गटळ्ळगर्रर्रगम!

मकरंद केतकर
सोमवार, 14 जून 2021

सहअस्तित्व

चित्रपटांमध्ये ‘प्रेमाचे संदेश’ द्यायला कधीकधी कबुतरांचा वापर केलेला दिसतो. पण कबुतरे खरेच संदेश देण्यासाठी वापरली जायची का? ही कबुतरे चिठ्ठ्या कशी पोहोचवतात किंवा पोहोचवत होती? नक्की ती प्रक्रिया काय आहे?

आईशप्पथ सांगतो, कबुतराच्या गळ्यातून निघणाऱ्‍या आवाजसदृश ध्वनीचे इतके नेमके शब्दात रूपांतर फक्त पु.लं.च करू शकतात! एखाद्या ध्वनीला शब्दरूपात सादर करण्याच्या पद्धतीला ‘ओनोमाटोपिया’ (Onomatopoeia) असे म्हणतात. तर, हा लेख वाचणाऱ्या वाचकांना नव्वदच्या दशकात आलेल्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमामधले ‘कबुतर जा जा जा’ हे गाणे नक्कीच ठाऊक असेल. त्यात चित्रपटातली अभिनेत्री भाग्यश्री तिच्या पाळलेल्या कबुतराला तिचा प्रेमसंदेश असलेली चिठ्ठी तिच्या साजनला ‘दे आ’ असो सांगते आणि तेही बापडे मुकाटपणे ती चिठ्ठी देऊन आणि ‘तिकडून’ दुसरी घेऊनही येतो. ‘दे आ’?? ‘जा आणि ये’?? भारतीय सिनेमावाल्यांनी केलेली ही मोठ्ठी घोडचूक आहे. कारण ‘मेसेंजर पिजन्स’ ही फक्त एकाच दिशेने, म्हणजे त्यांच्या घराच्या दिशेनेच उडतात. त्यांना असे मोबाईलवरच्या मेसेजसारखे घरातून दुसरीकडे पाठवता येत नाही आणि ते त्या मेसेजसारखा हवा तो माणूस शोधतही नाहीत. त्यामुळे या गाण्यात ते कबुतर करत असलेली चिठ्ठ्यांची देवाणघेवाण ही शुद्ध थाप आहे. 

मग ही कबुतरे चिठ्ठ्या कशी पोहोचवतात किंवा पोहोचवत होती? नक्की ती प्रक्रिया काय आहे? आज आपण या विस्मयकारक पद्धतीविषयी जाणून घेऊ. वर सांगितल्याप्रमाणे चिठ्ठी किंवा संदेश पोहोचवण्याचे काम करणाऱ्‍या कबुतरांना मेसेंजर पीजन्स, पोस्टमन पीजन्स, कॅरियर पीजन्स किंवा होमिंग पीजन्स अशा विविध नावांनी ओळखले जाते. प्राचीन काळापासून माणसाच्या मोहात पडलेल्या पशुपक्ष्यांपैकी कबुतर हा एक जीव आहे. संदेशवहनासाठी कबुतरे वापरण्याचा इतिहास आजपासून कमीतकमी दोन अडीच हजार वर्षे मागे जातो. कबुतरांची उडण्याची शर्यत लावण्याच्या खेळातून या पद्धतीचा जन्म झाला आणि तिचा सर्वाधिक वापर अगदी अलीकडे दुसऱ्‍या महायुद्धात हजारो सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी झाला. अशी कामगिरी बजावणाऱ्‍या कबुतरांना शौर्यपदकेही देण्यात आली आहेत. याबाबत मी पुढच्या लेखात सविस्तर सांगेनच, पण ही पद्धत कशी वापरली जाते याकडे आधी बघू. 

जगात माणसाने हव्या तशा घडवलेल्या जातींसकट कबुतरांच्या शेकडो जाती आहेत. यापैकी रॉक पीजन्स म्हणजे आपल्या घराच्या आसपास ‘गटळ्ळगर्रर्रगम’ करणारी कबुतरे ही सगळ्यात बिनधास्त आणि म्हणूनच सगळ्यात जास्त प्रयोग झालेली जात आहे. सगळीच कबुतरे काही ‘गटळ्ळगर्रर्रगम’ असा आवाज काढत नाहीत. उलट सह्याद्रीतल्या जंगलात आढळणारे हिरव्या तपकिरी रंगाचे जंगली पारवे, ज्यांना ग्रे फ्रंटेड ग्रीन पीजन्स म्हणतात ते अतिशय सुंदर शीळ घालतात. ती ऐकतच राहावीशी वाटते. 

