यांचं सगळंच भन्नाट

मकरंद केतकर
सोमवार, 25 जानेवारी 2021

सहअस्‍तित्व
 

लहानपणापासून आपण सगळ्यांनी एकदा तरी ऐकलेले किंवा वाचलेले वाक्य म्हणजे ‘कुत्रा हा माणसाचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे.’ पुराणातल्या कथा तसेच इतिहासातल्या अनेक गोष्टी कुत्र्यांच्या ‘वफादारी’च्या कहाण्या सांगतात. आजच्या आधुनिक जगातही मरण पावलेल्या मालकाच्या आठवणीत झुरून कुत्र्यांनी प्राणत्याग केल्याच्या घटना घडल्या आहेत. अंतराळात माणसाने सोडलेला पहिला जीव ‘लायका’ नावाची कुत्री होती आणि हा तोच प्राणी आहे, कोणाला पटो वा न पटो, पण ज्याचे मांस चीनमध्ये आवडीने खाल्ले जाते.

पुराणातली पांडवांच्या कुत्र्याची कथा खूपच प्रसिद्ध आहे. महाभारताच्या युद्धानंतर सगळे मिळवूनही खूप काही गमावलेल्या पांडवांनी अखेरच्या प्रवासाचा रस्ता धरला होता. त्या प्रवासात द्रौपदी, सहदेव, नकुल, अर्जुन, भीम या सगळ्यांचा मृत्यू झाला आणि फक्त युधिष्ठिर व त्याचा कुत्रा स्वर्गाच्या दारात पोहोचले. तिथे इंद्राने युधिष्ठिराला कुत्रा मर्त्य जीव असल्याने त्याला रथात घेता येणार नाही असे सांगितले. पण इमानी कुत्र्याला एकटे सोडणे पाप होईल म्हणून त्याच्याशिवाय मी स्वर्गात येणार नाही असे युधिष्ठिरानेही इंद्राला निक्षून सांगितले. हे पाहून युधिष्ठिराचे स्वर्गारोहण सोपे व्हावे यासाठी त्याच्याप्रति अत्यंत प्रेम असलेल्या कुत्र्याने आपला जीव त्यागला व त्याला प्रेमाच्या पाशांमधून मोकळे केले. 

कुत्र्यांचे माणसांशी असलेले सख्य कसे निर्माण झाले व वाढले याची माहिती आपण मागच्या दोन लेखातून घेतली. कुत्र्याची भीती वाटणारे किंवा तो अजिबात न आवडणारे लोक सोडले तर कुत्रा पाहून ‘ऑ.. कित्ती गोड आहे,’ असे उद्‍गार काढलेले आपल्याला ऐकायला मिळतात. डोळे हे भावना व्यक्त करण्याचे बहुतांश सजीवांचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. शेपूट हलवत आलेल्या कुत्र्याचे डोळे लहान मुलासारखे निरागस व बालिश भाव व्यक्त करतात व आपल्या हृदयाशी नाते जोडतात. म्हणूनच बहुतांश लोक लहान मुलांशी बोलावे तसे कुत्र्यांबरोबरही बोबडे बोलतात. 

आपल्या डोळ्यांना दिसते तसे जग कुत्र्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. त्यांच्या नजरेतले जग जरासे भुरकट आणि फिके असते. त्यांना रंगांचे फारसे ज्ञान नसते पण राखाडी रंगाच्या छटा चांगल्या ओळखता येतात. रात्री सगळेच गडद रंगात दिसते व त्यातून भक्ष्य वेगळे ओळखता येणे महत्त्वाचे असते. म्हणून त्यांच्यात ही क्षमता विकसित झाली असावी. याचबरोबर त्यांच्या डोळ्यात ‘टॅपेटम ल्युसीडम’ नावाचा प्रकाशपरावर्ती पडदा असतो, जो टॉर्चच्या प्रकाशात चमकतो. हा पडदा क्षीण प्रकाशकिरणे डोळ्यातल्या प्रकाशग्राही पेशींकडे परावर्तित करतो व त्यामुळे कुत्र्याला काळोखातही व्यवस्थित दिसते. कुत्र्यांना फार लांबचे दिसत नाही ही त्यांच्या दृष्टीक्षमतेतली एक उणीव आहे. पण ती भरून काढण्यासाठी त्यांना २४० अंशाच्या कोनातील दृश्य दिसते. माणसांना फक्त १८० अंशातीलच दिसते, कारण आपले डोळे चेहऱ्‍यावर शेजारी शेजारी आहेत. माणसांप्रमाणेच कुत्र्यांचे डोळेही त्याच्या आजारपणाची लक्षणे दाखवतात, जसे की कावीळ, अशक्तपणा वगैरे. कुत्र्यांचे डोळे बघून त्यांच्या मालकांना त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू करणे शक्य होते.

