एक घास चिऊचा

मकरंद केतकर
सोमवार, 10 मे 2021

सहअस्तित्व

गेल्या दहा हजार वर्षांच्या मानवी इतिहासात समाजव्यवस्था निर्माण होऊन अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांबरोबरच हळूहळू पैसा ही गोष्टसुद्धा महत्त्वाची होऊन गेली. नशिबाने निसर्गातील इतर सजीव मात्र आपल्या नैसर्गिक उर्मींना अनुसरूनच वागत राहिले आहेत. माणूस हा असा जीव आहे ज्याच्या वागण्यात एकवाक्यता आढळत नाही. स्थानपरत्वे त्याच्यात बदल आढळतो. तसेच संस्कृती, राजसत्ता, धर्मसत्ता यांचासुद्धा फार मोठा प्रभाव त्याच्या जीवनावर झालेला आढळतो. या घटकांच्या प्रभावामुळे अनेकदा त्याच्या आचारविचारातील साधकबाधकता लोप पावते आणि त्याचे घातक परिणाम भविष्यकाळात दिसून येतात. अर्थात त्यावर उपायही योजले जातात, पण तोपर्यंत मोठे नुकसान होऊन गेलेले असते हे मात्र नक्की. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एका पक्ष्याशी संबंधित आहे.

शेती हा जगभरातील संस्कृतींचा अविभाज्य हिस्सा आहे. शेतीतून अन्न तसेच पैसा या दोन्ही गोष्टी मिळतात. त्यामुळे तिचे रक्षण करणे व त्यातून मिळणारे उत्पन्न वाढवणे हे शेतकरी आणि राज्यकर्ते यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. भारताचा शेजारी देश असलेला चीन त्याच्या विचित्र खाद्यसंस्कृतीविषयी जसा प्रसिद्ध आहे तसाच तिथल्या शासकांसाठीसुद्धा. याच शासकांचा एक अविचारी निर्णय तिथल्या चिमण्या आणि नंतर प्रजेच्या जिवावर कसा बेतला याची ही धक्कादायक आणि खरोखर घडलेली कथा आहे. नैसर्गिक आपत्ती माणसासाठी नवीन नाही. पण ओढवून घेतलेल्या या नैसर्गिक आपत्तीची तुलना क्वचितच इतर कुठल्या आपत्तीशी होऊ शकेल. १९५८ सालचा तो एक दिवस होता जेव्हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या पक्षाचा संस्थापक माओ त्झे तुंग यांच्या डोक्यात कोणीतरी भरवून दिले की आपल्या देशाला चिमण्यांसारख्या शेतीला उपद्रवी पक्ष्यांची गरज नाही आणि त्याने चिमण्यांच्या कत्तलीचे आदेश दिले. या आदेशामुळे पुढच्या फक्त तीन वर्षांच्या काळात चीनमधील किमान पंचेचाळीस लाख माणसे मृत्युमुखी पडली. नेमके काय झाले ते आपण बघूया. 
एक ऑक्टोबर १९४९ या दिवशी माओ त्झे तुंग यांनी ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ या पक्षाची स्थापना केली. पुढच्या नऊ वर्षांत तो पक्ष सत्तेवर आला आणि त्याने आर्थिक आणि सामाजिक बदलाची मोहीम हाती घेतली. याला ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ म्हणजे ‘महान झेप’ असे नाव दिले गेले. या मोहिमेअंतर्गत त्याने शेतीला सामुदायिक व्यवसाय आणि केंद्रशासीत उपक्रम म्हणून जाहीर केले. वैयक्तिक आणि खासगी शेतीवर बंदी घातली गेली. शेती केंद्राच्या अखत्यारित आल्यावर आपला निर्णय कसा योग्य होता ते दाखवण्यासाठी शेतीचे उत्पन्न वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचे खल सुरू असताना माओ त्झे तुंग यांना सल्लागारांकडून, एक चिमणी वर्षाला साधारण दोन किलो धान्य खाते आणि दहा लाख चिमण्या साधारण साठ हजार माणसांना पुरेल इतके धान्य फस्त करतात, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे अशी माहिती देण्यात आली. हे ऐकून तुंग यांनी फतवा काढला की चिमण्या समूळ नष्ट करा. त्यानुसार लोकांनी गोळ्या घालणे, विषारी दाणे देणे, अंडी फोडणे, घरटी उद्‍ध्वस्त करणे, पिल्ले ठार मारणे अशा शक्य तितक्या पद्धती वापरून चिमण्यांना संपवायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांचा पाठलाग करून त्यांना दमवूनसुद्धा मारले गेले. एकेका दिवसात दोन दोन लाख चिमण्या मारल्या गेल्या. या मोहिमेत आबालवृद्ध सहभागी होते. याचबरोबर डास, उंदीर आणि माश्यासुद्धा मारायचा हुकूम होता. 

पुढच्या तीन वर्षांत लोकांनी एक अब्ज चिमण्या, दीड अब्ज उंदीर, एक कोटी किलो माश्या आणि साधारण तितकेच डास मारले. याचे परिणाम अर्थातच भीषण होते. चिमण्या काही फक्त दाणेच खात नव्हत्या. त्या कीटकही खायच्या. चिमण्या गेल्यावर टोळधाड आणि इतर कीटक यांनी भात आणि इतर धान्यांची शेती फस्त करायला सुरुवात केली. सोबतच शेतीचे क्षेत्र वाढवायला केलेली जंगलतोड आणि कीटकनाशकांचा अवाजवी वापर याची जोड होतीच. शेतीतून अन्न मिळेनासे झाल्यावर लोकांनी जे दिसेल ते पकडून खायला सुरुवात केली. चिनी लोक सर्रास वाट्टेल ते खातात त्याचे मूळ मोठ्या प्रमाणात या ओढवून घेतलेल्या संकटातही आहे. मोठ्या प्रमाणात खून, दरोडे, चोऱ्या सुरू झाल्या. शेती सरकारच्या मालकीची असल्यामुळे, सरकारी धोरण म्हणा किंवा सरकारी कारकुनांचा अप्पलपोटेपणा म्हणा, सरकारी गोदामात जमा असलेल्या धान्याचे वाटप भुकेल्या लोकांना केले जात नव्हते. एवढेच नाही तर आपले अपयश लपवायला सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना जबर शिक्षा दिल्या गेल्या. शेवटी चिमण्यांच्या जागी ढेकूण मारायचे हुकूम देऊन चिमण्यांची कत्तल थांबवली गेली. 

या मानवनिर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी रशियामधून अडीच लाख चिमण्या आणून चीनमध्ये सोडल्या गेल्या. आज चीनमध्ये चिमण्यांचा चिवचिवाट परत ऐकू येत असला, तरी त्यासाठी फार मोठी किंमत तिथल्या लोकांनी मोजली आहे. अशावेळी आपल्या संस्कृतीशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. आपल्याकडे ‘एक घास चिऊचा’ हे लहान मुलांना शिकवले जाते, तर चीनमध्ये चिऊचाच घास घ्यायला मुलांना शिकवले जात होते, कदाचित आजसुद्धा असेल. कुठे गोफणीने चार पाखरे हाकलणे आणि कुठे अब्जावधी पाखरे मारून टाकणे. चीन अजूनही 

यातून शिकला नाहीये आणि २००४मध्ये सार्सच्या विषाणूचे उगमस्थान समजून ऊदमांजरांच्या निर्मूलनाची मोहीम त्यांनी काढली होती. लहरी राजा आणि आंधळी प्रजा. दुसरे काय!

संबंधित बातम्या