तर, या मेसेंजर पीजन्सची पिल्ले उडायला शिकली की त्यांचे प्रशिक्षक त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या ढाबळीपासून दूर नेऊन सोडत असत आणि ती आपल्या खुराड्यात परतत असत. असे करत करत शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर असे टप्पे त्यांनी गाठले की त्यांना ‘संदेशवहनासाठी तयार’ असे सर्टिफिकीट मिळत असे. कबुतरांनी ढाबळीकडे लवकर परत यावे यासाठी त्यांना घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या खुराड्यात आवडीचे अन्न ठेवले जात असे. नंतर नंतर असे लक्षात आले की भुकेपेक्षा ‘ईर्षा आणि मत्सर’ जास्त प्रभावी आहेत. म्हणून मोहिमेवर निघण्याआधी ढाबळीमध्ये एक नवा नर आणून ठेवत असत. त्यामुळे सोबत नेलेल्या पक्ष्यांमधले नर, समूहातले आपले स्थान सुरक्षित राखण्यासाठी अधिक वेगाने घराकडे परतत असत. 

माझ्या ओळखीचे काही ढाबळवाले आहेत, ते सकाळ संध्याकाळ कबुतरांना खूप उडण्याचा व्यायाम देतात. शिट्ट्या वाजवून आणि काठीला लावलेले एक कापड हवेत फडकवून त्यांना बराच वेळ गोल गोल फिरवत ठेवले जाते. एकाच वेळी दोन ढाबळवाले जर कबुतरे उडवत असतील तर कधीतरी दुसऱ्‍या ढाबळीमधले नर इकडच्या माद्यांच्या आकर्षणाने या थव्यात शिरतात आणि मग वादावादीचे प्रसंगही उद्‍भवतात. अशी प्रशिक्षित कबुतरे उडण्याच्या स्पर्धेत वापरत असल्याने त्यांचे मोल फार असते. अशाच प्रशिक्षणादरम्यान पुण्यात खंबाटकी घाटातून सोडलेली कबुतरे, मधले ऐंशी किलोमीटरचे अंतर पार करून जेमतेम पंधरा वीस मिनिटांत त्यांच्या बाणेर इथल्या ढाबळीत परत आली होती. 

हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेने नसेल, तर या कबुतरांचा वेग दीडशे किलोमीटर प्रतितास इतका असू शकतो. तसेच ती दिवसाला सलग आठशे ते हजार किलोमीटर सहज उडू शकतात. अशाच एका ढाबळवाल्या मित्राने स्पर्धेसाठी पुण्यातून बुलढाण्याला नेलेली त्याची कबुतरे चारशे साडेचारशे किलोमीटरचे अंतर तीनेक तासात पार करून आली होती. अर्थात किलोमीटर हे जमिनीवरील अंतर आहे कारण रस्ता वेडावाकडा, वळणावळणाचा असतो. पण गंमत म्हणजे कबुतरेसुद्धा हवाईमार्गे येताना रस्ते, रेल्वेलाईन्स, नद्या, डोंगर अशा ओळखीच्या खुणांचा वापर करत परत येतात. 

ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील एका संशोधक चमूने पन्नास कबुतरांच्या पाठीवर ‘ट्रॅकिंग डिव्हाईस’ लावून त्यांच्या परतीच्या उड्डाणाचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना कबुतरे कसा आणि कुठला मार्ग निवडतात हे लक्षात आले. कबुतरे अचूक रस्ता कशी शोधतात, याचे उत्तर त्यांना लाभलेल्या अद्‍भुत नैसर्गिक देणगीत आहे. कबुतरे आणि असंख्य जातीचे पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर दिशादर्शक यंत्रासारखा करतात. जोडीला ते सूर्याची आकाशातील स्थिती आणि स्वतःची घ्राणक्षमता (वास) याचाही वापर करतात. कबुतरांच्या चोचीमध्ये सूक्ष्म प्रमाणात ‘मॅग्नेटाईट’ नावाचे एक लोहाचे संयुग आढळते. त्याचा वापर त्यांना होकायंत्रासारखा होत असावा असा अंदाज आहे. अशाप्रकारे आपल्या मूळस्थानी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या आराखड्याचा वेध घेत ते स्वगृही परततात. कबुतरांच्या या अफाट क्षमतांचा माणसाला केवढा मोठा उपयोग झाला हे मी पुढच्या लेखात सांगणार आहे. मला खात्री आहे ते वाचल्यावर तुम्ही अवंढा गिळून म्हणाल ‘गटळ्ळगर्रर्रगम!’  

संबंधित बातम्या