खग मरणोत्सुक लक्ष

मकरंद केतकर
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

सहअस्तित्व

आसाममधल्या दिमा हासाओ जिल्ह्यात अतिशय दुर्गम अशा जतिंगा गावात अचानक आकाशातून पक्षी पडू लागले तेव्हा हा दैवी कोपच आहे अशी गावकऱ्यांची समजूत झाली. पण नंतर असे का होते याचा अभ्यास झाला आणि यामागे शास्त्रीय कारण असल्याचे सिद्ध झाले.

जागताच मंडूक कुंद आवसेच्या राती
अन वाहताच वारा धुंद झुलवित पाती
अद्‍भुत खेळास होई ग्राम जतिंगा साक्ष
वर्षावती जेव्हा खग मरणोत्सुक लक्ष

मला शंभर टक्के खात्री आहे मी लिहिलेल्या या चार ओळी वाचून तुम्हाला गहिवरून येईल आणि तुमच्या ओठांतून तेच तीन वेदकालीन शब्द सांडतील... ‘काही कळलं नाही’. पण पुढचे पाल्हाळ वाचून तुम्ही निश्चितच थक्क व्हाल. आपले ईशान्येकडील देशबांधव पाहुण्यांसाठी आतिथ्यशील आहेत, याबाबत कुणाचच दुमत नाही, पण तिथल्या एका गावात दारात आलेल्या पाहुण्यांना पान वाढण्याऐवजी त्यांनाच पानात वाढून घेतात हे थोडसे चक्रावणारे आहे.

आसाममधल्या दिमा हासाओ जिल्ह्यात अतिशय दुर्गम असे जतिंगा नावाचे दोन अडीच हजार माणसांचे एक गाव आहे. गाव तसे किती जुने आहे ठाऊक नाही, पण या घटनेची नोंद तशी अलीकडचीच. झाले असे, त्या वर्षी साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यातली ती कुठलीतरी एक अमावास्येची ढगाळ रात्र होती. दिवसभराची कामे आटपून सुस्तावलेल्या वस्तीवर दिवेलागण झाली आणि एक अद्‍भुत घटना घडली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक जिवंत पक्ष्यांचा पाऊस सुरू झाला. या घटनेकडे तेव्हा दैवी प्रकोप म्हणून जरी पाहिले गेले तरी हरीने खाटल्यावर आयत्या आणून दिलेल्या या पूर्णब्रह्माला फोडणी देण्याचे सत्कर्मही तत्काळ घडले हे सांगायला नकोच. त्यानंतर अनेक वेळा हा चमत्कार घडला परंतु त्याला जगासमोर आणण्याचे श्रेय जाते ते शस्त्राचा आधार न घेता शास्त्राचा आधार घेणाऱ्‍या ई.पी. गी नावाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञास. 

चहाच्या मळ्यांचे काम करणारे हे गृहस्थ १९५७ साली त्या गावात गेले आणि त्यांना या घटनेचा पत्ता लागला. याची नोंद त्यांनी त्याच साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या ‘वाईल्डलाईफ ऑफ इंडिया’ या पुस्तकात केली. पुढे १९६० साली ते भारताचे प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सालिम अलींना घेऊन या गावात आले आणि अभ्यासाअंती त्यांनी काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढले. उदाहरणार्थ, दिव्यांवर झेपावणाऱ्‍या पक्ष्यांमध्ये स्थलांतर करणारे पक्षी नसून सुमारे ४४ जातींचे स्थानिक पक्षीच आहेत. दीड किलोमीटर लांब आणि दोनशे मीटर रूंद असा हा पट्टा वगळला तर आसपास कुठे असे घडल्याची क्वचितच एखादी नोंद आढळते. तसेच ही घटना घडायला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. या दरम्यान वारा दक्षिणोत्तर वाहत असावा लागतो आणि तरी पक्षी मात्र वाऱ्‍याच्या विरुद्ध उत्तरेकडून दक्षिणेकडे उडत येतात. या माहितीच्या आधारावर भारताच्या ‘झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने १९७७ साली डॉ. सेनगुप्तांच्या मार्गदर्शनाखाली अधिक संशोधन करून हा चमत्कार आणि जतिंगा गावास वैश्विक प्रसिद्धी मिळवून दिली. 

