रेशमाच्या रेघांनी...

मकरंद केतकर
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

सहअस्तित्व

जगभरात गाण्यापासून खाण्यापर्यंत विविध संस्कृतींमधील जाणिवा आणि प्रेरणांना हळुवार गुंफणारा धागा म्हणजे रेशीम. गाण्यात ‘रेशमाच्या रेघांमुळे’ आणि खाण्यात ‘रेशमी कबाब’मुळे जी लाजवाब रंगत येते ती याच्याच शोधामुळे. आज आपण या अद्‍भुत गोष्टीची तलम कहाणी पाहणार आहोत. 

‘लेपिडॉप्टेरा’ म्हणजे खवलेसदृश पंख असलेल्या कुळातल्या कीटकापासून रेशमाच्या धाग्याचा उगम होतो. या कुळात पतंग आणि फुलपाखरे अशा दोन प्रकारच्या कीटकांचा समावेश होतो. या दोघांच्याही जन्माची सुरुवात अंड्यातून होते. त्यांच्या प्रजातीनुरूप आवश्यक पोषण देणाऱ्‍या वनस्पतीवर ही अंडी घातली जातात आणि मग त्यातून येणारे सुरवंट त्या वनस्पतीची पाने खाऊन स्वतःचे पोषण करतात. काही जातीच्या पतंगांचे सुरवंट तर चक्क शिकारही करतात. इथपर्यंत त्यांच्या जीवनचक्रात आपल्याला बहुतांश साम्य आढळते. जेव्हा रूपांतरणाच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी आवश्यक तितक्या पोषणाचा पुरेसा साठा त्यांच्या शरीरात जमतो, तेव्हा ते स्वतःला कठीण कवचात बंदिस्त करून घेतात. इथे आपल्याला फुलपाखरू आणि पतंग यांच्यातला एक महत्त्वाचा फरक दिसून येतो. सर्व फुलपाखरांचे सुरवंट मेटामॉर्फोसिस सुरू करण्यापूर्वी कात टाकतात. त्यांची नवीन त्वचा कडक होते आणि या कडक खोळीच्या आत सुरवंट रूपांतरणाची क्रिया पार पाडतात. पतंग म्हणजे मॉथ्स्‌मध्ये मात्र शेवटच्या टप्प्यात वैविध्य आढळते. त्यांच्या काही जाती तोंडात असलेल्या ग्रंथींद्वारे रेशमी धाग्याची म्हणजे सिल्कची निर्मिती करून स्वतःभोवती कोष विणतात आणि आतमधल्या जिवाचे रूपांतर घडते. फुलपाखरांचे सुरवंट जे तयार करतात त्याला ‘क्रायसिलीस’ असे म्हणतात. तर मॉथ्स्‌चे सुरवंट रेशमाच्या साहाय्याने जे विणतात त्यांना ‘कुकून’ म्हणतात. थोडक्यात म्हणजे फुलपाखरांच्या खोळीला आपण सर्वसामान्यपणे जरी ‘कोष’च म्हणत असलो तरी खऱ्‍या अर्थाने ते कोष नाहीत.

हा फरक चीनमध्ये साधारण इ.स.पूर्व अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी काही चौकस मनुष्यप्राण्यांच्या लक्षात आला आणि एका मोठ्या क्रांतीचा पाया रचला गेला. आपली गुपिते कडेकोट बंदोबस्तात ठेवण्याबाबतीत चीन त्या वेळेपासूनच प्रसिद्ध आहे. कारण कित्येक शतके या धाग्याच्या निर्मितीचे गुपित चीनपुरतेच मर्यादित होते. पुढे मग इ.स.पूर्व पहिले शतक संपताना या कापडाचा युरोपियन समूहांबरोबर व्यापार सुरू झाला आणि हिमालयातून जाणारा ऐतिहासिक ‘रेशम मार्ग’ अर्थात सिल्क रूट स्थापित झाला. हळूहळू या कापडाच्या निर्मितीची गुपिते चीनमधून बाहेर पडू लागली. हळूहळू ती जपानमध्ये पोहोचली आणि पहिल्या सहस्रकाच्या मध्यावर रोमन साम्राज्यातील लोकांनी या पतंगांची अंडी आणि एकूणच सगळ्या प्रक्रियेची पूर्ण माहिती प्राप्त केली. त्यांनी काही ख्रिस्ती धर्मसेवकांना चीनमध्ये पाठवले आणि बांबूंच्या डब्यांमधून त्यांनी रेशमाच्या पतंगांच्या अंड्यांची तस्करी केली. नंतर कधीतरी कोरिया आणि भारतातही या उद्योगाच्या ज्ञानाने हस्तांतरण झाले आणि चिन्यांचे गुपित पूर्णपणे संपले. 

