‘अजि’ म्या ब्रह्म पाहिले

मकरंद केतकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

सहअस्तित्व

गोवंशामुळे माणसाच्या आर्थिक तसेच सामाजिक उन्नतीला कसा हातभार लागला. ते आपण मागच्या लेखांमध्ये पाहिले. गोवंशांतील वन्य जनावरांना माणसाळवण्याचा प्रयोग साधारण दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. पण याच सुमारास किंवा त्याच्याही थोडे आधी अजकुळातील प्राण्यांनाही माणसाळवण्याचे प्रयत्न सुरू होते असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. 

हा  तो काळ होता, ज्या सुमारास वातावरण वारंवार बदलत होते व त्यामुळे तत्कालीन मानवी जीवनावर त्याचा ताण येऊ लागला होता. याचीच परिणती प्राण्यांना माणसाळवण्यात आणि शेतीच्या शोधात झाली, जेणेकरून भुकेचा मुख्य प्रश्न सुटेल. ही प्रक्रिया जरी एका झटक्यात होणारी नसली तरी प्रयोगामधल्या सातत्यामुळे हळूहळू प्राण्यांमध्ये जनुकीय बदल घडत जातात आणि हवा तो परिणाम दिसत जातो. हीच बाब वनस्पतींच्या बाबतीतही दिसते. उदाहरणार्थ बटाटा हा मूळचा दक्षिण अमेरिकेतला आणि विषारी असलेला कंद प्राचीन माणसांनी प्रयोग करून खाण्यालायक बनवला आणि आज तो भारतीय संस्कृतीच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये विराजमान झालेला आहे. याच अनुषंगाने आपण बकरीपालनाकडे पाहू शकतो. जे वन्यप्राणी बंदिस्त जागेत ठेवता येऊ शकतील आणि आज्ञाधारक असतील असेच प्राणी निवडून त्यांचा वापर करण्यात आला. मग यामध्ये उग्र स्वभाव मवाळ होत गेल्याने आकार लहान होणे, वेग कमी होणे, शिंग आखूड होणे ही लक्षणे प्रकट होत गेली. 

याचे माझ्या अनुभवातले एक उदाहरण सांगतो. तामिळनाडू राज्यात असलेल्या पश्चिम घाटाच्या पर्वत रांगांत ‘निलगिरी ताहर’ नावाची बकरीची एक वन्य प्रजाती आढळते. या बकऱ्‍या त्यांच्या विशिष्ट खुरांमुळे उभ्या कड्यांवर चालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या पर्वत रांगांमध्ये जे अनेक घाटरस्ते आहेत त्यापैकी वालपराई भागातील चहाच्या मळ्यांकडे जाणाऱ्‍या घाटरस्त्यात या बकऱ्‍या कधीकधी रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत खाताना दिसतात. मूळच्या अतिशय लाजाळू स्वभावाच्या या बकऱ्‍यांपैकी ज्या बकऱ्‍या मानवी वर्दळीच्या जवळ आल्या त्या स्वभावाने धीट झाल्या आहेत आणि लोक त्यांच्या शेजारी उभे राहूनसुद्धा फोटो काढताना मी पाहिले आहे. अर्थात वनखात्याचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतातच.

हजारो वर्षांपूर्वीही बकऱ्यांच्या ज्या पूर्वजांची भीड चेपली त्यांना पाळीव करण्यात आले. इराक आणि इराण यांच्यामधील ‘झाग्रोस’ या डोंगराळ प्रदेशात अकरा हजार वर्षांपूर्वीचे पाळीव बकऱ्‍यांचे अवशेष सापडले आहेत. आजच्या बकऱ्‍यासुद्धा त्यांच्या डोंगरी पूर्वजांप्रमाणेच काही प्रमाणात झाडावर चढू शकतात आणि अन्नपाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात जगू शकतात. बदलत्या हवामानात हेच गुण असलेले प्राणी माणसाला आधारभूत ठरणार होते, म्हणूनच त्यांना पाळीव करण्याचे प्रयत्न झाले. आजही आपण पाहिले तर महाराष्ट्रातल्या काटेरी वनस्पती असलेल्या रूक्ष प्रदेशात बकऱ्‍या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात आणि धनगर त्यांना घेऊन फिरतीवर असतात. 

