स्थिर-अस्थिरतेच्या प्रवासात...

अमृता देसर्डा
गुरुवार, 24 मे 2018

शब्दांची सावली
गर्दीतले विचार काही उपयोगाचे नसतात. ते माणसांच्या झुंडीसारखे कुचकामी आणि निरुपयोगी असतात. कारण त्यांना एक सलग अशी दिशा नसते. ते विचार जास्त गोंधळलेले असतात, ते फक्त असतात. त्यांना काही अर्थ नसतो. तरीही मी धडपडत होते. त्यातून काहीतरी मला मिळेल किंवा सापडेल ज्याने माझ्या मनातल्या विचारांचा वेग थोडा कमी होऊन मला स्थिरता मिळेल.

रेल्वेतून जाताना आपण त्या रेल्वेसोबत धावत असतो, गाडीतले सगळे प्रवासी, त्यांच्याबरोबर असलेले सामान, बाहेरचे सगळे जे जे दिसेल ते धावत असते. म्हणजे वर पोकळ पण भरीव दिसणारे आकाश. एका ठिकाणी पक्की असलेली पण तरीही धावत राहणारी झाडे, काळी, लाल, तपकिरी जमीन, चौकोनी दिसणाऱ्या ठोकळेबाज इमारती, कौलारू घरे अशा असंख्य गोष्टी त्या रेल्वेच्या वेगात एकरूप होऊन जायचा प्रयत्न करत असतात. किती भारी वाटते आपण कुठल्यातरी गतीत असताना. म्हणजे आपण चोवीस तास एका गतीत फिरत असतो. पृथ्वीची पण भ्रमंती सुरू असते, फक्त ती इतकी संथ हलत असते, की आपण पण तिच्या बरोबर हलतो आहोत हे आपल्याला कळत नाही. पृथ्वीबरोबर आपण प्रवास करत असतो. तो प्रवास पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र यांच्या माध्यमातून चालू असतो. रोज आपण पृथ्वीबरोबरच्या प्रवासाला खूप गृहीत धरतो. इतकं गृहीत धरतो, की तो आपण करत आहोत हे आपल्याला जाणवत देखील नाही. याचा अर्थ आपण सतत एका विशिष्ट वेगात जगत असतो. त्या वेगळा  लय आणि गती असते. फक्त रेल्वेतला वेग किंवा एखाद्या गाडीवर बसून प्रवास करताना अनुभवत असलेला वेग हा मात्र चटकन मेंदूला कळतो. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपली ऊर्जा त्या वेगाला बरोबर पकडते, आणि आपण एका वेगळ्याच विश्वात वेगाने जातो. या विश्वाला आपण प्रवास असे नाव देतो. हा प्रवास रोज होत असतो, प्रत्येक श्वासाला होत असतो. रोजच्या या वेगाच्या संथ लयीत आपण इतके एकरूप होतो की आपण या पृथ्वीचा एक अविभाज्य घटक आहोत हे विसरून जातो. 

वेगाला आपण कधी बांधून ठेवू शकत नाही. कारण तो सतत पुढे जात असतो. आणि आपल्याला देखील तो पुढे नेत असतो. पण तरीही या वेगात आपण निवांत जगण्याचे क्षण शोधत असतो. वेगाने आपल्यासाठी थांबावे असे आपल्याला वाटत असते. त्यातून आपण आपली स्वस्थता शोधत असतो, त्याला आपल्यासाठी थांबवायचा प्रयत्न करतो. हा प्रवास आपल्याला कळून येत नाही. एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाताना आपल्या मनात आपण त्या ठिकाणी कधी एकदाचे पोचतो आहोत असे होऊन जाते. आणि त्या पोहोचण्याच्या मधल्या काळात आपण आपल्या मनातल्या विचारांना त्या प्रवासातल्या वेगाइतका वेग देतो. कधीकधी तो वेग हळू होतो, तर एकदम त्याच्याही पुढे जातो आणि कधी एकदा तो स्थिर होईल असे वाटत राहते, पण तो पुढे जातो. तो आपल्यात असतो. 

