‘मधुर’नाते

मकरंद केतकर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सहअस्तित्व

या जगात सजीवांची निर्मिती झाल्यापासून त्यांचे अग्रस्थानी असलेले कर्तव्य म्हणजे उदरभरण. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या न्यायाने आधी देह टिकवणे आणि अशा टिकवलेल्या देहाचा साधन म्हणून वापर करून आयुष्यातील इतर कर्तव्ये पार पाडणे असा जीवनक्रम सर्व सजीव आचरतात. 

उत्क्रांतीच्या प्रवासात अन्न म्हणून सुरुवातीला विविध गोष्टींचे भक्षण सुरू झाले. यात स्वतः शिकार करून किंवा शोधून खाणे, इतरांनी मिळवलेले पळवून खाणे किंवा उरलेले खरकटे खाणे असे विविध प्रकार निर्माण झाले. पुढे जशी खंडांची रचना व हवामान बदलले तशी उपलब्धतेनुसार अन्नाची निवड महत्त्वाची ठरली. काळाच्या ओघात जसे शिकारी विकसित झाले, तशीच शिकारही विकसित झाली. जीव घेण्याबरोबर जीव वाचवणेही तितकेच कौशल्याचे ठरू लागले. यातूनच अवतीभवती असलेल्या साधनांचा हत्यार म्हणून हुशारीने वापर करण्याची पद्धत जन्माला आली, आणि ही पद्धत फक्त माणसानेच वापरात आणली असा समज असेल तर त्या समजाला छेद देणारे एक उदाहरण आज मी आपल्याला सांगणार आहे. 

हे उदाहरण आहे आफ्रिकेत आढळणाऱ्‍या ‘हनीगाईड’ नामक पक्ष्याचे. पण त्याबद्दल अधिक सांगण्याआधी पक्षी आणि माणसाच्या नात्याबद्दल थोडे अधिक बोलणे मला आवश्यक वाटते. माणूस आणि पक्ष्यांचे नाते जगातील सर्वात मजबूत नाते मानले जाते. त्यांचे आसपास वावरणे, बहुतांश पक्ष्यांचे गोड आवाजात शीळ घालणे, त्यांचे नेत्रसुखद रंगरूप असणे, अनेकदा माणसाशी जवळीक साधूनही त्यांचे वन्यत्व टिकून असणे आणि मुख्य म्हणजे त्यांचे सहज उपलब्ध असणे या गोष्टींमुळे माणूस फार प्राचीन काळापासून त्यांच्यावर फिदा झालेला आहे. म्हणूनच पक्ष्यांना दाणे खायला घालणे, त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे तसेच त्यांना घरटे करता यावे म्हणून खिडकीत लाकडी खोकी लावणे असे अनेक उद्योग हौसेने अनेकजण करतात. मांजात अडकून किंवा काचेला धडकून एखादा पक्षी जखमी झाला, तर त्याला ताबडतोब ठीकठाक करून परत निसर्गात सोडून देणारी अनेक सहृदय माणसे आहेत. 

माणसांना आपल्याविषयी अप्रूप वाटते आणि त्यामुळेच त्यांच्या सहवासात राहणे हे वन्यअधिवासात राहण्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे हे पक्ष्यांनाही कळत असावे का? असा विचार डोक्यात येतो कारण तशी अनेक लक्षणे त्यांच्या वागण्यातून दिसतात. साळुंक्या, पोपट, कबुतरे, चिमण्या, बगळे, करकोचे, घारी, राखी धनेश, बुलबुल, शिंजीर (सनबर्ड), मुनिया, नाचण, वटवट्या, चष्मेवाला, रॉबिन, शिंपी, कोकीळ, भारद्वाज, कावळे असे अनेक प्रकारचे पक्षी अगदी शहरातही आपल्या घरांच्या आसपास बिनधास्त वावरत असतात. एवढेच नाही तर त्यांना खायला घालणाऱ्‍या माणसांना ते व्यवस्थित ओळखतातसुद्धा. माझ्या ओळखीच्या एक वयस्कर काकू रोज त्यांच्या गच्चीवरच्या झाडांना पाणी घालून झाले की पोपटांना शेंगदाणे खाऊ घालतात. त्या गच्चीवर आल्याबरोब्बर अनेक पोपट कठड्यावर येऊन बसतात आणि त्यांच्या हातातूनसुद्धा दाणे घेऊन जातात. असो. तर मुद्दा हा की माणसाला जसे पक्षी हवेहवेसे वाटतात तसेच पक्ष्यांनाही माणूस हवाहवासा वाटतो. 

