परिसंस्थेचे अभियंते

मकरंद केतकर
सोमवार, 6 डिसेंबर 2021

सहअस्तित्व

सृष्टीत राहणारा आणि मुख्यतः पावसाळ्यात आढळून येणारा गांडूळ हा जीवविशेष किमान वीसेक कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला असावा, असा अंदाज उपलब्ध जीवाश्मांवरून बांधता येतो. पण गांडुळांसारखेच दिसणारे मृदुकाय शरीराचे जीव एक अब्ज वर्षांपूर्वीसुद्धा निर्माण होऊन गेले होते. 

निसर्ग अभ्यासकांच्या भाषेत गांडुळांना ‘इकोसिस्टीमचे इंजिनियर्स’ म्हणजे परिसंस्थेचे अभियंते असे आदराने संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे गांडूळ जमिनीखाली राहत असले तरी त्याच्या वर्तणुकीमुळे मातीच्या वरच्या थराची उचकापाचक होते, त्यामुळे हवा खेळती राहते आणि मुख्य म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होतो. याशिवाय त्याच्या खादाडीमुळे कुजलेल्या पालापाचोळ्याचे, तसेच विष्ठेचे पुन्हा सुपीक मातीत रूपांतर होते, जिला आपण सेंद्रिय खत या नावाने ओळखतो. माणसाने नेहमीप्रमाणेच याही गोष्टीत व्यापारी आणि व्यावहारिक फायदा पाहिला. गांडूळखताचा इतिहास जेमतेम काही दशके इतकाच जुना आहे. पण तरी त्यातून गांडूळखत निर्माण करणारे उद्योग निर्माण झाले, तसेच सरकारतर्फे गांडूळखताला प्रोत्साहन देणाऱ्‍या विविध योजनाही अस्तित्वात आल्या. 

गांडुळांना हल्लीहल्लीच व्यापारी मोल आले असले, तरी किमान दोन अडीच हजार वर्षांपासून माणसांना त्यांचे महत्त्व माहिती आहे. अ‍ॅरिस्टॉटलने त्यांचे वर्णन ‘इंटेस्टाईन्स ऑफ दी अर्थ’ म्हणजे ‘पृथ्वीची आतडी’ असे केले आहे, जे अतिशय चपखल आहे. जगात गांडुळांच्या हजारो जाती आहेत आणि अतिथंड प्रदेश सोडून हे प्राणी सर्वत्र आढळतात. अगदी समुद्रकिनारीसुद्धा. यातल्या काही जाती तर रात्री मंद निळसर रंगात उजळतातही, तर काही चक्क शंभर शंभर फूट उंच झाडांवर चढूनही जातात.

सर्वसाधारणपणे गांडुळांची विभागणी तीन प्रकारात केली जाते. जमिनीच्या वरवरच्या थरात राहणारी ज्यांना एपिजेईक (Epigeic) असे संबोधले जाते. जमिनीच्या वरच्या थरात साहजिकच खूप जास्त प्रमाणात जैविक घटक असतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात या प्रकारातील गांडुळे आढळून येतात. ही फार खोल जात नाहीत आणि बिळेसुद्धा करत नाहीत. जेमतेम पाच दहा सेंटीमीटर खोलीपर्यंत ही आढळून येतात. हीच ती आपल्या परिचयाची नाजूक गांडुळे. ही गांडुळे तपकिरी लालसर रंगाची आणि टोकाला गडद निळसर रंगाची काहीशी खरखरीत त्वचा असलेली असतात. गांडूळखत प्रकल्पात यांचाच अधिक वापर केला जातो. ही साधारण दोन ते अठरा सेंटीमीटर इतकी लांब असतात. यानंतर दुसऱ्‍या प्रकारात येतात, ती एंडोजेईक (Endogeic). ती वीस सेंटीमीटरपर्यंत खोलीवर आढळतात. यांची लांबी तीन ते तीस सेंटीमीटर इतकी असते. ही थोडी फिकट रंगाची आणि एपिजेईक गांडुळांपेक्षा संथ असतात. ही गांडुळे जमिनीत तात्पुरती बिळे तयार करून त्यात राहतात, आतच माती खाऊन त्यातले जैविक घटक पचवत राहतात आणि क्वचितच जमिनीवर येतात. तिसरा प्रकार म्हणजे एनेकिक (Anecic) गांडुळे. ही बऱ्‍यापैकी खोल जमिनीत राहतात. म्हणजे आठ नऊ फूट तरी. त्यांची बिळेसुद्धा पक्की आणि एकमेकांना जोडलेली असतात. त्यांच्या शरीरातील स्नायू पृष्ठभागाजवळ राहणाऱ्‍या गांडुळांपेक्षा तुलनेने दुर्बळ असतात. पण त्यांची लांबी बरीच मोठी असते म्हणजे जास्तीत जास्त साडेतीन फुटांपर्यंत. इतक्या खोल सेंद्रिय घटक उपलब्ध नसल्याने ही गांडुळे जमिनीवर येऊन पालापाचोळा आपल्या बिळांमध्ये ओढत घेऊन जातात. 

