मन शुद्ध तुझं..

मकरंद केतकर
सोमवार, 5 जुलै 2021


सहअस्तित्व
 

घुबडांबाबत असलेल्या अनेक गैरसमजांमधून त्याच्याबद्दल भीती निर्माण झाली. पण खरेतर हा पक्षी उंदीर खाऊन एकप्रकारे आपली मदतच करत असतो.

मंडळी, भूत असते की नाही यावर वाद होऊ शकतो. पण अज्ञानातून जन्माला येणारी भीती आणि चुकीच्या मार्गांनी तिचे निरसन करताना होणारे नुकसान हा नक्कीच समुपदेशनाचा विषय आहे. निदान आमच्यासारख्या निसर्ग अभ्यासकांसाठी तरी. नुसतीच भीती नाही तर लोभ हासुद्धा विनाशाला (स्वतःच्या आणि इतरांच्या) कारणीभूत होऊ शकतो. माणूस उत्क्रांत होत असताना, जसजसा त्याचा मेंदू विकसित होत गेला, तसतसा त्याच्या आसपास असणारे अनेक प्राणी, पक्षी, कीटक तसेच नैसर्गिक घटना याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलत गेला. अनेकदा त्या गोष्टींचा अन्वयार्थ (परस्पर संबंध) न लावता आल्याने त्यातून भीती जन्माला आली. मग त्या भीतीचे निरसन करण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या आणि यातून निसर्गाच्या साखळीचे नुकसान होऊ लागले. 
युरोपमध्ये प्लेगच्या साथीला मांजरे (सैतानाचे साथीदार) कारणीभूत आहेत, या गैरसमजातून त्यांची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली आणि परिणामी साथीचे मूळ कारण असलेल्या उंदरांची संख्या वाढून प्लेग कसा बळावला हे आपण मागच्या एका लेखात पाहिले. काहीसे तसेच आजही दुर्दैवाने आजच्या लेखाचा विषय असलेल्या घुबडांच्या बाबतीत घडताना दिसते. मुख्यतः निशाचर असलेल्या या पक्ष्याची भीती वाटण्याचे कारण म्हणजे, त्याचे खिळवून ठेवणारे मोठ्ठे डोळे आणि गूढगंभीर आवाज (त्या आवाजाला हूटिंग असे म्हणतात), त्याचबरोबर त्याची नीरव झेप ज्यामुळे ते आवाज न करता अचानक समोर येऊन बसलेले दिसते आणि त्याचे डोके वळवून मागे पाहणे यांमुळे त्याच्याबद्दल अधिकच गैरसमज निर्माण होतात. वास्तविक या गोष्टी त्याची जगण्याची साधने आहेत. मोठ्ठ्या डोळ्यांमुळे रात्री अधिक प्रकाशग्रहण करता येऊन घुबडाला सावजाची हालचाल दिसते. २७० अंशाच्या कोनात मान फिरत असल्याने त्याला बसल्या जागी सावज कुठल्या दिशेला चालले आहे हे सहज पाहता येते आणि नीरव झेपेमुळे सावजाला काही कळायच्या आतच त्याची शिकार होते. 
घुबडांच्या आहारात मुख्यतः उंदरासारख्या प्राण्यांचा समावेश होतो, जे शेतीला उपद्रव करतात. पकडलेले सावज लहान असेल तर अख्खेसुद्धा गिळून टाकले जाते आणि नंतर त्यातला न पचलेला भाग विष्ठेव्यतिरिक्त छोट्या गोळ्यांच्या रूपाने उलटी करून बाहेर टाकला जातो. त्याला पेलेट्स म्हणतात. मेळघाटात माझ्यासमोर एका रानपिंगळ्याने पाचोळ्यात खुडबुड करणारा उंदीर झटक्यात पकडून पटकन मटकावला होता, त्याची आत्ता आठवण झाली. मग आपल्याला इतकी मदत करणारा हा पक्षी वाईट का ठरला असावा? याचे एक कारण म्हणजे घुबड रात्री सक्रिय होत असल्याने आणि भुतेखेतेसुद्धा रात्री सक्रिय असल्याच्या समजामुळे घुबडाला वाईट शक्तींबरोबर जोडले गेले असावे. त्यातून ते त्या शक्तींची भाषा बोलते, चेटकीणींचा संदेश घेऊन येते असे गैरसमज रूढ झाले. 
