वाळवंटातील जहाज

मकरंद केतकर
सोमवार, 1 मार्च 2021

सहअस्तित्व

या जगात मानवी संस्कृतीचा विकास जिथे जिथे झाला तिथे तिथे आपल्याला एक समान गोष्ट आढळून येते, ती म्हणजे त्या संस्कृतीला तसेच तिथल्या हवामानाला साजेसे ठरलेले पाळीव प्राणी आणि वनस्पती. आपल्या भारतात जशी गाय ही कामधेनू आहे, कोकण तसेच दक्षिण आशियात नारळ हा कल्पवृक्ष आहे तशीच मरूभूमीतील गरीब जनतेची ‘मदार’ अजूनही बऱ्‍यापैकी उंटावर विसंबून असते. माणूस उंटावरचा शहाणा कधी झाला ते माहीत नाही, पण शहाण्या माणसाने उंटाला वेडे बनवण्याचा इतिहास इसवीसनाच्या हजार दोन हजार वर्षे तरी सहज मागे जातो. 

उत्क्रांतीमधून उंटांना लाभलेल्या अद्‍भुत क्षमतांमुळे माणसाला त्यांची उपयुक्तता पटली आणि त्यांच्या वन्यस्वरूपातील पूर्वजांना पकडून माणसाळवण्यात आले. हा प्राणी अत्यंत प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्यात पटाईत आहे. त्यामुळे दुष्काळ पडल्यास एखाद्या माणसाकडे असलेल्या पशुसंपत्तीमधील सगळी गायीगुरे तसेच बकऱ्‍या मरतील, पण त्याच्याकडील जवळपास सगळे उंट जिवंत राहतील.

उंटांच्या ड्रोमेडेरी आणि बॅक्ट्रियन अशा दोन जाती आहेत. ड्रोमेडेरी म्हणजे आपल्या परिचयाचे एक मदारी उंट. ही जात भारत, नैऋत्य आशिया तसेच उत्तर आफ्रिका आणि अरबी वाळवंट अशा विस्तृत परदेशात आढळते. बॅक्ट्रियन उंट, ज्यांना पाठीवर दोन मदार किंवा कुबड असतात ते मध्य आशियातील मंगोलिया, गोबीचे वाळवंट अशा थंड आणि ओसाड परदेशात आढळतात. ड्रोमेडेरी उंटांचे वन्य नातलग आता अस्तित्वात नाहीत. बॅक्ट्रियन उंटांचे जेमतेम सहाशे ते सातशे प्राणी वन्यस्वरुपात वर उल्लेखलेल्या प्रदेशात अजून आढळतात. याच्या उलट एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला मालवाहतुकीसाठी ऑस्ट्रेलिया खंडात नेलेल्या ड्रोमेडेरी उंटांचे काम झाल्यावर सोडून दिलेले तांडे मध्य आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातील शुष्क कोरड्या प्रदेशात मोकाट फिरत असून त्यांची संख्या तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तिथले स्थानिक शाकाहारी प्राणी तसेच रहिवासी यांच्यासाठी हे घुसखोर प्राणी प्रचंड डोकेदुखी झाले आहेत. गेल्याच वर्षी जानेवारी महिन्यात शेताची नासाडी करणार्‍या दहा हजार उंटांना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अविचाराने केलेली कृती कशी अंगलट येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. असो!

'वाळवंटातील जहाज' असे बिरुद मिरवणाऱ्या या प्राण्यासोबत माणसांना प्रवास करणे सोयीचे का ठरले ते आपण पाहू. नैसर्गिक साधनसंपत्तीचे दुर्भिक्ष्य असलेल्या भूभागात राहणार्‍या माणसांना उंटाचा सगळ्यात उपयोगी पडणारा गुण म्हणजे त्याची पाण्याशिवाय जिवंत राहण्याची अफाट क्षमता. सर्वसाधारण परिस्थितीत पाण्याशिवाय उंट सात दिवसांपर्यंत तग धरू शकतो. परंतू पुरेसा ओलसर चारा उपलब्ध झाल्यास सहा ते आठ महिनेसुद्धा पाण्याशिवाय निभावू शकतो. एवढंच नाही तर तो क्षारयुक्त पाणीसुद्धा पचवू शकतो. 

