‘योग्य आणि सोपे’ यातली निवड

मकरंद केतकर
सोमवार, 17 मे 2021


सहअस्तित्व

मराठीत ‘फिरून फिरून भोपळे चौकात’ अशी एक मजेशीर म्हण आहे. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथेच परत येणे. माणसाच्या प्रयोगशील इतिहासाच्या बाबतीत आपल्याला हेच सांगता येते. सुरुवातीला निसर्गासोबत जगणारा माणूस, प्रश्नांची उत्तरे शोधताना हळूहळू निसर्गनियमांचे ब्रह्मांड भेदून पल्याड जायचा प्रयत्न करू लागला. हे करत असताना त्याला सुरुवातीला मोठे यश मिळाले, पण नंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले आणि आता तो परत फिरून शाश्वत उत्तरांकडे येऊ पाहत आहे. 

हॅरी पॉटर सीरिजमधील एका सिनेमामध्ये हॅरी शिकत असलेल्या हॉग्वर्ट्स विद्यालयाचे कुलगुरू अल्बस डंबलडोअर एका निर्णायक प्रसंगात त्याला एक सल्ला देतात आणि हा सल्ला निदान मला तरी कुठलाही निर्णय घेताना फार मोलाचा वाटतो. ते म्हणतात, ‘‘Sometimes we have to choose between what is right and what is easy.’’ म्हणजे कधीकधी आपल्याला ‘योग्य आणि सोपे’ यापैकी एक निवडावे लागतो. या विचाराच्या अनुषंगाने आजच्या विषयाला धरून बोलायचे तर, माझ्या शेतकरी मित्रांशी होणाऱ्या चर्चांमधून मला एक गोष्ट निश्चित कळली, की रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग सोपा आहे, पण नैसर्गिक पद्धतीने कीटकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे जास्त योग्य आहे, कारण त्यातून इतर दुष्परिणाम होत नाहीत. 
दक्षिण आशियातील लक्षावधी शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये कीटकांचे निर्मूलन किंवा त्यांच्या संख्येवर जास्तीतजास्त नियंत्रण आणण्यासाठी बदकांचा सुरेख वापर करून घेतलेला दिसतो. तांदूळ हे आशियातील अनेक देशांचे मुख्य पीक आहे. याचे कारण या प्रदेशात पडणारा भरपूर पाऊस आणि सुपीक जमीन. आजच्या तारखेला जगभरात तांदळाच्या वन्य आणि संकरीत अशा दोन्ही मिळून ४० हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. जगातल्या जवळपास प्रत्येक देशात भाताशी संबंधित एक तरी खाद्यप्रकार आढळतोच. मग इतक्या महत्त्वाच्या पिकाचे संरक्षण आणि पालनपोषण करणे ओघाने आलेच. त्यासाठी स्वस्त आणि सोपा उपाय म्हणून रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. त्यातून पिके जोमदार नक्कीच आली, पण कालांतराने दुष्परिणामही दिसू लागले. जसे की माती टणक होणे, जलप्रदूषण तसेच वायूप्रदूषण होणे वगैरे. मातीत शोषली न गेलेली खते पाण्यातून वाहून जाऊन नदी तसेच तळ्यांमध्ये साचू लागली. यामुळे शैवाल वाढीस लागले आणि मृत शैवालाचे विघटन करताना सूक्ष्मजीवांनी पाण्यातील प्राणवायू कमी केला, त्याचे इतर जलचरांवर दुष्परिणाम झाले. सातत्याने रसायनांच्या संपर्कात राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये कॅन्सरसारखे आजारही वाढीस लागले. पंजाबमध्ये बासमती भात पिकवणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कॅन्सर झाला आहे. भटिंडा ते बिकानेर धावणारी एक ट्रेन तर चक्क ‘कॅन्सर एक्प्रेस’ म्हणून ओळखली जाते, कारण त्यातले ६० टक्के प्रवासी बिकानेरला उपचारासाठी जाणारे पंजाबमधील कॅन्सरग्रस्त शेतकरी असतात. 