आता आपण बघूया वर सांगितलेल्या हनीगाईडला माणूस कसा आणि का हवाहवासा वाटतो. माणसाच्या क्षमतेची ज्याला पुरेपूर ओळख पटलेली आहे असा हा पठ्ठ्या आहे. त्याचे नाव वाचूनच तुम्हाला अंदाज आला असेल की मध आणि मार्गदर्शन याच्याशी त्याचा संबंध येत असावा. त्याचे शास्त्रीय नावसुद्धा ‘इंडिकेटर इंडिकेटर’ असे आहे. हा आफ्रिकेतल्या रानात आढळणारा चिमणीएवढ्या आकाराचा आणि कोकिळेसारखा ‘बांडगुळी’ कुळातील पक्षी आहे. म्हणजे इतरांच्या घरट्यात याचा जन्म होतो आणि जन्मल्यावर त्याची पिल्ले घरट्याच्या मालकाच्या पिल्लांना मारून टाकून फक्त स्वतःला अन्न मिळेल याची तजवीज करतात. पण त्यांचे खरे कौशल्य दिसते ते प्रौढपणी. आफ्रिकेत बाओबाबसारखी अवाढव्य वाढणारी विविध झाडे आहेत. त्यांच्या ढोल्यांमध्ये मधमाश्या पोळी तयार करतात. या पक्ष्यांचे कौशल्य हे की ते चक्क माणसाला या पोळ्यांकडे घेऊन जातात. रानात आदिवासी हिंडताना दिसले की हा पक्षी चिवचिवाट करून त्यांचे लक्ष वेधून घेतो आणि माणसांना दिसेल अशा पद्धतीने झाडावर बसतो. आदिवासी त्याच्या मागावर चालत राहतात आणि अखेर पोळे असलेले झाड आल्यावर तो उडायचा थांबतो. काही प्रदेशात माणूस आणि हनीगाईडच्या नात्यामध्ये एक संवाद विकसित झाला आहे. उदा. मोझांबिकमधले आदिवासी ‘बर्रर्रर्रर्रर्र - हम’ असा आवाज काढतात. या आवाजाला प्रतिसाद देऊन हनीगाईड चिवचिवाट करत पोळे असलेल्या झाडाच्या दिशेने उडू लागतो. पोळे असलेले झाड सापडले की आदिवासी धूर करून मधमाश्या पळवून लावतात. पोळ्यातील मध काढून घेतात आणि उरलेला चोथा पक्ष्याला खाण्यासाठी ठेवून देतात. या पोळ्यात असलेले मेण आणि मधमाश्यांच्या अळ्या हे त्याचे आवडते अन्न आहे. आता तुम्हाला कळले असेल की ते मिळवण्यासाठी तो माणसाच्या शिकारी कौशल्याचा कसा खुबीने उपयोग करतो. 

एका अभ्यासानुसार या दोघांचे नाते किमान दहा लाख वर्षे जुने असण्याची शक्यता आहे, जेव्हा बोलीभाषा विकसित नव्हती. पण तेव्हाही पक्षी आजच्यासारखाच आवाजाच्या खाणाखुणा करून माणसाला पोळ्याकडे आकृष्ट करत असला पाहिजे. हळूहळू माणसाला पक्ष्याची सांकेतिक भाषा कळू लागली आणि त्यांचे नाते दृढ होत गेले. केंब्रिज विद्यापीठाच्या एका संशोधन मोहिमेच्या निष्कर्षानुसार या पक्ष्याशिवाय मध मिळण्याची शक्यता फक्त १६ टक्के आहे आणि पक्ष्याने मार्गदर्शन केल्यावर साधारण ७५ टक्के वेळा खात्रीलायकरीत्या मध मिळतो. इतर अनेक प्रथांप्रमाणे काळाच्या ओघात आता ही पद्धतसुद्धा मागे पडत चालली असल्याची या आदिवासींना खंत आहे. पण संस्कृतिक ठेवा म्हणून हे ‘मधु’र नाते कायम टिकेल असेल असा त्यांना विश्वासही वाटतो.

संबंधित बातम्या