शब्दांची सावली भरून पावली 

अमृता देसर्डा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

शब्दांची सावली
 

‘तुला शब्द म्हणजे काय माहीत आहे?’ माझ्या एका मैत्रिणीने मला शब्द या शब्दावर जोर देऊन हा प्रश्‍न विचारला. मी तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. तिने विचारलेला प्रश्‍न इतका सहज होता, पण या प्रश्‍नाचे उत्तर मात्र वाटते तितके सहज नसावे असे वाटत राहिले. मी बराच वेळ गप्प आहे, हे पाहून ती परत मला म्हणाली, ‘सांग ना. तुला काय वाटते, आपल्या जगण्यात शब्दांना किती महत्त्व आहे? शब्द म्हणजे काय?’ आता तिने आणखी एका प्रश्‍नाची भर घातली. 

‘खरे सांगू का, हा प्रश्‍न मला कधी पडला नाही. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात शब्द हे इतके सहज म्हणून आपण वापरतो, त्यात नवल काय? आणि त्यांचा विचार काय करायचा हे कळत नाही बघ. पण मीच तुला एक विचारू का?’ 
‘हो विचार की’ 
‘तुला हा प्रश्‍न का पडला?’ 

त्यावर ती म्हणाली, ‘एक जवळचा मित्र आहे, त्याने दोन दिवसांपूर्वी मला एक पुस्तक वाचायला म्हणून भेट दिले, तर त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्याने लिहिले की, ‘शब्दांतल्या अर्थांना जप’ हे एक वाक्‍य गेले दोन दिवस माझ्या डोक्‍यात घुमत आहे. मी त्याला फोन करून तू हे असे का लिहिले म्हणून विचारले, तर तो म्हणाला, ‘आता मी हे शब्द का वापरले याचा विचार कर आणि तुला जो अर्थ लावायचा आहे तो लाव.’ पण त्याने काही मला त्याला काय म्हणायचे आहे ते सांगितले नाही.’ 

‘त्याला काय म्हणायचे आहे ते सोपे आहे खूप. शब्दांच्या मागे जो अर्थ दडला आहे तो जप, म्हणजे जर तू म्हणत असशील की तुझे तुझ्या मित्रावर खूप प्रेम आहे...’ 

ैमैत्रिणीने मला मधेच तोडले आणि तिच्या शब्दांवर जोर देऊन ती म्हणाली, ‘काहीही काय बोलतेस, तो माझा फक्त मित्र आहे, प्रेम वगैरे नाही...’ तिने असे स्पष्टीकरण दिलेले पाहून मला खूप हसायला आले. 

‘अरे मी फक्त उदाहरण देते आहे. तू कशाला मनावर घेतेस. आत्ता तू जे बोललीस त्याचा अर्थ काय होतो, तो म्हणजे फक्त तुझा मित्र आहे. तुला त्याच्याबद्दल जे काही वाटते त्यात फक्त मैत्री आहे. म्हणजे तुझ्या शब्दांचा अर्थ जो आहे, जी त्यात भावना आहे ती महत्त्वाची. त्यात प्रेम आहे, पण हे प्रेम मैत्रीचे आहे. म्हणजे प्रत्येकवेळी आपण जे बोलतो, जे लिहितो, त्यातून जे शब्द आपण व्यक्त करत जातो, त्यातले जे भाव असतात, अर्थ असतात ते सतत बदलत राहतात. तरीही प्रत्येक शब्दाच्या मागे अर्थ दडलेले असतात, ते आपण जपणे जास्त महत्त्वाचे असे त्याला म्हणायचे आहे.’ 

‘हो म्हणजे तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. पण तरीही आपण शब्द किती सहज वापरतो नाही का? त्या शब्दांना जे अर्थ आपण जोडतो तेही किती सखोल असतात. म्हणजे आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकतो की, ‘आपण जे शब्द देतो तो पाळला गेला पाहिजे.’ तो शब्द प्रेमाच्या नात्यातला असो किंवा व्यावहारिक नात्यातला. आता शब्द पाळतो म्हणजे काय तर त्यातील अर्थ प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतो. हो ना?’ 

‘हो गं, अगदी बरोबर. अर्थांना जपणे म्हणजेच शब्द पाळणे, आपण जे बोलतो ते फक्त नुसतेच न बोलता ते समजून घेणे. आपण जे लिहितो ते नुसतेच न लिहिता त्यातून जो अर्थ अपेक्षित आहे, जे वागणे अपेक्षित आहे ते समजून घेऊन आचरणात आणायचे, म्हणजे प्रत्येक शब्दांच्या मागचा अर्थ जपायला लागणे. पण हे दिसते तितके सोपे नाही. अर्थ समजून घेऊन तो मनाला समजावून सांगून शब्द पचवून जगणे वाटते तेवढे सोपे नाही.’ 

 मी काय बोलत होते ते मैत्रिणीला समजत होते. मला काय म्हणायचे त्याचा अर्थ तिला समजला, हे पाहून आम्ही दोघी एकमेकींकडे बघत हसलो. तिच्या डोळ्यात उत्तर सापडल्याचे समाधान होते. आम्ही मग हा विषय तिथेच थांबवला. पण बोलणे झाल्यावरही माझ्या मनात हा विचार घोळत राहिला. 

