आकाशातील चित्ता

मकरंद केतकर
सोमवार, 28 जून 2021

सहअस्तित्व

माणसाला इतर प्राण्यांपेक्षा जे गुण वेगळे ठरवतात, त्यापैकी विरंगुळा हा एक गुण आहे. आयुष्याच्या रोजच्या त्याच त्याच रहाटगाडग्याला ‘टाइम-प्लीज’ म्हणून चार क्षण मनोरंजन व्हावे या उद्देशातून कलेचे असंख्य प्रकार विकसित झाले. पुढे काहींसाठी तेच रहाटगाडगे झाले. यापैकी एक म्हणजे प्राण्यांना आपल्या तालावर नाचवणे, त्यांना नकला करायला लावणे, त्यांना शिकार करायला लावणे असे अनेक प्रकार आहेत. प्राण्यांना किंवा पक्ष्यांना शिकार करायला लावणे हा खेळ खूप जुना आहे. 

भारतातले राजेरजवाडे शिकारीच्या खेळासाठी चक्क चित्ते पाळत असत. त्यांना पिंजऱ्‍यातून माळरानावर घेऊन जात आणि चिंकारा किंवा काळविटाच्या मागे सोडून त्यांची शिकार करायला लावत असत. आपल्याकडच्या अनेक संस्थानांमध्ये असे पाळीव चित्ते होते. पण दुसरीकडे खुद्द चित्त्यांचीच शिकार होत गेली आणि विसाव्या शतकाच्या मध्यावर भारतातून चित्ता नामशेष झाला. शिकारीच्या खेळात चित्ते जसे त्यांच्या वेगासाठी प्रसिद्ध होते, तसेच पक्ष्यांमध्ये ससाणे आजही प्रसिद्ध आहेत. त्यात पेरीग्रीन फाल्कन्स विशेष प्रसिद्ध असून त्यांचे फाल्कनरी क्लब आजही जगभर आहेत. 

ससाण्यांच्या शिकारीसाठी केलेल्या उपयोगाचा इतिहास अगदी प्राचीन आहे. इसवीसनपूर्व हजार वर्षांपासून फाल्कनरी जोपासल्या जात आहेत. मध्यपूर्वेतील हिटाईट्स समूहातील लोकांनी इसवीसनपूर्व चौदाव्या शतकात कोरलेल्या अश्मस्तंभांवर ससाण्यांच्या आकृती आढळतात. या लोकांच्या संपर्कात आलेले युरोपियन व्यापारी, प्रवासी तसेच आक्रमकांनी ही कला युरोपात नेली आणि तिथेही ती प्रसिद्ध झाली. पण तिचा वापर फक्त उच्चभ्रू समाजापुरताच मर्यादित होता. मला हे गमतीशीर वाटते. म्हणजे हे फक्त तेव्हाच होते असे नाही, तर आजही काहीसे असेच घडते. एखादे तंत्रज्ञान हे आधी लष्करी वापरासाठी किंवा उच्चभ्रू लोकांच्या खेळासाठी विकसित होते आणि मग हळूहळू ते आपल्यापर्यंत येते. उदा. F1 मधील रेसकार्ससाठी संशोधन करण्यात आलेले टायर्स, डिस्क ब्रेक्स, इग्निशन सिस्टीम, एरोडायनामिक डिझाईन वगैरे तंत्रज्ञान नंतर प्रॉडक्शन कार्समध्ये वापरले जाऊ लागले. असो. 

पुढे जसा बंदुकांचा विकास झाला तसा ससाण्यांचा शिकारीसाठी होत गेलेला वापर मागे पडत गेला आणि मग हौशी क्लब मेंबर्सपुरताच तो उरला. या खेळात ससाण्यांचा वापर करायचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रचंड वेग आणि त्यांचे माणसाळणे. ससाण्याची शिकार करण्याची पद्धत विलक्षण आहे. हवेत भराऱ्‍या घेत तो उंच उंच जातो आणि त्याचे लक्ष्य नक्की झाले की तो पंख मिटून एखाद्या बाणासारखा खाली सूर मारतो. खाली येताना त्याचा वेग तब्बल तीनशे किलोमीटर प्रतितास इतका प्रचंड नोंदला गेलेला आहे. या वेगाने हवेत ‍उडणाऱ्या किंवा जमिनीवर बसलेल्या पक्ष्याला त्याच्या धारदार नख्यांनी धडक देतो आणि अनपेक्षितरीत्या फटका बसलेला पक्षी जागच्या जागी गतप्राण होतो. त्याच्या या सूर मारण्याच्या पद्धतीला ‘डाईव्ह बॉम्बिंग’ असे म्हटले जाते. 

