हाडाचे कामसू

मकरंद केतकर
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

सहअस्तित्व

मला कधीकधी वाटते की आपण ‘प्राण्यांना वापरून घेतो’ म्हणून उगाचच माणसांना दोष देतो. पण निसर्गात डोकावून पाहिले तर अनेक जिवांच्या अशा जोड्या दिसतात, की ज्यात एकाने आपला कार्यभाग साधायला दुसऱ्‍या जिवाला लालूच दाखवून कामाला लावले आहे. आज ज्या जीवांच्या वापराबद्दल लिहितोय त्यात त्या जिवांचे पालनपोषण होईल व आपले कामही होईल असा दुहेरी हेतू साध्य केलेला आढळतो. 

लाकूड मऊ व्हायला मदत व्हावी म्हणून वाळवीच्या काही जाती चक्क बुरशीची शेती करतात. बुरशीने सोडलेल्या स्रावांमुळे लाकडातील कठीण पेशी मऊ होतात. त्यामुळे वाळवी ते लाकूड सहज खाऊ शकते. काही फुलपाखरांचे सुरवंट किंवा प्लान्ट हॉपर नावाचे कीटक ठरावीक काळाने शरीरातून गोडसर द्राव सोडतात, ज्यामुळे त्यांच्याकडे मुंग्या आकर्षित होतात व तो द्राव पीत त्यांचे रक्षण करतात. त्या जिवांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी मुंग्यांना दिलेला हा एक प्रकारचा मोबदलाच आहे. मग माणसांनीच प्राण्यांचा वापर केला, तर बिघडले कुठे नाही का? बिघडते तेव्हा जेव्हा त्याचा निसर्गातील सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. 

पण आज ज्या जीवांच्या वापराबद्दल लिहितोय त्यात त्या जिवांचे पालनपोषण होईल व आपले कामही होईल असा दुहेरी हेतू साध्य केलेला आढळतो. सदर जीव बीटल वर्गातील कीटक असून त्यांना ‘फ्लेश इटिंग बीटल्स’ किंवा वैज्ञानिक भाषेत ‘डर्मीस्टीड बीटल्स’ असे म्हणतात. यांचे काम म्हणजे माणसाने ऑफर केलेल्या कलेवराचे मांस खाऊन फक्त अस्थिपंजर शिल्लक ठेवणे. निसर्गात एखादा जीव मरतो तेव्हा त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारी अतिशय सुंदर साखळी तत्काळ कार्यरत होते. त्या प्राण्याची दडदडीत त्वचा भेदणे ते हाडाला चिकटलेला मांसाचा शेवटचा कण खाईपर्यंत वाघापासून मुंग्यांपर्यंत (होय वाघसुद्धा मेलेले प्राणी खातो) विविध जीव यथाशक्ती आपले योगदान देतात व त्या कलेवराचे पूर्णपणे विघटन करून टाकतात. या प्रक्रियेत हे मांसभक्षी बीटल्ससुद्धा आपले काम अतिशय चोखपणे पार पाडतात आणि म्हणून त्यांच्या या क्षमतेचा वापर माणसाने अभ्यासासाठी प्राण्यांचे सांगाडे जतन करण्यासाठी केला आहे. 

या वापराची नक्की सुरुवात कधी झाली हे ठाऊक नाही. पण उपलब्ध साधनांनुसार सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी या बीटल्सचा प्रयोग केलेला आढळतो. पूर्वी काय व्हायचे, एखाद्या नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये अभ्यासासाठी एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा स्पेसीमेन आला की गरजेनुसार एकतर त्यात भुसा भरून टॅक्सीडर्मी केली जायची किंवा मग सांगाडा हवा असेल तर कुजवणे, उकळवणे अशा विविध किचकट पद्धतींनी मांसापासून हाडे वेगळी केली जात असत. तसेच हत्यारांच्या साहाय्यानेसुद्धा हे काम केले जात असे. परंतु यात अनेकदा हाडे खराब होत. म्हणून हे काम करण्यासाठी अधिक प्रभावी पद्धतीच्या गरजेतून या बीटल्सच्या वापराचा शोध लागला. 