आयुष्य हे त्या अर्थाने शब्दांचे जाळेच वाटत राहते. माणूस शब्दांतून व्यक्त होतो. बोलून आपण जे सांगतो ते समोरच्या माणसाला एक भाषा म्हणून जरी समजत असले तरीही त्या भाषेत जे शब्द वापरले आहेत त्या प्रत्येक शब्दाला किती अर्थ असतील याचा बारीक विचार आपण फारसा करत नाही. त्या शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचा उगम किती लाखो वर्षांपूर्वी झाला असेल, त्यांच्या जन्मानंतर त्यांना जे अर्थ चिकटले ते अजूनही तसेच आहेत का? की त्या अर्थांमध्ये काही बदल झाले असतील? याचा विचार आपण कधी करत नाही. पण केला पाहिजे असे वाटून गेले. कारण जर आपण आपल्या प्रत्येक व्यवहारात, नात्यात शब्द पाळले तर काय होईल? नाती, व्यवहार आदर्श होतील? आणि जगात असे काही वाईट अर्थांचे शब्द आहेत त्यांचे काय होईल? लहानपणापासून, वाईट बोलायचे नाही, हे जे आई-वडील सांगत असतात, ते वाईट बोलणे म्हणजे काय? तर वाईट शब्द वापरायचे नाहीत असा त्याचा अर्थ मी तेव्हा काढायचे. 

मी पाचवी-सहावीत असेन तेव्हा मला बावळट, मूर्ख, चक्रम आणि कुत्री हे शब्द वापरायची सवय लागली. काहीही झाले किंवा माझ्या मनासारखी एकही गोष्ट जर झाली नाही, तर मी हे शब्द वापरायचे. माझ्या जवळच्या मैत्रिणींना या शिव्या द्यायचे, कधीकधी आईलापण बावळट म्हणायचे. एकदा - दोनदा ती मला रागावली. आधी शांतपणे समजून सांगितले, हे शब्द वाईट असतात, ते उच्चारायचे नाहीत. पण मला या शब्दांची इतकी सवय लागली होती की मी नंतर नंतर कुणालाही मूर्ख, चक्रम म्हणू लागले. कुत्र्या किंवा कुत्री मी खेळताना चिडले की इतक्‍या सहजपणे म्हणू लागले की माझ्या तक्रारी अनेक जणांनी माझ्या आईकडे केल्या. तेव्हा आईने माझ्या तोंडाला जोरात चिमटा दिला आणि सांडशी थोडी गरम करून चटका दिला. हे शब्द उच्चारायचे नाहीत अशी ताकीद दिली. माझी सवय तिच्या कठोर शिक्षेने मोडली. तिने जर मला शिक्षा केली नसती तर मी या शिव्या द्यायचे माझ्याबाजूने थांबवले असते का? असा विचार मी तेव्हा कधीच करू शकले नसते. पण आता करते आहे. आताही मला अनेक शिव्या माहिती आहेत. कधी राग आला तर मनातल्या मनात शिव्या येतातही. कधी कधी त्या ओठांवरदेखील येतात. पण शिव्या वाईट असतात म्हणजे त्यांचे अर्थ चांगले नसतात, हा मनावर झालेला संस्कार इतका खोल असतो, की त्यांचे अर्थ मनाच्या तळाशी बसून राहतात, ते काही केल्या पुसले जात नाहीत. 

कुठलाही शब्द वाईट नसतो. त्यांना आपण आपल्याला पाहिजे तसा फक्त अर्थ लावत जातो. शब्दांमध्ये अनेक दडलेले अर्थ आपण जर पाहिले तर शब्दांमध्ये किती ताकद असते याची जाणीव होईल. शब्दांच्या अर्थांना जपावे कसे हे मात्र ज्याचे त्याने ठरवायला हवे. कारण हे अर्थ जेव्हा सावली होऊन आपल्या जगण्यात येतात तेव्हा ते एखाद्या उन्हात तळपत राहणाऱ्या झाडाच्या सावलीसारखे आपल्याला आधार देत राहतात. एकेक शब्द मग झाडाची पालवी बनतात आणि उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूला आराम करण्यासाठी सावली देतात. अगदी तसेच हे शब्द आणि त्यांच्या अर्थांच्या सावल्या माणसाच्या जगण्यात येतात आणि जगण्यातला उदासीनपणा, तोचतोचपणा घालवत राहून जगणे भरीव करत जातात. शब्दांच्या अर्थांचा हा प्रवास असाच अखंड राहिला पाहिजे कारण त्यात असलेले अर्थ टिकून राहतील आणि आपल्या मातृभाषेतल्या शब्दांचा खजिना आणखी समृद्ध होईल.. आणि मग शब्दांची सावली खऱ्या अर्थाने भरून पावेल.  
(समाप्त) 

Tags

संबंधित बातम्या