मुक्ताफळे

मकरंद केतकर
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

सहअस्तित्व

बालपणी आपण सगळ्यांनी अनेकदा राजाराणीच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यात अमुक एक गोष्ट कोणीतरी करून दाखवली किंवा आणून वगैरे दिली की राजा त्याच्या गळ्यातला मोत्याचा कंठा बक्षीस देत असे. छान दातांना उपमा देताना मोत्यासारखे दात असे म्हटले जाते. हजारो वर्षांपासून माणसांना भुरळ घालणारा ‘मोती’ हा प्राणिज पदार्थ आजही त्याचे अप्रूप टिकवून आहे. 

दागदागिने, औषधे, सजावट अशा विविध कामांमध्ये मोत्यांचा उपयोग केला जातो. मृदुकाय म्हणजेच मोलस्क्स् या प्रकारातल्या जिवांच्या करामतीमधून या पदार्थाची निर्मिती होते. ज्या पदार्थापासून त्यांचे शिंपले तयार होतात, त्याच कॅल्शिअमच्या स्रावांपासून मोती तयार होतात. समुद्रात मोती शोधणे आणि गोळा करणे हे खूप कष्टाचे काम असले तरी प्राचीन व्यापारामध्ये या प्राणिज रत्नाची फार मोठी उलाढाल होत असे. विशेषतः इराणच्या आखातातून चांगल्या दर्जाचे मोती मिळत असत. गंमत म्हणजे अथर्ववेदातल्या शंखमणी सूक्तात देवांच्या अस्थींपासून मोती तयार होतात असा उल्लेख आहे. यावरून आपल्याकडे किती प्राचीन काळापासून मोती वापरत होते यांचा अंदाज येतो. भारत आणि चीन तर मोत्यांच्या वापरात आघाडीवर होतेच, पण युरोपमध्ये रोमन साम्राज्यातही मोत्यांना विशेष मागणी होती आणि मोत्यांचा वापरसुद्धा सुरुवातीला फक्त उच्चाधिकारी व राजघराण्यातल्या लोकांनाच करता येत असे. आपल्याकडे ऋग्वेद, अथर्ववेद, बृहत्संहिता अशा विविध ग्रंथांमधून ‘मुक्ताफळां’च्या वापराचे उल्लेख सापडतात. ज्योतिषशास्त्रात मोती हे चंद्राचे रत्न म्हणून ओळखले जाते. 

आदिम काळात खाण्यासाठी कालवे म्हणजे शिंपले उघडून आतले प्राणी काढताना माणसाला मोत्यांचा शोध लागला असणार आणि पुढे मोत्याचे तेज आणि रूप यामुळे त्याला व्यवहारात महत्त्व प्राप्त झाले.

नैसर्गिकरीत्या मोती तयार होण्याची प्रक्रिया बरीच वेळखाऊ आणि दुर्मीळही आहे. शेकडो शिंपले उघडल्यावर एखाद्या शिंपल्यातून मोती निघतो. शिंपल्याच्या कठीण कवचाच्या आतमध्ये कालव्याचे अवयव आणि त्यांना संरक्षण देणारे अधिस्तर असतात. मोती तयार होण्यासाठी कालव्याच्या अधिस्तरांमध्ये वाळूचा कण किंवा कुठलीही सूक्ष्म आकाराची गोष्ट अडकून राहणे गरजेचे असते. अशी अडकलेली वस्तू त्याला, त्याच्या जिवाला संभाव्य धोका वाटते आणि त्यापासून मुक्तता करून घेण्यासाठी शिंपल्याच्या आतमध्ये असलेल्या अस्तरांमधल्या पेशी त्या कणाच्या भोवती कॅल्शिअम कार्बोनेटचे स्राव पाझरणे सुरू करतात. हळूहळू या स्रावांचे त्या कणाभोवती थर जमू लागतात. या थरांना नेकर असे म्हणतात. अरगोनाइट या कॅल्शिअम कार्बोनेटच्याच एका घटकापासून ते तयार होतात. शिंपल्याचा आतला चकचकीत थर याच नेकरपासून तयार झालेला असतो. मोत्याचा मोतिया रंग आणि चमकसुद्धा नेकरपासूनच येते. जसे या स्रावाचे थरांवर थर चढत जातात, तसा मोती आकार घेत जातो. या दरम्यान जर त्याच्यावर दाब पडला नाही, तर त्याचा आकार गोल होतो. अन्यथा चपटा किंवा लांबूडक्या आकाराचा मोती तयार होतो. नैसर्गिकरीत्या मोती तयार होण्याच्या प्रक्रियेत पाच सहा वर्षेसुद्धा लागू शकतात. 

