वाहन खरेदीत ‘न्यू नॉर्मल’

आशिष तागडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

आपली स्वतःची  दुचाकी किंवा चारचाकी असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी माणूस कायम प्रयत्नशील असतो. या वर्षी मात्र कोरोनाने अनेकांच्या या स्वप्नाला काही प्रमाणात अर्धविराम लावला आहे. असे असले तरी लॉकडाउननंतर ऑटोमोबाईलच्या थंडावलेल्या बाजारपेठेत आता ‘न्यू नॉर्मल़़’ सुरू झाले असून दसऱ्याचा मुहूर्त साधत अनेकांनी वाहन खरेदीची तयारी केली आहे.

बदलत्या परिस्थितीत प्रत्येकाला हाताशी दुचाकी किंवा चारचाकी पाहिजेच असे मनोमन वाटत असते. काही दशकांपूर्वी आवाक्याबाहेर वाटणारी ही खरेदी आता टप्प्यांत आली आहे. साधारण ऐंशीच्या दशकात चारचाकी बाजूलाच ठेवा, दुचाकी खरेदी करणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या रकमेतून दुचाकी घेतली जात होती. त्यासाठीही मोठी प्रतीक्षा करावी लागायची. ज्याच्या दारात दुचाकी तो श्रीमंत माणूस अशी काहीशी समजूत त्या काळात होती. दारात मोटार असेल तर विचारूच नका. नव्वदच्या दशकापासून या चित्रात काहीसा बदल होत गेला. बँका, खासगी वित्तीय संस्था यांच्या मदतीने अनेकांच्या दारात दुचाकी दिसायला लागल्या अर्थात मोटार खरेदीची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढायला लागली. यामागचे मुख्य कारण म्हणजे सक्षम नसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वेळेचे नियोजन. नव्वदच्या दशकानंतर वाहन खरेदी ही चैनीची खरेदी न राहता गरजेची झाली. घरापासून लांब असलेले कार्यालय, वाढलेला व्याप, वेळेची बचत आणि सहजतेने उपलब्ध होणारा वित्तीय पुरवठा यामुळे सहाजिकच दारोदारी वाहन दिसायला लागले.

गुढी पाडवा, दसरा, दिवाळी या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी वाहन खरेदी करण्याची प्रथाच गेल्या दोन दशकांपासून आहे. त्यामध्ये अन्यही सण येतातच. म्हणजेच सणांच्या निमित्ताने वाहन खरेदीचा ग्राफ वाढतच गेला. मात्र २०२० हे वर्ष याला अपवाद ठरले. अनेक गोष्टींसाठीच ते अपवादात्मकच आहे, परंतु गरजेच्या गोष्टींच्या खरेदीसाठीही ते विशेष निर्णायक ठरले. जगभरात कोरोनाची साथ पसरल्यानंतर त्याचा समाजातील सर्वच घटकांवर परिणाम झाला. भारतात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्याचा फटका वाहन उद्योगालाही बसला. दुचाकी असो किंवा मोटार खरेदीचा मोठा मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याकडे पाहिले जाते. यंदा मात्र लॉकडाउनमुळे ही खरेदी झालीच नाही. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, गणेशोत्सवाच्या काळात तरी खरेदीची धूम निर्माण होईल असे वाटत असताना त्यावरही लॉकडाउनने पाणी फिरविले. आता अनलॉक होत असताना मात्र वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांची पावले पुन्हा वाहनखरेदीकडे वळाली आहेत.

काय आहेत कारणे?

  •  दुचाकी असो किंवा मोटार, आता वाहन खरेदी ही गरजेची बाब झाली आहे. कोरोनाच्या संकटाने तर ही बाब अधिक प्रकर्षाने अधोरेखित  केली आहे. कारण आता सार्वजनिक वाहतूक योग्य प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यातून प्रवास करताना सर्वसामान्य नागरिक चारदा विचार करतो. थोडे जरी लांब जायचे असले तरी  तो स्वतःच्या वाहनाचा पर्याय निवडताना दिसत आहे.
  • स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाला स्वतःचे वाहन असावे, असे प्रकर्षाने जाणवायला लागले आहे. लॉकडाउननंतर सार्वजनिक वाहतुकीवर असलेले निर्बंध यामुळे स्वतःच्या वाहनाची आवश्यकता भासत आहे. त्यातूनच वाहन खरेदीला लॉकडाउननंतर प्राधान्य दिले जात आहे.
  • ई-वाहने खरेदीलाही पसंती प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन उद्योगांनी इलेक्ट्रिकल वाहनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या (एसएमईव्ही) वार्षिक अहवालावरून ई-वाहनांना चांगली मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ई-वाहनांच्या खरेदीत २०१९-२० या दरम्यान २० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. ई-वाहनाबाबत नागरिकांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ऊर्जा आणि संसाधन संस्थेच्या(टेरी) वतीने नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून नागरिकांना ई-वाहनाबाबत पुरेशी माहिती नसल्याचे लक्षात आले आहे. त्याचबरोबर किंमत, देखभाल याबाबतही शंका असल्याचे समोर आले आहे. नागरिकांना योग्य माहिती दिल्यास ई-वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. 

