जहर का बदला जहर से...

मकरंद केतकर
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021


सहअस्तित्व

वर्ष सरत आले आहे. ‘सकाळ साप्ताहिक’च्या माध्यमातून गेली तीन वर्षे आपल्यासोबत सुरू असलेल्या प्रवासातील माझे स्टेशन आले आहे. त्यामुळे ‘सहअस्तित्व’ या सदरातील सर्पविषावरील हा शेवटचा लेख टाइप करताना बोटे जराशी जड झाल्यासारखी वाटत आहेत... 

वन्यजीवांचा अभ्यास करताना अनेकदा त्यांचा माणसांसोबत असलेल्या संबंधांच्या इतिहासाचा स्पर्श होऊन जातो, पण हे संबंध कधी इतक्या तपशिलात अभ्यासण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. यानिमित्ताने तुमच्याबरोबरच माझ्याही ज्ञानात अनेक नव्या गोष्टींची भर पडली. ज्योत से ज्योत बढाते चलो... दुसरे काय! असो. गेली दोन वर्षे कोविडने उच्छाद मांडला आहे. कधी नव्हे ते लसीकरण, प्रतिपिंडे हे शब्द ‘कांदा-बटाट्या’सारखे तोंडात सहज रुळून गेले आहेत. लसीकरण किंवा त्यामुळे शरीरात तयार होणाऱ्‍या अँटीबॉडीज या विषयांतील मी तज्ज्ञ नाही. पण मानवी जीवनावर प्रचंड मोठा प्रभाव टाकणारे संशोधन, त्या विषयातील संशोधक आणि त्यात नकळत योगदान देणारे मानवेतर सजीव यांच्याबाबत माझ्या मनात सदैव कृतज्ञता राहील. या लेखाद्वारे मी सर्पविषावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्‍या लशीबद्दल थोडी माहिती शेअर करत आहे. 

विषाणूंमुळे येणाऱ्‍या कोविडसारख्या साथीचा उद्रेक शतकातून एखाद्याच वेळी होतो. पण सर्पदंशांमुळे दरवर्षी किमान साठ ते सत्तर हजार माणसांना जिवास मुकावे लागते. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील एका वृत्तानुसार, सन २००० ते २०१९ या काळात सुमारे बारा लाख माणसे सर्पदंशामुळे दगावली आहेत. यामध्ये जसे वेळेत योग्य उपचार न मिळणे आहे, तसेच उपचार उपलब्ध असूनसुद्धा अंधश्रद्धांपोटी चुकीच्या उपायांच्या नादाला लागूनही अनेक जीव गेले आहेत. 

सर्पदंशापासून लोकांचे प्राण वाचवणाऱ्‍या प्रतीसर्पविषाचा शोध इ.स १८९५ साली फ्रेंच शास्त्रज्ञ अल्बर्ट काल्मेट याने लावला. ही लस नागाच्या विषावर उपचार करत असे. अल्बर्ट व्हिएतनाममध्ये असताना आलेल्या एका पुरात त्याच्या समक्ष सर्पदंश होऊन चार रुग्णांनी प्राण सोडले. ‘लस’ या उपचार पद्धतीच्या उगमाचा तो काळ होता. त्यामुळे या पद्धतीचा वापर सर्पदंशावर कसा करता येईल, या ध्यासातून प्रतिसर्पविषाच्या लशीची निर्मिती झाली. तिच्या निर्मितीच्या पद्धतीत सुधारणा होऊन व्यावसायिक उत्पादन सुरू व्हायला पुढे अनेक वर्षे गेली. सुरुवातीला अल्बर्टने घोड्याच्या शरीरात नागाचे विष टोचले, त्याची विषप्रतिरोधक क्षमता वाढवून नंतर त्याचे रक्त थेट माणसांना देण्याचा प्रयोग केला आणि त्याला त्यात काही प्रमाणात यशही आले. अर्थातच ही संशोधनाची पहिली पायरी होती. नंतर नंतर त्यात बरीच सुधारणा होऊन संपूर्ण विषप्रतिरोधक रक्त देण्याऐवजी फक्त विषप्रतिरोधक प्रतिपिंडे (अँटीबॉडीज्) असलेला प्लाझ्मा देण्यात येऊ लागला. ही लस कशी काम करते ते आपण थोडक्यात पाहू. 