 या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर काय जाणवेल? असा मी स्वतःला जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा मी काहीक्षण थांबले. माझे विचार गोंधळले. मनात विचारांचा कोलाहल सुरू झाला. मला जणू काही मी रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आहे,  आणि तिथं जशी माणसांची प्रचंड गर्दी असते, तशी माझ्या मनात विचारांची गर्दी निर्माण झाली. आणि तो विचारांचा प्रवास मला नकोसा झाला. अशा गर्दीतले विचार काही उपयोगाचे नसतात. ते माणसांच्या झुंडीसारखे कुचकामी आणि निरुपयोगी असतात कारण त्यांना एक सलग अशी दिशा नसते. ते विचार जास्त गोंधळलेले असतात, ते फक्त असतात. त्यांना काही अर्थ नसतो. तरीही मी धडपडत होते. त्यातून काहीतरी मला मिळेल किंवा सापडेल ज्याने माझ्या मनातल्या विचारांचा वेग थोडा कमी होऊन मला स्थिरता मिळेल. 

माणसाच्या जगण्यात स्थिरता आहे?  स्थिरता म्हणजे काय? त्याला कुठल्या गोष्टी स्थिर करू शकतील? त्याला वेग तर अजिबात स्थिर करू शकत नाही, कारण वेगाला स्थिरता हा शब्दच माहीत नसतो. पण तरीही जगण्याच्या अफाट वेगातही आपण स्थिरतेच्या प्रवासाकडे जाऊ पाहतो. ती स्थिरता आपल्याला कशी हवी असते? तर ती एकसलग, भंग न पावणारी, आणि सदैव आनंदाचा अनुभव देणारी अशी हवी असते. पण तसा आनंद आपल्याला प्रत्येकवेळी मिळत नाही. आपण स्थिर-अस्थिरतेच्या डोहात तरंगत असतो. त्या अर्थाने आपण खूप लहरी जगत असतो. त्या लहरींना कसा वेग असावा, किती वेग असावा, याची गणिते अचूक मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण ते गणित प्रत्येकवेळी सोडवता येईलच असे नाही. 

चोवीस तासांचे हे दिवसाचे चक्र आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या खाजगी आणि सार्वजनिक जगण्यातले हे चोवीस तास आपण कसे घालवायचे, काय काम करायचे याचे चक्र मात्र आपल्या एकट्याच्या हातात असते. त्यावर फक्त आपला हक्क असतो. कुणी परका माणूस त्यावर आक्रमण करू शकत नाही. कुणी आपले तास घ्यावे, कुणी न घ्यावे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते असे वाटते. या चोवीस तासांच्या काळाला जी गती असते, ती गती प्रत्येकवेळी आपण अनुभवूच असे नाही. निसर्ग जसा पृथ्वीचा वेग पकडून पुढे जात असतो, तसे माणसाचे नसते, माणूस त्याच्या जगण्याचा वेग हा कमी-जास्त करून पृथ्वीच्या वेगात पण सामील होतो हे माणसाचे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जर आपल्याला पृथ्वीचा वेग थांबवायचा काही मार्ग भविष्यात सापडला तर किती गंमत होईल. बापरे, कल्पना पण करू शकणार नाही आपण. इतका आमूलाग्र बदल आपल्या जगण्यात होईल. पृथ्वीने जर ठरवले, आज स्वतःभोवती फिरायचेच नाही, एकाच ठिकाणी थांबायचे तर? पण माणूस असा स्वतःला थांबवू शकेल? आणि पृथ्वीला? म्हणजे सगळेच थांबेल. वेग, काळ, गती, लय एका क्षणात नाहीशा होतील. सूर्याचा प्रकाश, वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकू? पण त्या जर नाहीशा झाल्या तर खरी स्थिरता आपल्याला  मिळेल? मला नाही वाटत आपण या सर्व गोष्टी जरी थांबवल्या तरी आपल्याला स्थिरता मिळेल. कारण स्थिरता म्हणजे काही सगळे थांबणे किंवा आपण प्रयत्नपूर्वक थांबवणे नव्हे. ती एक जगण्यातली संकल्पना आहे. आणि ती व्यक्तिसापेक्ष आहे असे वाटते. एका बाजूला स्थिरता म्हणजे जगणे थांबणे असेही वाटते. म्हणजे आपल्या जन्माला एक प्रकारचा वेग असतो, आणि मृत्यूला कुठलाही वेग नसतो. तो येतो तेव्हा तो पूर्णतः स्थिर होतो. 

