गजकथा

मकरंद केतकर
सोमवार, 15 मार्च 2021

सहअस्तित्व

आज मी कथा सांगणार आहे, साक्षात देव्हाऱ्‍यात गणेशरूपाने विराजमान होण्याचे भाग्य लाभलेल्या प्राण्याची. ज्याच्या कथांनी, ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या नुसत्या उल्लेखाने आबालवृद्ध रोमांचित होतात अशा अद्‍भुत जिवाची. मनोरंजन, युद्ध, पर्यटन, गस्त, मेहनतीची कामे अशा कितीतरी गोष्टींमध्ये महत्त्वाचा ठरलेल्या प्राण्याची. ही गोष्ट आहे हत्तीची!

माणूस आणि हत्ती यांच्या इतिहासाला जोडणारा एक दुवा म्हणजे दोघेही आफ्रिका खंडातून उत्क्रांत झाले व विश्वभ्रमंती करत बहुतांश जगात पसरले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेतसुद्धा हत्ती होते आणि जेमतेम साडेदहा हजार वर्षांपूर्वी ते तापमान बदलांमुळे नामशेष झाले. याच कारणामुळे केसाळ स्वरूपाचे ‘वुली मॅमथ’ जेमतेम चार हजार वर्षांपूर्वी उत्तर गोलार्धातून नामशेष झाले. पण साधारण हाच काळ होता, जेव्हा त्यांचे आशियाई वंशज सिंधू नदीच्या खोऱ्‍यातील हडप्पा-मोहेंजोदारो संस्कृतीतील मानवांना वश झाले होते. चार सहस्रके लोटली तरी मानवाने पुष्कळ प्रयत्न करूनही जात्याच बुद्धिमान असलेल्या हत्तींनी काही प्रमाणात तरी आपले जंगली स्वभावाचे अंश टिकवून ठेवले आहेत. त्यांच्या कितीही पिढ्या गजशाळेत जन्माला आल्या तरी कुत्रे, बकऱ्‍या किंवा गाई यांच्यासारखे आपल्याला हवे तसे शारीरिक बदल हत्तींमध्ये घडवता येऊ शकले नाहीत व खऱ्‍या अर्थाने हा प्राणी कधीच ‘पाळीव’ होऊ शकला नाही. यामुळेच त्याला समजून घेऊन त्याच्यासोबत काम करणे व त्याचे रागरंग सांभाळणे हे आजही एक कौशल्याचे काम आहे. याच अनुषंगाने पाचव्या किंवा सहाव्या शतकात ‘गजशास्त्र’ हा हत्तींच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन करणारा ग्रंथही लिहिला गेला. 

अजून एक मनोरंजक बाब म्हणजे आशियाई हत्तींना माणसाळवण्याचे प्रयत्न जेवढ्या मोठ्या प्रमाणात भारतात झाले, तेवढे प्रयत्न आफ्रिकेत झालेले दिसत नाहीत. म्हणजे पाळीव हत्ती म्हटला की डोळ्यासमोर कधीच धिप्पाड आणि खडूस आफ्रिकन हत्ती येत नाही. डोक्यावर दोन उंचवटे असलेला, गोंडस चेहऱ्‍याचा भारतीय हत्तीच आपल्याला अधिक भावतो. आफ्रिकन हत्ती माणसाळू शकत नाही असे अजिबात नाही, पण त्यांचे प्रमाण फारच तुरळक आहे. 

यामागची काही कारणे अशी आहेत, की आफ्रिका हा बहुतांश गवताळ प्रदेश आहे. तिथे उंच वृक्ष कमी आहेत. तसेच तिथे पाण्याची उपलब्धीसुद्धा जरा कमीच आहे. त्या प्रदेशातील जमाती टोळीने राहतात. त्यांच्या गरजा कमी आहेत. त्या गरजांसाठी हत्तीची ताकद काहीच उपयोगाची नाही. म्हणून अशा ठिकाणी हत्तींना पकडून माणसाळवणे बिनकामी ठरते. याच्या उलट आशियामध्ये समृद्ध वनसंपत्ती आहे. दाट जंगलात प्रचंड मोठे वृक्ष आहेत. या वृक्षांचे ओंडके पूर्वापार घरे तयार करण्यासाठी वापरले जातात. त्यांची वाहतूक करण्यासाठी हत्तींची ताकद आवश्यक ठरली. तसेच पाळीव हत्तींना पोसण्यासाठी इथे पुष्कळ चारा व पाणी उपलब्ध आहे. यामुळे आशियाई हत्तींना मोठ्या प्रमाणात पाळीव केले गेले. वन्य हत्तींना पाळीव करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न थोडे क्लेशदायक वाटू शकतात, पण आजच्या आपल्या समाजाच्या घडणीत अशाच पद्धतीने वश केलेल्या हत्तींचे योगदान आहे हे आपल्याला स्वीकारावे लागते. 

