बॅकफायर

मकरंद केतकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

सहअस्तित्व

मधमाश्यांचा स्टार परफॉर्मन्स आणि व्यापारी महत्तेमुळे त्यांच्या सूक्ष्मस्तरावरील उपद्रवाची दखल घेतली जात नाही. 

एकदा का व्यापारीदृष्ट्या एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यासाठी निर्मितीच्या प्रक्रियेत नवनवीन शोध लावून कमी श्रमात आणि गुंतवणुकीत अधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयोग केले जातात. या प्रयोगांचा आणि त्यातून होणाऱ्‍या नवनिर्मितीचा दूरगामी परिणाम तपासला गेला नसेल किंवा तपासून मिळालेल्या निष्कर्षांनुसार आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था निर्माण केल्या नसतील, तर परिस्थिती बघता बघता हाताबाहेर जाऊ शकते. ही नवनिर्मिती जर सजीव नैसर्गिक गोष्टींची असेल तर गुंतागुंत वाढते, कारण सजीवसृष्टीत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता असते. त्यामुळे अधिक उत्पादन देणारी एखादी वनस्पती किंवा प्राणी हा व्यापाराच्या दृष्टीने जरी वरदान असला, तरी त्याच्यावर नियंत्रण राखता न आल्यास तो प्रयोग आपल्यावरच ‘बॅकफायर’ होऊ शकतो आणि फक्त माणसांनाच नाही, तर इतर सजीव-निर्जीव सृष्टीलाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. आजच्या लेखाचा विषय असलेल्या मधमाश्या हा असाच ‘बॅकफायर’ झालेला प्रयोग आहे.

मधमाश्या म्हणजे परागीभवनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. तसे तर असंख्य कीटक मधमाश्यांइतकेच परागीभवनाचे काम करत असतात. परंतु मधमाश्या मध गोळा करत असल्याने आपल्या नजरेत त्या सेलिब्रिटी झाल्या आणि त्यांची व्यापारी उपयुक्तता वाढली. व्यापाराच्या सहजभावानुसार एखाद्या गोष्टीची कमर्शियल व्हॅल्यू वाढली की निर्मिती किंवा आयात खर्च टाळण्यासाठी त्या वस्तूचे उत्पादन आपल्या भूभागात घेण्याचे प्रयत्न सुरू होतात. जसा ब्रिटिशांनी जगभर जे जे पिकते ते ते सगळे आपल्या भूमीत नेऊन पिकवायचा प्रयत्न केला. अमेरिकेत घुसखोरी केलेल्या मूळच्या ब्रिटिश आणि इतर युरोपियन लोकांनी मधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सतराव्या शतकात युरोपमधून उत्तर अमेरिका खंडात मधमाश्या (एपिस मिलिफेरा) आणल्या. मुळात उत्तर अमेरिकेत मधमाश्याच नव्हत्या. त्यामुळे वरकरणी पाहिले तर इतर कीटकांमध्ये हा अजून एक कीटक असाच विचार कोणाच्याही डोक्यात येईल. पण सूक्ष्मस्तरावर त्याचे इतर कीटकांवर होणारे दुष्परिणाम पाहायला मिळतात. 

अभ्यासकांच्या निरीक्षणांनुसार या उपऱ्‍या कीटकांमुळे सर्वात आधी उपलब्ध अन्नात वाटेकरी निर्माण होतात. अनेक स्थानिक कीटक एकांडे असतात. त्यांची संख्याही कमी असते. त्या तुलनेत मधमाश्यांसारखे संख्येने प्रचंड असलेले कीटक वेगाने उपलब्ध अन्न संपवतात. अनेकदा विशिष्ट हंगामात अशा वनस्पती फुलतात की ज्यांचे परागीभवन फक्त हे विशिष्ट कीटकच करू शकतात. परंतु त्या फुलण्याआधी या कीटकांना इतर वनस्पतींमधून पुरेसे अन्न उपलब्ध न झाल्यास त्यांच्या संख्येवर परिणाम होतो. याशिवाय दुसरा धोका म्हणजे, असे इतर प्रदेशातून आलेले घुसखोर कीटक आपल्यासोबत त्या प्रदेशातले रोगजंतूही घेऊन येतात आणि त्यांचा प्रसार स्थानिक कीटकांमध्ये होतो. 

