ढोल बाजे...

सोनिया उपासनी
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

यंदा नवरात्रात नेहमीसारखा जल्लोषभरा दांडिया रास नसला, तरी सर्व काळजी घेऊन उत्सव साजरा होईल... आणि त्यासाठी परफेक्ट आऊटफिट आणि स्टाइल हवीच! त्यासाठीच नवरात्रातील फॅशन ट्रेंड्सविषयी...

अधिक मास संपून आता नवरात्रोत्सवाची लगबग आणि गडबड सुरू झाली आहे. इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही हा उत्सव जल्लोशात साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात घटस्थापना, धान्यपेरणी आणि नऊ दिवस अखंड दिव्याची तेवती ज्योत असे मनोहारी वातावरण असायचे. आश्विन शुद्ध पक्षात अंबा (देवी) सिंहासनारूढ झाल्यावर घरातील समस्त आबालवृद्धांची रेलचेल, उपवास, हळदीकुंकू, कन्यापूजन सुरू होते आणि शेवटी दसऱ्याच्या सोनेरी दिवस उजाडतो. 

भारतातील प्रत्येक राज्यामध्ये नवरात्रीचे निरनिराळे प्रकार पाहावयास मिळतात; त्याच बरोबर बघायला मिळते, ती विविध राज्यांची खास फॅशन. आपल्या राज्यात सर्व भाषिक, सर्व धर्मीय एकोप्याने हा सण साजरा करतात. गुजरातमधील आणि राजस्थानी लोक ‘गरबा’ मधे मांडून त्याभोवती दांडिया रास खेळतात. बंगाली लोकांमध्ये दुर्गापूजा, पंडाल हॉपिंग, सिंदूर खेला करतात. जितकी राज्ये, तितके प्रकार. पण या सगळ्यात दांडिया रास हा सर्वांचा आवडता प्रकार!

त्यात मार्केटिंग गिमिक म्हणून नवरात्रीच्या नऊ रंगांचे फॅड आले. त्याला काही शास्त्र नसले तरी वरवर बघितल्यावर लक्षात येते, की वारांचे जे रंग आहेत त्या हिशोबाने या रंगांचे वाटप करून त्याप्रमाणे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसवण्यात आले... आणि त्याची पब्लिसिटी केल्यावर संपूर्ण महाराष्ट्र रोज एकेका रंगात रंगू लागला. उदा. सोमवारचा रंग पांढरा, गुरुवारचा पिवळा इत्यादी.

या वर्षी नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होतोय. त्यामुळे प्रतिपदेला म्हणजे शनिवारी (ता. १७) करडा (ग्रे), रविवारी (ता. १८) नारंगी (ऑरेंज), सोमवारी (ता. १९) पांढरा (व्हाईट), मंगळवारी (ता. २०) लाल (रेड), बुधवारी (ता. २१) निळा (ब्लू), गुरुवारी (ता. २२) पिवळा (यलो),  शुक्रवारी (ता. २३) हिरवा (ग्रीन), पुढील शनिवारी (ता. २४) मोरपंखी (पिकॉक ग्रीन) आणि रविवारी  (ता. २५)जांभळा (पर्पल) असे रंग आहेत. तर अशा या विविध रंगांनी नटलेल्या उत्सवासाठी आधीपासूनच शॉपिंगचे कार्यक्रम आखायला सुरुवात होते. शॉपिंग लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचे शॉपिंग असते ते चनीया चोळी, घागरा, पुरुष आणि स्त्रियांसाठी केडीया, गरारा, शरारा, पटोला साड्या, धोती आणि कुर्ता इत्यादी.

नवरात्र स्पेशल आऊटफिट्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी करून तयार करतात. स्पेशली कच्छी एम्ब्रॉयडरीचे जॅकेट्स, घागरे, साड्या यांना देशविदेशातही विशेष मागणी आहे. कवड्या, सिक्वीन आणि विविध प्रकारचे मणी लावून तयार केलेले आऊटफिट्सही सध्या ‘इन थिंग’ आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांचे नक्षीकाम करून झल्ला पद्धतीच्या घागऱ्यावर बांधल्या जाणाऱ्या कंबरपट्ट्यांनासुद्धा खूप मागणी आहे.  स्त्रियांप्रमाणे पुरुषही दांडिया रासमध्ये हल्ली अगदी उत्साहाने सहभागी होतात आणि मनमुराद आनंद लुटतात. बरेच जण या वेळी केडीया, धोती, पगडी हा ट्रॅडिशनल आऊटफिट अगदी उत्साहाने फ्लॉन्ट करतात. दर वर्षीप्रमाणे या वर्षी दांडिया रास नसला, तरीही पुढील वर्षी हे आउट्सफिट्स घातलेली तरुणाई दांडिया रासमध्ये थिरकताना दिसेल.

