त्या किड्यांच्या रंगकोषी...

मकरंद केतकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

सहअस्तित्व

मानवी संस्कृतीच्या इतिहासात ‘व्यापार’ ही अशी एक गोष्ट जन्माला आली, जिच्यामुळे अनेक प्रदेशांची सांस्कृतिक, भौगोलिक आणि जैविक जडणघडण एकतर साफ बदलून गेली किंवा त्यावर मोठा प्रभाव तरी पडला. एखादी गोष्ट लोकांच्या उपयोगी पडू शकते व ती देण्याच्या बदल्यात आपल्याला मोल मिळू शकते या कल्पनेने प्रेरित होऊन हजारो वर्षांत असंख्य उलथापालथी झालेल्या आहेत आणि त्यामुळे विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित असलेली एखादी गोष्ट जगभर वापरली जाऊ लागली. याचे एक उदाहरण म्हणजे मेक्सिकोमधील ‘कोचिनियल डाय’. 

फार पूर्वीपासून माणूस रंगांच्या प्रेमात पडलेला आपल्याला दिसतो. मग त्या प्राचीन गुहांमधील ओबडधोबड आकृत्या असोत किंवा बौद्ध लेण्यांमधील सुंदर रंगीत चित्रे; प्रत्येक ठिकाणी रंगांचा वापर झालेला दिसतो. तसेच कापड रंगवणे, खाद्यपदार्थांना रंग देणे यासाठीसुद्धा विविध रंगांचे उत्पादन पूर्वापार घेतले जात आहे. हे रंग प्रामुख्याने वनस्पती आणि इतर अजैविक घटकांपासून तयार केले जातात. पण मेक्सिको आणि त्याच्या आसपासच्या काही देशांमध्ये कीटकांपासून विशिष्ट रंगनिर्मिती केली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रंग खाद्य आणि अखाद्य अशा दोन्ही वापरांसाठी उपयोगात येतात. याच्या निर्मितीचा नेमका उगम कधी झाला याबाबत फारशी माहिती नसली, तरी पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला या रंगाची ख्याती युरोपात पोहोचल्याच्या नोंदी आहेत. कसे? अर्थातच स्पॅनिश व्यापाऱ्‍यांकडून. 

युरोपियन वसाहतवादी संस्कृतीनुसार सुरुवातीला व्यापाराच्या निमित्ताने त्या प्रदेशात स्पॅनिश लोकांचा शिरकाव झाला आणि पुढे ‘हर्नन कोर्टेस’ नावाच्या स्पॅनिश आक्रमकाने सोळाव्या शतकात तिथल्या ‘एझटेक’ साम्राज्याचा पाडाव करून सत्ता काबीज केली. तोपर्यंत अदबीने चालणारा कोचिनियल रंगांचा व्यापार आता हुकूमशाहीने होऊ लागला. या रंगाच्या निर्मितीसाठी दोन मुख्य गोष्टींची आवश्यकता असते. ‘डॅक्टिलोपीस कॉकस’ नावाचे खवले किडे आणि ‘ओपुंशिया फायकस इंडिका’ नावाचा फड्या निवडुंग. हे कीटक या निवडुंगाचा रस पिऊन जगतात. त्यांच्या मादीला पंख नसतात, पण नराला असतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर नर जेमतेम आठवडाभर जगतो. या काळात तो मादीच्या शोधात असतो व पुढे समागमानंतर तो मरून जातो. तर मादी निवडुंगावर स्वतःला जखडून टाकते. अशी अचल झालेली मादी एकीकडे रसपान करत असताना दुसरीकडे तिच्या शरीरातून विशिष्ट द्रव्य स्रवत राहते, ज्याच्या कोटिंगमुळे तिच्या शरीरातून पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. याच दरम्यान ती अंडीसुद्धा घालते. त्यातून बाहेर आलेली पिल्ले तिच्या अवतीभोवतीच राहून रसपान करत राहतात. साधारण नव्वद दिवसांचे आयुष्य जगल्यानंतर मादी प्राणत्याग करते. पण त्याच्या थोडे आधीच या माद्यांना गोळा करून उन्हात वाळवले जाते. त्यांच्या शरीरात ‘कार्मीनिक’ नावाचे अ‍ॅसिड असते. त्याचा उपयोग या कीटकांना शत्रूपासून संरक्षणासाठी होत असला, तरी आपल्याला त्यापासून लाल रंगाच्या विविध छटा असलेले रंग तयार करता येतात. 