काहीजण म्हणतात, मला कधीच स्थिरता आली नाही. म्हणजे त्यांना भौतिक स्थिरता अपेक्षित असते. एखाद्याला नोकरी नसेल किंवा असली तरी तुटपुंजा पगार असेल, आणि त्याचे रोजचे जगणे जर अभावाचे असेल, त्याच्याकडे स्वतःचे घर नसेल जमीन नसेल तर तो माणूस स्वतःला अस्थिर समजतो. त्यासाठी तो झगडतो, आणि त्याच्या जगण्याचा वेग निर्माण करतो. याचा अर्थ काय? तो त्याची आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि राजकीय अस्थिरता कमी करण्यासाठी धडपडतो. म्हणजेच माणूस त्याच्या जगण्याचा वेग स्वतः निर्माण करतो. हा वेग त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. कारण त्याला अस्थिरतेकडून लवकरात लवकर स्थिरतेच्या प्रवासाकडे जायचे असते. त्याचे ध्येय हे स्थिरता असते. पण आपण पृथ्वीचा वेग थांबवू शकत नाही. तिच्या वेगाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, किंवा तिला वगळून आपण पुढेही जाऊ शकत नाही. ही आपली मर्यादा आहे. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम असो. अगदी कुठलेही, त्या कामांना आपण दिलेला वेग थांबवू शकतो, किंबहुना आपण त्या गोष्टी नियंत्रित करू शकतो. पण पृथ्वीने जो वेग आपल्याला दिला आहे तो मात्र आपण आजही थांबवू शकलेलो नाही. शास्त्र, संशोधन कितीही पुढे गेले तरी काळाच्या वेगाला आपण थांबवू शकू असे वाटत नाही. 

हा वेगाचा प्रवास म्हणजेच आपले जगणे आहे असे वाटत राहते. आपल्या जगण्याला स्पर्धेचा, गतीचा आणि पुढे जाण्याचा प्रचंड वेग आहे. जसे रस्त्यावर वाहने चालवताना वेग ताब्यात ठेवून ज्याप्रमाणे वाहक चालवत असतो, तसे आपण आपले जगणे आपल्या हातात ठेवून आपल्या क्षमतेनुसार, गरजेनुसार आपण ते चालवत राहतो. मग कधी ठेचकाळतो, तर कधी अडखळतो, तर कधी एकदम सुसाट होऊन वेगालाही मागे टाकून पुढे जातो. हे असे चढ-उतार सतत जगण्यात येत असतात. आणि त्यातून आपण आपली स्थिरता शोधत असतो. स्वस्थ- अस्वस्थतेचा आपला प्रवास हा आपल्याही नकळत हळूहळू चालू राहतो. 

स्वस्थता ही आपल्या वेगावर अवलंबून आहे किंवा असते असे उगाच वाटत राहते. आणि वेग हा आपल्या आणि आजूबाजूच्या एकूणच वातावरणावर अवलंबून आहे असे वाटते. आपला भवताल हा सतत बदलतो. त्याला वेग येतो, तसा आपल्या आतल्या विचारांचा भवताल देखील बदलत असतो. तो जमिनीच्या एखाद्या तुकड्यासारखा असतो, जो ऊन, वारा आणि पाऊस या तिघांच्या येण्याने जसा बदलतो, अगदी तसाच आपल्या मनातला विचारांचा भवताल हा आपल्या असलेल्या स्थिर-अस्थिरपणाच्या भावनेवर अवलंबून असतो. आपल्यातली जी स्थिरतेची भावना आहे ती या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. 

हे गतीचे, काळाचे, आणि वेगाचे चक्र पृथ्वी जसे जगते, अगदी तसेच चक्र आपण पृथ्वीचा एक अंश असल्यामुळे जगत असतो. फक्त हे प्रत्येक क्षणाला जाणवत नाही, कारण आपण आपल्या वेगाचे, काळाचे, आणि गतीचे अगणित भास निर्माण करून, त्या चक्रात स्वतःला अडकवतो, आणि आपल्या परीने आपल्या जगण्याचा अर्थ काढत राहून आपणच निर्माण केलेल्या वेगाला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात एका विशिष्ट गतीने जगत राहतो.

संबंधित बातम्या