बिलंदर 

मकरंद केतकर
सोमवार, 29 मार्च 2021

सहअस्तित्व

पाळीव झाला तरी आपल्या स्वभावानुसार माणसाला आपल्याशी जुळवून घेण्यास भाग पाडलेला बिलंदर प्राणी म्हणजे मांजर! या अद्‍भुत प्राण्याच्या आणि माणसाच्या मैत्रीचा इतिहास किमान आठ हजार वर्ष तरी मागे जातो.

या  लेखमालेच्या पूर्वार्धात आपण माणसाच्या उपयोगी पडणाऱ्‍या तसेच ‘पाळीव प्राणी’ असे म्हटले की चटकन डोळ्यासमोर येतील अशा सस्तन प्राण्यांची माहिती घेत आहोत. त्यात मानवी संस्कृती आणि समाजाची जडणघडण करणाऱ्‍या, माणसाचा सर्वात जुना मित्र असलेल्या कुत्र्यापासून तुलनेने अगदी अलीकडे पाळीव केल्या गेलेल्या उंट, हत्ती या प्राण्यांचा माणसासोबतचा इतिहास पाहिला. यातली एक गंमत म्हणजे, माणसाने जसे कष्ट कमी करण्यासाठी शक्कल लढवून, प्रयोग करून काही प्राणी आपल्या काबूत आणले, त्याचप्रमाणे काही प्राण्यांनीसुद्धा आपला मूळचा वन्य स्वभाव बऱ्‍याच अंशी तसाच राखून, आपल्या विचार स्वातंत्र्याला अबाधित ठेऊन माणसाकडून कळत नकळत मिळणारे आयते फायदे मिळवण्यासाठी त्याच्याशी जवळीक साधली. अशा प्राण्यांपैकी एक म्हणजे मांजर. 

माझ्या परिचयाच्या एका सरांनी एकदा स्वभावातील फरकाच्या अभ्यासाचे उदाहरण म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘what makes cat a cat and what makes dog a dog?’ म्हणजे मांजराचे मार्जारपण आणि कुत्र्याचे कुत्रा असणे कशात आहे? असा प्रश्न विचारला होता. सगळ्या विद्यार्थ्यांकडून त्याची पुष्कळ मनोरंजक उत्तरे आली. पण मला भावलेले सगळ्यात चपखल उत्तर होते, ‘When human offers food to a cat, it thinks I must be a God and when same is offered to a dog it thinks human must be a God.’ म्हणजे मांजराला अन्न दिले तर त्याला वाटते की मीच देव आहे आणि कुत्र्याला अन्न दिले तर त्याला वाटते की अन्न देणारा माणूसच देव आहे. असा हा ‘मानभावीपणा’ नामक स्थायिभाव घेऊन जन्माला येणारा पृथ्वीतलावरचा एक अलौकिक प्राणी आहे. त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे काही समाजांनी त्याला देवत्व दिले, त्याच्यावर बोधकथा तयार झाल्या, त्याच्यावर म्हणी तयार झाल्या आणि त्याच्यावर कार्टून्ससुद्धा तयार झाली. कुत्रा कितीही श्रीमंत घरातला असला तरी बिचाऱ्‍याच्या चेहऱ्‍यावरून गरिबीच टपकते. मांजराचे तसे नाही. ते उकिरडे फुंकत असले तरी त्यांच्या चेहऱ्‍यावर एक विशिष्ट बेरकी माज दिसतो. पण ‘फेलीन’ कुळाचेच वैशिष्ट्य आहे. त्यातले वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता हे प्राणीसुद्धा जन्मजात आब राखून राहणारे. अशा या अद्‍भुत प्राण्याच्या आणि माणसाच्या मैत्रीचा इतिहास किमान आठ हजार वर्ष तरी मागे जातो. 

माणसाने पिकवलेले आयते धान्य फस्त करायला उंदीर येऊ लागले आणि त्यांची मेजवानी झोडायला मांजरांनी माणसांशी जवळीक साधली. आजही आम्ही दुर्गम खेड्यापाड्यांच्या आसपास हिंडतो तेव्हा आम्हाला अनेकदा शेतांच्या आणि घरांच्या आसपास पूर्णपणे वन्य असलेली ‘जंगल कॅट’ दिसते. असा हा पाळीव झाला तरी आपल्या स्वभावानुसार माणसाला आपल्याशी जुळवून घेण्यास भाग पाडलेला बिलंदर प्राणी आहे. 