मोती तयार करणारी कालवे समुद्रात किनाऱ्‍यापासून वीसेक किलोमीटर अंतरावर आणि साधारण सोळा ते चाळीस मीटर खोल पाण्यात सापडतात. मोती गोळा करणारे पाणबुडे टोपली घेऊन पाण्यात जातात व साधारण दीड मिनिटात जमतील तितकी कालवे गोळा करून वरती येतात. फक्त खाऱ्‍या पाण्यातच नाही तर गोड्या पाण्यातल्या कालवांकडूनसुद्धा मोत्यांची निर्मिती होते. या वेळखाऊ आणि बेभरवशाच्या पद्धतीपासून सुटका करून घेण्यासाठी नेहमीप्रमाणेच माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून याच शिंपल्यांना कामाला लावून खात्रीलायकरीत्या मोत्यांची निर्मिती करून घ्यायला सुरुवात केली. साधारण तेराव्या शतकात चीनमध्ये या पद्धतीचा उगम झालेला आढळतो. 

गोड्या पाण्यातल्या कालवांमध्ये लाकूड, धातू किंवा तत्सम पदार्थाचा साधारण दोन ते आठ मिलिमीटर लांबीचा तुकडा घुसवून अधिक खात्रीलायकरीत्या मोती मिळवत असत. परंतु हा मोती शिंपल्याला चिकटलेला आणि अर्धगोल आकाराचा असे आणि त्याला तसाच दुसरा अर्धगोल मोती चिकटवून पूर्ण गोलाकार मोती तयार केला जात असे. पुढे जपानमध्ये कोकीची मिकीमोटो या माणसाने १८९० साली नव्या पद्धतीचा शोध लावला. यात दुसऱ्‍या कालव्याच्या शिंपल्यापासून तयार केलेला एक गुळगुळीत गोळा आणि एका जिवंत कालव्याच्या आतील मृदू टिश्यू हे एकत्र दुसऱ्‍या जिवंत कालव्याच्या आत ठेवून त्यापासून गोलाकार मोती मिळवणे शक्य झाले. सूक्ष्मातून सुरुवात करण्यापेक्षा या गोळ्याच्या  भोवती नेकरचे थर चढत जाऊन या पद्धतीमुळे लवकर मोती तयार होतो. यांना कल्चर्ड किंवा संवर्धित मोती असे म्हणतात. 

या पद्धतीने मोती तयार करणाऱ्‍या संस्था काचेच्या पेट्यांमध्ये कृत्रिमरीत्या कालवांची पैदास करतात आणि थोडी वाढ झाली की त्यांना त्यांच्या प्रकारानुसार समुद्र किंवा नदीमध्ये असलेल्या पिंजऱ्‍यात सोडतात. 

इथे एक ते दोन वर्षे त्यांची वाढ होऊ दिली जाते. यानंतर त्यांना पाण्याबाहेर काढून त्यांना काही वेळ उघड्यावर ठेवले जाते. त्यांनी शिंपला उघडला की त्यात पाचर सरकवून शिंपला उघडा ठेवला जातो. मग आतल्या मऊ भागात अलगद छोटा कट देऊन त्यात वर सांगितलेला गोळा आणि दुसऱ्‍या कालव्याचा टिश्यू सरकवून, पाचर काढून, शिंपला बंद करून परत पाण्यात सोडला जातो. पुढे मग जाती प्रजातीनुसार आणि हव्या असलेल्या आकारानुसार एक वर्ष ते तीन वर्षे या काळात तयार झालेले मोती काढून घेतले जातात. 

अर्थात या पद्धतीतसुद्धा पन्नास टक्केच कालवे जगतात आणि फक्त पाच टक्केच कालव्यांमधून अपेक्षित मोती मिळतात. पण तरी नैसर्गिक मोत्यांच्या तुलनेत हे प्रमाण किती जास्त आहे हे दरवर्षी होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढालच सिद्ध करते.

संबंधित बातम्या