अश्‍वकुळाच्या अद्‍भुत क्षमता

मकरंद केतकर
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सहअस्तित्व

यस्याश्वा तस्य राज्यं। यस्याश्वा तस्य मेदिनी।
यस्याश्वा तस्य सौख्यं। यस्याश्वा तस्य सामराज्यं।।

‘ज्याच्याकडे घोडे आहेत त्याच्याकडे सत्ता आहे. ज्याच्याकडे घोडे आहेत पृथ्वी त्याची अंकित आहे. ज्याच्याकडे घोडे आहेत त्याच्याकडे सौख्य आहे आणि तो सर्वशक्तिशाली सम्राट आहे,’ अशी घोड्यांची महती वर्णन करणारा हा श्लोक. ऐश्वर्य, सौंदर्य, शक्ती आणि वेग यांचे प्रतीक म्हणून पूर्वापार घोड्याकडे पाहिले जाते.

आपल्या प्राचीन लेण्यांमध्ये अलंकृत घोडे कोरलेले आढळतात. ताकदवान, वेगवान आणि अत्यंत महाग गाड्या तयार करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ‘फेरारी’ या कंपनीच्या लोगोत पुढचे पाय उचलून उधळण्याच्या तयारीत असलेला घोडा आहे. वाहनाच्या शक्तीचे एककसुद्धा हॉर्सपॉवर आहे. कित्येक सत्ता, कंपन्या आणि सुरक्षादलांनी घोड्याचा आपल्या चिन्हात समावेश केलेला आहे. जेव्हा एखादा योद्धा घोड्यावर स्वार होतो तेव्हा त्याचा थाट कितीतरी पटींनी वाढतो. बाजीराव पेशव्यांनी आपल्या अल्पायुष्यात दोन लाख किलोमीटरची घोडदौड केली. त्यांच्या अजिंक्य कारकिर्दीत या वेगाचा खूप मोठा हातभार आहे... आणि म्हणूनच, मनुष्याच्या प्रगतीच्या घोडदौडीमध्ये अश्वकुळातील प्राण्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे हे निर्विवाद सत्य आहे. 

माणूस आणि घोड्यांचे संबंध फार जुने नाहीत. जेमतेम पाच हजार वर्षांपूर्वी दक्षिण रशिया आणि कझाकिस्तान या भागातील गवताळ कुरणांमध्ये चरणाऱ्‍या घोड्यांना माणसाळवण्याचा प्रयोग झाला आणि हळूहळू ते ज्ञान जगभर पसरत गेले. त्यापूर्वी अश्वकुळातील गाढवांचा उपयोग ओझी वाहण्यासाठी केला जात असे. मानवी समाजातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून या प्रयोगाकडे आदराने पाहिले गेले पाहिजे. घोड्यांचा उपयोग गोवंशाप्रमाणेच माणसाने दूध, मांस, व्यापार, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात केला. नेहमीप्रमाणेच या प्रक्रियेत संकर घडल्यामुळे घोड्यांच्या अनेक जाती निर्माण झाल्या. घोडा आणि गाढव यांचा संकर घडवून खेचरसुद्धा तयार केले. व्यावहारिकदृष्ट्या इतके महत्त्व प्राप्त झाल्यामुळे घोड्यांची काळजी घेणारे वैद्यकशास्त्रही विकसित झाले. घोड्यांच्या वैद्याला शालीहोत्री, साळोत्तरी अशी नावे आहेत.

