’पण’ असलेलं, नसलेलं घर!

अमृता देसर्डा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

जी माणसे घरात रमतात ती बाहेरही रमतात. जी माणसे घरात घुसमटत जगतात ती बाहेरही तशीच जगतात. ज्या घरात जे वाटते ते मोकळेपणाने बोलता येते ते घर असते...

घराचे घरपण हे माणसांवर अवलंबून असते, हे किती खरे आणि सच्चे आहे. मग ते घर कितीही मोठे असो, लाख खोल्यांचे असो किंवा एकाच खोलीचे असो. त्यात कितीही माणसे राहोत, एका माणसाचे देखील घर हे घरच असते. त्या घराला घरपण देणे हे आपल्यावर अवलंबून असते.

माणसांच्या घरात माणसे असूनही घर कधीकधी खायला उठते. कारण माणसांचे मेंदू एकमेकांशी जुळत नाहीत. त्यांच्यात विसंवाद होतात. आई-वडील, भाऊ-बहीण, नवरा- बायको, अगदी घरातली कुणीही एकमेकांशी अबोला धरतात. अशी कितीतरी घरे माझ्या आसपास मी पाहतेय. अनुभवतेय. घर म्हणून लौकिक अर्थाने एकदम उत्तम, घरात सगळ्या सोयी-सुविधा. एकदम चकचकीत घरे. किंवा गळकी, जुनाट झालेली, थकलेली घरे. त्यातली माणसे मात्र एकमेकांकडे पाहत नाहीत. एकमेकांशी बोलत नाहीत. समोर येऊनही मनात काय चालले आहे हे समजत नाही. आपण आपल्याच घरात परके होतो. ही गोष्टच किती भयंकर आहे. 

माझी एक मैत्रीण शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. इंग्रजी शाळेत ती मराठी शिकवते. ती शाळा खूप मोठी आहे. पैसेवाले लोक त्या शाळेत त्यांच्या मुलांना टाकतात. ती मुले दिवसातले सात ते आठ तास शाळेत जातात, मग उरलेले चार ते पाच तास पाळणाघरात  जातात आणि फक्त झोपायला त्यांच्या घरात जातात. म्हणजे यात सगळीच मुले मोडतात असे नाही.  पण किमान दहा ते बारा तास घरापासून लांब राहणारी मुले तिच्या शाळेत खूप आहेत. त्यांच्याकडे सगळेकाही आहे फक्त त्यांच्या पालकांना त्यांना देण्यासाठी अजिबात वेळ नाही. त्यांचे घर दिवसातले बारा तास बंद असते, घरात कुणीही नसते, मुलांना सांभाळायला बाहेरून माणसे हायर करावी लागतात. ही गोष्ट ऐकून तर आतून खूपच अस्वस्थ व्हायला झालं. मग मनात विचार येतो, आपल्याला राहायला, निजायला एक जागा लागते, म्हणून आपण घर करतो. आपल्याला एक अशी हक्काची जागा लागते जिथे आपण आपल्याला मिळालेला रिकामा वेळ घालवू शकतो अगदी मोकळेपणाने. पण मग तशी मोकळी जागा जर आपले घर असेल तर मग आपण आपल्या घरापासून इतके लांब का राहतो? त्या घरात राहणारी माणसे नक्की आपलीच  असतात का? ही शंका येईपर्यंत आपल्यावर विचार करण्याची वेळ का येते? एक घर म्हणून आपण ज्या माणसांशी  एकसंध राहत असतो ती माणसे आपल्याला समजून घ्यायला कमी पडली तर आपण त्यांच्या बरोबर राहायचे नाही का? किंवा अशी कितीतरी माणसे एकटी राहतात, त्यांना याबद्दल काय वाटत असेल? 

