जगण्यातलं माणसाचं गाठोडं...

अमृता देसर्डा
गुरुवार, 5 जुलै 2018

शब्दांची सावली
समोरचा माणूस तुमच्या व्यक्तित्वाबद्दल कशा पद्धतीचा विचार करतो हे एका भेटीत कधीच कळत नाही. ती हळूहळू कळण्याची प्रक्रिया असते. कधीकधी तर त्या माणसाबरोबर आपण दिवस रात्र असतो किंवा अनेक वर्षे त्या माणसाच्या प्रदीर्घ सहवासात राहतो. तरीही त्याच्या मनात आपल्याबद्दल असलेली भावना कळत नाही.

रोजच्या जगण्यात जे अनुभव येत असतात त्यानं खरंतर आपण घडत असतो. मग तो अनुभव काम करतानाचा असो, किंवा बाहेर गेल्यावर वेगवेगळ्या माणसांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा असो. माणसांशी बोलून, त्यांच्या संपर्कात राहून आपण त्यांच्याशी नाती नकळत जोडत राहतो. काहीजण खूप जवळ येतात, तर काहीजण फक्त हाय-बाय पुरतं बोलत राहतात. याबाबतीत मी जेव्हा स्वतःशी विचार करते तेव्हा माझ्या डोक्‍यात अनेक गोष्टींची गर्दी होते. जर त्या विचारांच्या गर्दीकडे नीट पाहिलं तर एक एक गोष्ट हळूहळू समजू लागते, त्या गोष्टीचं आकलन होतं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांच्या ओळखी होणं आणि त्या टिकवत टिकवत त्यांच्याशी एक असं नातं निर्माण करत जाणं ज्या नात्याला कुठलंही नाव नसेल. मग त्या ओळखी कामासंदर्भात असतील, किंवा बिनकामाच्या अशाच ओळखी झालेल्या असतील. त्या ओळखीतून फक्त आनंद मिळेल, त्यात कुठलाही स्वार्थ किंवा छुपा हेतू नसेल, किंवा स्वार्थ असला तरी त्यातून कुणाच्या आयुष्यावर होणारा वाईट परिणाम नसेल. 

माणूस त्याच्या माणसांचं एक गाठोडं करत राहतो, आणि स्वतःच्या मनात त्यांची खूणगाठ बांधत राहतो. हल्ली रोजचा दिवस ही सतत धावत असतो. म्हणजे घड्याळ त्याच्या ठिकाणी आहे, वेळ त्याच्या ठिकाणी आहे; पण आपण मात्र त्यात वेगानं फिरत असतो. अगदी घरातली माणसं, आपले आई-वडील, भाऊ-बहीण, नवरा-बायको किंवा अगदीच मित्र-मैत्रिणी या सर्वांना एकत्र बांधून ठेवायचा प्रयत्न आपण करत असतो, आणि त्यातूनच त्या नात्यांचा पोत ठरतो. काही माणसं अशी असतात, की त्यांच्या सहवासात नुसतं आलं आणि त्यांच्याशी काहीच बोललं नाही तरी बरं वाटत राहतं. त्यांचं असणं आपल्याला हवं वाटत राहतं. त्यांच्या आजूबाजूला जरी आपण राहिलो तरी आपल्याला आधार वाटतो. तर अशा माणसांच्या शोधात आपण सतत राहिलं पाहिजे असं वाटत राहतं. अर्थात त्यासाठी आपण देखील तशा प्रकारचा माणूस होऊ, जेणेकरून आपल्यामुळे इतरांना चांगलं वाटेल असंही वाटलं पाहिजे. 

 माझ्या ओळखीत अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांच्या सहवासात येऊन, त्यांच्याशी बोलून, त्यांच्या संपर्कात राहून मला आनंद वाटला आहे. वाटतो आहे, आणि वाटत राहणार आहे; पण काही माणसं याच्या अगदी उलट असतात. त्यांच्याशी आपले सूर जुळत नाहीत. अगदी पहिल्या भेटीतच काहीतरी वेगळं त्यांच्याबद्दल वाटत राहतं, जे सांगता येत नाही, पण आतून जाणवत राहतं. मग त्यांच्याशी आपोआप संपर्क होत नाही. ती माणसं आजूबाजूला असूनही आपल्या कक्षेत सामावत नाहीत. कधीकधी आपले माणसांना ओळखायचे अंदाज चुकतात. काहीजण पहिल्या भेटीत फारशी पटत नाहीत, पण हळूहळू जेव्हा ओळख वाढते तेव्हा ते कसे आहेत, त्यांची वृत्ती कशी आहे हे कळत जाते, आणि मग आपल्या मनात त्यांच्याबद्दल जी प्रतिमा असते, ती बदलते. 

