सहा पायांचे सैनिक

मकरंद केतकर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

सहअस्तित्व

माणूस आणि कीटकसृष्टी यांच्या साहचर्याचा इतिहास पाहिला तर आढळून येते की माणसाने जसा स्वतःचा विकास करण्यासाठी कीटकांना कामाला लावले, तसेच त्याने शत्रूला नामोहरम करण्यासाठीसुद्धा कीटकांचा वापर मोठ्या हुशारीने करून घेतला आहे. हा इतिहास कालपरवाचा नाही, तर चांगला दोनेक हजार वर्षे तरी मागे जातो. 

इसवी सनाच्या दुसऱ्‍या शतकात रोमन सम्राट सेप्टीमियस याने मेसोपोटेमिया जिंकून घेण्यासाठी त्यावर आक्रमण केले. या दरम्यान ‘हातरा’ या भागातील वाळवंटातून जाणारा रेशीम मार्ग म्हणजेच सिल्क रूट ताब्यात घेण्याचा त्यांचा मनसुबा होता. मात्र त्या प्रदेशातील राजा बार्सेमिया आणि त्याचे प्रजाजन यांनी आपल्या नगरवेशीच्या उंच आणि भरभक्कम भिंतीमागे दडून रोमन सैन्याला धक्का देण्याची तयारी केली होती. त्यांच्याकडे मातीची मडकी होती आणि त्यात विंचू भरलेले होते. हे विंचू त्या प्रदेशात पुष्कळ संख्येने आढळत. इतके की पर्शियन सत्ताधीश सिल्क रूटच्या आसपास आढळणारे विंचू नष्ट करण्यासाठी बक्षीसे जाहीर करीत असत, जेणेकरून त्या मार्गाने जाणाऱ्‍या प्रवाशांचा आणि व्यापाऱ्‍यांचा प्रवास निर्धोक होईल. स्थानिकांना या विंचवांच्या विषाच्या तीव्रतेची चांगलीच कल्पना होती. जसे रोमन सैन्य हातराजवळ आले तसा त्यांच्यावर विषारी विंचवांचा वर्षाव झाला. त्यांच्या शरीराचे जे जे भाग अनावृत्त होते तिथे तिथे विषारी डंख बसले आणि बहुतांश सैनिक प्रचंड वेदनांनी तळमळू लागले. अखेर विसाव्या दिवशी रोमन सैन्याने हातराची भिंत फोडून नगरात प्रवेश केला. अर्थात विंचू हे काही कीटक नव्हेत. विंचू अष्टपाद प्राण्यांच्या शाखेतील एक जीव आहेत. परंतु त्यांच्या विषाचा वापर किती कल्पक आणि भेदक पद्धतीने युद्धात केला गेला याचे हे उदाहरण.

युरोपमधील युद्धांचा इतिहास पाहिला तर मधमाश्या आणि गांधीलमाश्या यांचा ‘सढळ हस्ते’ वापर झालेला आढळतो. नुसता वापर नाही तर वापर करण्यासाठी चक्क यंत्रसुद्धा तयार केलेली आढळतात. आज ज्याला आपण ‘गॅटलिंग गन’ या नावाने ओळखतो, त्या मशीनगनची पूर्वीची आवृत्ती म्हणता येतील अशी पवनचक्कीसारखी यंत्रे तयार केली गेली. त्यातून नळीच्या आकाराची मधमाश्यांची पोळी शत्रूसैन्यावर फेकली जात असत. चौदाव्या शतकात निर्मिती झालेल्या या यंत्रांना ‘हाईव्ह-हीविंग मशीनरी’ असे नाव होते. या कीटकांचा वापर जसा जमिनीवरील युद्धात झाला तसाच तो समुद्रावरील युद्धातही झाल्याचे आढळते. शत्रूसैन्याच्या बोटीवर या कीटकांची पोळी भिरकावली जात असत, ज्यामुळे डंखांपासून वाचण्यासाठी त्या बोटीवरील सैनिक आडोशाला जात व बोटीवर हल्ला करणे सोपे होत असे. याबरोबरच या विषयातील तत्कालीन तज्ज्ञ किल्ल्यांच्या भिंतींमध्ये मधमाश्यांना पोळी करता येतील अशा खाचा ठेवत असत, जेणेकरून हल्ला झाल्यास हे षटपादांचे सैन्य कामी येऊ शकेल.

