स्वत:च्या भाषेचा आवाज!

अमृता देसर्डा
गुरुवार, 7 जून 2018

शब्दांची सावली
पुढच्या शंभर वर्षांत मराठी असेलच यात शंका नाही; पण ती किती जणांना लिहिता आणि वाचता येईल? मराठी शाळा सगळ्या बंदच होतील? पुढच्या शंभर वर्षांत मराठीचे स्वरूप बदलेल? किंवा ही पिढी नवीनच कुठलीतरी वेगळी भाषा निर्माण करेल? जशी संगणकाची आहे, तंत्रज्ञानाची आहे. त्यांची नवी भाषा कशी असेल?

‘‘नो क्राय, नो क्राय, तू स्ट्राँग बॉय, स्टॉप क्राय. मी आहे ना इथे, कम हिअर, तुझे डॅड आहेत ना इथे, चल, नो क्राय, स्माईल स्माईल.’’ 

असं एक वडील त्याच्या खेळताना पडलेल्या लहान मुलाशी बोलत होते. वडिलांचे बोलणे ऐकून सगळेजण पाहत आहेत, हे पाहून त्याने भोंगा पसरला. आम्ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जमलो होतो. गप्पा  गोष्टी करत होतो. अर्धवट इंग्रजी, मराठी शब्द कानावर पडले आणि मला कसेतरीच झाले. आम्ही त्या मुलाकडे गेलो. त्याची चौकशी केली, त्याचे वडील मोडक्‍या तोडक्‍या इंग्रजीतून त्याच्याशी बोलत होते, त्या मुलाचे सांत्वन करत होते. मी त्याच्या वडिलांना विचारले, 

’’ तुम्ही असे अर्धवट इंग्रजी आणि मराठी का बोलत आहात? सॉरी, म्हणजे ते ऐकायला जरा विचित्र वाटतेय, तुम्हाला राग आला असेल तर ...’’
’’ अहो, नो सॉरी, नो नो सॉरी.’’ असे म्हणून ते माझ्याकडे पाहून परत ओशाळून म्हणाले, 

’’ त्याचं काय आहे, पर्वा आम्ही अन्वयच्या शाळेत पेरेंट्‌स मिटींगला गेलो होतो, आणि त्यांच्या मिसने सांगितले, की आपल्या मुलांशी शक्‍यतो इंग्रजीमधून बोलायचे. म्हणजे त्यांना आत्तापासूनच सवय लागेल. मी कधी इंग्रजी माध्यमातून शिकलो नाही, आमच्या हिचा आग्रह इंग्रजी मीडियम मध्येच टाकायचे, तेही सी.बी.एस.ई बोर्डात टाकायचे. त्यामुळे आम्ही पण सध्या इंग्रजी शिकतोय.’’

हे ऐकून मी फक्त हसले. काहीच बोलले नाही, माझ्या पर्समधून त्या मुलाला श्रीखंडाची गोळी दिली, त्याने ती उत्सुक नजरेने घेतली तोंडात टाकली आणि तो खूप गोड हसला. मला चक्क मराठीत काकू म्हणाला आणि इंग्रजीतून ’थॅंक यू’ म्हणाला. मी त्याचे आभार घेतले आणि मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील व्हायचा उगाच प्रयत्न करू लागले. 

मैत्रिणीचा मुलगा देखील कॉन्व्हेंटमध्ये शिकत होता, त्याला मी मुद्दाम मराठी पुस्तकं घेतली. लहान मुलांची. चार-पाच पुस्तके घेतली. त्यावर मराठीत स्वहस्ताक्षरात संदेश लिहून दिला. मला माहीत नाही, तो मराठी कितपत वाचेल, पण मैत्रिणीला सांगितले, जरा बाजूला घेऊन, ’’त्याला झोपताना रोज एक गोष्ट वाचून दाखव. आणि मला सांग त्याला गोष्टी कशा वाटल्या त्या.’’ 

यानंतर बरेच दिवस गेले, आमचं फोनवर अधून मधून बोलणं झालं, पण तिच्या मुलाच्या शाळेच्या प्रवेशाच्या प्रक्रियेत ती व्यग्र झाली. आणि मग मी दिलेल्या पुस्तकांचे काय झाले हे बोलणेच आमचे राहून गेले. 

पुण्यात सदाशिवपेठेत एक आज्जी ओळखीच्या झाल्या आहेत. कधीकधी त्यांच्या घरी जाते, तेव्हा त्यांच्या नातवाबरोबर खेळण्याचा मी प्रयत्न करते. तो सहा वर्षांचा आहे. आधी आधी तर तो पाहायचा पण नाही. पण काही कामासाठी जेव्हा जायला लागले, तेव्हा हळूहळू ओळख वाढली, मग तो मला ओळखू लागला.  एकदा मी त्यांच्याकडे गेले होते, तर त्यांचा नातू वही पेन घेऊन त्यावर काहीतरी काढत होता. ओळख झाल्यामुळे त्याने त्याचे वही पेन माझ्या ताब्यात दिले. मी त्यावर मराठीतून त्याचे नाव लिहिले. 

