हमराह वराह

मकरंद केतकर
सोमवार, 8 मार्च 2021

सहअस्तित्व

भटक्या अवस्थेतून स्थिरस्थावर होत जाणाऱ्‍या मनुष्याने अन्न, वस्त्र आणि इतर गरजांसाठी प्रयोगशील वृत्तीने विविध वन्यप्राण्यांना आपल्या काबूत आणले आणि आपल्या गरजांनुसार त्यांच्यात शारीरिक बदलसुद्धा घडवून आणले. माणूस आणि प्राण्यांच्या या संगमाचा इतिहास पाहिला तर लक्षात येते, की सुरुवातीला मुख्यत्वे अन्नासाठी प्राणी पाळले गेले. पाठलाग करून शिकार करण्यापेक्षा एकाच जागी पैदास करून हवे तेव्हा त्यांच्यापासून अन्न, कातडी तसेच चरबी मिळवणे खूप सोपे आहे हे तत्कालीन मानवी समूहांना उमगले. मग या यादीत सुरुवातीला जशी गायीगुरांची आणि बकऱ्‍यांची वर्णी लागली तशीच वराहाची अर्थात डुकरांचीही लागली.

गोवंशातील प्राणी आकाराने मोठे असतात तसेच त्यांना पाळणे खर्चीकसुद्धा असते. त्यांना बांधायचे गोठेसुद्धा मोठे असावे लागतात. पण बकऱ्‍या किंवा वराह पाळणे तुलनेने कमी कष्टाचे आणि कमी खर्चीक असते. मानवी संस्कृती आणि वराहवंश यांचा इतिहास हा पुन्हा आठ ते दहा हजार वर्षे मागे जातो. आजच्या पाळीव किंवा खाद्यडुकरांचे पूर्वज असलेल्या रानडुकरांच्या विविध प्रजाती मूळच्या आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडातल्या. माणूस नंतर आपल्यासोबत त्यांना जगभर घेऊन गेला ही गोष्ट वेगळी. सोडून दिलेल्या उंटांनी ऑस्ट्रेलियात जसा उच्छाद मांडलाय तसाच अमेरिका खंडातल्या अनेक राज्यांमध्ये या बाहेरून आणलेल्या आणि नंतर सोडून दिलेल्या रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यांच्यामुळे नाही म्हटले तरी दरवर्षी चाळीस एक कोटी डॉलर्सचे नुकसान होते. त्यांच्या मिश्राहारी खाद्यसवयीमुळे तसेच वेगवान प्रजननदरामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणेही तिथल्या सरकारांसाठी एक मोठी डोकेदुखी झाली आहे. आपण जरी सरसकट या प्राण्याला वराह म्हणत असलो तरी त्याला इंग्लिशमध्ये स्वाईन, पिग, बोअर, हॉग अशी विविध नावे आहेत.

वराहवंशांचा उगम इतर अनेक सस्तन प्राण्यांप्रमाणेच डायनासोर्सच्या अंतानंतर झाला. एका जनुकीय अभ्यासानुसार आजच्या पाळीव वराहांच्या मूळ वंशजांची शाखा रानडुकरांपासून साधारण पाच लाख वर्षांपूर्वी वेगळी झाली. रानडुक्कर स्वभावाने आक्रमक व चपळ असते. त्याच्या अंगावर खूप राठ केस असतात तसेच त्याचे सुळेसुद्धा मोठे आणि अणकुचीदार असतात. त्यांच्या शरीरात तुलनेने चरबी आणि मांस कमी असते तसेच ते चिवटही असते. या डुकरांना पाळीव बनवायचे तर त्यांच्यातल्या या अडचणीच्या ठरणाऱ्‍या गोष्टी काढून टाकणे गरजेचे होते. त्यामुळे तत्कालीन प्रयोगकर्त्यांनी रानडुकरांच्या कळपातील आपल्या गरजांना त्यातल्या त्यात साजेसे असलेले प्राणी पकडून त्यांचे प्रजनन सुरू केले. या प्रयोगांची जन्मभूमी टर्की आणि मध्य चीन हे प्रदेश असावेत असा अंदाज आहे. पाळीव बनवलेले हे प्राणी कालौघात शांत स्वभावाचे, कमी चपळ, कमी केसाळ आणि अधिक मांसल होत गेले. वराह त्याच्या वर्तनामुळे जरी बथ्थड वाटत असले तरी तो एक बुद्धिमान प्राणी आहे. चिंपांझी, डॉल्फिन तसेच हत्ती या प्राण्यांसारखाच तो हुशार आहे. आकार ओळखणे, तुलना करणे वगैरे प्रश्न सोडवण्यात माणसाच्या तीन वर्षांच्या मुलापेक्षा वराह अधिक हुशार असतात अनेक प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कंपॅरिटीव्ह स्टडीज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार त्यांच्या प्रयोगातील डुकरांनी नवीन शिकलेली माहिती लक्षात ठेवून तिचा वापर करून अनेक अडचणींवर मात करून त्यांना दिलेले टार्गेट गाठले.  