एकोणिसाव्या शतकात ‘बुखारा’ म्हणजे आजचे उझबेकिस्तान या राज्याचा राजा असलेला बहादूर खान हा परपीडाआनंदभोगी म्हणून प्रसिद्ध होता. विशेषतः स्थानिक लोक त्याला त्याच्या काळ्या विहिरीसाठी ओळखत असत. वीस-एकवीस फूट खोल असलेल्या या विहिरीला वरून लोखंडी जाळी होती आणि तिला बांधून खाली सोडलेला दोर हाच काय तो त्या विहिरीत उतरण्याचा किंवा त्यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग होता. या विहिरीला ‘बग पीट’ म्हणून ओळखले जायचे. कारण त्यात राजाच्या शत्रूंचा छळ करण्यासाठी असॅसिन बग्ज आणि पिसवा यांच्यासारखे रक्तपिपासू कीटक सोडलेले असायचे. यापैकी असासिन बग्जची खासियत अशी की त्यांना सुईसारखी लांब सोंड असते, तिचा डंख प्रचंड वेदनादायी असतो. तुलना करायची झाली तर रसरशीत तापलेली सुई टोचल्यावर होतील तशा वेदना होतात. उपाशी कीटक आत सोडलेल्या माणसावर हल्ला चढवत असत. 

दुसऱ्‍या महायुद्धात जपानने जैविकयुद्धनीती वापरताना कीटकांच्या माध्यमातून शत्रूप्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवली होती. जैविकयुद्धनीतीच्या जपानी युद्धविशारदांनी चीनमधील अनेक शहरांमध्ये प्लेगवाहक पिसवा आणि कॉलराचे विषाणू असलेल्या माश्या सोडल्या होत्या. त्यांच्या प्रसारामुळे या दोन्ही रोगांची लागण होऊन जवळपास साडेचार लाख चिनी नागरिकांना जगाचा निरोप घ्यावा लागला होता. असे म्हणतात की जपानी सैन्याने अमेरिकेतील सॅनडियागो या शहरावरसुद्धा याच पद्धतीने हल्ला करण्याचे योजले होते, परंतु पुढे ती योजना बारगळली.

 आता एक जरा अलीकडचे उदाहरण पाहू. १९८९ साली कॅलिफोर्नियामधील काही उग्र पर्यावरणवाद्यांनी तिथल्या स्थानिक सरकारने विषारी कीटकनाशकांच्या वापरावर बंदी आणावी, म्हणून सरकारला चक्क धमकी दिली की आम्ही ‘मेडफ्लाईज’ या माश्यांचे प्रजनन करत आहोत. जर का या माश्या त्या माथेफिरू पर्यावरणवाद्यांनी मुक्त केल्या असत्या, तर त्याचा या शेतीप्रधान प्रदेशावर विशेषतः फळझाडांवर भयानक परिणाम झाला असता. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सच्या शेतमालाचे नुकसान तर झाले असतेच, पण लाखो लोकांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या असत्या.

दिसायला एवढेसे दिसणारे हे जीव समूहाने एकत्र आले तर बलाढ्य शत्रूलाही कसे नमवू शकतात याची ही उदाहरणे. म्हणूनच बहुधा मुघलांनीसुद्धा मराठ्यांना आग्यामाश्यांची उपमा दिली होती. क्या बात है! एकदम परफेक्ट!

संबंधित बातम्या