पत्रपारवे

मकरंद केतकर
सोमवार, 21 जून 2021

सहअस्तित्व

उत्तुंग मानवी आकांक्षांचे ‘जू’ अजाणतेपणी आपापल्या शारीरिक बलस्थानांवर पेलून, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवलेल्या पशुपक्ष्यांच्या बाबतीत मनुष्य कायमच ऋणी राहिला आहे. हे विधान खरेतर सार्वत्रिक नाहीये कारण मनुष्याच्या विविध कृतींपायी अनेक प्राण्यांचा जीव गेला आहे. कित्येक प्रजाती नष्ट झाल्या आहेत, तर कित्येक प्रजाती संकटग्रस्त झाल्या आहेत. पण तरी विविध प्रजातीच्या पशुपक्ष्यांनी त्यांच्या ध्यानीमनी नसताना दिलेल्या योगदानाचे माणसाने वेळोवेळी स्मरणदेखील ठेवले आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. 

मा गच्या लेखात मी युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्‍या संदेशवाहक कबुतरांचा उल्लेख केला होता. त्या संदेशवाहक कबुतरांच्या या काही रम्य युद्धकथा. सोयीसाठी आपण त्यांना ‘पत्रपारवे’ म्हणू. हा तो काळ आहे, जेव्हा संदेशवहनाची साधने मर्यादित होती आणि आजच्या सारखेच तेव्हाही ती साधने ‘इंटरसेप्ट’ (मार्गात मधेच पकडणे) केली जात असत. तरीसुद्धा गौप्यस्फोटाचा धोका पत्करून शत्रूला चकवून संदेश पोहोचवले जायचे. त्यातला सहज दृष्टीस न पडेल आणि वेगाने काम करेल असा पत्रपारवे हा एक उपाय होता. त्यांना कसे प्रशिक्षित केले जायचे हे आपण मागच्या लेखात पाहिले. कबुतरे आपल्या मूळस्थानाच्या ओढीने प्रवास करतात. म्हणून त्यांना आपल्यासोबत शत्रूप्रदेशात घेऊन जात असत आणि त्यांच्या पायाला किंवा पाठीला चिठ्ठी बांधून त्यांना सोडून दिले जात असे. प्रवास करून ती आपल्या खुराड्यात परतत असत. त्यामुळे घटनास्थळी चालू असलेल्या घडामोडी इकडच्या लोकांना कळत असत. 

पत्रपारव्यांचा इतिहास इसवीसन पूर्व चारशे वर्षे इतका तरी मागे जातो. ऑलिंपिकची घोषणा करणे, भिन्न शहरांदरम्यान संदेशवहन करणे अशा कामांसाठी त्यांचा वापर होत असे. चेंगीज खानाने युद्धांदरम्यान पत्रपारव्यांचा उपयोग केलेला आढळतो. कुठल्याही घोडेस्वारापेक्षा अधिक वेगाने सर्व दुर्गम प्रदेश पार करून हे पारवे संदेश पोचवत असत. त्यामुळे अधिक कुशल व्यूहरचना करता येऊन मंगोल सैनिक शत्रूपक्षावर सहज मात करत असत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, की कबुतरांची स्मरणशक्ती किती तीव्र असते? तर, १९९७ साली फ्रान्समधून इंग्लंडमधील मूळस्थानाच्या दिशेने रेससाठी सोडलेले कबुतर अनाकलनियरीत्या वाट भरकटून हरवले आणि तब्बल पाच वर्षांनी आपल्या मूळ मालकाला येऊन भेटले. त्याच्या पायात असलेल्या कडीवरून त्याची ओळख पटली आणि अर्थातच याची मोठी बातमी झाली. 

गेली दोन हजार वर्षे पत्रपारव्यांचा वापर अखंड सुरू असला, तरी त्याचा सर्वोच्च वापर पहिल्या आणि दुसऱ्‍या महायुद्धात झाला. पहिल्या महायुद्धात कबुतरांच्या छातीला विशिष्ट यांत्रिक रचना असलेले स्वयंचलित छोटे कॅमेरे लावून शत्रूप्रदेशाचे हवाई फोटो काढले जायचे. आज आपण जे ड्रोन वापरतो त्याची कदाचित ही सुरुवात म्हणता येईल. याचबरोबर हेरगिरी करणाऱ्‍या विमानांमधून या प्रशिक्षित कबुतरांना नेले जायचे. वैमानिक खाली दिसणाऱ्‍या गोष्टींची कागदावर चटचट नोंद करून तो कागद पत्रपारव्यांबरोबर बेसवर पाठवत असे. याच पहिल्या महायुद्धात ‘शेर आमी’ (Cher Ami) नावाच्या पत्रपारव्याने शेकडो अमेरिकी सैनिकांचे प्राण वाचवले होते. 

