मार्जारपण...

मकरंद केतकर
सोमवार, 5 एप्रिल 2021

सहअस्तित्व

मागच्या लेखात आपण पाहिले की शेतीमुळे मांजर कुळातील प्राण्यांची मनुष्याशी कशी सलगी झाली. साधारण आठ हजार वर्षे होऊन गेलीयत या गोष्टीला. पण हा प्राणी आजही स्वतःचा आब राखून आहे. कुत्र्यांनी किंवा इतर अनेक प्राण्यांनी जसे माणसांच्या प्रयोगांना शरण जाऊन मवाळ धोरण स्वीकारले, तसे या प्राण्याने केलेले दिसत नाही. आपल्या स्वभावातील ताठा पिढी दर पिढी हे प्राणी कटाक्षाने टिकवून ठेवत आले आहेत. 

आज जगभरात ह्या कुळातील प्राण्यांच्या अडतीस जाती आढळतात ज्यांचे वर्गीकरण तीन प्रकारात केले आहे. पँथेरा (वाघ, सिंह, बिबट्या, जॅग्वार आणि मोठे प्राणी), एसिनोनीक्स (चित्ता) आणि फेलीस (घरगुती तसेच इतर लहान वन्यमांजरे). या सगळ्या प्राण्यांमध्ये अधिवास तसेच त्यातील भक्ष्याच्या स्वरूपानुसार शारीरिक वैशिष्ट्ये विकसित झालेली दिसतात. उदाहरणार्थ, अनेकांना ठाऊक असेल की घरगुती मांजराला पाण्याचे वावडे आहे. म्हणजे तहान भागवणे ही क्रिया सोडली तर ते स्वतःहून पाण्यात शिरलेले दिसत नाही. पण याउलट भारताच्या सुंदरबन तसेच पूर्व किनाऱ्‍यावरील कांदळवनांच्या प्रदेशात राहणारे अतिशय लाजाळू आणि दुर्मीळ असलेले ‘फिशिंग कॅट’ हे मांजर चक्क पाण्यात शिरून मासे पकडते आणि पाण्यात पोहता यावे यासाठी त्याच्या बोटांच्या मध्ये बदकाला असतात तसे पडदेही असतात. बिबट्या आणि वाघ ह्या एकाच अधिवासात राहणाऱ्या दोन ‘बिग कॅट्स’. पण उन्हाचा कडाका जाणवू लागल्यावर बिबट्या डेरेदार वृक्षाच्या उंचावरील काळोख्या सावलीतील जाडजूड फांदीवर झकासपैकी ताणून देतो, तर वाघ मस्तपैकी उथळ पाण्यात शिरून झोपा काढतो. शिकारीच्या बाबतीत पाहायचे तर आफ्रिकेतील गवताळ प्रदेशांमध्ये सिंह अँबुश हंटिंग म्हणजे दबा धरून बसून अचानक पाठलाग करून भक्ष्याला खाली पाडण्याची पद्धत वापरतात. तर चित्ते काही क्षणांकरिता प्रचंड वेगवान पाठलाग करून हरणांसारख्या प्राण्यांची शिकार करतात. चित्ता जगातील जमिनीवरील सर्वात वेगवान सस्तन प्राणी असून धावताना तो ताशी एकशेवीस किलोमीटर प्रति तास या वेगापर्यंत पोहोचल्याच्या नोंदी आहेत. जगातील सर्वात मोठे मांजर म्हणजे साडेचारशे किलो वजनाचा सायबेरियन वाघ, तर सर्वात लहान मांजर म्हणजे भारतीय उपखंडात आढळणारी रस्टी स्पॉटेड कॅट जी जेमतेम दीड किलो वजनाची असते. 

