(पाण)काकस्पर्श

मकरंद केतकर
सोमवार, 19 एप्रिल 2021

सहअस्तित्व

साधारण दहा बारा हजार वर्षे लोटली आहेत आपल्याला स्थिरस्थावर होऊन. या दरम्यान माणसाने असंख्य कला आत्मसात केल्या, ज्यात धातुशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, पक्षीशास्त्र अशी विविध क्षेत्रे आहेत. यापैकी त्याने जसा प्राणिशास्त्रात उंदरापासून व्हेलपर्यंत अनेक प्राण्यांचा विविध कामांसाठी उपयोग केला, तसाच त्याने अनेक पक्ष्यांचाही वापर करून घेतला. अर्थात प्रत्येक प्राणी जसा फक्त खाद्य म्हणून उपयोगात आणला नाही, तसाच त्याने प्रत्येक पक्षीसुद्धा फक्त खाद्य म्हणून पाळला नाही. अशाच एका वेगळ्या अर्थाने उपयोग करून घेतलेल्या एका पक्ष्याची आज आपण माहिती घेणार आहोत. 

कॉर्मोरंट म्हणजेच पाणकावळा हा पक्षी कुठल्याही पाणथळीच्या जागेत अगदी सहज दिसतो. शुभ्र रंग आणि नाजूक शरीरयष्टीच्या अभावामुळे बिचाऱ्‍याला ‘बगळ्यांची माळ फुले’सारख्या सुंदर गाण्यांमध्ये स्थान मिळू शकले नाही. पण त्याच्या जीवनक्रमासाठी त्याच्याकडे सुयोग्य शारीरिक वैशिष्ट्ये असल्यामुळे तो मासेमारांसाठी खूप महत्त्वाचे साधन ठरला आहे. पक्ष्यांची रेलचेल असलेल्या पाणवठ्यावर ज्यांनी एखादी सकाळ किंवा संध्याकाळ घालवली आहे त्यांनी बगळ्यांसोबत या पक्ष्यांच्याही माळा आकाशात पाहिल्या असतील. तांबडे फुटले की रात्रभर एखाद्या झाडावर शेकडोंच्या संख्येने बसलेले पाणकावळे पोटभरणीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतात. अनेकांचा समज असतो की पक्षी निवाऱ्‍यासाठी घरटी बांधतात. हा समज चुकीचा आहे, कारण पक्षी फक्त पिल्ले वाढवण्यासाठीच घरटी बांधतात. अन्य काळात ते त्यांच्या ठरलेल्या झाडांवर किंवा जागेवर त्यांच्या सवयीनुसार दिवस किंवा रात्र संपली की थाऱ्‍याला जातात. माझ्या भटकंतीत मी गरुड, बगळे, पोपट, मैना असे दिनचर पक्षी रोज त्याच त्याच झाडावर निवाऱ्‍यासाठी आलेले पाहिले आहेत. याचप्रमाणे घुबड आणि रातव्यासारखे निशाचर पक्षीही दिवस उजाडल्यावर त्यांच्या ठरावीक जागेवर जाऊन बसलेले पाहिले आहेत. एवढेच कशाला वटवाघळासारखे सस्तन प्राणीही ठरलेल्या झाडांवरच दिवसा विश्रांती घेताना अनेकांनी पाहिले असेल. एखादी जागा पक्ष्याने रातथाऱ्‍यासाठी निवडली आहे हे ओळखायची सोपी खूण म्हणजे त्या झाडाखाली विष्ठेचा थर असतो. याचप्रमाणे पाणवठ्यावरती एखादा खडक किंवा ओंडका पक्ष्यांच्या विष्ठेने माखला असेल तर तिथे पक्षी ‘टाईम-प्लीज’ घेऊन बसतात हे ओळखता येते. 
तर, असे रात्रभर एका झाडावर वस्तीला आलेले पाणकावळे सकाळ झाल्यावर आपापल्या थव्यानुसार इंग्रजी V अक्षराच्या रचनेत आकाशस्थ होऊन पाणवठ्याच्या दिशेने झेपावू लागतात. हवा हे माध्यम विरळ असले तरी उडताना त्याचा प्रतिरोध होतोच. V आकाराच्या वायुगतिकीय (एरोडायनामिक्स) रचनेचा वापर केल्याने हवेचा प्रतिरोध कमी होतो व ऊर्जेचा कमी व्यय होतो. अशा पद्धतीने उडत येऊन अक्षरशः आकाशात काळी चादर भासावी इतक्या संख्येने शेकडो पाणकावळ्यांचे थवे मी पाण्याच्या काठावर असलेल्या झाडांवर उतरलेले पाहिले आहेत. जागा अपुरी पडल्याने त्यांच्यात चक्क मारामाऱ्‍यासुद्धा होतात. त्यानंतर ते पाण्याच्या काठावर तसेच पाण्यावरही उतरतात आणि डुबकी मारून मासेमारीला सुरुवात करतात. 