सुमारे पाचशे अमेरिकी सैनिकांची एक तुकडी उत्तर फ्रान्समधील अर्गोनच्या डोंगराळ प्रदेशात अडकून पडली होती. त्यांच्या मागावर असलेले जर्मन सैन्य त्यांच्यावर सतत हल्ला करत होते आणि उरलेल्या दारूगोळ्याबरोबर अमेरिकी सैनिक टिकाव धरण्याचा प्रयत्न करत होते. दुर्गम प्रदेशामुळे तिथून रेडिओ संपर्कसुद्धा होत नव्हता. त्यातच आणखी एक दुर्दैव म्हणजे आपल्याच तुकडीच्या स्थानाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या त्यांच्या दुसऱ्‍या तुकडीतील सहकाऱ्‍यांनी जर्मन सैनिकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात चुकून स्वतःच्याच अडकलेल्या सैनिकांवर शेलिंग सुरू केले. इकडे आड तिकडे विहीर अशा कचाट्यात सापडलेल्या अमेरिकी सैनिकांची आता बरोबर नेलेल्या पत्रपारव्यांवरच शेवटची आशा टिकून होती. त्यांनी “We are along the road parallel to 276.4. Our own artillery is dropping a barrage directly on us. For heaven’s sake, stop it.” असा संदेश लिहून  

कबुतरे सोडायला सुरुवात केली. पण मिनिटाला पाचशे फैरी झाडणाऱ्‍या यंत्रांपुढे ही कबुतरे कशी टिकाव धरणार होती? आकाशातून गळून पडणाऱ्‍या एकेका पक्ष्याबरोबर आपली जगण्याची आशा धूसर होताना त्यांना दिसत होती. आता त्यांच्याकडे शेवटचे कबुतर, ज्याचे नाव शेर आ‍मी होते, त्याच्यासोबत हा संदेश परत एकदा पाठवण्यात आला. या पत्रपारव्याने हवेत भरारी घेतली आणि गोळीबाराच्या असंख्य फैरी चुकवत ते आपल्या मूळस्थानी निघाले. पण शेवटी दुर्दैव आड आलेच आणि बिचाऱ्‍याच्या छातीत गोळी बसली आणि ते जमिनीवर कोसळले. आता अमेरिकी सैनिकांची जगण्याची शेवटची आशासुद्धा मावळली. पण तेवढ्यात ते कबुतर परत धडपडत उठले आणि तशाच रक्तबंबाळ अवस्थेत त्याने भरारी घेत अर्ध्या तासात पंचवीस मैलांचे अंतर कापले, संदेश पोचवला आणि सैनिकांचे प्राण वाचले. 

ते जेव्हा पोहोचले तेव्हा त्याचा एक पाय फाटून लटकत होता आणि एक डोळा फुटलेला होता. त्याच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले आणि त्याचे प्राण वाचले. दुसऱ्‍या दिवशी तेच बॉम्बगोळे जर्मन सैन्यावर पडू लागले आणि युद्ध अमेरिकेच्या बाजूने झुकले. एखाद्या थरारक सिनेमासारखी ही कथा. या अतुलनीय शौर्याबद्दल या पत्रपारव्याचा फ्रेंच सैन्यदलातील ‘क्रुआ द गेर’ (Croix de Guerre) हा अत्यंत प्रतिष्ठित युद्धसन्मान देऊन गौरव करण्यात आला. त्याचे शरीर अमेरिकेत सन्मानपूर्वक जतन करून ठेवण्यात आले आहे. ‘प्रिय मित्र’ असा फ्रेंच अर्थ असलेल्या शेर आमीने कित्येक सैनिक मित्रांची आपल्या प्रियजनांशी गाठ घालून दिली. त्याचे पांग कोणालाच कधीच फेडता येणार नाहीत.

संबंधित बातम्या