जळवा आणि गोगलगायींसारखीच गांडुळेही उभयलिंगी असतात. म्हणजे एकाच शरीरात नर आणि मादी दोन्ही. त्यांचे पुनरुत्पादन मुख्यत्वे पावसाळ्यात होते. या पद्धतीत दोन गांडुळे आपापल्या मानेकडच्या बाजूने एकमेकांना चिकटतात आणि शुक्राणूंचे आदानप्रदान करतात. यानंतर आपल्याच मानेजवळच्या त्वचेचा कोष तयार करतात आणि त्यामध्ये फलित अंडी ठेऊन तो कोष मातीत सोडून दिला जातो. त्यातून नंतर पिल्ले जन्माला येतात.

जातीप्रजातींनुसार गांडुळांचे आयुष्य काही दिवस ते काही वर्षे असते. जमिनीच्या जवळ राहणारी गांडुळे पटापट पिल्ले जन्माला घालतात, कारण त्यांना सुरक्षा तुलनेने कमी असते. मला वाटते आपल्यापैकी बहुतेक जणांनी गांडुळावर मीठ टाकून पाहण्याचा ‘प्रयोग’ करून पाहिलेला आहे. यात बिचारे गांडूळ तडफडून मरते. याचे कारण गांडूळ त्वचेद्वारे श्वसन करते आणि यासाठी त्याला त्वचा ओलसर ठेवणे गरजेचे असते.  

सोडियम क्लोराईडमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे गांडुळाच्या शरीरावर पडलेले मीठ त्याच्या त्वचेतील पाणी ओढून घेते व पाण्याचा निचरा झाल्याने गांडूळ मरते. 

गांडूळ हे पक्षी, सस्तन प्राणी, जलचर तसेच कीटक अशा अनेक सजीवांचे अन्न आहे. काही प्रदेशात तर माणसेसुद्धा गांडुळे खातात. Zhejun Sun आणि Hao Jiang या संशोधकांच्या प्रबंधानुसार गांडुळांमध्ये जवळपास साठ टक्के प्रथिने असतात. हे प्रमाण मत्स्याहार, गायीचे दूध आणि सोयाबीनच्या दुधापेक्षाही अधिक आहे. याशिवाय त्यांच्या शरीरात तांबे, मँगेनीज, झिंक तसेच कॅल्शिअम अशी खनिजेही आढळतात. सध्याचे बदलते हवामान पाहता शेती व त्यावर अवलंबून असणारे प्राणिज पदार्थांचे उद्योग बेभरवशाचे होत जाणार असल्याची भीती अन्न या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याला पर्याय म्हणून सहज उपलब्ध होणारे कीटक व गांडुळांसारखे जीव मानवी आहारात भविष्यात समाविष्ट केले जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जुळवून घेणे हा सजीव सृष्टीचा गुणधर्म आहे, मग माणूस त्याला अपवाद कसा ठरेल?

 

संबंधित बातम्या