त्याने निरागस पणे विचारले, ’’ दीदी, तू हे काय लिहिलेस?’’ 

’’ बेटा, तू सांग मला, मी काय लिहिले आहे ते?’’ 

’’ मला कळत नाही, हे मराठी आहे ना?’’ 

’’ हो.’’

’’ मग इंग्लिशमधून हे लिही, मी ओळखतो.’’ 

मी त्याच्या नावांचे इंग्रजीतून लेटर लिहिले, आणि मग चटकन त्याने मी त्याचे नाव लिहिले आहे हे सांगितले. मला धक्काच बसला. म्हणजे त्याला मराठी अक्षरांची ओळखच झाली नव्हती, फक्त इंग्रजी अक्षरांची ओळख होती.  मी त्याच्या आज्जीला विचारले, ’’यांना शाळेत मराठी शिकवत नाहीत का?’’ 

’’ नाही, त्याला मराठी अक्षरांची ओळख करून दिली जात नाही, त्यांना डायरेक्‍ट इंग्रजीची  लेटर शिकवली आहे.’’

’’मग शाळेत त्यांना मराठी शिकवणार नाही? मग त्यांना मराठीतून लिहिता वाचता कसे येईल?’’ 

’’त्यांनी सांगितले आहे, घरी शिकवायचे असेल तर तुम्ही मराठी घरीच शिकवा, शाळेत कम्पलसरी इंग्रजीच शिकवले जाईल, आणि बोलले देखील इंग्रजीतूनच जाईल.’’ 

त्यांचे हे बोलणे ऐकून, त्या वहीतली देवनागरी आणि इंग्रजी अक्षरे माझ्या डोळ्यांपुढे गरागरा फिरू लागली. 

’’बापरे, म्हणजे मराठी शिकायचे असेल तर घरात शिकवायचे. मग तुम्ही का नाही शिकवले?’’ 

’’आता बाजारात पूर्वी मिळत होत्या तशा  मराठीतून पाट्या मिळत नाहीत, आणि ते तक्ते पण मिळत नाही, संपूर्ण तुळशीबाग पालथी घातली. आणि त्याचा शाळेचा, पाळणाघरातला दिवसच इतका भरगच्च असतो, की मराठी शिकवायला वेळच मिळत नाही, ना त्याच्या आईला आणि बाबांना पण.’’ 

’’ म्हणजे मग तो अक्षर ओळख कधी शिकणार?’’ 

डॉक्‍टर आज्जी काहीच बोलल्या नाहीत. आमचे संभाषण असे अर्धवट थांबले. मी तिथून अस्वस्थ होऊन बाहेर पडले. या लहान मुलांना मराठीची अक्षर ओळख नाही, फारसे आई-वडील घरात नसल्यामुळे, आणि सतत बाहेर असल्यामुळे या मुलांना मराठी पुस्तके, वाचन या गोष्टी सांगायला कुणाला वेळ नाही. शाळेत इंग्रजी अनिवार्य, संस्कृत आहे पण ते पाठांतर स्वरूपात, लेखी स्वरूपात लहानपणापासून नाही, आणि घरी, शाळेत, पाळणा-घरात इंग्रजीतून संभाषण करण्याला महत्त्व दिले जाते त्यामुळे मराठी ऐकणे, बोलणे फार नाही. किती गोंधळ होत असेल या मुलांचा. त्यात जे मराठी भाषिक नाहीत त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्रजीतून संवाद करायचा. म्हणजे मराठी फक्त घरात बोलली जाणार. मला तर विचार करून करून आणि उत्तर सापडेल का या प्रश्नावर म्हणून डोक्‍यात मुंग्या यायला लागल्या. 

