ट्रेंडी दागिने

ज्योती बागल
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

काळ कितीही बदलला तरीही पारंपरिक दागिन्यांची क्रेझ काही कमी होत नाही. शिवाय पारंपरिक दागिने तरुणाईला आवडतील अशा नव्या ढंगात, नव्या रूपात बाजारात दाखल होत असतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेले दागिने आणि त्यांच्या ट्रेंड्सविषयी थोडक्यात... 

मंगळसूत्र हा ऑल सीझन खरेदी केला जाणारा दागिना आहे. मंगळसूत्र हे शॉर्ट आणि लाँग अशा दोन प्रकारात मिळते. यामध्ये कलकत्ती पॅटर्न, टेम्पल पॅटर्न, अँटिक पॅटर्न, पूर्ण पट्टी, गोकाक पॅटर्न, राजकोट पॅटर्न अशी डिझाईन्स उपलब्ध आहेत. शॉर्ट मंगळसूत्र साधारण १५ ग्रॅमपासून उपलब्ध आहेत, तर लाँग मंगळसूत्र एक तोळ्याच्या पुढे घेऊ तसे आहेत. राजकोट आणि मनीवाले या दोन्ही डिझाईनमधील मंगळसूत्र एक तोळ्याच्या पुढेच येतात. रोजच्या वापरासाठी फॅन्सी मंगळसूत्रांना जास्त मागणी दिसते. फॅन्सी मंगळसूत्र सहा ते १५ ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत. या फॅन्सी मंगळसूत्रांमध्ये पेंडंट किंवा वाट्यांमध्ये अमेरिकन डायमंडचा वापर केला जातो. पेंडंटमध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत.

नेकलेस म्हणजे सर्व वयोगटातील स्त्रियांचा आवडता दागिना. नेकलेसमध्येही मंगळसूत्राप्रमाणे शॉर्ट आणि लाँग असे दोन मुख्य प्रकार येत असून यामध्येही कलकत्ता पॅटर्न, बंगाली पॅटर्न, टेम्पल पॅटर्न उपलब्ध आहेत. याशिवाय वन साईड ब्रोच नेकलेस, अँटिक नेकलेस असे पॅटर्नही उपलब्ध आहेत. टेम्पल आणि कलकत्ती शॉर्ट नेकलेस साधारण एक तोळ्यापासून उपलब्ध आहेत, तर लाँग नेकलेस तीन ते साडेतीन तोळ्यापासून उपलब्ध आहेत. लाँग नेकलेसमध्ये जास्तीत जास्त तीन लेअरचे डिझाईन पाहायला मिळते. नेकलेसला आकर्षक करण्यासाठी प्रेशियस स्टोनचा वापर करून डिझाईन केले जाते. या स्टोनमध्ये लाल, हिरवा, गुलाबी हे रंग अधिक वापरलेले दिसतात. हे स्टोन्स टेम्पल ज्वेलरीमध्ये जास्त वापरले जातात. काही नेकलेसमध्ये कल्चर्ड मोती वापरले जातात. मात्र कलकत्ती नेकलेस हे पूर्णपणे सोन्याचे असतात. नेकलेस हा पूर्ण सेटसह घेता येतो किंवा फक्त नेकपीस घेता येतो. पूर्ण सेटमध्ये नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या इत्यादींचा समावेश असतो. असा पूर्ण सेट खास लग्न समारंभासाठी खरेदी केला जातो.         

गळ्यातील इतर दागिन्यांमध्ये ठुशी, लक्ष्मी हार, मंचली, चोकर, मोहनमाळ, कोल्हापुरी साज असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. लक्ष्मी हारामध्ये गोल चकत्यांवर लक्ष्मीच्या प्रतिकृतीचे डिझाईन असते, त्यामुळे त्याला लक्ष्मी हार म्हणतात. हा एक तोळ्यापासून पुढे घेऊ तसा उपलब्ध आहे. चोकर हा टेम्पल डिझाईनमध्ये असून साधारण १३ ग्रॅमपासून पुढे घेऊ तसा उपलब्ध आहे. चोकर हा रुंद डिझाईनमध्येच जास्त छान दिसतो, त्यामुळे बऱ्याचदा ऑर्डर घेऊनच तो तयार केला जातो. मंचली हे पाच ग्रॅमपासून उपलब्ध आहे. ठुशी हा पारंपरिक दागिना आहे, मात्र आजही तो तेवढ्याच आवडीने खरेदी केला जातो. सोन्याची ठुशी साधारण पाच ते सहा ग्रॅमपासून उपलब्ध आहे. यामध्ये पूर्ण सोन्याची ठुशी आणि मोत्यांची ठुशी असे दोन प्रकार दिसतात. दोन्हीलाही चांगली मागणी आहे. तसेच एक भरीव ठुशी असते, तर लाख भरलेली एक साधी ठुशी असते. यामध्ये छोट्या छोट्या मण्यांची गुंफण केलेली असते, तर काहींचे प्लेन डिझाईन असते. साधी ठुशी तीन ग्रॅमपासून उपलब्ध आहे, तर भरीव ठुशी दोन ते अडीच तोळ्यांमध्ये उपलब्ध आहे.