या पद्धतीचा फायदा असा, की अतिशय नाजूक पद्धतीने यांचे सुरवंट अलगदपणे हाडावरचे मांस खाऊन फस्त करतात व मागे जवळपास पूर्णपणे स्वच्छ असा सांगाडा उरतो. विशेष करून अतिशय लहान प्राणी ज्यांची काही हाडे फारच लहान असतात व हत्याराने स्वच्छ करताना त्यांना इजा पोहोचू शकते अशी हाडे अलगदपणे स्वच्छ होतात. पण फक्त अभ्यासाकरिता सांगाडे जतन करण्यासाठीच नाही, तर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यजीव हत्येच्या एखाद्या गुन्ह्याच्या तपासातसुद्धा हाडांवर असलेले शस्त्राचे घाव तपासण्यापूर्वी या बीटल्सकरवी ती हाडे साफसूफ करून घेतली जातात. 

या बीटल्सचे आयुष्य साधारण सहा महिन्यांचे असते. ही प्रक्रिया अमलात आणण्यासाठी आधी एक झाकण असलेली पेटी करून त्यात काही असले मांसभक्षी बीटल्स सोडले जातात. ज्या प्राण्याचे कलेवर स्वच्छ करायचे आहे, त्याच्या शरीरातील अंतर्गत अवयव काढून टाकून कलेवर सुकवतात आणि मग ते या पेटीत ठेवतात. असे कलेवर साफ करण्यात प्रौढांपेक्षा त्यांच्या अळ्यांचा वेग अधिक असतो. पेटीत ठेवलेल्या कलेवरावर मादी बीटल शंभर किंवा अधिक अंडी घालते आणि अंडी घातल्यावर मरून जाते. साधारण चार दिवसांनी अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्या अतिशय वेगाने उदरभरणाच्या कामाला लागतात आणि पाहता पाहता शास्त्रज्ञांना अपेक्षित असलेला परिणाम दिसू लागतो. उंदराएवढा प्राणी असेल तर एका दिवसात आणि कोंबडीएवढा पक्षी असेल तर दोन ते तीन दिवसात सर्व काही सफाचट होऊन मागे फक्त हाडे उरतात. यानंतर ती अलगदपणे गोळा करून त्यांना गोठवले जाते जेणेकरून अवशेषांमध्ये बीटल्स असतील तर ते मरून जातात. यानंतर त्यांच्यावर अमोनिया आणि इतर रसायनांमध्ये बुडवून उर्वरित प्रक्रिया केली जाते. उरलेसुरले सूक्ष्म मांसकण सूक्ष्मदर्शकाखाली तपासून स्वच्छ केले जातात आणि मग हाडांची पुन्हा जुळवाजुळव करून त्या सांगाड्याची रवानगी सांगाडा संग्रहालयात केली जाते. 

या बीट्ल्सची कॉलनी पेटीत एकदा का तयार झाली की मग साधारणपणे पाचेक वर्षे तरी काही बघावे लागत नाही. त्या पेटीतच नवे जीव जन्माला येतात व त्यातच त्यांची विष्ठा, कलेवरे वगैरे साचत राहते. शेवटी जेव्हा ठरावीक मर्यादेपर्यंत हे वाढते, तेव्हा त्यांचे खाद्य बंद करून कॉलनी नष्ट केली जाते व साफसफाई करून पुन्हा नव्याने सुरुवात केली जाते. हे बीटल्स दुधारी शस्त्रासारखे असल्याने ते त्या विशिष्ट पेटीतून आणि खोलीतून म्युझियममधील इतर खोल्यांमध्ये जाणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. अशा सुटलेल्या बीट्ल्सनी २०११ साली ऑस्ट्रेलियातील एका म्युझियममध्ये अत्यंत दुर्मीळ स्पेसीमेन्स खाऊन नष्ट केले. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. पण असा एखादा अपघात आणि अपवाद वगळता, या खाद्यकर्मींच्या यज्ञकर्मात पडलेली प्रत्येक आहुती विज्ञानाला पुढेच घेऊन जात आहे हे त्या बीटल्सने ‘क्लीन’ केलेल्या हाडांइतकेच स्वच्छ सत्य आहे यात शंका नाही.

संबंधित बातम्या