तीक्ष्ण नजर, धारदार चोच, बोटांच्या मधे असलेले पातळ पडदे आणि पाण्याचा अवरोध कमीतकमी होईल अशी शरीररचना यामुळे ते गढूळ पाण्यातही वेगाने पाठलाग करून मासे पकडू शकतात आणि तेसुद्धा नुसते वरवर नाही तर तब्बल शंभर फुटांपर्यंत डुबकी मारून. पाण्यात पकडलेला मासा गिळण्यासाठी त्यांना पाण्यावर यावे लागते. मासा गिळून झाला की ते परत पाण्याच्या काठावर येतात आणि पंख पसरून पिसे वाळवत बसतात. इतर पाणपक्ष्यांच्या जलअपसारक पिसांच्या विरुद्ध पाणकावळ्यांची पिसे पाणी शोषून घेतात, ज्यामुळे त्यांना पाण्यात बुडण्यासाठी जडत्व प्राप्त होते. त्यामुळे त्यांना खूप वेळ पाण्यात घालवल्यानंतर परत पिसे कोरडी करूनच डुबकी मारावी लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होतो पण वर सांगितलेल्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ही उणीव भरून काढली जाते. अशा प्रकारे हा पक्षी दिवसभरात साधारण अर्धा किलो वजनाचा मत्स्याहार करतो. त्याच्या याच गुणांचा उपयोग माणसाने मासे पकडण्याच्या कामात अत्यंत हुशारीने करून घेतलेला आढळतो. चीन, जपान, दक्षिण अमेरिका तसेच युरोपातील काही देशांमध्ये या पद्धतीचा वापर प्राचीन काळापासून केलेला आढळतो. चीनमध्ये तर या पद्धतीच्या मासेमारीचे इसवी सन सातव्या शतकापासूनचे उल्लेख आढळतात. या प्रकारात मासेमार आपापले पाळलेले पाणकावळे बोटींवर बसवून पाण्याच्या मध्यभागी जातात आणि विशिष्ट खुणांद्वारे पक्ष्यांना पाण्यात शिरण्याची आज्ञा देतात. त्यानुसार बोटीच्या काठावर बसलेले पाणकावळे पाण्यात डुबकी मारून दिसेनासे होतात व मासा गिळून परत बोटीवर येऊन बसतात. पण मग त्याने जर मासा गिळला तर मासेमाराला त्याचा काय उपयोग? खरी मेख इथेच आहे. कुत्र्याच्या गळ्यात जसा पट्टा असतो, तशी या पक्ष्यांच्या गळ्यात एक विशिष्ट आकाराची कडी अडकवलेली असते. चीनमध्ये कडीऐवजी गळ्यात गवताची दोरी बांधली जाते. त्यामुळे एखादा लहान आकाराचा मासा असेल तर पक्ष्याच्या गळ्यातून उतरून त्याच्या पोटापर्यंत पोहोचतो. परंतु मासा जर मोठ्या आकाराचा असेल तर या कडीमुळे तो पक्ष्याच्या लांबलचक अन्ननलिकेतच अडकून बसतो. असा मासा अडकलेला पक्षी जेव्हा बोटीवर येतो तेव्हा त्याचा मालक त्याच्या गळ्यातून तो मासा अलगद काढून घेतो आणि पाणकावळ्याला परत पाण्यात सोडतो. या प्रकारात उत्पादन खूपच किरकोळ असल्यामुळे आता ही पद्धत फक्त पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी वापरली जाते. जपानमध्ये तर गिफू शहरात याचा उत्सव भरवला जातो जो पाहायला हजारो पर्यटक येतात. एखाद्याकडे केलेली चाकरी कशी ‘गळ्याशी’ येऊ शकते याचे हे ‘जलंत’ उदाहरण आहे.

संबंधित बातम्या