‘लाख’मोलाची गोष्ट

मकरंद केतकर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

सहअस्तित्व
 

मागच्या लेखात आपण पाहिले की हुशार माणसे कशी संधी शोधून व्यापार निर्माण करतात. तसे नसते तर निवडुंगावर वाढणारे इवलेसे कीटक व त्यांच्यातून निर्माण होणारा रंग जगाच्या कोपऱ्‍यातच सीमित राहिला असता. याच कीटकांच्या कुळातील एक कीटक भारतात फार प्राचीन काळापासून आपल्या गुणांमुळे स्वतःची महती राखून आहे. 

प्राचीन म्हणजे किती जुन्या, तर महाभारतात पांडवांना जाळून मारण्याच्या कौरवांच्या कारस्थानात एका कीटकाने निर्माण केलेल्या रेझीनचा वापर करण्यात आला होता. लाक्षागृहाचा प्रसंग आठवतोय तुम्हाला? लाखेला संस्कृतमध्ये ‘लाक्षा’ म्हणतात. याचा उगम लक्ष या शब्दापासून झालेला आहे. अक्षरशः लक्षावधी कीटकांनी निर्माण केलेले रेझीन गोळा होते, तेव्हा कुठे किलोभर लाख मिळते. 

‘लॅसिफर लॅक्का’ असे शास्त्रीय नाव असलेले हे कीटक, स्केल बग्स म्हणजेच खवले कीटक यांच्या कुळातले आहेत. जेमतेम ४-५ मिलिमीटर लांबीची लाखेच्या कीटकाची मादी कुसुम, पळस, बोर अशा विविध झाडांवर दोनशे ते पाचशे अंडी घालते. लाख उत्पादक अशी अंडी असलेल्या काड्या तोडून त्या आपल्या नियोजित प्रकल्पातील झाडांवर बांधून ठेवतात. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले ताबडतोब कोवळ्या फांद्या शोधून, त्यात सोंड खुपसून त्यांचे रसपान करू लागतात. एक चौरस इंच एवढ्या क्षेत्रफळात दोनशे ते तीनशे पिल्ले एकत्र येऊन रसपान करतात. या दरम्यान स्वसंरक्षणासाठी त्यांच्या शरीरातून चिकट स्राव बाहेर पडत राहतो व हवेशी संपर्क आल्यावर हा स्राव कडक होतो. हीच ती लाख. 

रेझीन, मेण, रंग अशा विविध घटकांचा समावेश असलेल्या या थरांचे कडक आवरण तयार होते व त्याच्या आत कात टाकत टाकत साधारण दोन महिन्यांनी ही पिल्ले प्रौढ होतात. मागच्या लेखाचा विषय असलेल्या रक्तरंगी कोचिनियल कीटकांप्रमाणेच याही कीटकांची मादी नरापेक्षा मोठी आणि अचल असते. तिला पंख, डोळे आणि पाय नसतात. मादी एकदा खोडाला चिकटली की परत तिथून हलत नसल्याने तिचे हे अवयव विकसित होत नाहीत. नराला मात्र पंख असतात. तो त्याच्या कडक डबीतून बाहेर आल्यावर मादीच्या शोधात उरलेल्या डब्यांवरून फिरत राहतो आणि मादी असलेल्या डबीत शिरून समागम करतो. एक नर अनेक माद्यांबरोबर समागम करू शकतो. मात्र त्याचे आयुष्य अल्प असल्याने लवकरच तो मरतो. पुढे मग फलन झालेली मादी आतल्या आतच वाढत राहते आणि पोटातल्या अंड्यांना पोषण मिळावे म्हणून अधिक वेगाने रसपान करीत राहते. तिचे आयुष्य साधारण सहा महिन्यांचे असते. जातीप्रजातींमधील फरकानुसार ते थोडे कमी अधिक होऊ शकते. अशा अनेक माद्या शेजारी शेजारी असल्यामुळे त्यांच्या शरीरावरील आवरणांचा एक सलग थर तयार होतो. साधारण तीन सव्वातीन महिन्यांनंतर मादी आकाराने आक्रसते आणि आतच अंडी घालते. पुढे आठवड्याभरात त्यातून पिल्ले बाहेर येतात. यानंतर लाख गोळा केली जाते. 