‘व्हॉट मेक्स कॅट ए कॅट’ म्हणजे मांजराचे मार्जारपण कशात दडले आहे याचे मुख्य उत्तर ‘स्वभाव’ हे तर आपण पाहिलेच, पण उत्क्रांतीच्या ओघात मांजर किंवा एकंदरच मार्जार कुळातील प्राण्यांमध्ये काय बदल झाले हे पाहणे कुतूहलाचे ठरते. कुठल्याही प्राण्याचा अत्यंत महत्त्वाचा भावदर्शक अवयव म्हणजे डोळे. मांजर पाहिले की डोळ्यात भरतात ते गोलसर चेहऱ्‍यावरील त्याचे मोठ्ठे डोळे. अत्यंत तीक्ष्ण नजर आणि सूक्ष्मप्रकाशग्रहणाची जबरदस्त क्षमता यामुळे दिवसा तसेच निबीड अंधारातसुद्धा मांजराला पुसटशी हालचालही अचूक टिपता येते. मार्जारकुळात डोळ्यांच्या बाहुल्यांचे दोन प्रकार आढळतात. गोल बाहुली जी वाघ, सिंह, बिबट्या अशा मोठ्या प्राण्यांमध्ये आढळते; तर उभी बाहुली, जी आपले घरगुती मांजर तसेच इतर लहान जातींमध्ये आढळते. पण यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत फरक पडलेला आढळत नाही. असे म्हणतात की तुम्ही वाघाच्या किंवा बिबट्याच्या जंगलात हिंडत असाल तर तुम्ही त्याला पाहण्याच्या कितीतरी आधीच त्याने तुम्हाला पाहून तुमची कुंडली मांडलेली असते. 

मांजराचे दुसरे अत्यंत महत्त्वाचे अस्त्र म्हणजे नीरव चाल. आवाज न करता दबक्या पावलांनी सरपटत भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जायचे आणि एका बेसावध क्षणी विजेच्या वेगाने उसळी घेऊन त्याच्यावर झडप घालायची हे तंत्र त्यांच्या विशिष्ट क्षमता असलेल्या पावलांमुळेच साधणे शक्य होते. त्यांच्या पावलांच्या तळाला मऊ गादी असते, ज्यामुळे पाय टेकवल्यावर आवाज येत नाही. तसेच स्नायूंवरील अत्युच्च ताब्यामुळे किती अलगदपणे पाय जमिनीवर टेकवायचा हे त्यांना ठरवता येते. ही गादी धक्काशोषणाचेही काम करते त्यामुळे खूप उंचीवरून पडूनसुद्धा मांजर अगदी अलगद लँड होते. १९८७ साली अमेरिकेत शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात तब्बल बत्तिसाव्या मजल्यावरून मांजराला खाली फेकले, तरी ते किरकोळ दुखापती वगळता बरोब्बर चारी पायांवर सुखरूप लँड झाले. इतका हा भाग महत्त्वाचा आहे, म्हणूनच मांजरे शक्य होईल तितका काटेकुटे असलेला मार्ग टाळतात आणि वेळ मिळेल तेव्हा पावलांना चाटून स्वच्छ ठेवतात. याच पावलांचा अजून एक महत्त्वाचा हिस्सा म्हणजे आत खेचून घेता येणारी नखे, जी त्यांचे अत्यंत तीक्ष्ण हत्यार आहे. कुत्रे चालतात तेव्हा त्यांच्या नखांचा जमिनीला स्पर्श होऊन आवाज होतो तसेच ती बोथटही होतात. पण मांजरे कामाव्यतिरिक्त आपली नखे त्वचेच्या म्यानात लपवून ठेऊ शकत असल्यामुळे त्यांची तीव्रता अबाधित राहते. ज्यांनी कोणी मांजराचे बोचकारणे अनुभवले आहे त्यांना मी काय म्हणतो आहे ते चांगलेच कळले असेल. 

मांजराचे अजून एक महत्त्वाचे शस्त्र म्हणजे त्याची श्रवणक्षमता. आपल्या तुलनेत ते पाचपट लांबूनही एखादा लहानसा आवाज अचूक टिपू शकते. त्यांची ही क्षमता कुत्र्यांपेक्षाही किंचित वरचढ असते. त्यांचे मोठे आणि फिरू शकणारे कान त्यांना भक्ष्याच्या आवाजावरून त्याच्या स्थानाचा अचूक अंदाज देतात. याशिवाय त्यांच्यामध्ये अत्यंत अचूक प्रतिक्षिप्त क्रिया, लवचिक शरीर, सापळ्यासारखे लॉक होणारे दात आणि ताकद ही भेदक अस्त्रे आहेत. त्यांच्या योग्य मेळातून ते यशस्वी शिकार करू शकतात. असो! जाता जाता मी तरी एवढे निश्चितच मान्य करेन, की जगण्यासाठी बाकी काहीही तडजोड करावी लागली तरी ‘स्व’त्व जपताना कोणाच्याही ‘ताटाखालचे मांजर’ कसे होऊ नये हे शिकावे मांजराकडूनच!

संबंधित बातम्या