आज जगभरात डुकरांच्या वन्य आणि पाळीव मिळून सोळा जाती अस्तित्वात आहेत. दोघांमध्येही जाडजूड मान, मोठे डोके, लांब कान, बारीक डोळे आणि लवचिक नाक ही समान शारीरिक वैशिष्ट्ये आढळतात. सर्वसाधारणपणे या दोन्ही प्रकारांची उंची तीन साडेतीन फूट आणि लांबी चार ते सहा फूट असते. त्यांचे वजन दीडशे ते तीनशे किलो भरते. पण अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यातील एका पिगरीमधील एका पाळीव वराहाचे वजन तब्बल साडेसातशे किलो एवढे भरले होते. एकदम हेवी वेट चॅम्पियन! रानडुक्कर अनेक प्रकारच्या अधिवासात आढळते. अगदी पुण्याचेच सांगायचे तर मी ते ताम्हिणीच्या घनदाट जंगलातही पाहिले आहे आणि सासवडच्या रूक्ष डोंगराळ भागातही पाहिले आहे. पाळीव आणि वन्य अशा दोन्ही प्रकारातील वराहांना चिखलात लोळायला फार आवडते. मुख्यत्वे अंगावरच्या त्रासदायक कीटकांपासून सुटका करून घेण्यासाठी हा कार्यक्रम पार पाडला जातो.

वराह कळपाने राहणारा प्राणी आहे. त्यांच्या अन्नात वनस्पती तसेच सडलेल्या मांसाचाही समावेश होतो. स्वभावाने भेदरट असलेल्या डुकराचे जीव वाचवण्याचे मुख्य अस्त्र वेग हे असले तरी अतिशय अणकुचीदार दात आणि चार ते सहा इंचांपर्यंत लांबीचे सुळे वेळप्रसंगी शत्रूला चांगलेच घायाळ करू शकतात. माझ्या सह्याद्रीतल्या भटकंतीत मी एकदा डोंगरात राहणाऱ्‍या एका आजोबांना भेटलो होतो. ते तरुणपणी रानात शिकारीला गेले होते आणि गोळी लागून जखमी झालेल्या रानडुकराने त्यांच्या मांडीचा चावून अक्षरशः लगदा केला होता. त्यानंतर आयुष्यभर त्यांना अपंगत्व भोगावे लागले. आपल्या पिल्लांचे रक्षण करताना डुकरीण वेळप्रसंगी वाघालाही जुमानत नाही. रानडुकरांप्रमाणेच काही जातीच्या पाळीव डुकरांच्या पिलांच्या अंगावरही पिवळे पट्टे किंवा ठिपके असतात. ते वाढत्या वयासोबत नाहीसे होत जातात.

जगात अनेक देशांमध्ये मांसाहार रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. त्यामुळे चिकन आणि बीफप्रमाणे पोर्क सुद्धा आवडीने खाल्ले जाणारे मांस आहे. वराहांचा उपयोग आज अनेक प्रकारच्या औषधांच्या चाचण्या करण्यासाठीही केला जातो. त्याच्या चामड्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. थोडक्यात म्हणजे सस्तन प्राण्यांच्या ज्या ज्या अवतारांनी मानवी संस्कृतीला स्थिरावण्यात आधार दिला, त्यात हिंदू संस्कृतीत दाखवल्याप्रमाणे सुळ्यांवर पृथ्वीगोल पेलणाऱ्‍या वराहवताराचा खूप मोठा वाटा आहे हे निर्विवाद सत्य आहे.

संबंधित बातम्या