साधारण चार पाच वर्षांपूर्वी एका संशोधक चमूने, हजारो वर्षांपूवी जतन केलेल्या मांजराच्या अवशेषांमधून जनुकीय माहिती गोळा केली आणि त्याची तुलना आजच्या मांजरांच्या जनुकांशी केली तर त्यातून असे उलगडले, की पाळीव मांजरांच्या मूळच्या वन्य स्वभावात काहीही बदल झालेला नाही. फरक असलाच तर तो फक्त माणसाने केलेल्या प्रयोगातून बदललेल्या शारीरिक ठेवणीत आणि रंगात. त्यामुळेच मांजरांना बांधून ठेवणे शक्य होत नाही. गळ्यात दोरी बांधल्यामुळे चिडलेले मांजर कोणी पाहिले असेल तर त्यांना मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. त्याच्या या ऐटीत राहण्याच्या वृत्तीमुळे अगदी इजिप्शियन संस्कृतीइतक्या जुन्या राजेशाही चित्रांमधून मांजरे रंगवलेली दिसतात. एवढेच काय तर तिथे त्यांची पूजा करून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पवित्र ‘ममी’सुद्धा बनवली जायची. जगातल्या अनेक देशांमध्ये मांजर केवळ हौसेपोटीच पाळले जात नाही तर धार्मिक संकेत म्हणूनसुद्धा पाळले जाते. इस्लाममध्ये मांजर हा एक पवित्र प्राणी असून त्याच्या स्वच्छ राहण्याच्या सवयीमुळे त्याला मशिदीतसुद्धा प्रवेश आहे. जपानमध्येही मांजराला शुभ आणि संरक्षक मानले जाते. मांजराच्या गूढ स्वभावामुळे काही ठिकाणी त्याला अपवित्रही मानले जाते. आपण थोडे मागे जाऊन युरोपचा इतिहास पाहिला, तर खेदजनक परिस्थिती दिसते. तिथे त्या काळात धर्मसत्तांकडून मांजर आणि काही स्त्रिया यांना सैतानाचे साथीदार समजले जायचे आणि त्यांना अत्यंत भयंकर देहान्ताच्या शिक्षा दिल्या जायच्या. यामागे मुख्य समज असा होता की सैतानाचा प्रभाव कमी होईल आणि रोगराई येणार नाही. म्हणून युरोपमध्ये चौदाव्या शतकात ‘ब्लॅक डेथ प्लेग’ची साथ आली होती तेव्हा हजारो मांजरांना विनाकारण मारून टाकले होते, ज्याचा उलटा परिणाम होऊन उंदरांची संख्या वाढली व प्लेग अधिक पसरला. 

आजच्या तारखेला जगभरात मांजर आवडीने पाळले जात असले, तरी भारतात मात्र मांजर पाळण्याचे प्रमाण अगदी विरळ आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे मांजराचे इमानी नसणे, जे आपल्या समाजाच्या मूळच्या हळव्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. मांजराची त्याच्या मालकामध्ये कुत्र्यासारखी खूप भावनिक गुंतवणूक नसते. म्हणून पवित्र आणि निरुपद्रवी मानणे तर सोडाच, पण भारतात बिचाऱ्‍या मांजराला अशुभ मानले जाते आणि त्याने रस्ता ओलांडला तर सात पावले मागे जाणे वगैरे अंधश्रद्धा अजूनही जपल्या जातात. मी एकदा गीरच्या अभयारण्यात जात असताना आमच्या बससमोरून मांजर आडवे गेले तर बसच्या ड्रायव्हरने चक्क एक काडी पेटवून काचेसमोर ओवाळून बाहेर टाकून दिली. का तर म्हणजे मांजराने दृष्ट लावली असेल तर ती जळून जाते. मानवी कल्पनाविश्वात मांजराच्या पावलांनी वावरणाऱ्‍या या प्राण्याच्या अद्‍भुतरम्य शारीरिक रचनांबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ, ज्यातून ‘व्हॉट मेक्स कॅट ए कॅट’ हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने उमगेल.

संबंधित बातम्या