आता यामध्येही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पळसावर तयार होणारी लाख; ज्यात पिल्ले बाहेर येण्याच्या सुमारास लाख उत्पादक लाखेचे थर असलेल्या काही फांद्या तशाच ठेवून उर्वरित फांद्या छाटतात. तर कुसुम, बोर, खैर या झाडांवर तयार होणारी लाख गोळा करण्यापूर्वी पिल्लांना कोषातून बाहेर येऊ दिले जाते आणि मगच फांद्या छाटल्या जातात. तशा शंभराहून अधिक जातीच्या झाडांवर लाखेची पैदास होऊ शकते, परंतु वर उल्लेखलेली झाडे अधिक उत्पादन मिळवून देतात. त्यातही कुसुमावरील लाखेला अधिक भाव आहे आणि ती ‘कुसुमी लाख’ म्हणून ओळखली जाते. यानंतर छाटलेल्या फांद्यांवरून लाख खरवडून काढली जाते आणि चांगली वाळवली जाते. वाळलेली लाख स्वच्छ धुतली जाते, त्यामुळे आतल्या कीटकांची कलेवरे, धूळ आणि इतर अशुद्धी निघून जाते. 

लाखेच्या कीटकांच्या शरीरातून कोचिनियल कीटकांसारखाच लाल रंग मिळतो. त्याला ‘लाख डाय’ म्हणून ओळखले जाते व त्याचा वेगळा वापर केला जातो. अशा प्रकारे जवळपास पूर्णपणे स्वच्छ झालेल्या लाखेला ‘सीड लाख’ असे म्हटले जाते. ती बाजारात विक्रीला पाठवली जाते. ही लाख विकत घेणारे यानंतर या लाखेची ‘शेलॅक’ नावाची अंतिम लाख करतात. याच्याही तीन पद्धती आहेत. त्यामध्ये एका पद्धतीत कापडाच्या पिशवीत लाख भरून तिला भट्टीची उष्णता देतात आणि वितळवून मऊ करतात. अशी मऊ लाख पिशवीतून काढून तिच्या पातळ पट्ट्या तयार केल्या जातात. इतर पद्धतीत वापरानुसार वाफेवर वितळवणे  आणि रसायनात विरघळवणे या पद्धती वापरल्या जातात. 

लाखेचा रंग वस्त्रोद्योगात वापरला जातो. लाखेतून मिळणारे मेण बूट पॉलिश, खाद्यउद्योग, लिपस्टिक, रंगाचे खडू यात वापरले जाते. शेलॅकचा वापर तर तब्बल शंभराहून अधिक उद्योगांमध्ये केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे शेलॅक बिनविषारी, नैसर्गिक, निरुपद्रवी आणि खाद्य स्वरूपाचे रेझीन आहे. उष्णता दिल्यावर साठ-सत्तर डिग्रीला ते मऊ होते आणि नव्वद अंश तापमानाला पूर्णपणे वितळते. शेलॅक पाण्यात विरघळत नाही, मात्र अल्कोहोल आणि इतर काही जैविक रसायनांमध्ये ते विरघळते. भारतात मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश अशी अनेक राज्ये लाखेचे उत्पादन घेतात. राजस्थानात तयार होणाऱ्या लाखेच्या बांगड्या आणि शोभेच्या वस्तू तर खूपच प्रसिद्ध आहेत. जप्तीच्या टाळ्यांवर लावली जाणारी सरकारी सीलसुद्धा लाख वितळवूनच त्यावर ठोकली जातात. प्लॅस्टिक आणि इतर सिंथेटिक गोष्टींनी या उद्योगाला उतरती कळा आणली आहे. पण तरीसुद्धा नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादनांबाबत वाढत असलेली जागरूकता, भारतात वार्षिक वीस हजार टनांची उलाढाल करणाऱ्‍या या उद्योगाची आशा अजूनही टिकवून आहे.

संबंधित बातम्या