खून की प्यासी

मकरंद केतकर
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

सहअस्तित्व

माणसाने अवाढव्य हत्तीपासून अतिसूक्ष्म अशा विषाणूपर्यंत कितीतरी जिवांना स्वतःच्या सेवेत राबायला ठेवलेले आहे. त्यांना प्रशिक्षण देता आले तर तसे, नाहीतर मग त्यांच्या जशा नैसर्गिक सवयी आहेत त्याचा वापर करून! ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार आरोग्य सलामत तर उद्योग हजार करता येतात. म्हणून या क्षेत्रासाठी उपयुक्त असे निसर्गातले अनेक घटक काळजीपूर्वक निवडून जीवनामध्ये समाविष्ट केले गेले. त्यांच्यापैकी एक आहे जळू! 

सदैव ओलसर जागी किंवा पाण्यात राहणाऱ्या‍ ‘जळू’ या प्राण्याला इतके विरोधाभास असलेले नाव आपल्या मराठीत का मिळावे? या गमतीशीर प्रश्नाचे उत्तर पुढे मिळणार आहे. आपल्याकडे कोरड्या दिवसांत सुप्तावस्थेत असणारी आणि पावसाळ्यात सक्रिय होणारी जळू फार प्राचीन काळापासून वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मोलाचे स्थान मिळवून आहे. दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजनाचा दिवस. डॉक्टरांच्या या देवाच्या उजव्या हातात ‘जलौका’ म्हणजे जळू असते. तिच्या रक्त पिण्याच्या गुणधर्मामुळे, गळू किंवा रक्त साकळलेल्या भागावर जळू लावून तिथले दूषित रक्त काढून टाकण्याच्या कामावर तिला नेमले जायचे आणि अजूनही तिचा वापर होतो. या पद्धतीला ‘रक्तमोक्षण’ असे नाव आहे. आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्याकडे बरणीतल्या पाण्यातल्या जळवा पाहत बसणे हा माझा बालपणापासूनचा आवडता उद्योग आहे. 

शरीरोपचारांमध्ये जळूच्या वापराचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. फक्त आपल्याच देशात नाही, तर जगभर अनेक देशांमध्ये त्यांचा वापर होतो. आपल्या देशात पूर्वीच्या काळात तर केशकर्तनालयातही जळवा लावून नासके रक्त काढून द्यायचे. याला ‘तुंबडी लावणे’ असे म्हणतात. आता तर आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा ही कोणे एकेकाळची ‘सो कॉल्ड’ गावठी ‘लीच थेरपी’ वापरली जाते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हिरूडो जातीच्या जळवा वापरल्या जातात. पूर्वी आदिवासी लोक या विशिष्ट जातीच्या जळवा डॉक्टरांना आणून द्यायचे. आधुनिक काळात या जळवा ‘बायोफार्म लीच’ किंवा तत्सम कंपनीद्वारे पुरवल्या जातात. त्यांच्या वापरामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचा संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे प्रजनन वैद्यकीय प्रयोगशाळेतल्या निर्जंतुक आणि मानवी वापरासाठी सुरक्षित अशा वातावरणात केले जाते.

आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली ही जळू, ‘हर्माफ्रोडाईट’ म्हणजे अर्धनारीनटेश्वर या प्रकारात येते. गोगलगायी, गांडुळे, स्लग हेसुद्धा याच वर्गातले सदस्य. जळूचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते. ऱ्‍हिंकोडेलीडा (rhynchobdellida) आणि अऱ्‍हिंकोडेलीडा (arhynchobdellida). (rhynchus - चोच | bdella - जळू).

