कीटकांची कमाल

मकरंद केतकर
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

सहअस्तित्व

पैसा, मनोरंजन, अन्न आणि आरोग्य या मनुष्यविश्वातील काही मूलभूत गोष्टी. त्याच्यासाठी जगभर सदासर्वदा असंख्य प्रकारचे संशोधन आणि उलाढाली सुरू असतात. त्यानुसार या गोष्टींना मदत करणारे जीव ‘उपयुक्त’ आणि त्यांच्या आड येणारे ‘उपद्रवी’ अशी ठळक विभागणी केली जाते. मानवी महत्त्वाकांक्षांचा भार वाहणारे जे असंख्य जीव आहेत, त्यात कीटकसृष्टी फार मोलाची भूमिका बजावते. मनुष्याच्या दृष्टीआडच्या सृष्टीत वावरत राहून आपली नियतकर्म पार पाडणारे कीटक आपल्याला कल्पना येत नाही इतक्या विविध प्रकारे आपले जगणे सोपे करत असतात. म्हणून पुढच्या काही लेखांमधून कीटक मनुष्य संबंधांची माहिती घेणार आहोत. या विषयाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून त्याचे विहंगमावलोकन करणारा हा नमनाचा लेख. 

मनुष्य स्थिरस्थावर झाल्यावर आयुष्य अधिकाधिक सुखकर करण्यासाठी नवनवीन गोष्टी शोधू लागला. कालौघात वस्तूंची देवाणघेवाण मागे पडून चलन हे विनिमयाचे साधन झाले आणि त्याच्या निर्मिती व संग्रहासाठी असंख्य उद्योग जन्माला आले. यात सर्वात पहिला म्हणजे शेती. शेती म्हणजे अन्न आणि पैसा या दोन्हीचे उगमस्थान. त्याच्या निर्मितीसाठी लागणारे कष्ट, खर्च आणि उत्पन्न यांचे गणित पाहिले तर हा जवळपास निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून असलेला व्यवसाय आहे. यात निसर्गाची अवकृपा होणे म्हणजे पिकाला कीड लागणे. शेती हे मोनोकल्चर. एकसुरी वनस्पतींचा प्रदेश. त्यामुळे साहजिकच एकाच प्रकारच्या वनस्पतीला टार्गेट करणारी कीड मोठ्या प्रमाणात फोफावते आणि शेतीचे नुकसान होते. अनेकदा बाहेरून नुकसान दिसत नसले तरी शेंगांच्या किंवा फळांच्या आत कीड शिरलेली असते, ज्यामुळे विक्रीनंतर मालाबाबत तक्रारी येऊ लागतात. यामुळे याबाबतीत कीटक उपद्रवी ठरतात. पण इथेसुद्धा निसर्गच पुन्हा मदतीला येतो आणि या कीटकांवर गुजराण करणाऱ्‍या दुसऱ्‍या कीटकांच्या मदतीने शेतीचे रक्षण करण्यास मदत करतो. अशा उपयोगी कीटकांमध्ये मुंग्या, चतुर, बांडगुळी माश्या, बीटल्स, खंडोबाचा घोडा (प्रेइंग मँटीस) अशा अनेक प्रकारच्या कीटकांचा समावेश होतो. पण पुन्हा हे कीटक दृष्टीआडच्या सृष्टीतले जीव. 

शेतीला मोठ्या प्रमाणात थेट उपयुक्त ठरणारे कीटक म्हणजे मधमाश्या आणि तत्सम जीव, जे परागीभवनात मदत करतात. जगातील किमान पस्तीस टक्के खाद्यपिके बीज किंवा फलधारणेसाठी परागीभवन करणाऱ्‍या कीटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे जर कीटक नष्ट झाले तर खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन जगातील खूप मोठ्या लोकसंख्येवर उपासमारीची वेळ येईल, असा अनेक संशोधनांमधून निघालेला निष्कर्ष आहे. मधमाश्यांपासून मिळणारा मध आणि मेण हे प्रॉडक्ट्ससुद्धा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मधुमक्षिका पालन हासुद्धा शेतीचा जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवण्याचा उत्तम स्रोत आहे. 