बिंदी हा दागिना एरवी फार खरेदी केला जात नसला तरी वधूसाठी आवर्जून खरेदी केला जातो. यामध्ये टेम्पल आणि कलकत्ती हे दोन पॅटर्न जास्त पाहायला मिळतात. बिंदी साधारण पाच ते सहा ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत. त्यातही कलकत्ती वर्क असलेल्या बिंदीला जास्त पसंती आहे.

साखळीमध्ये पुरुष आणि महिलांसाठी अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. यामध्ये रस्सीचेन, गोफ, इंद्रजित चेन, हाय वे, बॉक्स चेन आणि फॅन्सी चेन असे पॅटर्न पाहायला मिळतात. महिलांसाठीच्या फॅन्सी चेन पाच ग्रॅमपासून उपलब्ध आहेत, तर पुरुषांसाठी चेन/साखळ्या दीड तोळ्यापासून उपलब्ध आहेत. महिलांसाठीच्या डिझाईन्समध्ये सिम्पल आणि सोबर साखळीला पसंती दिली जातेय, तर पुरुषांमध्ये रस्सी चेन आणि गोफ अशा साखळ्यांची क्रेझ कायम दिसते. या मोठ्या साखळ्यांसाठी अर्ध्या तोळ्यापासून पेंडंट उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी अडीच ग्रॅमपासून चेन उपलब्ध आहेत. महिलांसाठी चांदीच्या चेन आणि फॅन्सी कानातले उपलब्ध आहेत. चांदीची चेन साधारण १,८०० रुपयांपर्यंत मिळते, तर फॅन्सी कानातले ७०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. या कानातल्यांमध्ये पांढरे खडे वापरले जातात. सोन्याची नथ साधारण तीन ग्रॅमपासून उपलब्ध आहे. यामध्ये खड्यांचे आणि मोत्यांचे डिझाईन पाहायला मिळते. मात्र खड्यांपेक्षा मोत्यांच्या नथीला जास्त मागणी आहे. यामध्ये कल्चर्ड मोती आणि सेमी कल्चर्ड मोती वापरले जातात. यापैकी कोणते मोती वापरले आहेत, यावरून नथीची किंमत ठरते. याबरोबरच मोत्याच्या नथीत एखादा गुलाबी किंवा लाल रंगाचा खडा वापरलेला दिसतो. त्यामुळे पांढऱ्या मोत्यांची नथ आणखी उठून दिसते.

रोजच्या वापरासाठी नाकातील चमकीमध्ये अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. या चमकी मिलिमीटरमध्ये असून त्यांची साधारण किंमत ७०० ते ८०० रुपयांपासून पुढे आहे. हल्ली चमकीमध्येही मोठ्या आकाराच्या चमक्यांना जास्त पसंती दिली जाते.

झुमके आणि टॉप्स यामध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. झुमक्यांमध्ये कलकत्ती झुमके, कुंदन झुमके, कारवारी झुमके, अँटिक झुमके उपलब्ध आहेत. यामध्ये कलकत्ती झुमक्यांना जास्त पसंती दिसत असून छोट्या आकारातील झुमके पाच ते सहा ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. अँटिक झुमके साधारण १० ते ११ ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे आहेत. हेवी झुमके मात्र ३० ते ४० ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. यामध्ये कुंदन खड्यांचा वापर केलेला दिसतो. कारवारी झुमके पाच ते सहा ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. याशिवाय फॅन्सी झुमकेही उपलब्ध आहेत.

रोजच्या वापरासाठी महिला छोट्या टॉप्सना पसंती देतात. यामध्ये टेम्पल टॉप्स, स्टोन टॉप्स, बंगाली टॉप्स, कलकत्ती टॉप्स, कारवारी टॉप्स उपलब्ध आहेत. हे टॉप्स अगदी एक ग्रॅमपासून १० ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत. झुमके आणि टॉप्सची शोभा आणखी वाढते ती ‘कान’ या दागिन्यांमुळे. कान हाफ आणि फुल अशा दोन प्रकारात येतात. शिवाय वेल हा जुना प्रकार आजही वापरला जातो. या कानातल्या वेलमध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. हाफ कान हे १० ग्रॅमपासून उपलब्ध आहेत, तर पूर्ण कान २५ ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. कानातले वेल मात्र अगदी तीन-चार ग्रॅमपासून उपलब्ध आहेत.