ससाणा म्हणजे जणू आकाशातील चित्ताच. अर्थात चित्त्याप्रमाणेच यात त्याला प्रत्येकवेळी यश मिळतेच असे नाही, कारण शिकार जर सजग असेल तर ती ससाण्याला हुलकावणी देऊन निसटते आणि मग त्याला परत नवे लक्ष्य शोधावे लागते. आपल्याकडे दिसणाऱ्‍या त्याच्या शाहीन फाल्कन नावाच्या एका कुळबंधूला मी अशी होल्याची शिकार करताना पाहिले होते. जेमतेम अर्ध्या सेकंदात दोन्ही पक्षी माझ्या नजरेसमोरून गेले आणि मी मागे वळून पाहिले तर बिचारा होला त्याच्या पंजात अडकला होता. इतर पक्ष्यांच्या तुलनेत ससाण्यांच्या छातीचा भाग अधिक रुंद असतो आणि त्याला जोडलेले स्नायू अधिक कार्यक्षम असतात. त्याच्या पंखांचा आकारही हवेचा अवरोध कमीत कमी होईल असा असतो, त्यामुळे त्याला झटकन ‘टॉप गियर’ टाकता येतो. त्याचबरोबर वेगाने खाली येताना त्याच्या डोळ्यात असलेली अधिकची अर्धपारदर्शक पापणी ओढली जाते, त्यामुळे धुलिकणांपासून डोळ्याला संरक्षण मिळते. या पापणीला निक्टिटेटींग मेंब्रेन असे म्हणतात आणि ती अनेक पक्षी तसेच प्राण्यांमध्ये आढळते. भारतात थंडीच्या दिवसात युरोप आणि मध्यपूर्वेतून पेरीग्रीन फाल्कन स्थलांतर करून येतात, पण गुजरातेत कच्छच्या रणात त्यांचा हा चित्तथरारक पाठलाग विशेष पाहायला मिळतो. 

कमिंग टू द पॉइंट, पाळीव ससाण्यांचे मालक अन्न आणि पाण्याची आश्वासक सोय करून हे पक्षी आपल्या सेवेत राहतील याची काळजी घेतात. सुरुवातीला त्यांना हाताने अन्न भरवले जाते, त्यांना त्यांच्या नावाने हाक मारून मालकाशी परिचित केले जाते आणि टप्प्याटप्प्याने शिकार उचलायला शिकवले जाते. त्यांना शांत ठेवण्यासाठी विशिष्ट पट्टीने त्यांचे डोळे झाकले जातात. शिकारीसाठी घेऊन जाताना त्यांचे मन दुसऱ्या गोष्टी पाहून विचलित होऊ नये यासाठी याचा उपयोग होतो. फक्त ससाणेच नाही तर अनेक प्रकारचे शिकारी पक्षी या खेळासाठी वापरले जातात. या खेळात पक्ष्यांच्या शिकारीच्या नैसर्गिक क्षमतेनुसार चिमण्या, ससे, बदके, पारवे किंवा इतर पक्ष्यांच्या पाठलागावर त्यांना सोडले जाते. त्यांनी केलेली शिकार परत आणायला सहसा शिकारी कुत्रे वापरले जातात. अनेक देशांमध्ये हा खेळ जोपासण्यासाठी परवाने आवश्यक असतात. 

विश्वविक्रमांच्या नोंदीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ‘गिनीज बुक’चा जन्मही असाच पक्ष्यांच्या शिकारीच्या छंदातून झाला. ‘गिनीज बुक’चे निर्माते सर ह्यु बीव्हर हे आयर्लंडमध्ये पक्ष्यांची शिकार करायला गेले होते तेव्हा ‘जगातील सर्वात वेगवान पक्षी कुठला’ यावरून त्यांची यजमानांसोबत चर्चा झाली आणि त्याची नोंद त्यांना कुठल्याही संदर्भ ग्रंथात सापडली नाही. यावरूनच त्यांना अशा अद्‍भुत नोंदींची संकल्पना सुचली. आहे की नाही गंमत?

संबंधित बातम्या