त्यांच्या तर्कानुसार पावसाळ्यामुळे भूजलातील पाण्यामध्ये काही खास चुंबकीय बदल होत असावेत, ज्यामुळे पक्ष्यांच्या दिशा शोधण्याच्या प्रक्रियेत गडबड होऊन ते जमिनीकडे झेपावतात. यात त्यांनी अजून एक प्रयोग केला. काही पक्ष्यांच्या पाठीवर पितळ्याच्या पट्ट्या आणि काहींच्या पाठीला चुंबक लावले. स्वच्छ प्रकाशात दोन्ही पक्षी व्यवस्थित उडत होते. पण हवा ढगाळ होताच चुंबक लावलेले पक्षी वाट चुकलेले आढळले. अर्थात याबाबतीत अधिक संशोधन चालू आहे पण तर्क योग्य होता हे नक्की. थोडक्यात निष्कर्ष असा की रात्री प्रकाशाच्या दिशेने झेपावणारे पक्षी हे जीव देण्यासाठी झेपावत नसून केवळ स्थलदिक्कालाच्या संभ्रमामुळे त्या जागेवर येतात. 

पक्षी उजेडाकडे झेपावू लागतात तसे गावकरी गावकरी काठ्यांना कंदील लावून सज्ज होतात. उजेडाकडे जसे किडे आकर्षित होतात तसे हे पक्षी कंदिलांकडे झेपावतात. मग लाठ्या काठ्या घेऊन गावकरी त्यांना झोडपून मारून टाकतात. त्यांच्या मते या मागे अमानवी शक्तींचा हात असतो. त्यामुळे असे ‘अंगात आलेले’ पक्षी मारून टाकले जातात. पण तरी निसर्गसंवर्धन करणाऱ्‍या अनेक संस्थांनी या भागात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इथल्या अनेक ग्रामस्थांचे मतपरिवर्तन होऊ लागले आहे, त्यामुळे या हत्याकांडात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. 

ही घटना पहायला जगभरातून दोनशे ते तीनशे परदेशी पर्यटक या गावात येतात. गैरसमजापोटी स्थानिक आदिवासी लोक पक्ष्यांची हत्या करतात, हे एकवेळ समजून घेता येईल पण स्वतःला सुशिक्षीत म्हणवणाऱ्‍या माणसांनी हे केले तर काय म्हणावे? ही दुर्दैवी घटना म्हणजे २०१७ साली ब्राझीलमधून एक ‘फिल्ममेकर’ आला होता. त्याच्यासोबत एक भारतीय साहाय्यकही होता. या ब्राझीलच्या माणसाने या घटनेची डॉक्युमेंटरी करण्यासाठी गावातील तरुणांना पैशाचे लालूच दाखवून पक्ष्यांची हत्या करण्यास भाग पाडले असा तिथल्या जागृत स्थानिकांचा आक्षेप आहे. लोकांनी अनेक वर्षे मेहनत घेऊन केलेल्या जनजागृतीला तडा देणारी हो गोष्ट होती. पण जागृत वनखात्याने या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेऊन पुढील कारवाईस सुरुवात केली आणि एफआयआर दाखल करून घेतला.  

जगात मोजक्याच ठिकाणी घडणाऱ्‍या या अद्‍भुत घटना. खरेतर आपल्याकडे असलेला नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक. पण अनाकलनीय गोष्टींचे चमत्काराच्या भांडवलात रूपांतर करणे ही माणसाची पुरातन खोड आहे आणि या भांडवलावर चालणाऱ्‍या भोंदू साधूंच्या या धंद्यात हजारो पक्ष्यांना आजवर ‘उदरभरण नोहे तर दैवी प्रकोप समजून ‘जाणिजे यज्ञकर्मा’च्या भावनेने मोक्ष मिळाला आहे. याच्याचसोबत कधीकधी असे संधीसाधूही येतात. असो. पण अनेक पक्षीअभ्यासकांनी केलेल्या जनजागृतीच्या प्रयत्नांमुळे पक्षांच्या शिरच्छेदाचे प्रमाण निदान चाळीस टक्क्यांनी तरी कमी झाले आहे हेही नसे थोडके. ‘जाणिजे यज्ञकर्म’ कडून ‘जाणिजे पुण्यकर्म’कडे होणारा पक्ष्यांचा हा प्रवास नक्कीच सुखावह आहे. नाही का?

संबंधित बातम्या