शेतीमधून अन्नाशिवाय वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक असा कच्चा मालही निर्माण होतो. उदा. कापूस आणि रेशीम. यातले रेशीम फक्त कीटकांमुळेच निर्माण होते. हजारो वर्षांपासून वस्त्रनिर्मितीत रेशमाच्या किड्यांनी आपले योगदान दिले आहे. भारत तर उच्च दर्जाच्या रेशमी वस्त्रांसाठी अतिशय प्रसिद्ध होता. रेशमाइतकाच प्राचीन पदार्थ म्हणजे लाख. ही लाख निर्माण करणाऱ्‍या कीटकांनी स्वतःभोवती निर्माण केलेले संरक्षक कवच आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी ठरू शकते, हे हुशार माणसाच्या लक्षात आले आणि या पदार्थाची निर्मिती करणाऱ्‍या व्यवसायाची भरभराट झाली. लाखेचा वापर स्त्रियांची आभूषणे, खेळणी, रंग आणि अशाच अनेक उत्पादनांमध्ये होतो. लाख ज्वलनशील असल्यामुळे महाभारतात पांडवांबरोबर घातपात करण्यासाठी कौरवांनी तयार केलेले ‘लाक्षागृह’ आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. गेल्या शतका-दोन शतकात सिंथेटिक पदार्थांचा शोध लागला आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. 

व्यापारासाठी माणसांकडून मुद्दाम पाळला जाणारा अजून एक कीटक म्हणजे कोचीनील. जास्वंदीवर पिडणाऱ्‍या पिठ्या ढेकणासारखे हे कीटक दिसतात. मेक्सिकोमध्ये फडया निवडुंगावर वाढणाऱ्‍या या कीटकांच्या शरीरापासून लाल, केशरी किंवा नारंगी रंग मिळवला जातो. सदर रंगांचा वापर खाद्य पदार्थ तसेच वस्त्रोद्योगात केला जातो. कोणे एकेकाळी लाखेप्रमाणेच प्रचंड उलाढाल असलेल्या या उद्योगावर सिंथेटिक रंगांच्या व्यापाराने कुरघोडी केली आहे. 

 आरोग्य विभागातही कीटकांची कामगिरी लक्षवेधक आहे. प्राचीन आदिवासी संस्कृतींमध्ये जखमा शिवण्यासाठी मुंग्यांचा वापर केला जातो. म्हणजे टाके घालण्याऐवजी जखमेची दुभंगलेली त्वचा एकत्र आणून तोंडाला मोठे चिमटे असलेल्या मुंग्यांकरवी ती चिमट्यासारखी धरून ठेवली जाते. नंतर मुंग्यांचे उरलेले शरीर तोडून टाकले जाते आणि त्वचा जुळेपर्यंत डोके तसेच ठेवले जाते. अनेक देशांमध्ये ग्रीन बॉटल फ्लाय आणि ब्लॅक ब्लो फ्लाय या माश्यांच्या अळ्या जखमांवरच्या उपचारात वापरल्या जातात. ‘मॅगेट थेरपी’ या नावाने ही पद्धत ओळखली जाते. काही विशिष्ट कारणांमुळे जखम ओली राहत असेल तर या माश्यांच्या निर्जंतुक केलेल्या अळ्या जखमेत सोडल्या जातात. माश्‍या तिथला पू किंवा खराब होऊ लागलेले टिश्यू खाऊन जखम स्वच्छ करतात. आपल्याकडे जळू वापरतात साधारण तसेच. 

फॉरेन्सिक सायन्समध्ये प्राण्यापक्ष्यांचे सांगाडे जतन करण्यात माणसाला नकळत मदत करणारा ‘डर्मीस्टीड बीटल’ हा असाच एक मांसभक्षी कीटक आहे. मृतदेहांचे असे अवशेष ज्यांच्या स्वच्छतेसाठी अवजारे वापरल्याने पुरावा डॅमेज होऊ शकतो, तिथे या कीटकांकडून साफसफाई करून घेतली जाते. 

मनोरंजन, साहित्यनिर्मिती अशा क्षेत्रातही फुलपाखरे, रातकीडे, काजवे वगैरे कीटक अनेक कलावंतांना प्रेरणा देतात. पण कीटकांवर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले संशोधन म्हणजे अन्न म्हणून थेट कीटकांची शेती. अनेकांना हे पचनी पडणार नाही पण त्यामागचे लॉजिक आणि त्याची गरज याची माहिती आपण लेखमालेतील पुढील लेखांमधून वर उल्लेख केलेल्या इतर कीटकांच्या जोडीने घेणारच आहोत.               

संबंधित बातम्या