माझा एक नवा मित्र झाला आहे, तो संगीतकार आहे, त्याच्या घरी त्याचे आई-वडील, बायको, मुलगा आणि तो आहे. त्याला फक्त एक सवय आहे ती म्हणजे तो रोज दारू पितो. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या घरातले सगळेजण खूप विटले आहेत. मी जेव्हा त्याला भेटायला त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्याबद्दल घरातली मंडळी एकही वाक्‍य चांगले बोलली नाही. तो कसाही असला तरी संगीताची त्याला उत्तम जाण आहे, त्याच्याकडे खूप सारी वाद्ये आहेत. त्याने ती किती कौतुकाने जपली आहेत. त्याचे वाचन खूप चांगले आहे. तो एक संवेदनशील माणूस आहे असे मला वाटते. अर्थात हे माझे मत झाले. त्याच्या घरातल्या लोकांना हे अजिबात पटणार नाही कारण ते आज त्याच्या बरोबर राहत आहेत, त्याला इतकी वर्षे सहन करत आहे. या सगळ्यात त्याची तब्येत पण खूप खराब झाली आहे. त्याचे घर त्या अर्थाने फार भेदरलेले आहे. त्याच्या दारूला आणि त्याला कंटाळले आहे. त्याच्या दारूचे मला समर्थन करायचे नाही. पण त्याच्या या एका गोष्टीमुळे त्याचे घर बिनसले आहे हे त्याला मी कसे सांगू हे समजत नाही. त्याच्या घरातली माणसे सुखात राहावी असे त्याला वाटत असले तरीही तो त्यातून काही मार्ग काढत नाही. त्यामुळे तो एकटा पडलेला आहे, त्याच्या घरातली सगळी माणसे एकटी पडली आहेत. माझ्या मित्राचे हे घर मला खूप काही सांगून गेले. त्याचे घर उदास झाले आहे हे जाणवत असूनही मी त्याला काही बोलले नाही, त्याच्या आईच्या आणि बायकोच्या हातचे खमंग जेवण करून त्याच्या घराची वेदना माझ्यासोबत घेऊन मी बाहेर पडले. 

माणूस घर बनवतो आणि घर तोडतो पण. अशी कितीतरी घरे आहेत जी बाहेरून हसरी दिसतात पण प्रत्यक्ष हसरी नसतात. आतून रडत असतात. त्यांना न सांगता येणारे दु:खं त्यांच्या आत मुरत असते. तरीही ती माणसे घर सोडून कुठेही जात नाहीत. घरासाठी राबत असतात. घरासाठी काय काय करतात. घरातली गृहिणी तर किती बारीकसारीक विचार करत असते. घरातल्या माणसांचा, घराचा. तिचे जगणे हे घराशी किती बांधलेले असते. 

घरातला कर्ता पुरुष म्हणून जो माणूस असतो तो जर चांगला असेल तर त्या घराला शिस्त असते, पण तो जर धड नसेल, वाईट सवयीत अडकलेला असेल तर घरातल्या इतर माणसांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. हसणारे, खिदळणारे घर मग उदास, आणि भकास जाणवू लागते. काही घरांत तर खूप नवीननवीन शोभेच्या वस्तू असतात, त्या तशाच धूळ खात पडलेल्या असतात. तर काहींच्या घरात एकही पुस्तक नसते. मला पुस्तके असलेले माझे घर खूप आवडते. मी जिथे जाईल, घरात जशी वावरेल तिथे माझ्या आजूबाजूला पुस्तकांचा ढीग असतो. तो माझ्याशी बोलत असतो, मी त्यांच्याशी बोलत असते. माझ्या घराला घरपण देणारी पुस्तके मला खूपच थोर वाटत राहतात. 

माझ्या काही मैत्रिणींकडे मी जर गेले आणि त्यांच्या घरी पुस्तक नसेल तर, मी माझ्या बॅगेत ठेवलेले पुस्तक त्यांना भेट देते. तिच्यावर बळजबरी करते आणि तिला ते वाचायला लावते. कदाचित हा त्यांना मूर्खपणा वाटत असेल, तरीही घरात  एकही पुस्तक नाही ही कल्पना मला सहन होत नाही. माणसांशिवाय असलेले घर जसे चांगले वाटत नाही, तसे पुस्तकांशिवाय  असलेली घरेही चांगली वाटत नाही. एकवेळ घरात माणसे नसतील तरी चालतील, पण पुस्तक नसणे म्हणजे त्याहूनही भयंकर असे उगाच वाटत राहते.  