अजकुळातील प्राण्यांच्या अद्‍भुत क्षमता पाहून माणसाने ‘अजि’ म्या ब्रह्म पाहिले असे तर नसेल म्हटले? जसे हे प्राणी पाळीव झाले तसे त्यांना पाळीव करणाऱ्‍या माणसांचा सामाजिक दर्जा उंचावला. आव्हानात्मक हवामान बदलामुळे निर्माण होणारा भुकेचा प्रश्न सुटला. माणसाला स्थैर्य प्राप्त होऊ लागले. बकऱ्‍या नावाची संपत्ती नसलेल्या इतर मानवी समूहांपेक्षा हे वेगळे ठरू लागले. आजच्या भाषेत सांगायचे तर सुशिक्षित मानवी समूह आणि निरक्षर मानवी समूह यांच्यात दिसणाऱ्‍या फरकाप्रमाणेच! अन्नसुरक्षेमुळे आलेल्या या स्थैर्यामुळे मानवी समाजाला इतर प्रयोगांकडे लक्ष देता येऊ लागले. ज्यात इतर प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. माणसांनी नवनवे प्रदेश पादाक्रांत केले आणि ते जिथे जिथे गेले तिथे तिथे बकऱ्‍यांनी त्यांची सोबत केली, कारण त्यांची कुठल्याही वातावरणाला जुळवून घेण्याची अनोखी क्षमता. याच सुमारास बकऱ्‍यांच्या जोडीने त्याच कुळातील मेंढ्यांनाही, दूध आणि मांसाच्या जोडीने त्यांच्या लोकरीसाठी पाळीव बनवण्यात आले. त्यांचे पूर्वज बहुधा आजच्या मेंढ्यांसारखे लहान चणीचे आणि केसाळ नसावेत. परंतु प्रयोगांमधून माणसाने त्यांना अधिक केसाळ आणि मवाळसुद्धा बनवले. 

बकरी आणि मेंढी यांच्यातला मुख्य फरक म्हणजे बकऱ्‍या ब्राऊझर्स आहेत आणि मेंढ्या ग्रेझर्स. आपण सरसकट त्यांच्या खाण्याच्या पद्धतीला चरणे असेच म्हणतो. तरी शास्त्रीयदृष्ट्या या दोन वेगळ्या संज्ञा आहे. ब्राऊझिंग म्हणजे झाडावरील पाला खाणे आणि ग्रेझिंग म्हणजे जमिनीवरील गवत खाणे. बकऱ्‍या दोन्ही करतात म्हणून त्यांना पाळणे अधिक सोपे ठरले असावे. आज या प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी जगभर आढळतात. भारतात वर उल्लेख केलेल्या निलगिरी ताहरप्रमाणेच उत्तरेत हिमालयी ताहर आहेत. हिमाचल प्रदेशामधल्या सुप्रसिद्ध ठिकाण असलेल्या मनाली शहरातील हडिंबा देवळात गेलात, तर तिथे तुम्हाला हिमालयात आढळणाऱ्‍या ‘आयबेक्स’ या प्राण्यांच्या कवट्या देवळाच्या लाकडी भिंतीवर सजावटीसाठी लटकवलेल्या आढळतील. त्यांची तुतारीसारखी भलीमोठी शिंगे आपले लक्ष वेधून घेतात. बकरी हा प्राणी जसा पाळीव झाला, तसा माणसासोबत जगभर गेला आणि त्याच्याविषयी गमतीदार कथासुद्धा निर्माण झाल्या. बकरीला ग्रीक भाषेत ‘केपर’ म्हणतात आणि त्यावरून त्या कुळाचे नाव केप्रिनी असे ठेवले आहे. आपल्यासारखाच युरोपमध्येही रातवा नावाचा एक कीटकभक्षी पक्षी आढळतो. हा पक्षी रात्री बकऱ्‍यांच्या गोठ्यांच्या आसपास कीटक शोधत हिंडत राहतो आणि म्हणून तिथे अशी आख्यायिका आहे की तो बकरीचे दूध चोरतो आणि यावरून त्याचे नाव शास्त्रीय नाव ‘केप्रीमुल्गस’ असे ठेवण्यात आले. त्यातल्या ‘मुल्गस’ या शब्दाचा अर्थ आहे दूध काढणारा. एक शास्त्रीय नाव एका अंधश्रद्धेवरून ठेवण्यात आले हा केवढा गमतीदार विरोधाभास आहे, नाही का?

संबंधित बातम्या