रिंग्जमध्ये टेम्पल, कलकत्ती आणि साध्या प्लेन उपलब्ध आहेत. साध्या रिंग्ज अगदी एक ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. मात्र महिलांची मोठ्या आकाराच्या रिंग्जना पसंती दिसते. काही रिंग्जमध्ये अमेरिकन डायमंडचा वापर केलेला आहे. याशिवाय डूल हा प्रकारची जास्त चालतो. डूल लहान मुले आणि तरुणींसाठी जास्त घेतले जातात. डूल साधारण एक ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. यामध्ये खड्यांचे डूल, प्लेन डूल, एम्बोस, कटक, अमेरिकन डायमंड वापरलेले असतात. बांगड्यामध्ये टेम्पल पॅटर्न, दुबई पॅटर्न, रेग्युलर पॅटर्न, कलकत्ती पॅटर्न, अँटिक, प्लेन, राजकोट, किल्ला बांगडी, मशीन बांगडी आणि फॅन्सी इत्यादी प्रकारचे डिझाईन्स उपलब्ध आहेत. बांगड्यांचा कोणताही सेट साधारण चार ते सहा बांगड्यांचा असतो. यामध्ये दोन पाटल्या आणि चार बांगड्या असतात. बांगडीच्या तुलनेत पाटल्या थोड्या जाड असतात. हे सेट साधारण ५० ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे उपलब्ध आहेत. पाटल्या स्वतंत्रही घेता येतात. यामध्ये प्लेन आणि नक्षी असे दोन प्रकार दिसतात. गोट पॅटर्नमध्ये दोनच बांगड्या येतात, यांना हॉलो पॅटर्न असेही म्हणतात. दुबई पॅटर्नमध्ये बांगडीवर जाळीवर्क केलेले असते. रेग्युलर पॅटर्नमध्ये मात्र हँडवर्क केलेले असते. बांगड्यांचे फॅन्सी प्रकार पाहिले तर यात तोडे पॅटर्न आणि टेम्पल पॅटर्न उपलब्ध आहेत. हे २० ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. टेम्पल बांगड्यांवर रेड स्टोनचे वर्क केल्याने हा सेट जास्त आकर्षक दिसतो. त्यामुळे बांगड्यांमध्ये टेम्पल पॅटर्नला आजही तेवढीच पसंती दिली जाते. बाजूबंदामध्ये प्लेन, कलकत्ती आणि टिकली हे प्रकार उपलब्ध असून ते साधारण १५ ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत.

अंगठ्यांमध्ये कलकत्ती पॅटर्नसह फॅन्सी डिझाईन्सही उपलब्ध आहेत. अंगठ्या साधारण दोन ते तीन ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी अंगठ्यांमध्ये एम्बॉस, कास्टिंग, रजवाडी, नजराणा इत्यादी प्रकारचे डिझाईन्स उपलब्ध असून हे एक तोळ्यापासून पुढे मिळतात.

ब्रेसलेट हे सोने आणि चांदी दोन्हीमध्ये उपलब्ध असून यामध्येही अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात. पुरुषांचे सोन्याचे ब्रेसलेट १० ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. तर चांदीचे ब्रेसलेट १,६०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. महिलांसाठी सोन्याचे ब्रेसलेट पाच ग्रॅमपासून उपलब्ध आहे, तर चांदीचे अगदी एक हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. ब्रेसलेटमध्ये अमेरिकन डायमंड, कास्टिंग, टिकली, कोईमतुरी, चेन हे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये अमेरिकन डायमंडचा वापर असलेल्या ब्रेसलेटला जास्त मागणी असून ५० ते ६० हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. सोन्याचा सध्याचा भाव एक तोळा ४९ हजारांच्या दरम्यान आहे, तर चांदीचा भाव ६०० रुपये तोळा/भार आहे. सोन्या-चांदीचे भाव जरी रोज असेच बदलत असले तरीही दागिन्यांमध्ये गुंतवणूक फायदेशीरच ठरते.   

सध्या पारंपारिक दागिन्यांनाही तेवढीच मागणी आहे. सोने, चांदी, प्लॅटिनम याबरोबरच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीदेखील ट्रेंडमध्ये आहे. तसेच अधिक महिन्यामुळे चांदीच्या आर्टिकल्सचीही भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. सणांच्या पार्श्‍वभूमीवर लोक दागिने खरेदी करणार हे नक्की. आमच्याकडे कस्टमाइज्ड ज्वेलरी असते. आम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांसाठी एक खास कॅम्पेन लाँच करत आहोत. त्यामध्ये ग्राहकांसाठी भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही कॅम्पेन तीन महिन्यांपुरतीच मर्यादित असेल. 

- पूजा कुलकर्णी,   ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग हेड, श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स

संबंधित बातम्या