संशोधनातले साथीदार

मकरंद केतकर
सोमवार, 12 जुलै 2021

सहअस्तित्व

पक्ष्यांच्या अभ्यासातून मानवी समाजासाठी कितीतरी प्रकारच्या उपयुक्त गोष्टी सापडू शकतात हे हळूहळू मानवाच्या लक्षात आले. मानवी जीवन समृद्ध करण्यात पक्ष्यांनी किती प्रकारे कळतनकळत योगदान दिले आहे हे आज आपण पाहणार आहोत.

मानवी प्रगतीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की अनेक संशोधनांमागे ‘आयुष्य सुखकर करणे (म्हणजे थोडक्यात कष्ट-टाळूपणा करणे) आणि या सुखाच्या आड येऊ शकणाऱ्‍या भविष्यातील संकटांचा वेध घेणे’ या प्रेरणा आहेत. काही प्रयोग असे असतात की त्यांचे परिणाम आणि निष्कर्ष आधी थेट माणसांवर तपासून पाहणे हे धोक्याचे असते. त्यामुळे मग माणूस सोडून कोणालातरी ‘बकरा’ करावे लागते. प्रयोगांच्या गरजांनुसार सस्तन प्राणी, मासे, सरपटणारे प्राणी, कीटक तसेच पक्षी असे विविध जीव या प्रयोगांत वापरले जात असतात. अनेकदा हे प्रयोग केवळ त्यांच्या दुरून केलेल्या निरीक्षणामधूनही केले जातात. कुठल्याही मानवी समाजाची अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच ‘आरोग्य’ हीसुद्धा ‘प्रायॉरिटी लिस्ट’वरची एक गोष्ट आहे. यातसुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन घटक अभ्यासले जातात. प्रत्यक्ष घटकाचे उदाहरण म्हणजे ‘बर्ड फ्लू’ रोग ज्यामुळे साथ येऊन माणसे आजारी पडतात आणि मृत्यूसुद्धा होतात. अप्रत्यक्ष घटकाचे उदाहरण म्हणजे पर्यावरणातील बदलांना पक्ष्यांकडून दिला जाणारा प्रतिसाद. 

अलीकडच्या काळात स्थलांतर करणारे पक्षी त्यांच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच स्थलांतर करू लागलेले आढळून येत आहे. यात त्यांच्या स्थानिक अधिवासात लवकर होणारे तापमान बदल तसेच त्यांच्या गंतव्य स्थळी होणारी अन्नाची अकाली उपलब्धी हे घटक नोंदले गेले आहेत. पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनक्रमातील बदलांच्या अभ्यासातून तापमानाची तब्येत अभ्यासता येत आहे. पक्षी पर्यावरणाच्या जैवनिदर्शकांपैकी एक आहेत. उदा. जलस्रोत स्वच्छ असेल तर त्यात स्वच्छ पाणीच निवडणारे पक्षी दिसतात. पण पाणी प्रदूषित झाले की तिथे संधीसाधू पक्षी अधिक आढळून येऊ लागतात. उदा. शेकाट्या, बगळे, घारी, मैना, कावळे वगैरे. याचबरोबर एखाद्या रसायनाचा त्यांच्या जीवनशैलीवर होणारा प्रतिकूल परिणाम आणि त्यामुळे बिघडणारी अन्नसाखळी हेसुद्धा अभ्यासले जाते. 

