साम्य...

मकरंद केतकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

विशेष

‘मानव आणि पशुपक्षी’ तसेच विविध पशुपक्ष्यांमधील आपापसातील परस्परसंबंध उलगडण्याचा प्रयत्न करण्याचा या लेखमालेचा उद्देश आहे. सोबतच त्या त्या लेखाचा विषय असलेल्या जीवांची शारीरिक वैशिष्ट्ये व इतर गुणधर्म याबद्दलसुद्धा अधिक माहिती आपण घेऊच. जेव्हा केव्हा तो प्राणी आपल्या पाहण्यात येईल, तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन ही लेखमाला आपल्याला नक्कीच देईल...

मानव हा बहुधा असा एकमेव सजीव आहे जो चाकोरीबाहेर विचार आणि कृती करतो. म्हणूनच इतर प्राण्यांशी तुलना करताना माणसांच्या बाबतीत वर्तवलेले अंदाज अनेकदा सपशेल चुकीचे ठरतात. उदा. सगळी हरणे शाकाहारी आहेत. संपूर्ण मार्जारकुळ मांसाहारी आहे. पण माणसांमध्ये पूर्ण शाकाहारी, पूर्ण मांसाहारी, मिश्राहारी तसेच ‘वीगन्स’ म्हणजे दुधासकट सगळे प्राणिजन्य पदार्थ वर्ज्य असणारे असे अनेक प्रकार आढळतात. म्हणजे माणसाची उत्क्रांती पूर्ण झालीय की निसर्गाने नाद सोडून दिला असावा अशी कधीकधी शंका येते. तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल, पण जगात अशीही एक संस्था आहे जिचे सदस्य ‘पृथ्वी गोल नसून तबकडीसारखी सपाट आहे’ असा प्रचार करत असतात. त्या संस्थेचे नाव ‘फ्लॅट अर्थ सोसायटी’. आपला दावा सिद्ध करण्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. एव्हढेच काय पण उपग्रहांनी काढलेले फोटोसुद्धा खोटे आहेत असा त्यांचा दावा असतो. असाच एक वेगळा पंथ म्हणजे, मानवाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि त्याचे इतर सजीवांपेक्षा असलेले विलक्षण वेगळेपण यामुळे ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ या विचाराचे अनुयायी. जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये आहेत. असा विचार करणाऱ्‍यां ही मंडळे मते कोण्या अतिप्रगत परग्रहवासीयांनी त्यांच्या प्रयोगासाठी पृथ्वीवर माणूस नावाचा वेगळा सजीव आणून सोडला. परंतु, याच मानवाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केलेले संशोधन त्याला दुजोरा देत नाही. 

आजच्या लेखात मी याबद्दल थोडे अधिक बोलतो. मागच्या लेखमालेतील शेवटचा लेख लिहिताना मी मानव आणि त्याचे घनिष्ठ नातेवाईक असलेले चिंपांझी यांच्यातील एक टक्क्याच्या जनुकीय फरकाबद्दल सांगितले होते. गुणसूत्रांमध्ये असलेल्या इतक्या अल्प बदलांनी दोन जातींमध्ये आकाशपाताळाएवढा फरक झालेला आहे. पण तरीसुद्धा उर्वरित गुणसूत्रे मिळतीजुळती असल्यामुळे दोन्ही प्राण्यांच्या शरीराची मूळ ठेवण, एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत यात खूप साम्य आढळते.

पण एकंदरच माणूस आणि विविध प्राण्यांच्या वर्तनात अनेकदा समानता आढळते. उदाहरण द्यायचे झाले तर सजीव आणि निर्जीव यातला फरक अधोरेखित करणारी क्रिया म्हणजे प्रजनन. बहुतांश सजीवांमध्ये नर आणि मादी यांच्या मीलनातूनच प्रजनन होते. अशा सजीवांमध्ये कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीमधून या मीलनापूर्वी अनुरूप जोडीदाराच्या निवडीची प्रक्रिया रुजत गेली आणि तो अधिकार मादीकडे आला. याचे मुख्य कारण म्हणजे मादीकडे नवीन जिवाला जन्म देण्याचे जबाबदारीचे काम असते. अनेक प्राण्यांमध्ये मादीच पिल्लांना मोठे करते. त्यामध्ये ऊर्जेची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे तिने आकर्षक दिसण्यात ऊर्जेचा अपव्यय करणे अनाठायी आहे. याच्याविरुद्ध या प्रक्रियेत नराची जबाबदारी तुलनेने कमी महत्त्वाची असल्याने त्याच्यामध्ये रंग-रूप-शक्ती-स्वर असे गुण विकसित होत गेले, ज्यांच्या आधारे मादी उपलब्ध नरांपैकी सर्वोत्तम नराची निवड करते. निवड आली म्हणजेच नरांना परीक्षा देणे आले आणि त्यातूनच स्पर्धेचा जन्म झाला. ही स्पर्धा कधी ताकदीची असते, कधी घरटी बांधण्याची असते, कधी शारीरिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन करण्याची असते, तर कधी मोठ्या हद्दीची असते. 

वाघ, हत्ती, हरणे तसेच इतर अनेक प्राण्यांमधील नर मीलनकाळात आपापसात मारामारी करून आपल्या ताकदीच्या जोरावर कळपामध्ये वर्चस्व गाजवतात. पक्ष्यांमध्ये सुगरणीचे नर मादीला आकर्षित करायला सुबक घरटी बांधायचा प्रयत्न करतात. काही प्रजातींचे नर बेडूक आपापसात मारामारी करून स्वतःच्या होणाऱ्‍या पिल्लांसाठी सर्वोत्तम जागा सुरक्षित करतात. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला तर ‘स्वयंवर’ हा विधीसुद्धा याच ‘स्पर्धेतून निवड’ प्रकारात येतो. स्वयंवराच्या दिवशी देशोदेशीच्या राजकुमारांची सभा भरत असे. त्यात काव्यशास्त्रविनोद, वादविवाद, शस्त्रनैपुण्य अशा विविध स्पर्धा होत असत व त्यातून सर्वोत्तम राजकुमार, जो सर्वगुणसंपन्न आहे, सुस्वरूप आहे त्यालाच अखेर राजकन्या वरत असे.  

माणूस आणि प्राण्यांचा इतिहास पाहताना अशी अनेक साम्यस्थळे आढळतात ज्यातून आपण निश्चितपणे सांगू शकतो, की माणूस पृथ्वीवर उपरा तर नाहीच उलट इतर सजीवांचा सोयरा आहे. किमान तीस चाळीस लाख वर्षे सोबत राहणाऱ्‍या माणूस आणि पशुपक्ष्यांनी कसे एकमेकांशी जुळवून घेतले, प्राण्यांनी माणसांचे जीवन कसे घडवले याबद्दल अधिक माहिती आगामी लेखांमधून घेऊ.

मानव आणि त्याचे घनिष्ठ नातेवाईक असलेले चिंपांझी यांच्यातील गुणसूत्रांमध्ये असलेल्या अल्प बदलांनी दोन जातींमध्ये आकाशपाताळाएवढा फरक झालेला 
आहे. पण तरीसुद्धा उर्वरित गुणसूत्रे मिळतीजुळती असल्यामुळे दोन्ही प्राण्यांच्या शरीराची मूळ ठेवण, एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत यात खूप साम्य आढळते.

संबंधित बातम्या