अरबस्तानात तसेच आफ्रिकेतल्या काही टोळ्यांमध्ये घुबड लहान मुलांना उचलून नेते अशी अंधश्रद्धा आहे. तसेच घुबडामध्ये मृत माणसाचा अतृप्त आत्मा शिरून, कबरीवर बसून मुक्ती मिळेपर्यंत विलाप करत राहतो, असाही एक गैरसमज विविध समाज घटकांमध्ये प्रचलीत आहे. जर्मनीमध्ये 
मूल जन्मल्यावर जर घुबडाचा घुत्कार ऐकू आला, तर ते आयुष्यभर नाखूष राहील 
असा एक विचित्र समज आहे. आयर्लंडमध्ये घरात शिरलेले घुबड मारून टाकले नाही, तर ते कुटुंबाचे भाग्य घेऊन उडून जाते असे मानले जाते. अर्थात सगळ्याच समाजात काही असे गैरसमज प्रचलित नाहीत. अनेक देशात सुगीच्या दिवसांत शेतात घुबड दिसणे ही समृद्धीची खूण मानली जाते, जे अगदीच लॉजिकल आहे. बेल्जियममध्ये चर्चमध्ये घुबड असणे हे शुभ मानले जाते, कारण ते उंदीर खाते व चर्च स्वच्छ ठेवते. भारतातही दोन गट दिसतात. एकीकडे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे, पण त्याच वेळी अनेक लोक त्याला अशुभही मानतात. मला आठवतेय, लालबागचा राजा गणेश मंडळाच्या सजावटीमध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीच्या मागे एकदा घुबडाचे चित्र रेखाटले होते तेव्हा अनेकांनी नापसंती दर्शवली होती. तेव्हा मंडळाने या पक्ष्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत या हेतूनेच आपण ही सजावट केल्याचे स्पष्ट केले आणि निसर्गाप्रती असलेली आपली  आस्था दर्शवून दिली. छोट्या छोट्या कृतींमधून कसे प्रबोधन करता येते याचे हे एक छान उदाहरण आहे. 
आपल्याला ठाऊक नसते, पण शहरातसुद्धा गव्हाणी घुबडे आणि पिंगळे रात्री कचऱ्‍याच्या ढिगांमध्ये हिंडणारे उंदीर खाऊन नकळत आपले आरोग्य जपत असतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काळी जादू करणारे मांत्रिक आजही अत्यंत क्रूर पद्धतीने घुबडाचा बळी देताना दिसतात. आश्चर्य म्हणा किंवा विरोधाभास म्हणा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला खूष करण्यासाठी तिच्याच वाहनाचा बळी देण्याची दुर्दैवी प्रथा काही भागात अस्तित्वात आहे. 
घुबड हा वन्यजीव कायद्याचे सुरक्षाकवच लाभलेला पक्षी आहे. त्यामुळे वनखाते डोळ्यात तेल घालून त्यांची तस्करी होणार नाही याकडे लक्ष ठेवून असते आणि अशी तस्करी करणाऱ्‍या गुन्हेगारांना दंड आणि तुरुंगवासाची शिक्षासुद्धा होते. 
सुगरणीचा आदर्श समोर ठेवताना बहिणाबाईंनी ‘तिची उलूशीच चोच, तेच 
दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोटं’ असे म्हटले आहे. तेव्हा गड्यांनो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. घुबडासारख्या आपल्याला मदतच 
करणाऱ्या निष्पाप पक्ष्याविषयी अंधश्रद्धा बाळगू नका. आपल्यासाठी ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची,’ यासारखा दुसरा जादुई मंत्र नाही.

संबंधित बातम्या