फेस्टिव्ह मेकअप

स्वप्ना साने
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल

कोरोनाच्या प्रभावामुळे सामूहिकरीत्या सणवार साजरे करता येत नसले, तरी आपला उत्साह मात्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नवरात्र, दसरा आणि दिवाळी म्हणजे तर उत्साहाला उधाण आलेले असते. नवरात्रात सामूहिक गरबा खेळायला नाही मिळाला, तरी ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आहेच! नवरात्र म्हणजे नऊ दिवस धमाल, वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, नैवेद्य, आरत्या आणि भरपूर ऊर्जा आणि उत्साह. या सर्वांत रोज वेगळा लुक येण्यासाठी मेकअपही महत्त्वाचा आहेच! चला तर आज आपण बघू या, फेस्टिव्ह मेकअप कसा करतात.

फेस प्रायमर, त्वचेला मॅच होणारे फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर, आय शॅडो, आय लायनर, मस्कारा, ब्लशर, लिप लायनर आणि लिपस्टिक; साधारण हा मेकअप किट सगळ्यांकडे असतेच. मेकअप करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, की आपल्याला इंद्रधनूष्यी मेकअप करायचा नाहीये. म्हणजे आहे तेवढे रंग वापरणे याला मेकअप म्हणत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की ड्रेसला मॅचिंग रंगही वापरू नयेत, म्हणजेच आपल्याला परफेक्ट मॅच मेकअपसुद्धा नकोय. आपले एकंदर सौंदर्य खुलून दिसेल असा मेकअप असावा.

स्टेप्स

 • चेहरा स्वच्छ धुऊन, भरपूर मॉईस्चराईज करून घ्यावा. त्यावर फेस प्रायमर लावावा. प्रायमरमुळे मेकअपसाठी एक प्लेन कॅनव्हास तयार होतो आणि मेकअप जास्त चांगला आणि टिकाऊ होतो. 
 • तुमच्या स्किनटोनला मॅच होणारे फाउंडेशन लावावे. लिक्विड किंवा क्रीम बेस, कुठलेही असले तरी त्याचे आधी डॉट लावावेत आणि मग हळुवार स्प्रेड करून त्वचेमध्ये ब्लेंड करावे. स्किन कुठेही पॅची दिसत नाहीये ना, याची खात्री करावी. त्यामुळे ब्लेंडिंग खूप महत्त्वाचे आहे. 
 • कॉम्पॅक्ट पावडरने फाउंडेशन सेट करावे. पावडर ब्रश असेल, तर अजून चांगले अप्लाय करता येते. 
 • चीक बोन हायलाइट करण्यासाठी ब्लशरचा वापर करावा, पण नॅचरल दिसेल एवढेच वापरावे. शक्यतो दिवसा पीच शेड वापरावी आणि रात्री ब्राँझ शेड.
 • आय मेकअप करताना आपला ड्रेस पॅटर्न आणि कलर लक्षात घेऊन मेकअप करावा. शिवाय दिवसा करायचा आहे किंवा रात्री, त्याप्रमाणे शेड सिलेक्ट करावी. रात्री स्मोकी लुक आणि बोल्ड आय लायनर परफेक्ट दिसते. दिवसा फेस्टिव्ह लुकप्रमाणे कॉपर शेड किंवा मेटॅलिक शेड सिलेक्ट करावी. ड्रेस किती हेवी आहे त्याप्रमाणे आय शॅडोच्या दोन किंवा तीन शेड्स ब्लेंड करू शकता. खूप जास्त कलर वापरू नये. त्याने मेड अप लुक दिसतो. आय लायनर, काजळ आणि मस्कारा लावून आय मेकअप पूर्ण करावा.
 • सध्या मास्कचा वापर असल्यामुळे लिपस्टिक बाद झाली आहे. तरी ही जर लावायची असेलच, तर नॉन ट्रान्सफर लिपस्टिक वापरावे. म्हणजे ते पसरणार नाही आणि मास्क खराब होणार नाही. 
 • तुमच्या केसांना शोभेल अशी हेअर स्टाइल करून तुमचा लुक पूर्ण करावा. क्रिमपिंग किंवा वेव्ह करून स्टाइल करता येईल. कुरळे केस असतील तर स्ट्रेट करता येतील.  

क्विक टिप्स

 • मेकअपचे सर्व साहित्य नसेल, तर फक्त BB क्रीम आणि त्यावर कॉम्पॅक्ट लावूनसुद्धा इफेक्ट छान येतो. 
 • आय शॅडोच्या वेगवेगळ्या शेड्स नसतील, तर लिपस्टिकची ब्राऊन, मरून अथवा पिंकमधली जी कॉन्ट्रास्ट शेड असेल, ती आय शॅडो म्हणून लावावी आणि त्यावर कॉम्पॅक्ट टच द्यावा. 
 • आजकाल काजल कम आय लायनर पेन मिळतो, त्यामुळे एकाच प्रॉडक्टमध्ये दोन्हीचे काम होते.
 • मास्कमुळे बहुतेक महिलांनी लिपस्टिक लावणे बंद केले आहे. त्याऐवजी लिप बाम किंवा ग्लॉसचा वापर करावा. 
 • एकंदर फेस्टिव्ह लुकसाठी यंदा आय मेकअपवर भर द्यावा. कारण मास्क तर वापरायचाच आहे, त्यामुळे डोळे एक्सप्रेसिव्ह दिसायला हवेत.
 • रात्री झोपायच्या आधी मेकअप रिमूव्ह करायला विसरू नये आणि CTM पण जरूर करावे, म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि  मॉईस्चरायझिंग.   

संबंधित बातम्या