जिभेचे चोचले

मकरंद केतकर
सोमवार, 20 डिसेंबर 2021


सहअस्तित्व

माशाच्या तोंडात प्रवेश करून जीभ-कसर त्याची जीभ तोडून टाकते व स्वतः त्या जागी चिकटून बसून आयते अन्न खात राहते. यात माशाला त्याची जीभ झडल्याची जाणीवसुद्धा होत नाही आणि दोघेही सुखाने आयुष्य जगतात.

मनुष्य आणि त्याने अंकित केलेल्या किंवा वापर केलेल्या प्राण्यांमधल्या परस्परसंबंधांच्या गोष्टी पाहता पाहता वर्ष कसे सरत आले कळलेच नाही. किमान तीस चाळीस हजार वर्षांपूर्वी, आयत्या अन्नाच्या शोधात मानवी समूहांजवळ आलेल्या कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुरू झालेली ही गोष्टींची यादी अगदी कालपरवाच माणसाने ज्यांना कामाला लावले अशा गांडुळांपर्यंत आलेली आपण वाचलीच असेल. यातल्या काही जिवांनी मानवासोबत जगणे शिकताना त्याने केलेल्या प्रयोगांना त्याला हवा तसा प्रतिसाद देऊन आपले रूपडे पालटले आणि स्वभावही बदलले. काही जिवांनी मात्र त्याच्या प्रयोगांना फारशी दाद न देता आपण आहोत तसेच स्वीकारायला माणसाला भाग पाडले. या प्रयोगांमध्ये काही वेळा तर इतके यश आले की त्या प्राण्यांचे मूळ जंगली अवतारच संपून गेले. तर अनेकांचे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जंगली भाऊबंद उरलेले आहेत. असो! तर ही होती माणसाने गुलाम करून कामाला लावलेल्या प्राण्यांची गोष्ट. पण मग असेच प्राण्यांमध्ये आपापसातसुद्धा घडत असेल का? होय, घडते ना! आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात, ज्यात यजमानाला त्रास न देता त्याच्याकडून आपल्याला हवे ते साध्य करून घेतले जाते. अशी काही उदाहरणे आपण शेवटच्या दोन लेखांमध्ये पाहू. 

यातले पहिले उदाहरण आहे टंग इटिंग लाऊज, म्हणजे मासा आणि जीभ-कसर या जिवाचे. एखादी विज्ञानकथा वाटावी असे या जिवांचे परग्रहवासीयांसारखे वर्तन असते. या ‘आयजीच्या जिवावरच्या बायजी’चा पराक्रम बघता हिला ‘जीभ-कसर’ म्हणण्यापेक्षा ‘जीभ-तोडी’ असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण ही कीड माशाच्या तोंडात प्रवेश करून त्याची जीभ तोडून टाकते व स्वतः त्या जागी चिकटून बसून आयते अन्न खात राहते. यात माशाला त्याची जीभ झडल्याची जाणीवसुद्धा होत नाही आणि दोघेही सुखाने आयुष्य जगतात. 

आयसोपॉड या संघात समाविष्ट होणारे हे कसर वर्गातले जीव समुद्र, गोडे पाणी तसेच जमिनीवरही आढळतात. आयसोपॉड म्हणजे खेकडे किंवा लॉबस्टर्स यांच्या प्रकारातले जीव. आजचे आपले कथानायक समुद्रात राहणारे जीव आहेत. यांची मादी एक इंचापर्यंत वाढते, तर नर तिच्या निम्मा असतो. या जिवांना ‘प्रोटेंड्रिक हर्माफ्रोडाईट्स’ असे म्हणतात. म्हणजे लिंगबदलू उभयलिंगी. यांच्या आयुष्याची सुरुवात नर म्हणून होते, पण नंतर ते लिंग बदलून मादी होतात. सजीवांची उत्क्रांती होताना काय काय चमत्कार घडले आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.