माझ्या मनातले आदर्श घर कुठले असा मी विचार करत असते, म्हणून माणसांची घरे पहायला मला आवडतात. घरातून तो माणूस कसा आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो का? हा प्रश्न मी विचारते स्वतःला. पण त्याचे उत्तर देणे कठीण आहे असे वाटते. कारण हल्ली घरात एक वागणारा माणूस बाहेर तसेच वागेल याची काही शाश्‍वती नसते, किंवा बाहेर चांगले वागणारा माणूस घरात त्याहून चांगले वागू शकतो, अर्थात तो कधी वाईट वागेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. पण तरीही घर हा माणसाच्या मनाचा एक उघडा आणि हळवा कोपरा असतो. जी माणसे घरात रमतात ती बाहेरही रमतात. जी माणसे घरात घुसमटत जगतात ती बाहेरही तशीच जगत असावी असे वाटत राहते. ज्या घरात जे वाटते ते मोकळेपणाने बोलता येते ते घर असते. अशी मी माझ्या पद्धतीने माझ्या समजूतीसाठी एक व्याख्या केली आहे. यात आता मोकळेपणा म्हणजे आपले विचार इतरांवर लादणे हे नाही, तर मला जे काय वाटते ते समोरच्या माणसाला मला अगदी खरे जसे आहे तसे सांगता येणे, आणि त्या माणसाने ते समजून घेणे असते. यात फक्त एकाच माणसाचे काम नाही, तर हा दोन माणसांच्या, किंवा त्याहीपेक्षा अधिक माणसांच्या एकमेकांच्या समजून घेण्याच्या कुवतीचा खेळ आहे. मग त्यात गैरसमज होऊनही नाती संवादी राहिली तर ते घर संवादी राहील असे वाटत राहते. पण असे आदर्श, संवादी घर प्रत्यक्षात होऊ शकेल? ज्यात माणसांची घुसमट होणार नाही, त्यांना आपल्या माणसांपासून काही दडवून ठेवता येणार नाही, सगळी नाती हसती, खेळकर, आणि खोडकर होतील? त्यात मग दुसऱ्या माणसाचा अहम आड येणार नाही, किंवा माझ्या पार्टनरला ज्याच्या सोबत मी राहतेय त्याला, मला काय वाटेल, हा विचार सतत मनात येणार नाही. इतकं आदर्श घर मला बनवता येईल? माझ्या स्वभावाचे सगळे पदर माझ्या माणसांना माहीत होतील? ते मला आपलं करतील? असे खूप प्रश्न सध्या पडत आहेत आणि तरीही मी घर या संकल्पनेबद्दल व्यापक  अर्थाने विचार करायचा प्रयत्न करते आहे.

’घराला घरपण देणारी माणसं’ या ओळी मी कितीतरी वेळा रेडिओवर ऐकलेल्या आहेत. आता ती जाहिरात कुणी वाजवत नाही. बंद झाली आहे बहुधा. पण मी मनात ती गुणगुणत असते. घराचे घरपण हे माणसांवर अवलंबून असते हे किती खरे आणि सच्चे आहे. मग ते घर कितीही मोठे असो, लाख खोल्यांचे असो, किंवा एकाच खोलीचे असो. त्यात कितीही माणसे राहोत, एका माणसाचे देखील घर हे घरच असते. त्या घराला घरपण देणे हे आपल्यावर अवलंबून असते, हे जरी प्रत्येकाला कळले तरीही ते प्रत्यक्षात कितपत उतरेल हे काही अजूनही कळत नाही. पण माणूस घराशिवाय जगू शकणार नाही, त्याला त्याची माणसे जवळ हवी असतात, तो कसाही वागला, काहीही केले तरीही रात्री त्याला त्याच्या बिछान्यावर, त्याच्या माणसात राहायचे असते म्हणून जगण्याची धडपड करत तो एखाद्या पक्षाप्रमाणे त्याचे घरटे एका एका काडीने तयार करत असतो, आणि आपल्या माणसांना त्याच्या घराच्या उबेत ठेवत असतो. या आदर्श घराची संकल्पना प्रत्यक्षात उतरली पाहिजे असे वाटत असले तरीही आपल्या मनात या घराबद्दल थोडीतरी जागा शिल्लक राहायला पाहिजे असे वाटते. अशा संवादी आणि आदर्श घराच्या शोधात जगायला सध्या तरी वडतं आहे. हा शोध असाच अखंड चालायला हवा.

संबंधित बातम्या