स्थानिक परिसंस्थेसाठी माणसाकडून निर्माण होणारा अजून एक धोका म्हणजे मधमाश्यांना आवडणाऱ्‍या वनस्पतींची मुद्दाम लागवड केली जाते, ज्यामुळे स्थानिक वनस्पतींवर या वनस्पती वरचढ होतात. त्यातही जर या वनस्पती मधमाश्यांच्याच मूळ प्रदेशातील असतील तर त्या तण होऊन फोफावण्याचा धोका निर्माण होतो. मधमाश्यांचा स्टार परफॉर्मन्स आणि व्यापारी महत्तेमुळे त्यांच्या सूक्ष्मस्तरावरील उपद्रवाची दखल घेतली जात नाही. परंतु या विषयावर अमेरिकेत जागरूकता निर्माण होऊन अधिक अभ्यास सुरू आहे.

पण हे सगळे ‘वीट’ वाटावे इतका ‘दगडा’सारखा दुसरा मोठा धोका मधमाश्यांवर केलेल्या प्रयोगांमधून निर्माण झालेला आहे. साठच्या दशकात ब्राझीलमध्ये उष्ण हवामानात अधिक मध गोळा करू शकणाऱ्‍या मधमाश्यांच्या निर्मितीचे प्रयोग सुरू होते. यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून स्थानिक मधमाश्या प्रयोगशाळेत आणून त्यांचा संकर युरोपियन प्रजातीबरोबर करण्यात आला. युरोपियन माश्यांची क्षमता आणि आफ्रिकन माश्यांचा चिवटपणा असा संकर घडवण्याचा मूळ हेतू होता. मात्र संकरातून जन्मलेल्या या नवीन माश्यांनी चिवटपणासोबत आफ्रिकन प्रजातीमधील तिखट स्वभावही उचलला आणि त्यातून एक राक्षस निर्माण झाला. बंदिस्त वातावरण असलेल्या प्रयोगशाळेतून दुर्दैवाने काही पोळ्यांमधील अशा आक्रमक माश्या मुक्त झाल्या आणि जशी त्यांची संख्या वाढली, तशी त्या जिथे वसल्या तिथे त्यांच्या आक्रमक स्वभावाचा प्रत्यय हळूहळू येऊ लागला. सहसा कुठल्याही पोळ्यातील दहा ते वीस टक्केच माश्या पोळ्याच्या रक्षणार्थ हल्ला करतात. पण या नवीन माश्यांमध्ये हे प्रमाण ऐंशी टक्के आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात डंख बसून मृत्यू ओढवतो. या माश्यांमुळे आजवर एक हजारपेक्षा अधिक माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत, तर त्याहून अधिक लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. सुरुवातीला ब्राझीलपुरत्याच मर्यादित असलेल्या या माश्या पुढच्या तीन दशकांत मेक्सिकोमार्गे अमेरिकेत शिरून आसपासच्या राज्यांमध्ये स्थिरावल्या आहेत. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांना ‘किलर बीज्’ या नावाने ओळखले जाते.

माणसाचा आणि मधाचा मधुर संबंध फार प्राचीन आहे. उत्खननात सापडलेल्या पुराव्यांनुसार माणूस किमान दहा हजार वर्षांपासून मध गोळा करत आहे. जॉर्जिया देशात एका पाइपलाइनचे काम सुरू असताना सापडलेल्या एका प्राचीन थडग्यात मधाने भरलेली काही भांडी सापडली. अभ्यासाअंती ती तब्बल साडेपाच हजार वर्षे जुनी असल्याचे आढळले. आश्चर्य म्हणजे तो मध अजिबात खराब झालेला नव्हता. इजिप्तमधील पिरॅमिड्समधूनही असाच हजारो वर्षे जुना मध मिळाला आहे. इजिप्तमध्ये तर मधुमक्षिकापालनाचे साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे लिखित पुरावे सापडले आहेत. यावरून मध गोळा करून साठवणे ही प्राचीन कला असल्याचे सिद्ध होते. २०१९मधील रिपोर्टनुसार मधाचे जागतिक उत्पन्न दोन कोटी मेट्रिक टन इतके प्रचंड होते. आपल्या पूर्वजांनी मधनिर्मितीची शाश्वत पद्धत स्वीकारून निसर्गाचा समतोल राखला. त्यामुळे आजची आपली मधनिर्मितीची पद्धत स्थानिक पर्यावरणासाठी गोड की कडू हे येणारा काळच ठरवेल.

संबंधित बातम्या