प्रतिविषाची लस ही घोडा किंवा मेंढी या प्राण्यांच्या शरीरात सर्पविषाचा डोस टोचण्यापासून होते. या प्राण्यांची विषप्रतिकारक क्षमता माणसांपेक्षा जास्त असल्याने या प्राण्यांची निवड केली जाते. टोचल्या जाणाऱ्‍या सर्पविषाच्या डोसमध्ये एक तर कुठल्यातरी एकाच सापाचे विष असते किंवा एकाहून अधिक सापांच्या विषांचे मिश्रण असते. एकाच सापाच्या विषापासून त‍यार होणाऱ्या लशीला मोनोव्हेलंट म्हणतात, तर अनेक सापांच्या विषापासून तयार होणाऱ्‍या लशीला पॉलीव्हेलंट म्हणतात. भारतात नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या चार सापांच्या विषापासून एक प्रतिविष तयार केले जाते. मोनोव्हेलंट तयार करण्यासाठी एकाच जातीच्या खूप सापांचे विष गोळा करावे लागत असल्यामुळे ते पॉलीव्हेलंटपेक्षा साहजिकच अधिक महाग असते; पण त्याचा परिणामही लवकर होतो हे मात्र नक्की. 

अशाप्रकारे दर ठरावीक काळाने विषाच्या डोसाची मात्रा (जी अक्षरशः ०.०२ मिलिग्रॅम इतकीच असते) वाढवत नेत अशा टप्प्यापर्यंत आणली जाते, की तेवढी मात्रा मनुष्यासाठी घातक ठरेल पण प्राण्यासाठी नाही. यानंतर त्या प्राण्याचे विशिष्ट प्रमाणात रक्त (उदा. घोड्याचे सात लिटर) काढून त्यातील प्लाझ्मा म्हणजे प्रतिपिंडे वेगळी केली जातात आणि उरलेले रक्त परत प्राण्याच्या शरीरात ट्रान्सफर केले जाते. पुढे प्लाझ्मावर अधिक प्रोसेसिंग करून त्याची लस तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. 

सुरुवातीला ही लस द्रव स्वरूपात असे आणि शीतकपाटातच ठेवावी लागत असे. यामुळे खेडोपाडी जिथे वीज नाही किंवा विजेचा अखंड पुरवठा नाही, अशा ठिकाणी ही लस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असत. जिथे ही सुविधा आहे तिथून आईसबॉक्समध्ये ठेवून लस अशा खेड्यांमधील आरोग्य केंद्रांवर पोचवली जात असे. यात वेळेचा अपव्यय होऊन रुग्ण दगावतसुद्धा असे. नंतर तंत्रज्ञान सुधारले व लायोफिलाईज्ड म्हणजे अतिशीत पद्धतीने शुष्क केलेली लस तयार होऊ लागली व आजही हेच तंत्रज्ञान वापरले जाते. कारण या पद्धतीने तयार झालेली लस सामान्य तापमानालासुद्धा तिच्या एक्सपायरी डेटपर्यंत व्यवस्थित राहू शकते. सलाईनमध्ये मिसळून दिली की झाले तिचे काम सुरू. फ्रीजच हवा वगैरे भानगडीच नाहीत. 

आता तर प्रतिविष तयार करण्याचे तंत्रज्ञान अजूनच अद्ययावत झाले आहे. घोडा, मेंढी, ससा, माकड असे प्राणी न वापरता चक्क विशिष्ट बॅक्टेरियांच्या कल्चरचा वापर करून लस तयार केली जाते. जे काम या प्राण्यांच्या पेशी करायच्या, तेच आता बॅक्टेरिया करतात.

थोडक्यात काय, तर तंत्रज्ञान कितीही बदलले, प्रगत झाले, नवनवे शोध लागले तरी अनेक बाबतीत माणूस अजूनही इतर सजीवांवर अवलंबून आहे. मानव आणि इतर जिवांचे संबंध कायम मैत्रीचेच राहोत अशी सदिच्छा व्यक्त करून आपला निरोप घेतो!
(या लेखाबरोबर ‘सहअस्तित्व’ हे सदर समाप्त होत आहे.)

संबंधित बातम्या