घोडा, गाढव आणि झेब्रा या प्राण्यांच्या कुळाला ईक्वीड असे संबोधले जाते. घोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या ‘ईक्वस’ या लॅटिन शब्दावरून या कुळाला सदर नाव देण्यात आले आहे. या प्राण्यांचा समावेश ‘ऑड टोड अंग्युलेट्स’ म्हणजे विषम खुरी या प्रकारात होतो. गाय बैल यांच्या दुभंगलेल्या खुरांच्या विरुद्ध अश्वकुळातील प्राण्यांच्या पायांना एकच खूर असतो. वर म्हटल्याप्रमाणे हे गवताळ प्रदेशातील प्राणी आहेत. एकाच मोठ्या खुराचा फायदा म्हणजे या प्राण्यांना मोकळ्या भूभागात वेगाने पळताना अडचण येत नाही. या एकांगी खुरांच्या उत्क्रांतीचा इतिहास मनोरंजक आहे. उपलब्ध जीवाष्मांनुसार या प्राण्यांचा उदय साधारण चार कोटी वर्षांपूर्वी ईओसीन युगात आजच्या अमेरिका खंडात झालेला आढळतो. सुरुवातीला हे प्राणी लहान आकाराचे आणि जंगलात राहणारे होते. आपल्यासारखीच त्यांनाही सुरुवातीला पाच बोटे होती. मात्र हवामान बदलामुळे गवताळ प्रदेश निर्माण होऊ लागले तसे हे प्राणी जंगलातून कुरणांमध्ये सरकले व नवीन अधिवास मानवल्यामुळे कालांतराने या प्रदेशातच त्यांचा विकास झाला. शिकाऱ्‍यांपासून जीव वाचवून वेगाने पळता यावे यासाठी त्यांचे पाय अधिक लांब होत गेले. अधिवासानुरूप उत्क्रांतीत फक्त मधले मोठे बोटच शिल्लक राहून अखेर त्याचे नखाप्रमाणे कठीण कवच असलेल्या खुरात रूपांतर झाले. नवीन अधिवासातील वनस्पती खाद्याशी जुळवून घेताना त्यांचे ओठ लवचिक आणि मोठे झाले. बोटांसारखे काम करणारे ओठ आणि मोठ्या आकाराचे पटाशीचे दात यामुळे त्यांना खुरट्या आणि काटेरी वनस्पतींची पानेही अलगद खुडता येतात.

आजच्या घोड्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी साधारण दोन कोटी वर्षांपूर्वी विकसित झाले. घोड्यांच्या उत्क्रांतीची प्रगती दर्शवणारे विविध काळातील अनेक जीवाश्म उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग उदाहरण म्हणून उत्क्रांतीच्या तत्त्वाचा अभ्यास करणाऱ्‍यांना होतो. आज दुर्दैवाने खऱ्‍या अर्थाने वन्य म्हणता येतील अशा घोड्यांच्या प्रजाती शिल्लक नसल्या, तरी जगभर माणसाने सोडून दिलेले प्राणी कळप करून हिंडताना आढळतात. त्यात कळपाचे नेतृत्व करणारा नर, माद्या आणि शिंगरांचा समावेश होतो. कळपातल्या पिल्लांमधील नर दोन वर्षांचे झाले की कळपाचा प्रमुख त्यांना हुसकावून लावतो. असे तरुण नर कळप करून एकत्र हिंडतात आणि माद्यांच्या शोधात राहून स्वतःचा परिवार सुरू करण्याचा प्रयत्न करतात.

अश्वकुळातील प्राण्यांमध्ये गरजेनुसार अनेक शारीरीक वैशिष्ट्ये निर्माण झालेली आढळतात. घोड्यांच्या शरीरात स्नायूंना मोठे महत्त्व असल्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये स्नायूंना नियंत्रित करणाऱ्‍या भागाचा अधिक विकास झालेला आढळतो. त्यांचे डोळे मोठे आणि खोबणीतून बाहेर आलेले असतात. त्यांची विशिष्ट रचना त्यांना काही अंशी द्विनेत्री दृष्टी देते, तसेच त्यांना पाठीमागे होणाऱ्‍या हालचालीसुद्धा टिपता येतात. घोड्यांमध्ये सापाच्या विषाला तोंड देऊ शकेल अशी जबरदस्त प्रतिकारशक्ती असते. त्यामुळेच सापांवर प्रतिविष तयार करण्यासाठी पूर्वी घोड्यांना 

विषाचे डोस देऊन त्यांच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर केला जात असे. त्यांची फुप्फुसे अत्यंत कार्यक्षम असतात. ती प्राणवायूचा अत्यंत चोख वापर करून त्यांना लांब अंतरापर्यंत दौडत राहण्यास मदत करतात.

अश्वकुळातील प्राण्यांच्या अशा विविध अद्‍भुत क्षमतांमुळे माणूस त्यांच्याकडे आकर्षित झाला. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कलाक्षेत्रातसुद्धा त्यांचा ठसा उमटलेला दिसतो. मला सर्वात जास्त भावलेला घोड्याचा उल्लेख म्हणजे जेव्हा वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे वर्णन करताना पु.लं. म्हणतात - ‘वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवत जाणारी नाही. दऱ्‍याखोऱ्‍यातून बेफाम दौडत जाणाऱ्‍या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे.’

 

संबंधित बातम्या