हा छंद जिवाला लावी ‘पिसे’

मकरंद केतकर
सोमवार, 24 मे 2021


सहअस्तित्व

साधारण वीस कोटी वर्षांपूर्वी, जनुकीय घोटाळ्यांमुळे असे काही डायनोसॉर जन्माला आले, ज्यांच्या अंगावर काही ठिकाणी टणक खवल्यांऐवजी मऊ पिसे उगवली होती. हा नवा बदल त्यांच्या जगण्याला पूरक ठरल्यामुळे पुढे पुढे अशी पिसे असलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या अंगावरील पिसांची संख्या यात प्रगती होत गेली आणि अशा डायनोसॉरची एक शाखा वेगळी झाली. या प्रक्रियेला ‘नॅचरल सिलेक्शन’ असे म्हणतात. मग पुढे जवळपास पाच कोटी वर्षांनंतर त्यांच्यापैकीच काही जिवांनी उड्डाण करण्याची कला अवगत केली. तिथपासून आजपर्यंतच्या काळात जसे त्यांच्या शारीरिक रचनेत खूप बदल झाले, तशी पिसांमध्येही थोडीफार बदल झाले.

अनेकांना वाचायला विचित्र वाटेल, पण आजचे पक्षीसुद्धा डायनोसॉरच आहेत. तुम्ही जर पक्ष्याच्या शरीरावर असलेली पिसांची रचना पाहिली, तर एकावर एक रचलेल्या खवल्यांचाच भास होतो. ही पिसे जशी पक्ष्यांना हलके करतात, तशीच ती त्यांना उबही देतात आणि त्यांच्या याच गुणाचा उपयोग माणसांनी करून घेतलेला आढळतो. 

उत्क्रांतीच्या प्रवासात डायनोसॉरच्या अंगावर पिसे वाढत गेली आणि त्याच्या बरोबर उलटे होऊन माणसांच्या अंगावरचे केस झडत गेले. त्यामुळे कृत्रिमरीत्या शरीराला ऊब देण्याची गरज भासू लागली. गेल्या लाखभर वर्षांपूर्वी प्राण्यांच्या कातड्यापासून सुरू झालेला कपड्यांचा प्रवास आधुनिक काळात पिसे भरलेल्या हलक्या जॅकेटपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. एवढेच नाही तर पिसांचे इतरही अनेक उपयोग माणसांनी करून घेतले आहेत. हलकी आणि पातळ असूनही पिसे उबदार का असतात याचे उत्तर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत आहे. 

पिसांची निर्मिती केरॅटीन नावाच्या घटकापासून होते. त्याच्याचपासून आपले केस आणि सरीसृपांचे खवलेही तयार झालेले असतात. पक्ष्याच्या शरीरावर अंतर्बाह्य विविध प्रकारच्या पिसांचे थर असतात, ज्यातल्या प्रत्येक प्रकारच्या थरातील पिसे विशिष्ट काम करतात. त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा प्रकारे केलेले आहे. सूक्ष्मदर्शकाखाली पीस पाहिल्यास प्रत्येक अतिसूक्ष्म तंतूच्या एका बाजूला ओळीमध्ये हुक्सची रचना दिसते. ती आसपासच्या तंतूंना धरून ठेवायचे काम करते. आपल्या सँडलची वेल-क्रोची पट्टी असते तसे. म्हणून पिसांमधले तंतू एका छान सरळ रेषेत दिसतात. या रचनेमुळे जवळपास सलग पृष्ठभाग तयार होतो व उडण्याच्या क्रियेत हवा खाली ढकलता येते. हीच सलगता पिसांना बऱ्यापैकी जलरोधकही बनवते. त्यामुळे पक्ष्याने पिसे फुगवून नुसते ‘फुर्रर्रर्र’ केले तरी पिसांवरचे पाणी निघून जाते. 