 काही माणसं वरवर गोड बोलतात, आणि आतून मात्र आपल्याबद्दल वेगळाच विचार करतात. जो आपल्या कल्पनेच्या पलीकडचा असू शकतो. समोरचा माणूस तुमच्या व्यक्तित्वाबद्दल कशा पद्धतीचा विचार करतो हे एका भेटीत कधीच कळत नाही. ती हळूहळू कळण्याची प्रक्रिया असते. कधीकधी तर त्या माणसाबरोबर आपण दिवस रात्र असतो. किंवा अनेक वर्षे त्या माणसाच्या प्रदीर्घ सहवासात राहतो तरीही त्याच्या मनात आपल्याबद्दल असलेली भावना कळून येत नाही, किंवा जे आकलन झाले आहे कदाचित ते चुकीचं देखील असू शकतं. पण या अचाट नात्यांच्या जंजाळात आपलीच माणसं आपल्याला जर ओळखता आली नाही, आणि आपल्या माणसाचं गाठोडं जर चुकून सुटलं तर त्या नात्यांचा नुसताच पसारा होतो; आणि तो झालेला पसारा निस्तरणं हे म्हणावं तितकं सोपं काम नसतं. 

एकदा रस्त्यावर खूप रहदारी होती, त्यात एक माणूस बडबड करत चालला होता. कुणाला तरी शिव्या देत होता. तोंड वेडेवाकडं करून मोठ्यानं बोलत होता, रडतही होता. त्याच्या अंगावर चांगले कपडे होते, तो भिकारी निश्‍चित नव्हता. त्याच्या पेहरावावरून तो चांगल्या घरातला वाटत होता. त्या गर्दीतले काही लोक त्याच्याकडे पाहून ओरडले, पण अनेकांनी दुर्लक्ष केलं. त्याचं ओरडणं ऐकून एकदम कसतरी झालं. वाटलं हा माणूस का ओरडत होता, कुणाला आणि कशाला शिव्या देत होता? त्याच्या स्वतःच्या माणसांच्या गाठोड्यात त्याची माणसं उरली नाहीत का? तो एकटा पडला आहे का? असे खूप प्रश्न मला पडले. अर्थात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती, आणि त्याला तो का ओरडतो आहे हे विचारण्याची माझी तेव्हा हिंमत  नव्हती. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण सहज सोडून देतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यापैकीच ही एक गोष्ट आहे, अशी मी मनाची समजूत काढली आणि त्या रस्त्यावरून पुढं जायला निघाले. 

पण माझ्या मनात त्याचं ओरडणं अधेमध्ये ऐकू येत होतं. आणि ते ऐकणं मला अस्वस्थ करून सोडत होतं. त्याच दरम्यान मी लियो टॉलस्टॉय यांचं ’नीती अनीतीच्या कथा’  नावाचं पुस्तक वाचत होते. त्यात एक गोष्ट आहे. ’माणूस कशाच्या बळावर जगतो’ या नावाची. त्या गोष्टीत एक थंडीत कुडकुडणारा माणूस जेव्हा त्या कथेतल्या गरीब नायकाला दिसतो, तेव्हा त्याला पाहून त्याची दया येते, आणि इतक्‍या थंडीतही त्याचा फाटलेला कोट तो त्या माणसाला देतो आणि स्वतः थंडीत कुडकुडत त्याला घेऊन घरी जातो. त्याला आपल्या घरात जागा देतो, त्याला घासातला घास देतो. मुख्य म्हणजे त्याला आधार देतो. एकटं सोडत नाही. 