आज भारतात सरसकट मनोरंजन किंवा मजुरीसाठी हत्तींना पाळीव बनवण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु भारतात जिथे हत्ती उपद्रव करतात अशा ठिकाणी वनखात्यातर्फे उपद्रवी हत्तींना पकडून माणसाळवले जाते व त्यांचा उपयोग वनखात्याच्या कामांसाठी केला जातो. कर्नाटकातील ‘दुबारे एलिफंट कॅम्प’ हा त्यापैकी एक आहे. हत्तींना वश करताना सर्वप्रथम त्यांचा ‘माज’ मोडणे आवश्यक असते. हे करण्यापूर्वी वन्य हत्तींच्या कळपातील योग्य ते प्राणी वेगळे करणे आवश्यक असते. आधीच पाळीव झालेल्या हत्तींच्या साहाय्याने असे हत्ती कळपातून वेगळे केले जातात. यामध्ये सहसा लहान पिल्ले व किशोरवयीन हत्ती असतात. प्रौढ हत्ती असतील तर पाळीव हत्तिणींद्वारे त्यांना सापळ्यात अडकवले जाते. 

प्राचीन काळात हत्ती पकडण्यासाठी जमिनीच्या एखाद्या भागाच्या भोवती खंदक खणून तो भाग वेगळा केला जायचा व त्या भागातला प्रवेश हा फक्त एका पुलावरून ठेवला जायचा. फसवून आणलेले.  

हत्ती त्या भागात शिरले की पूल मोडून टाकला जायचा. नंतर विकसित झालेली दुसरी पद्धत म्हणजे उंच लाकडी कुंपण असलेल्या भागात फसवलेल्या हत्तींना अडकवून बंदिस्त केले जाते. या दोन्ही प्रकारात पुढे हत्तींचा माज मोडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यांना सतत आजूबाजूला माणसे दिसत राहतील अशी व्यवस्था केली जाते. हत्तींचा आहार प्रचंड असतो. पण माज मोडताना त्यांना अनेक दिवस उपाशी ठेवले जाते. तसेच पाणीसुद्धा ठराविक काळाने दिले जाते. हत्तीने माणसाची आज्ञा स्वीकारायला शिकेपर्यंत त्यांना छावणीत ठेवले जाते. पूर्वी अतिआक्रमक प्राण्यांच्या मानेभोवती चाकूने लहान घाव करून त्यात दोरखंड आवळला जायचा जेणेकरून हत्ती वेदनांनी जेरीस येईल व आज्ञाधारक होईल. दक्षिण भारतात वापरली जाणारी दुसरी पद्धत म्हणजे खड्डा खणून त्याला बांबू आणि गवताने झाकले जाते. बेसावध हत्ती त्यावर चालत आला की आत कोसळतो. मग त्याच्या गळ्यात दोरखंड अडकवून पाळीव हत्तीच्या साहाय्याने त्याला बाहेर खेचले जाते व त्याच्या पायातही दोर किंवा साखळ्या अडकवल्या जातात व पुन्हा वर लिहिल्याप्रमाणे त्यांचा माज मोडला जातो. यात त्यांना मारहाण करणे, अंकुशाने टोचणे या पद्धतीही वापरल्या जात असत. हत्तींना पकडण्याच्या पद्धतीत आता भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत त्यांना कमी मानसिक धक्का बसतो पण उर्वरित प्रक्रिया त्यांच्यासाठी क्लेशदायकच असते. माझ्या नजरेसमोर आजही दांडेलीत बंदिस्त केलेला तो रुबाबदार सुळेवाला तरुण हत्ती आहे ज्याच्या डोळ्यात मुक्त आयुष्याचा इतिहास रेंगाळलेला होता...

संबंधित बातम्या