निसर्गोपचाराची नवलाई

मकरंद केतकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

सहअस्तित्व

मागच्या काही लेखांमधून आपण पाहिले की माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून कशा प्रकारे कीटकांचा उपयोग आपले राहणीमान उंचावण्यासाठी करून घेतला. आज आपण बघूया की निसर्गोपचारांमध्ये कीटकांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो किंवा जायचा. 

एखाद्या आजारावरच्या उपचारांमध्ये जिवंत कीटकांचा वापर करणे या कल्पनेनेच अनेकांना गरगरल्यासारखे होऊ शकेल. कारण या पद्धतींमध्ये मधमाश्यांचा डंख, विशिष्ट माश्यांच्या अळ्या, मुंग्या तसेच विशिष्ट पॅरासाईट्सचे वाहक असलेल्या डासांचाही समावेश होतो. होय, हे सगळे वाचायला विचित्र असले तरी काही वेळेला आधुनिक उपचारपद्धतींपेक्षा या उपायांनी अधिक चांगला गुण आल्याचे आढळते. 

मधमाश्यांच्या विषाचा उपयोग ज्या आजारांच्या उपचारात केला जातो, ते म्हणजे ऑटोइम्युन कंडिशन्स (म्हणजे आपल्या शरीरातील सुरक्षा व्यवस्था स्वतःच्या पेशी आणि घुसखोर यात फरक करू शकत नाही अशी परिस्थिती), सांधेदुखी, क्रॉनिक पेन सारखी चेतासंस्थेशी निगडित दुखणी, अस्थमा आणि काही प्रकारचे त्वचारोग. यामध्ये हे विष इंजेक्शनद्वारे अथवा मधमाशीलाच डंख करायला लावून शरीरात सोडले जाते. अर्थात हे सगळे त्या विषयातील तज्ज्ञाच्याच देखरेखीखालीच होते, अन्यथा त्याची गंभीर रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता असते. इतर कुठल्याही प्राण्याच्या जैविक विषाप्रमाणेच मधमाश्यांचे विषसुद्धा प्रथिनांचा संच असतो आणि त्यांच्या विषात मेलॅटीन नामक प्रथिन हे सर्वात सक्रिय असते. जगात ही पद्धत सर्वमान्य नसली तरी तिच्या वापरातून येणाऱ्‍या गुणांमुळे तिचा वापर अनेक ठिकाणी होतो.

त्वचारोगांशी संबंधित एका जुन्या उपचारपद्धतीत ग्रीन बॉटल फ्लाय या माशीच्या अळ्यांकरवी जखम स्वच्छ करून घेतली जाते. याचे कारण या अळ्या जखमेतील नेमक्या नको असलेल्याच उती खाऊन नष्ट करतात. यामुळे सुदृढ टिश्यू वा उती आहे तशाच राहतात. भाजलेली त्वचा, गळू, पू झालेले भाग, त्वचेला होणारे विविध बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, अल्सर इत्यादी प्रकारांच्या उपचारांसाठी या माशीच्या मॅगेट्सचा वापर केला जातो. त्यांच्या वापरामुळे अवयव कापून टाकण्याची गरज उरली नाही. विशेषतः अशा मधुमेही व्यक्ती ज्यांच्यामध्ये जखम भरून येण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते, अशा रुग्णांसाठी ही उपचारपद्धती उपयुक्त ठरली आहे. सोळाव्या शतकापासून याप्रकारे उपचार केले जात असल्याचे आढळते. परंतु नव्या युगातील अँटिबायोटिक्स आणि शस्त्रक्रियापद्धतींमुळे ही पद्धत मागे पडली. साधारण ऐंशीच्या दशकात पुढारलेल्या देशांमध्ये अँटिबायोटिक्सला विरोध होत असताना पर्याय म्हणून पुन्हा निसर्गाकडे वळून अळ्यांची उपचारपद्धती वापरात आणली गेली. एवढेच नाही तर अमेरिकेत मेडिकल मॅगेट्सचे उत्पादन आणि वापर यासाठी अन्न आणि औषधे नियंत्रण खात्याला अधिकार देण्यात आले. नको असलेलीच त्वचा खाणाऱ्‍या, उपद्रवी बॅक्टेरियांना खाणाऱ्‍या आणि जखम सुलभपणे भरून येण्यात मदत करणाऱ्‍या या अळ्या त्वचारोगींसाठी निश्चितच एक वरदान आहेत.

कुठलीही मोठी जखम उघडी ठेवणे हे रुग्णासाठी घातक असते. कारण जखम भरून येईपर्यंत त्यात अशुद्ध गोष्टींचा शिरकाव होऊन जखम चिघळू शकते. म्हणूनच अशा जखमांना टाके घालून बंद केले जाते. पुढारलेल्या समाजांमध्ये सुईधाग्याने जखम शिवली जात असताना अनेक आदिवासी समाज मात्र मुंग्यांच्या साहाय्याने टाके घालण्याची पद्धत वापरतात. यासाठी आर्मी अँट्स किंवा कार्पेट अँट्सचा वापर केला जातो. याचे कारण या मुंग्यांच्या जबड्याला असलेले चिमटे मोठे असतात. तसेच त्यांची पकडही अतिशय घट्ट असते, इतकी घट्ट की त्यांना काढून टाकण्यासाठी जोर लावला असता शरीरापासून त्यांचे डोके वेगळे होते तरी ते त्वचेला पकडूनच राहते. अर्थात हा काही टाक्यांच्या आधुनिक शिवण पद्धतीला पर्याय असू शकत नाही. पण तरी माणसाला डोके असल्याने त्याने उपलब्ध साधनामधून कामचलाऊ उपाय शोधून काढला याचे कौतुक व्हायला हवे. या मुंग्या जगातील अनेक देशांमध्ये आढळतात. माझ्या एका सह्याद्रीतल्या जंगलभटकंतीत एकदा मी घामाने भिजलेला शर्ट रात्री दगडावर वाळत घातला होता. रात्रीच कधीतरी त्याला भक्ष्य समजून या मुंग्यांनी त्यावर प्रचंड संख्येने हल्ला चढवला. त्यांना हाकलायचीसुद्धा माझी हिंमत झाली नाही इतके दृश्य भयानक होते. शेवटी त्या आपोआप निघून गेल्या. दुसऱ्‍या दिवशी घरी आल्यावर मशीनमधून तो शर्ट धुऊन काढून वाळत घातला, तेव्हा त्याला पकडून राहिलेल्या चार मेलेल्या मुंग्या आढळल्या.  

 आता बघूया वर उल्लेखलेली शेवटची डासांची उपचारपद्धती, जी आता चांगले पर्याय आल्यामुळे कोणी वापरत नाही. सिफिलीस वा गरमी हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारा रोग आहे. 

शरीराचे तापमान चाळीस अंशांच्या वर नेल्यास तो काबूत येतो हे पूर्वापार ठाऊक होते. म्हणून मलेरियाचे सौम्य विषाणू डासांकरवी रुग्णाच्या शरीरात सोडले जायचे. यामुळे ताप येऊन गरमीचे विषाणू मरून जात आणि मग नंतर मलेरियावर उपचार करून रुग्ण पूर्णपणे बरा होत असे. आपण कायम ऋणी राहावे अशा या काही उपचारपद्धती, ज्यांनी आपल्या पूर्वजांना रोगमुक्त केले, कदाचित तुमच्या आणि कदाचित माझ्याही.

संबंधित बातम्या