते. यात कुठलाच स्वार्थी हेतू न ठेवता निखळ प्रेम असलेले नाते निर्माण झाले असे वाटत नाही का? 

 मग आजचा पुरुष हा खूपच क्रूर, कोरडा, भावनाहीन झाला आहे असे वेगवेगळ्या माध्यमांतून आपण जे पाहतो आहोत, समाजात जे घडत आहे ते खरे, की ’न्यूड’ मधील जो प्रोफेसर आहे त्याने त्याचे मुकपणे यमुनेवर प्रेम करणे खरे, की ब्लॅकमेल मधला नवरा नायक जेव्हा त्याची बायको वडिलांच्या टेस्टसाठी पैसे मागते, आणि तो लगेच तिला काढून देतो तो खरा असा प्रश्न मनाला वारंवार पडतो.  

 या ज्या पुरुष म्हणून ज्या काही प्रतिमा आपल्या मनात निर्माण होत आहेत, त्या नक्की खऱ्या आहेत? आणि त्या जर खऱ्या असतील तर त्या प्रचंड भयंकर आहेत असे मला वाटते. मग चित्रपटांतील पुरुष नायक असोत, किंवा रोजच्या जगण्यात व्यावहारिक पातळीवर, दैनंदिन पातळीवर संबंध येणारे पुरुष असोत. स्त्रिया त्यांच्या मनात कुठल्या प्रकारे पुरुषांची प्रतिमा तयार करत असतात आणि ती प्रक्रिया कशी असते हे सांगणे मोठे अवघड काम आहे. पण तरीही एक स्त्री-माणूस म्हणून जर माझ्या आजूबाजूला मी पाहिले तर पुरुष-माणूस म्हणून माझ्या समोर येणारे पुरुष हे संवेदनशील आहेत. ते माझा एक माणूस म्हणून आदर करत आहेत का हे मी सतत पाहत असते. ते माझ्याकडे फक्त वस्तू म्हणून तर पाहत नाही ना? आणि तर जे तसे पाहत असतील तर त्यांना वागणूक कशी द्यायची याचा विचार करते. अर्थात माणूस स्त्री असो किंवा पुरुष. दोघांच्या वृत्ती महत्त्वाच्या वाटत राहतात. फक्त संवेदनशीलता बोथट होऊ न देणे हा हेतू ठेवून, समाजात शांतपणे, सहनशील वृत्तीने जगणारे पुरुष आजही मोठ्या प्रमाणात आहेत. यावर विश्वास ठेवून, एक माणूस म्हणून स्त्रियांनी पुरुषांकडे पाहिले पाहिजे. पुरुषांनीदेखील स्त्रियांकडे त्याच आदराने एक माणूस म्हणून पाहिले पाहिजे, असे मनापासून वाटते.

संबंधित बातम्या