फ्युजन ही पद्धतसुद्धा सध्या एकदम चलनात आहे. ट्रॅडिशनल घागऱ्यावर हॉल्टर नेक क्रॉप टॉप, अथवा केडीयाबरोबर पँट्सचे टीम अप, वेस्टर्न लाँग अथवा शॉर्ट वनपीसबरोबर लाँग ट्रॅडिशनल एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट्स, लाँग हेवी वर्क कुर्तीबरोबर नॅरो बॉटम ट्राउझर्स, असे एक ना अनेक फ्युजनचे प्रकार आहेत. हे प्रकार तरुणाईमध्ये विशेष आवडीचे आहेत. 

बाजारात घागरा चोलीच्या रंगांना साजेल असे मॅचिंग कापडी दागिनेही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत व आपल्या आऊटफिटच्या रंगसंगतीप्रमाणे ऑर्डर दिल्यावर तयारही करून मिळतात. कच्छी, शाबेरी आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीलाही विशेष मागणी आहे. सर्व हेवी वर्क ड्रेसेसवर लाँग हँगिंग इअरिंग्स अधिकच उठून दिसतात. गुजराती राजस्थानी स्टाइलच्या रंगीबेरंगी लाखेपासून तयार केलेल्या बांगड्यांनाही कायमस्वरूपी विशेष मागणी असते. 

सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग होते ती दांडियांची. पूर्वी दांडिया म्हणजे  गरबाभोवती खेळायच्या दोन काड्या एवढेच होते. काळ बदलला आणि कपड्यांच्या फॅशनप्रमाणेच दांडियांची फॅशनही बदलली. आता या दोन लाकडी काड्याही विविध रंगांनी सजवल्या जातात. वेगवेगळी चमकदार कापडे लावून, अथवा शायनिंग थ्रेड्स लावून, आऊटफिट्सला मॅचिंग घुंगरू, टॅसल्स लावून अथवा मण्यांच्या सुंदर सुंदर माळांनी सजलेले अनंत प्रकार मिळतात.  हे सर्व झाल्यावर अजून एक महत्त्वाची ॲक्सेसरी उरते ती ट्रॅडिशनल फुटवेअरची. वेगवेगळ्या मोजड्या, जुती, मोकासीन्स आऊटफिट्सला मॅचिंग रांगांमध्ये उपलब्ध असतात. 

टॉप टू टो नटल्यावर तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवायला थ्रेड वर्कच्या ट्रॅडिशनल डिझाईन्सच्या सुंदर सुंदर हँडबॅग्स आणि स्लिंग बॅग्सही हव्या त्या आकारात उपलब्ध आहेत.

नवरात्रात अजून एक क्रेझ तरुणाईमध्ये असते, ती म्हणजे फेस, बॅक अथवा बॉडी पेंटिंगची. आजकाल टेम्पररी टॅटूचे ही फॅड आहे. काळजी घेऊन टिकवले, तर हे पेंटिंग अथवा टॅटू काही दिवसांसाठी मिरवता येतात. यामध्ये खास करून देवीचे मुखवटे अथवा गरबा खेळतानाचे जोडपे अथवा कुठलेही ट्रॅडिशनल डिझाईन पेंट अथवा टॅटू करून घेतले जाते. अशा या नऊ रात्रींनंतर दसऱ्याची-विजयादशमीची सोनेरी पहाट उजाडते. नऊ दिवस कितीही फ्युजन, मिक्स अँड मॅच, इंडोवेस्टर्न परिधान केले तरी दसऱ्याला मात्र सर्व महिला, तरुणी आपल्या पारंपरिक वेशात दागदागिन्यांनी नटलेल्या असतात. आपल्या सर्वांना या वर्षी अजून एक खास बाब आवर्जून पाळायची आहे, ती म्हणजे कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर कम्पलसरी मास्क घालायचा आहे. तर, नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये आपल्या मास्कलाही रंगवा आणि हा उत्सव सुरक्षिततेत आणि आनंदात आपल्या स्वजनांबरोबर साजरा करा. 

नवीन फॅशन ही अंगीकारायचीच असते हो, पण आपली परंपरा जपून!   

 

संबंधित बातम्या