ऱ्‍हिंकोडेलीडा प्रकारातल्या जळवांना तोंडामध्ये लवचिक सुईसारखा अवयव असतो, ज्याच्याद्वारे त्या रक्त शोषून घेतात. अऱ्‍हिंकोडेलीडा या प्रकारातल्या जळवांच्या तोंडात पात्यासारखे ‘Y’ आकारात तीन धारदार अवयव असतात, ज्यांचा वापर करून त्या त्वचेला छेद देतात आणि रक्त शोषून घेतात. या प्रकारातल्या जळवांनी रक्त शोषायची जागा सोडल्यावर तिथे मर्सिडीजच्या चिन्हासारखी ‘Y’ आकाराची तीनधारी जखम दिसते. जळूच्या शरीराच्या दोन्ही टोकांना दातेरी अवयव असतात ज्याचा उपयोग तिला ‘होस्ट’च्या शरीरावर स्वतःला धरून ठेवण्यासाठी होतो. एकदा का शेपटीच्या दाताने स्वतःला होस्टच्या त्वचेवर धरून ठेवले की जळू तोंडाच्या भागाने त्वचेला छेद देते व हिरूडीन नावाचे रसायन जखमेत सोडते. त्यामुळे खपली धरण्याची प्रक्रिया होत नाही व रक्त प्रवाही राहते. इवलीशी जळू सुमारे अर्धा तास रक्त प्यायल्यानंतर चांगली दसपट मोठी होते व आपोआप गळून पडते. (त्वचेवर चिकटलेली जळू काढून टाकण्यासाठी मीठ किंवा डेटॉलचा उपाय करून पाहावा). हिरूडीनचा प्रभाव कमी झाला की जखमेवर खपली धरण्याची प्रक्रिया परत सुरू होते. 

जळूच्या विविध जातींनुसार जखमेच्या ठिकाणी रिअ‍ॅक्शन येणार की नाही येणार हे ठरते. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार एक दोन दिवस किंवा फार तर आठवडाभर जळू चावलेल्या ठिकाणी कंड सुटत राहते व नंतर थांबते. पण काही जणांमध्ये या काळात तिथली त्वचा जरा खराब झाल्यासारखी दिसू शकते. यानंतर जळू अनेक महिने हे रक्त पचवत राहते. अन्न न मिळाल्यास ती वर्षभरसुद्धा उपाशी राहू शकते. 

जळवा मीलनकाळात एकमेकींच्या शरीरात शुक्राणू सोडून एकमेकींच्या शरीरातील अंड्यांना फलित करतात. यानंतर जळू त्वचेचाच एक कोष (क्लिटेलम) तयार करून त्यात अंडी घालते व त्याला ओलसर दगडाला किंवा खोडाला चिकटवून देते. काही आठवड्यांनी कोषातून पिल्ले बाहेर येतात व प्रौढांप्रमाणेच रक्तपिती होतात. जळूला गोगलगायीप्रमाणे सक्रिय राहण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते. म्हणून पावसाळ्यात जळवा सर्वात जास्त आढळतात. पावसाळ्यात कोयनेच्या जंगलात हिंडताना फांद्याफांद्यांवरून अंगावर झेपावणाऱ्‍या जळवा आठवल्या की माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. 

फारसे दिसत नसले तरी प्राण्याच्या शरीरातली उष्णता आणि गंध यांचे गणित जुळवून जळू शरीराला चिकटते. आम्ही तर बेडकांच्या अंगावरही जळवा लागलेल्या पाहिल्या आहेत. जळू रक्तपिपासू असली तरी पाण्यात राहणाऱ्‍या काही जळवा गोगलगायी, गांडुळे व कीटकांच्या पिल्लांना खातात. जळवांचे मुख्य शत्रू म्हणजे कासवे, पक्षी, मासे वगैरे. हे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. आपल्या सह्याद्रीतले आदिवासी बांधव उन्हाळ्यातला अन्नाचा स्रोत म्हणून दऱ्‍याखोऱ्‍यातल्या धोंड्यांवर दगड भरडून त्याखालच्या बिळात लपलेले खेकडे गोळा करतात. या खेकड्यांच्या आतल्या ओलसर भागात अनेकदा जळवा आढळतात. पावसाळा संपल्यावर त्या ओलाव्याचा स्रोत म्हणून खेकड्यांच्या शरीरात शिरून खेकड्याला इजा न करता सुप्तावस्थेत गेलेल्या असतात.  

जळू हा प्राणी एकंदरच जरा विचित्र 

आहे. पण तरी तिला पाहिल्यावर ‘अशी 

ही बनवाबनवी’मधल्या ‘विचित्र दिसत 

असले तरी आपलेच आहेत’ या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हेही तितकेच खरे!

संबंधित बातम्या