तर ही विध्वंसक साखळी टप्प्याटप्प्याने नजरेस येऊ लागली व त्यावर उपाय म्हणून शेतकरी नैसर्गिक उपायाच्या ‘भोपळे चौकात’ येऊन पोहोचले व त्यांनी जपान तसेच चीनमधील शेकडो वर्षे जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन करायचे ठरवले. याला परंपरेला ‘इंटीग्रेशन ऑफ राईस अँड डक फार्मिंग’ असे म्हणतात. म्हणजे बदक आणि भातशेतीची सांगड किंवा एकीकरण. या परंपरेनुसार बदकांचा वापर करून भातशेतीमधील कीटक तसेच तण यांचे निर्मूलन केले जाते, बदकांच्या विष्ठेमुळे शेतीला खत मिळते आणि बदकांना वेगळे खाद्य देण्याचा खर्च कमी होतो; असा तिहेरी फायदा या एकीकरणातून होतो. अर्थात यातही अभ्यासानुसार आधुनिक बदल घडवले आहेत जेणेकरून कमी कष्टात आणि खर्चात बदकांकडून जास्तीत जास्त काम करून घेता येते. 
भातशेतीमधील एक मुख्य समस्या म्हणजे भाताची रोपे हळूहळू वाढतात आणि तण वेगात वाढतात. हे तण उपटणे कौशल्याचे काम असते, अन्यथा भाताची रोपे खराब होऊ शकतात. बदके हा या समस्येवरील एकदम ‘फर्स्टक्लास’ उपाय आहे. कारण त्यांचा आकार लहान असतो, त्यांची हालचाल नाजूक असते आणि मुख्य म्हणजे बदके भाताची पाने खात नाहीत, कारण भाताच्या पानांमध्ये ‘सिलिका’ नामक द्रव्य असते. बदकांची पचनसंस्था सिलिका पचवू शकत नाही. बदकांचा अजून एक फायदा म्हणजे त्यांची मुबलक पैदास करता येते. 
या प्रकाराची सुरुवात करताना नेहमीप्रमाणेच आधी भाताची रोपे एकत्र वाढवली जातात. त्यांनी एक विशिष्ट उंची गाठली की ठरावीक अंतर ठेवून त्यांची लावगड केली जाते. भातशेतीमध्ये भरपूर पाणी असतेच. यानंतर एका विशिष्ट वयाची बदकांची पिल्ले भातशेतीत सोडली जातात व त्यांना तिथेच ठेवले जाते. आता पुढच्या सहा ते आठ आठवड्यांच्या काळात बदके आणि भात एकत्रच वाढतात. या काळात त्यांच्याकडून तण आणि कीटकांचा फन्ना उडवला जातो. भाताला लोंब्या धरू लागल्या की मग बदकांना शेतांमधून बाहेर काढून परत त्यांच्या पालनकेंद्रात नेले जाते, कारण बदके तांदळाचे दाणे खातात. या बदकांपासून अंडी आणि मांस मिळते हे वेगळे सांगायला नकोच.
या एकीकरणाचा प्रचार करणाऱ्या ताकाओ फुरूनो नामक जपानी शेतीतज्ञाने ‘The Power of Duck and The One Duck Revolution’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने या पद्धतीचे सखोल विवेचन केले आहे. फक्त दक्षिण आशियाच नाही तर अमेरिका तसेच युरोपमधील देशांनीही विविध पिकांसाठी या पद्धतीचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे. भारतातसुद्धा बंगालमध्ये भातशेतीत या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार आपल्याकडेसुद्धा नाही का शेतात शेळ्यामेंढ्या बसवतात? ‘योग्य आणि सोपे’ यातली निवड आपल्या लोकांनीही कधीच केली होती हेसुद्धा तितकेच खरे.

संबंधित बातम्या