कुत्र्यांचे नाक हा एक भन्नाट विषय आहे. कुत्रा डोळ्यांपेक्षा नाकाने हे जग पाहतो असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अगदी झोपेतसुद्धा तो नकळत गंधकण हुंगत असतो. त्यासाठी त्याला त्याचे नाक सतत ओलसर ठेवावे लागते, म्हणून तो जीभ फिरवून नाक ओले ठेवतो. त्याच्या नाकातून स्रवणारा श्लेष्मा गंधकण शोषतो व मेंदूला संदेश पोचवतो. आपण जेव्हा ठरवून वास घेतो, तेव्हा आपल्याला श्वसन थांबवावे लागते. पण कुत्रे वास घेणे आणि श्वास घेणे व सोडणे या तिन्ही क्रिया एकाच वेळी चालू ठेवतात. त्यांना श्वासोच्‍छ्‍वास थांबवायची गरज पडत नाही. त्यांचा मेंदू प्रत्येक नाकपुडीतून येणाऱ्‍या गंधकणांचे स्वतंत्र विश्लेषण करतो व एक त्रिमिती चित्र उभे करतो. जसे आपले डोळे दोन वेगवेगळ्या कोनांमधून दृश्य बघतात व मेंदू त्याची एकच प्रतिमा बनवतो. कुत्र्यांना यामुळे वासाचे नेमके अवलोकन करणे सोपे जाते. कुत्र्यांना गंधाच्या तीव्रतेवरून कालमापन करता येते. म्हणजे एखादा प्राणी त्या जागेवरून किती वेळापूर्वी व कुठल्या दिशेला गेला हे त्यांना ओळखता येते व त्यानुसार ते त्याचा माग काढतात. त्यांची घ्राणक्षमता मानवाच्या क्षमतेच्या तुलनेत एक लाख पटीने तीव्र असते. त्यामुळे ते अगदी फिकट गंधसुद्धा शोधू शकतात. तुलनेसाठी उदाहरण द्यायचे, तर ही क्षमता म्हणजे ऑलिंपिकमध्ये असणाऱ्या तरणतलावात विरघळलेल्या अर्धा चमचा साखरेची चव घेता येण्यासारखी क्षमता. मला आठवते, मी लहानपणी एका डॉक्युमेंटरीमध्ये एक प्रयोग पाहिला होता. त्यामध्ये लॅब्रेडॉर कुत्रा त्याचे टार्गेट असलेल्या माणसाचा तब्बल आठ-दहा किलोमीटरपर्यंत वास घेत जाऊन त्याला शोधून काढतो. मी हेही पाहिलेय की नुकतीच व्यालेली कुत्री आपल्या पिल्लांना आचळ कुठे आहे हे कळावे म्हणून आपल्या स्तनाग्रांना चाटते व पिल्लांच्या नाकाला चाटते ज्यामुळे त्यांना आईचे पोट शोधणे सोपे जाते.

कुत्र्यांकडे असलेले तिसरे महत्त्वाचे आयुध म्हणजे त्यांची श्रवणक्षमता. ती एवढी तीव्र असते की लाकडी भिंतीत चालणाऱ्‍या वाळवीचा ‘पदरव’सुद्धा त्यांना ऐकू येतो. त्यांचे कान स्वतंत्रपणे आवाजाचा मागोवा घेऊन आवाजाची दिशा निश्चित करतात. तसेच ते कानांच्या हालचालींवरूनही आपल्या भावना व्यक्त करतात. गंमत म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या श्रवणमार्गिका बंद असतात, त्या आठवड्याभराने उघडतात.याशिवाय कुत्र्यांकडे खूप दूरपर्यंत एकाच वेगात पळत राहण्याची क्षमता असते. याचा वापर ते टोळीने शिकार करताना व्यूहरचना करून सावजाला पळवून दमवण्यासाठी करतात.

आपल्या या मित्राविषयी लिहावे तितके थोडे आहे. मनुष्य आणि श्वानांची युती अशीच चिरायू राहो.

संबंधित बातम्या