 हे वाचून मला खूप आश्‍चर्य वाटलं. मी ती गोष्ट दोन वेळा वाचली, अगदी काळजीपूर्वक आणि नकळत मला आणि त्या कथेतल्या नायकाला तराजूत तोलू लागले. मी त्याच्या जागी असते तर फारतर फार त्या माणसाला माझ्या अंगातला स्वेटर देण्याचा विचार केला असता. पण त्या माणसाला घरी घेऊन गेले नसते. त्याला फक्त काहीतरी खाऊ घातले असते, पण या झाल्या शक्‍यता. त्याही शंभरटक्के केल्याच असत्या असेही नाही. कारण आत्ताच्या काळात जशी स्वतःच्या गाडीवर फिरणारी अनेक माणसं आहेत, तशीच रस्त्यावर राहणारी अनेक माणसं आहेत. प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या जगण्याची व्यवधानं आहेत. जो तो माणूस त्याच्या अडचणींमध्ये गुंतलेला आहे. तर मग त्या कथेतल्या नायकासारखं वागणं म्हणजे खूपच आदर्श. अर्थात त्या नायकालापण दोन वेळच्या खाण्याची मारामार होती. त्याची बायको, मुलं उपाशी होती. रोजच्या जगण्याची त्याला पण काळजी होती. तरीही त्या गोष्टीत पराकोटीची करुणा  टॉलस्टॉय यांनी दाखवली. माणूस  कशाच्या गोष्टीवर जगत असतो तर त्याला प्रेम, करुणा आणि आपलेपणा यागोष्टींशिवाय त्याला जगता येत नाही. पण मग जर आपण या गोष्टींच्या बळावर जगत असू, तर मग आपण का कलह करतो, एकमेकांचा द्वेष का करतो? एकमेकांबद्दल अढी मनात का ठेवतो? आणि ती मनातून सहजासहजी काढून का टाकू शकत नाहीत. उगाच कल्पनेनं गैरसमज वाढवत बसतो, त्या माणसाच्या नकारात्मक प्रतिमा डोक्‍यात एकदम फिट्ट करून घेतो, आणि तो माणूस तसाच आहे, असं गृहीतक खरं आहे हे मनावर बिंबवून टाकतो. त्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार का करत नाही आणि मग अनेक वर्षे, अगदी आपण जिवंत असेपर्यंत अशा नावडत्या माणसाचं गाठोडं आपल्याच मनात कुजवत ठेवतो. कुढत राहतो. आपल्या या गाठोड्याचा प्रवास कितीकाळ असेल तर 

आपण असे पर्यंत. मग असंख्य माणसांच्या वागण्याचे द्वेष मनात साठवत राहून आपण स्वतःला त्यात अडकून ठेवतो आपल्याही नकळत. अशी भावना मनात कुजवत ठेवत जगणं हे जिवंत राहून मृत्यूचा अनुभव घेण्यासारखं आहे का? असा विचार कधीकधी मनात येतो. 

 एक माणूस म्हणून आपण कसे आहोत हे ओळखून आपल्या समोरचा माणूस कसा आहे याचा अंदाज आपण बांधतो, तो कधी चुकतो तर कधी बरोबर येतो. काहीजण फसवतात, काहीजण आपल्या आयुष्यातून जिवंत असूनही कायमची निघून जातात, पुन्हा आपण कितीही प्रयत्न केला तरी ती परत काही आपल्या आयुष्यात येत नाहीत. आणि मग मनाला एकप्रकारची जखम होते, ती कधीही भरून येत नाही. तरीही त्या माणसाबरोबर घालवलेले क्षण मेंदूच्या कोपऱ्यात कुठंतरी जिवंत राहतात, आणि त्यांच्या वागण्याचे हिशोब मनाशी साठवून आपण जगत राहतो. 
 लिओ टॉलस्टॉयच्या कथेतल्या नायकासारखी उदार आणि उदात्त भूमिका घेऊन मला जगता नाही येणार कदाचित. पण किमान चांगल्या माणसांचा साठा करून आणि इतर लोकांच्या चांगल्या माणसांच्या गाठोड्यात मला प्रवेश मिळावा म्हणून मी प्रयत्न तर नक्कीच करू शकेन. तुम्हाला आवडेल का असा प्रयोग करायला? आपणच कणकण माणसं गोळा करायची, त्यांना समजून घ्यायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांच्या प्रेमाच्या बळावर आपण आपलं आयुष्य समृद्ध करत राहायचं. प्रयत्न करायला हरकत नाही, नाही का? 

संबंधित बातम्या