मादीने मुक्त केलेले नवजात नर यजमानाच्या शोधात पाण्यात पोहत असतात. त्यांचे टार्गेट असलेला यजमान मासा सापडला की ते त्याच्या कल्ल्यांमध्ये शिरतात. इथून पुढे खरी गंमत सुरू होते. या नरांपैकी एकजण मादी होतो आणि कल्ल्यातून पुढे सरकत माशाच्या तोंडात शिरतो, म्हणजे शिरते. आत आल्यानंतर माशाने आपल्याला खाऊ नये याची काळजी घेऊन ती त्याच्या जिभेचा चावा घेते आणि तिला घट्ट पकडून तिथले रक्त पिऊ लागते. हळूहळू जिभेला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने तिथल्या पेशी मरतात आणि जीभ लुळी पडत पडत झडून जाते. आता जिभेची जागा ही लिंगबदल झालेली मादी घेते आणि आपल्या पायांनी माशाच्या जबड्याला आतून घट्ट पकडून राहते. पोट भरण्यासाठी ती माशाच्या तोंडातील श्लेष्मा, रक्त तसेच त्याने खाल्लेले अन्न या सगळ्यावर ताव मारत राहते. आश्चर्य म्हणजे माशाला आपली जीभ झाडल्याची जाणीवसुद्धा होत नाही. तो त्याच्या तोंडात एखादा कृत्रिम (पण खरेतर नैसर्गिक) अवयव लावल्याप्रमाणे त्याचे नियमीत आयुष्य जगत राहतो. आता सजीव म्हटला म्हणजे पुनरुत्पादन आलेच. माशाच्या कल्ल्यात शिरलेल्या नरांपैकी एक जण तोंडात शिरून मादीशी समागम करतो आणि नंतर मादी पिल्लांना जन्म देते. ती पुन्हा पाण्यातच तरंगत राहून नव्या यजमानाच्या शोधात भटकत राहतात. 

या जीभतोड्या कसरींच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत आणि त्या विशिष्ट यजमानांनाच निवडतात. हे जीव माणसांसाठी अजिबात घातक नाहीत. परंतु ते सहजपणे दिसून येत नसल्याने पकडलेल्या माशांबरोबर त्यांचा प्रवास सुपरमार्केट्स किंवा थेट हॉटेल्सच्या किचनमध्ये होतो आणि  माशाबरोबर त्यांनाही नकळतपणे शिजवले जाते. यातूनच ‘बिचाऱ्‍या’ सुपरमार्केट्स किंवा हॉटेल्सना ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्‍या कायदेशीर कारवायांनाही सामोरे जावे लागले आहे.

यांच्या अनेक प्रजाती भारतीय समुद्रातसुद्धा आढळतात. अगदी खवय्यांचे चोचले पुरवणाऱ्‍या बांगडा, सूचीमुखी मासा (नीडल फिश) अशा प्रजातींमध्येही हे जीभतोडे सहजरीत्या आढळतात. कन्नूर (केरळ) येथील श्री नारायण कॉलेजमधील संशोधक अनीष पनक्कूल थंबन आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी २००९ ते २०१२ या दरम्यान मोठ्या प्रमाणात सॅम्पलिंग करून २०१५ साली सूचीमुखी माशांमध्ये आढळणाऱ्‍या जीभतोड्यांवर एक छान संशोधन निबंध प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी ‘सायमोथोआ फ्रंटॅलीस’ या जीभतोड्यांच्या प्रजातीच्या जीवनचक्राचे विस्तृत वर्णन केले आहे. आपण सस्तन प्राण्यांमधला मार्सुपियल्स (म्हणजे कांगारूसारखे पोटाच्या पिशवीत भ्रूण वाढवणारे जीव) हा प्रकार जाणून असतो. हे जीभतोडेसुद्धा आपल्या शरीरात असलेल्या पाऊचमध्ये अंडी उबवून पिल्लांना जन्म देतात. कुतूहल म्हणून गुगलवर, ‘Cymothoa frontalis, a cymothoid isopod parasitizing the belonid fish Strongylura strongylura from the Malabar Coast (Kerala, India): redescription, description, prevalence and life cycle’ असे सर्च केल्यास आपल्याला या पेपरमध्ये अनेक अद्‍भुत गोष्टी वाचायला मिळतील. बाकी जे शब्द अडतील त्यासाठी पुन्हा गुगलबाबा आहेच मदतीला. तर सांगायचे काय, तर ‘जिभेचे चोचले पुरवणे’ या म्हणीला या माशांच्या दुनियेत एक वेगळाच अर्थ आहे.

संबंधित बातम्या