या रंगांचे उत्पादन घेणारे शेतकरी, अधिक प्रभावी उत्पादन घेण्याकरिता बोटभर लांबीच्या पिशव्यांमध्ये गर्भार माद्या एकत्र करून त्या पिशव्या निवडुंगांवर ठेवून देतात. त्यातून बाहेर येऊन त्यांची निवडुंगावर लागण होते. या कीटकांना इतर परजीवी कीटक तसेच पक्षी व कीटकनाशकांपासून जपावे लागते. सुरक्षित वातावरणात रस पिऊन पिऊन त्यांचा आकार वाढत जातो व योग्य वेळी लांब दांड्याच्या चमच्याने अगदी नाजूक हातांनी त्यांना निवडुंगावरून काढले जाते. हे अतिशय कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. साधारण एक लाख मृत कीटक गोळा केले की जेमतेम एक किलो रंग मिळतो. कीटकांपासून रंग मिळवण्यासाठी त्यांच्या वाळवलेल्या देहांना कुटले जाते व वजनाच्या विशिष्ट प्रमाणात घेतलेल्या पाण्यात मिसळून गाळले जाते. मग तो रंग घट्ट करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम व कॅल्शियमच्या क्षारांची द्रावणे त्यात मिसळून मिश्रण उकळले जाते आणि परत एकदा सगळा द्राव गाळून अर्क गोळा केला जातो. 

सुरुवातीला उच्चभ्रू लोकांपुरता मर्यादित असलेल्या या पदार्थाचा व्यापार कालांतराने मध्ययुगात इतका शिगेला पोहोचला की मेक्सिकोमधून चांदीनंतर निर्यात होणारे दुसऱ्‍या क्रमांकाचे उत्पादन हे वाळवलेले कीटक होते. हे उत्पादन फक्त उष्ण आणि रूक्ष प्रदेशातच होत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील इथिओपिया या देशांमध्ये या रंगांच्या निर्मितीचे प्रयोग केले गेले. परंतु तिथले हवामान या कीटकांना न मानवल्याने या प्रयोगांना तिथे फारसे यश आले नाही. उलट ऑस्ट्रेलियात या निवडुंगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन त्याचे निर्मूलन करणे ही तिथल्या सरकारांसाठी मोठी डोकेदुखी झाली. पुढे सिंथेटिक रंगांचा शोध लागला आणि या व्यापाराला उतरती कळा आली. पण तरीसुद्धा आजही पेरू, मेक्सिको या देशांमधून या रंगाचे शेकडो टन उत्पादन घेतले जाते. त्यासाठी जवळपास पन्नास ते साठ अब्ज कीटक दरवर्षी गोळा करून वाळवून चुरडले जातात. नैसर्गिक रंगासाठी आग्रही असलेल्या ग्राहकांमुळे हा व्यापार आजही टिकून आहे. 

या रंगांचा वापर वर म्हटल्याप्रमाणे खाद्यपदार्थ, औषधे तसेच वस्त्रोद्योगात केला जातो. या रंगांचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम कापडापेक्षा लोकर, रेशीम यांसारख्या जैविक धाग्यांवर हे रंग अधिक पक्के बसतात. फ्रान्स, जपान हे देश या रंगांचे फार मोठे आयातदार आहेत. जगात अनेक देशांमध्ये या रंगांचा वापर केलेल्या उत्पादनांवर तसे स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. कारण काही जणांना या रंगांमुळे अ‍ॅलर्जी येऊ शकते. भारतात खाद्योत्पादनांमध्ये या रंगांच्या वापरावर बंदी आहे. मात्र औषधांमध्ये रंग देण्यासाठी त्याच्या वापराला परवानगी आहे. भारतात हा रंग फारसा जम बसवू शकला नसला, तरी याच कीटकाच्या एका भाऊबंदाने वेगळ्या प्रकारे इथल्या व्यापाराला फार मोठी चालना दिली. त्याविषयी अधिक पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या