दर्शनी भागातील मजबूत पिसांच्या आत डाऊन फेदर्स असतात जी आकाराने लहान, करडी पांढरी आणि मऊ असतात. ही पिसे मुख्यत्वे उष्णतारोधकाचे काम करतात म्हणून याच पिसांचा उपयोग कापड उद्योगात केला जातो. इटलीमधील एका गुहेत निअँडरथल मानवाच्या वास्तव्याच्या खुणांमध्ये पिसे खरवडून काढलेली पंखांची हाडे सापडली आहेत. यावरून असा अंदाज येतो की तत्कालीन माणूस कदाचित कातड्यावरील सजावटीसाठी पिसे वापरत असावा. पण पिसांचा सरसकट वापर अगदी अलीकडच्या काळात सुरू झालेला आढळतो. विशेष करून फॅशन इंडस्ट्रीमध्ये कोंबड्या, हंस, बदक, शहामृग अशा विविध पक्ष्यांची विविध पिसे वापरली जातात. जॅकेटस्, स्लीपिंग बॅग्स, उशा, चादरी इत्यादींमध्ये वापरली जाणारी पिसे ही थंड प्रदेशातील बदक वर्गीय पक्ष्यांची असतात, कारण उष्ण प्रदेशातील पक्ष्यांपेक्षा या पक्ष्यांवर जास्त पिसे असतात. 

पिसे मिळवण्यासाठी पूर्वी पक्ष्यांच्या अंगावरून पिसे थेट उपटली जायची. तसेच पिसे लवकर उगवावीत म्हणून त्यांना जबरदस्तीने अधिक अन्न दिले जायचे. ही पद्धत क्रूर होती म्हणून २०१४ साली जागतिक वस्त्रोद्योग संघटनेने ‘रिस्पाँसिबल डाउन स्टँडर्ड’ (RDS) ही नियमावली तयार केली, ज्याद्वारे या क्रौर्यावर निर्बंध आणले गेले. तसेच या नियमावलीचे पालन करून गोळा केलेल्या पिसांपासून तयार झालेल्या उत्पादनांवरच १०० टक्के RDS असा शिक्का मारायची परवानगी आहे. पिसांच्या व्यापाऱ्यांकडून कारखान्यांना पिसे पुरवण्यापूर्वी ती स्वच्छ करून त्यांची क्रमवारी केली जाते. ही क्रमवारी ‘फिल पॉवर’ या एककानुसार होते. २४० X ६०० मिलीमीटर आकाराच्या सिलेंडरमध्ये एक औंस (२८.३ ग्रॅम) वजनाची डाउन फेदर्स भरून त्यावर ९४.६ ग्रॅम वजनाची प्लेट ठेवली जाते. त्या वजनाने पिसे एका मिनिटात किती घन इंच खाली दबतात त्यावरून पिसांची गुणवत्ता ठरते. कारण त्यावरून पिसे किती हवा धरून ऊब देऊ शकतात हे कळते. ५०० फील पॉवर म्हणजे सर्वात कमी आणि ९०० फिल पॉवर म्हणजे सर्वात उत्तम अशी ही क्रमवारी असते व त्या दर्जानुसार किंमत ठरते. 

कपड्यांप्रमाणेच पिसांचा उपयोग सजावटीमध्येही मोठ्या प्रमाणात होतो. पिसांनी तयार केलेला लकी चार्म अनेकांनी पाहिला असेल. खेळामध्येसुद्धा बॅडमिंटनचे शटल कॉकसुद्धा बदकाच्या पिसांचे असते. पूर्वी वारा घालायच्या हातपंख्यात पिसांचा वापर केला जायचा. अनेकांना सुंदर पिसे गोळा करायचा छंद असतो. माझ्या मते ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ हे गाणे अशा छांदिष्टांना चपखल लागू होते. या सृष्टीतल्या कोणी कोणी माणसाला काय काय दिले असा विचार केला तर दिसते की घोड्याने वेग दिला, हत्तीने शक्ती दिली, वाघाने शौर्य दिले, मुंग्यांनी एकी दिली वगैरे वगैरे. पण यापैकी महत्त्वाचे एक म्हणजे पक्ष्यांनी माणसांच्या कल्पनांना पंख दिले. खूप मोठ्या काळापासून पिसांनी आपल्या आयुष्यात विशेष जागा मिळवली आहे. पण मला भावलेले पिसाचे सर्वात सुंदर स्थान सांगू? घनःश्याम श्रीकृष्णाने केसात खोवलेले मोरपीस जे पाहून कदाचित त्याच्या निर्मात्यालाही आपल्या निसर्गदत्त देणगीचे सार्थक झाल्यासारखे वाटत असेल.

संबंधित बातम्या