रेशमाला एवढी प्रचंड मागणी येण्याचे कारण या धाग्याच्या रचनेत आहे. प्रोटीनपासून तयार झालेल्या या मऊसूत धाग्यामधल्या तंतूंची सूक्ष्म स्तरावर प्रिझमसारखी रचना असल्यामुळे त्यावर पडणाऱ्‍या प्रकाशाचे अपवर्तन (रिफ्रॅक्शन) होऊन वेगवेगळ्या अँगलमध्ये वेगवेगळे रंग दिसतात. चोखंदळ स्त्रीवर्गाच्या भाषेत ‘फिरते रंग’. सुरुवातीच्या काळात चीनमध्ये फक्त स्त्रियांनाच रेशीम निर्मितीची परवानगी होती. रेशमी कापडाचा वापर राजघराण्यांपुरताच सीमित होता. एवढेच नाही तर त्याच्या वापराच्या नियंत्रणासाठी कायदेसुद्धा निर्माण केले होते. अर्थात काळाच्या ओघात हळूहळू सर्वसामान्य लोकांपर्यंत रेशीम पोहोचलेच. याच रेशमापासून महागडा कागदसुद्धा तयार केला जायचा, ज्याचा उपयोग उच्चभ्रू आणि शाही व्यक्तींपुरताच मर्यादित होता. पुढे जसा हा उद्योग जगभर पसरला तसे विविध देशात अधिक प्रयोग आणि संशोधन होऊन सिल्कमध्ये प्रकार तयार झाले. भारतसुद्धा रेशमी कापडाच्या निर्मितीत अग्रेसर होता आणि इ.स.च्या दुसऱ्‍या शतकापासून भारतातून होणाऱ्‍या निर्यातीचे संदर्भ आढळून येतात. असे म्हणतात की चक्क काडेपेटीत मावेल इतकी तलम सिल्कची साडी भारतात तयार होत असे. याचा पुरावा म्हणजे आजच्या तेलंगणमध्ये असलेल्या सिरसीला गावातील विजय कुमार या विणकराने काडेपेटीत मावेल अशी सिल्कची साडी हातमागावर तयार केली होती. ती साडी २०१२ साली भरलेल्या जागतिक तेलगू कॉन्फरन्समध्ये ठेवली होती.

 रेशमी धागा परिधान करायला अतिशय सुखकर असला तरी त्याची निर्मिती जीवहत्येतूनच होते. ‘बाँबिक्स मोरी’ नामक जातीचे पतंग या प्रक्रियेसाठी वापरले जातात. समागमानंतर मादी तुतीच्या पानांवर तीनशे ते चारशे अंडी घालते. साधारण दहा दिवसांनी त्यातून सुरवंट जन्माला येतात आणि महिनाभर ते तुतीची पाने खात वाढत राहतात. या दरम्यान चार वेळा कातही टाकतात. वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आल्यावर ते तोंडातून निघणाऱ्‍या धाग्यापासून स्वतःभोवती कोष विणू लागतात. ही प्रक्रिया तीन दिवस चालते. बाहेर आलेला हा ओलसर धागा वाळून लगेच कडक होतो. कोषात गेलेल्या सुरवंटांना जर पूर्ण वाढू दिले तर ते कोष तोडून बाहेर येतात व अखंड धागा मिळत नाही. म्हणून हे कोष गोळा करून उकळत्या पाण्यात टाकले जातात आणि नंतर बाहेर काढलेल्या कोषाचे टोक शोधून अखंड धागा सोडवून काढला जातो. अर्थात काही कोष नवनिर्मितीसाठी तसेच ठेवले जातात. कोषातून बाहेर आलेल्या या पतंगांचे आयुष्य जेमतेम दोन तीन दिवसांचे असते. त्यांना तोंड नसल्याने अन्नग्रहण न करता फक्त समागम करून ते मरण पावतात. गंमत म्हणजे हजारो वर्षांच्या प्रयोगांमुळे हे पतंग आता त्यांच्या विविध नैसर्गिक क्षमता गमावून पूर्णपणे माणसांवर अवलंबून झाले आहेत. व्यापाराच्या इतिहासात इतके महत्त्वाचे योगदान देणाऱ्‍या या पतंगांसाठी एक सॅल्युट तो बनता है!

संबंधित बातम्या