अमेरिकेत दुसऱ्‍या महायुद्धानंतर डीडीटी या कीटकनाशकाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. त्याचे अंश जलस्रोतांत साठत गेले व त्यांचा पाणवनस्पती व माशांमध्ये प्रवेश झाला. अशा माशांना खाल्यामुळे ते रसायन तिथल्या ‘बॉल्ड ईगल’ या गरुडांच्या पोटात गेले. परिणामी गरुडांच्या अंड्यांचे कवच कमकुवत झाले आणि पक्षी अंडी उबवायला बसल्यावर अंडी फुटू लागली. त्यामुळे त्यांची संख्या अचानक घटली. पुढे अधिक संशोधन झाल्यावर डीडीटीवर बंदी घालण्यात आली आणि गरुडांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. असेच एक भयानक उदाहरण म्हणजे भारतातील संकटग्रस्त गिधाडे. गुरांमध्ये वापरल्या जाणाऱ्‍या वेदनाशामक औषधात ‘डायक्लोफेनॅक’ हे रसायन असते. अगदी आपल्या वापरातल्या काही वेदनाशामक मलमांमध्येही ते असते. अशी गुरे मेल्यानंतर त्यांच्या स्नायूंमध्ये त्याचे अंश शिल्लक राहतात. डायक्लोफेनॅक दिलेल्या जनावरांची कलेवरे खाणाऱ्‍या गिधाडांची मूत्राशये निकामी होऊन त्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यांच्या मृत्यूचे कारण कळेपर्यंत भारतात दुर्दैवाने त्यांची संख्या ९९ टक्के कमी झाली होती. पुढे त्याच्या वापरावर प्रतिबंध वगैरे आणले गेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता हे खरे. दुसरीकडे याच गिधाडांचा अभ्यास मानवासहीत पशुपक्ष्यांना धोकादायक असणाऱ्‍या ‘अँथ्रॅक्स’ या रोगावरील उपचारासाठी करण्यात येत आहे, कारण या रोगामुळे मृत झालेल्या प्राण्यांचे मांस खाणारी गिधाडे मात्र ठणठणीत असतात. अभ्यासातून असे आढळले, की त्यांच्या जठरात सुमारे तेरा हजार प्रकारचे जिवाणू असतात पण आतड्याच्या शेवटी मात्र जेमतेम पंधराशे असतात. त्यामुळे त्यांच्या पोटात कुठली जीवाणूनाशक क्षमता आहे आणि ती कशी काम करते यावर संशोधन सुरू आहे.

पक्ष्यांचा चिवचिवाट कोणाला आवडत नाही? पण पक्षीसुद्धा भाषाशास्त्री आहेत हे सांगितले तर अनेकांना पटायला जरा अवघड जाईल. त्यांच्या प्रत्येक कृतीबरोबर विशिष्ट स्वरातील संदेश जोडलेला असतो. तुम्ही आपल्या नेहमीच्या मैनेचे निरीक्षण केलेत तरी तुम्हाला त्या प्रसंगानुरूप शंका, भीती, आनंद, संधी, इशारा अशा विविध भावना दर्शवणारे वेगवेगळे आवाज काढताना दिसतात. पिल्लू असल्यापासून पक्षी आवाजांचा अर्थ समजायला शिकतात असे अभ्यासातून आढळून आले आहे. त्यामुळे एखाद्या ध्वनीचा मेंदू कसा अर्थ लावतो याच्या पक्ष्यांवरील निरीक्षणातून श्रवणदोष असलेल्या मुलांवर कसे उपचार करता येतील यावर अधिक संशोधन सुरू आहे. 

नवनिर्मितीमध्ये कित्येकांच्या प्रतिभेला पक्ष्यांनी पंख दिलेत असे आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसून येते. गरुड किंवा ससाण्यासारख्या शिकारी पक्ष्यांची पंखांची रचना, हल्ल्याच्या पावित्र्यात होणारी त्यांची शरीररचना, हमिंगबर्डसारख्या पक्ष्याचे एकाच जागी अधांतरी तरंगणे अशा कितीतरी गोष्टींनी विमाने व हेलिकॉप्टर्सच्या निर्मात्यांना प्रेरणा दिली आहे. जपानमधील बुलेटट्रेनचे डिझाईन अधिक कार्यक्षम करताना विविध पक्ष्यांच्या शरीररचनेच्या अभ्यासाचा झालेला उपयोग तर आपण मागच्या एका लेखात पाहिलाच आहे. पक्ष्यांची कवटी हासुद्धा संशोधांनाचा विषय आहे. ती वजनाने हलकी असली तरीही मजबूत असते. सुतारपक्ष्याचे उदाहरण तर आपल्याला ठाऊक आहेच. याच कवटीपासून प्रेरणा घेऊन मरीएका रास्मा नावाची डच महिला संशोधक व तिच्या चमूने बायकांच्या आवडत्या ‘हाय हिल’ चपलांच्या टाचा डिझाईन केल्या आहेत. इतरांनी तयार केलेल्या डिझाईनपेक्षा निसर्गातून काही प्रेरणा घेता येईल का या विचाराने तिने संशोधन केले व हलक्या तरीही मजबूत टाचा निर्माण करण्यात तिला यश आले. 

निसर्ग माणसापेक्षा पुष्कळ शहाणा आहे. फक्त त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास आणि वापर केला की ‘विन-विन’ सिच्युएशन कशी साध्य करता येऊ शकते याचीच ही काही उदाहरणे.

संबंधित बातम्या