हे दोन्ही प्रसंग तसे म्हणायला गेले तर फार विशेष नाही. हल्ली आर्थिक परिस्थिती जरा बरी असलेले पालक आणि अजिबातच चांगली नसलेले पालक देखील त्यांच्या मुलांना सी.बी एस.ई, कॉन्व्हेंट मध्ये टाकतात, आणि अगदी शी.शु. विहार, बालवाडी, मोठा गट, छोटा गट हे प्राथमिक शिक्षणाच्या आधीचे टप्पे देखील इंग्रजीतूनच शिकवतात. स्वतःहून अगदी कमी पाल्य त्यांच्या मुलांना मुद्दाम मराठी शाळेत टाकतात तेही अगदी बोटांवर मोजण्याइतकेच असतील. ही लहान मुले जी सध्या शिक्षणाच्या वाटेवर आहेत, आणि ज्या मुलांच्या आई-वडिलांची मातृभाषा मराठी आहे त्यांच्या घरात बहुतांशकरून आजही मराठी बोलले जाते, मराठीतून विचार केला जातो, पण त्या मुलांची जडणघडण परक्‍या भाषेतून होतेय. ही भाषा वाईट अजिबात नाही, पण मग जिथे मराठीतून विचार केला जातो, त्या वातावरणात ती मुले कशी वाढतील? त्यांची आजूबाजूची परिस्थिती किती बदलते आहे, ही मुले कशी सामोरी जातील या बदलांना. प्राथमिक शिक्षणाला जणूकाही उच्च शिक्षण घ्यावे इतका खर्च सध्या पालक करत आहेत. त्यासाठी घरातून बारा - बारा तास बाहेर राहून, एक एक पैसा जमवून शिक्षणसंस्थांना देत आहेत. सरकारी मराठी शाळा तर आत्ताच गुणवत्तेअभावी आणि शिक्षकांअभावी बंद पाडण्याचा निर्णय शासन घेत आहे. त्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात घमासान चालू आहे. राज्यघटनेतली मुलभूत हक्कांची आणि विशेषतः शिक्षण हा लहान मुलांचा मुलभूत हक्क आहे, हे कलम रद्द होतं आहे, की काय असे वाटायला लागले आहे. म्हणजे शिक्षण आपण देतो आहोत, पालक त्यांचे कर्तव्य उत्तम निभावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरेच आपण त्यांना जसे हवे तसे शिक्षण देत आहोत? या शिक्षणामुळे ही मुले व्यापक होतील एक माणूस म्हणून? 

आपल्या पुढच्या पिढीला नक्की कुठे नेतो आहोत आपण? त्यांना स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी त्यांना एकदम ’दम लगाके’ तयार होण्यासाठी भलत्याच गोष्टी करायला लावत नाही ना आपण? त्यांना समज आली, आणि त्यांनी माझ्या पिढीवर, माझ्या आधीच्या पिढीवर आरोप केले तर, खोडू शकू का आपण त्यांचे आरोप? जो त्यांचा मुलभूत हक्क आहे, तो हिरावून घेतो आहोत का? त्यांना जीवघेण्या स्पर्धेच्या तोंडी टाकून आणि त्यांचे लहानपण गमावून तर बसणार नाही ना आपण? 

पुढच्या पिढीचा क्षणभर विचार नको करूयात. पण मग आपल्या भाषेचे काय? त्यांना कदाचित मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,  जर्मन, फ्रेंच उत्तम बोलता येईलही. पण मग ते स्वतःशी कुठल्या भाषेतून बोलतील? विचार नक्की कुठल्या भाषेतून करतील? पुढच्या शंभर वर्षांत मराठी असेलच यात शंका नाही पण ती किती जणांना लिहिता आणि वाचता येईल? मराठी शाळा सगळ्या बंदच होतील? पुढच्या शंभर वर्षात मराठीचे स्वरूप बदलेल? किंवा ही पिढी नवीनच कोणीतरी वेगळी भाषा निर्माण करेल? जशी संगणकाची आहे, तंत्रज्ञानाची आहे. त्यांची नवी भाषा कशी असेल? मला खूप प्रश्न पडायला लागले. आणि मनातून पूर्ण मराठीतून विचार करणारी मी मौनात गेले. मौनाला कुठली भाषा नसते. पण तरीही भाषा जर टिकवायची असेल तर ती नुसती बोलूनच चालणार नाही, तर ती लिहिता, वाचता आली पाहिजे, नुसती लिहिता वाचता नाही, तर त्यातून विचार करून रोजगार निर्माण झाला पाहिजे. असे पुढच्या शंभर वर्षांत मराठीचे होईल?  मराठीतून रोजगार उपलब्ध होतील? भाषेचे असे किती वय असते? ती चिरकाल टिकू शकेल का? 

मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील की नाही माहीत नाही. पण मराठीतून विचार करून लिहिणे आणि ते वाचणे मला खूप महत्त्वाचे वाटते. आपली स्वतःची भाषा आहे तिला जर असे आपण डावलत गेलो, तर एक चांगला माणूस म्हणून आपली वाढ कशी होईल? इंग्रजीतून आपण स्वतःला व्यक्त करू देखील, पण जो आपल्या आतला आवाज आहे, तो नक्की कुठल्या भाषेत असेल? तो पुढच्या पिढीचा आवाज हळूहळू बदलतो आहे हे वरच्या दोन प्रसंगांतून मला प्रकर्षाने जाणवू लागले आहे.

संबंधित बातम्या