या दरम्यान तो मूत्रविसर्जन कमी करून शरीरातील पाणी वाचवतो. प्यायला पाणी मिळाल्यावर उंट जेमतेम दहा मिनिटात शंभर लिटर पाणी रिचवतो. इतक्या वेगात तहानलेल्या गायीगुरांनी पाणी प्यायले तर अचानक झालेल्या पाण्याच्या शिरकाव्याने रक्तातील पेशी फुटून त्यांचा जीव जाऊ शकतो. पण उंटाच्या पेशींचे आवरण हा ताण सहन करणारे असल्याने त्याचे रक्त हा आघात पचवते. अनेक सस्तन प्राण्यांप्रमाणे उंटांनाही शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येतो. परंतू घामावाटे पाण्याचे उत्सर्जन होत असल्याने त्यावर उपाय म्हणून त्याचे शरीर आधी आत्यंतिक उष्णता सहन करते. शरीराचे तापमान साधारण ४१ अंश सेल्सियस होईपर्यंत त्याला घाम येत नाही. आपल्या शरीराशी तुलना केली तर या तापमानाला माणूस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट करावा लागेल. अगदी टोकाच्या निर्जळी परिस्थितीत त्याचे वजन पंचवीस ते तीस टक्के कमी होऊनही तो जिवंत राहतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अन्न पचवण्याची क्षमता. गोवंशातील प्राण्यांच्या विरुद्ध उंट काटेरी वनस्पती, वाळलेला पालापाचोळा असं किडूकमिडूक अन्न खाऊनसुद्धा राहू शकतो. ज्यावेळेस पौष्टिक अन्न मिळेल तेव्हा तो त्यातली चरबी पाठीवरच्या मदारीत साठवून ठेवतो आणि प्रतिकूल परिस्थितीत तिचा सुयोग्य वापर करतो. जसा चरबीचा वापर वाढत जाईल तशी मदार आक्रसत जाते आणि नाहीशीसुद्धा होते. 'एखाद्या गोष्टीवर मदार असणे' म्हणजे भिस्त असणे हा वाक्प्रचार यातून आलेला आहे. उंटाच्या पापण्यांचे लांबलचक केस वाळूच्या कणांपासून त्याच्या डोळ्यांचे संरक्षण करतात तसेच त्याच्या नाकपुडयासुद्धा पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्याचे वरचे ओठ दुभंगलेले असतात आणि प्रत्येक ओठ बोटांप्रमाणे स्वतंत्र हालचाल करू शकतो. साधारणपणे पाचशे ते साडेसहाशे किलो वजनाचा आणि पाठीपर्यंत साडेसहा फूट उंच असलेला हा विलक्षण प्राणी स्वभावाने सहसा मवाळ असतो. परंतू त्रास दिल्यास चावणे किंवा लाथ मारणे असे प्रकारही घडतात. त्याचे चपटे फेंदाडे खूर आणि लांबसडक पाय गंभीर इजा करू शकतात. या सगळ्या शारिरीक वैशिष्ट्यांमुळे उंट शंभरेक किलो वजन घेऊन दिवसा तीस किलोमीटर आणि रात्रीच्या थंड हवेत पन्नास किलोमीटरपर्यन्तचे अंतर कापू शकतात.  

उंटाच्या कळपात मुख्य नर आणि त्याच्या अंकित असलेल्या सांडण्या अशी रचना असते. सांडणीचे दूध कमी चरबी असलेले परंतू पौष्टिक असते आणि आपल्याकडे लहान मुलांना विशिष्ट आजारात ते दूध पाजले जाते. मला आठवतंय, गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने मुंबईतील एका मातेच्या विनंतीवरून तिच्या बाळासाठी राजस्थानवरुन मुंबईला ते दूध पोचवण्याची व्यवस्था केली होती. आजवरचे माणसाचे आणि उंटाचे सख्य पाहता वाळवंटातील हे जहाज मानवी संस्कृतीला सोबत घेऊन वाळूच्या लाटांवरून भविष्यातही प्रवास करीत राहील याची मला खात्री वाटते.

संबंधित बातम्या