एसएमइव्हीच्या वार्षिक अहवालानुसार ई-वाहनांच्या खरेदीचा आकडा        
प्रकार    २०१८-१९    २०१९-२०  (आकडे युनिटमध्ये)
दुचाकी     १.२६ लाख      १.५२ लाख
चारचाकी    ३ हजार ६००     ३ हजार ४००
बस    ४००     ६००

ई-वाहनांच्या खरेदीबाबत ‘टेरी’च्या अहवालानुसार नागरिकांचे मत 
(आकडे टक्क्यांत)
खरेदीचा विचार करतोय    ३७
नक्कीच खरेदी करणार    २८
खरेदी करणार नाही     ५
खरेदी करण्याबाबत शंका आहे     ३

मागणीत वाढ
पुण्यात दर महिन्याला साधारणपणे पंधरा हजार दुचाकींची खरेदी होत असते. मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अचानक वाहन खरेदीच बंद झाली. काही जणांनी सणाच्या निमित्ताने आगाऊ नोंदणी केली होती, त्यांना परवानगी घेऊन वाहन वितरित करण्यात आले. मात्र त्याची संख्या नगण्य होती. पाडवा, गणेशोत्सव या काळात काही प्रमाणात मागणी होती, मात्र वाहन घेता येत नव्हते. आता सहा महिन्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात पुन्हा चांगले दिवस यायला सुरुवात झाली असून ‘न्यू नॉर्मल’बरोबर बाजारपेठ आता नॉर्मल होत आहे. सप्टेंबरपासून खरेदीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे आणि या पुढच्या काळात ती वाढतच राहील, असा विश्‍वास आहे. मार्चमध्ये असलेल्या मागणीच्या तुलनेत आता भरीव वाढ होत आहे. जानेवारीपर्यंत सर्व काही सुरळीत होईल, अशी चिन्हे आहेत. दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान वाहन खरेदीत नक्कीच सुधारणा होणार आहे. आता कोणतीही स्कीम नसतानाही ग्राहकांना वाहन खरेदीचा कल वाढला आहे, हे सुचिन्ह आहे. विविध बँकांनी व्याजदर कमी केल्याने तसेच खासगी वित्तीय संस्थांनीही सवलती दिल्याने नागरिकांचा वाहन खरेदीकडे अधिक कल आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःचे वाहन अधिक सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे भविष्यात मागणीत वाढ होणार आहे.
- प्रदीप सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीव्हीएस शेलार

आरटीओने सवलत द्यावी
लॉकडाउनच्या काळात वाहन खरेदीवर चांगलाच परिणाम झाला होता. आता मात्र परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यावर तो काही काळापुरता मर्यादित असेल, असे वाटत होते, प्रत्यक्षात तो एवढा दीर्घकाळ असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. जुलै महिन्यात वाहन खरेदी करणाऱ्याची नागरिकांची मानसिकता होती. नागरिक वाहन खरेदीच्या चौकशीसाठी येण्याचे प्रमाण वाढले होते. सामान्य नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला असला, तरी वाहन खरेदीकडे त्यांचा कल होता. यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण होते ती सुरक्षितता. स्वतःचे चारचाकी वाहन असावे, अशी मानसिकता निर्माण झाली. सार्वजनिक वाहतुकीबरोबर खासगी वाहनाने जाण्यासाठी काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे, ऑगस्टमध्ये मागणीत वाढ झाली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये वाढ झाली. आता फेस्टिव्हल सीझन असल्याने मोटार खरेदीसाठी मानसिकता वाढली आहे. बँकांनीही व्याजदरात कपात केल्याने खरेदीचा कल दिसून येत आहे. सरकारने या विषयात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये फ्लॅट खरेदीसाठी स्टॅम्प ड्यूटीवर सूट दिली आहे, त्याप्रमाणे वाहन खरेदीसाठी लागणाऱ्या आरटीओ कर, रजिस्ट्रेशन टॅक्सवरही सवलत दिली पाहिजे. यामुळे वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळेल. जानेवारीपर्यंत या क्षेत्रातील उलाढाल पूर्वपदावर येईल, असे वाटते.
- शैलेश भंडारी, डायरेक्टर, बी. यू. भंडारी ऑटो प्रा. लि.

संबंधित बातम्या