द गॉडफादर 

विजय तरवडे
सोमवार, 2 मार्च 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

कोणत्याही कालखंडातली समाजव्यवस्था सामान्य माणसावर कळत-नकळत अन्याय करीत असतेच. वैयक्तिक पातळीवर झालेल्या अन्यायाला पूर्वीच्या ललित साहित्यात वाचा कशी फोडली जात होती? कथा-कादंबऱ्या, चित्रपट-नाटके यातील नायक, सहनायक अन्यायाबाबत कोणती भूमिका घेत होते? ‘हमों’च्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’चा नायक स्वतःशी चरफडतो. लताच्या स्वरात दिलासा, मानसिक आधार शोधताना म्हणतो, ‘लताच्या स्वरांचा जयजयकार असो. लताच्या स्वरांनी आमची अभागी, विदीर्ण, हताश हृदयं संपृक्त होवोत.’ ‘अमृतवेल’मधली वसू ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे गाणे गाते, गुणगुणते. दुःख अतिशय असह्य झाल्यावर गाणे विसरते. त्या काळी चित्रपटातले खलनायक नायक-नायिकेच्या प्रेमात बिब्बा घालणे, त्यांच्यावर एखादे संकट आणणे असे फुटकळ अन्याय करीत. सिनेमाच्या शेवटी छोटीशी मारामारी होऊन अन्यायाचे परिमार्जन होई. कौटुंबिक कलाकृतीत सुनेचा छळ करणाऱ्या नणंदांचे-सासवांचे यथावकाश हृदयपरिवर्तन होई. १९७३ मध्ये अमिताभचा ‘जंजीर’ आणि खराखुरा हिंसाचार रुपेरी पडद्यावर आला. सिनेमात दिसणारे अन्यायाचे लुटुपुटीचे परिमार्जन मागे पडले. पडद्यावर महानगरांमधले खरे खलनायक आणि खऱ्या वाटणाऱ्या मारामाऱ्या दिसू लागल्या. मारिओ पुझोची ‘द गॉडफादर’ १९६९ मध्ये प्रकाशित झाली. अगदी लगेच सगळीकडे दिसू-मिळू लागली. १९७२ मध्ये तिच्यावर चित्रपट आला. १९७५ मध्ये त्या सिनेमातल्या फक्त हिंसाचाराची पोरकट नक्कल करणारा ‘धर्मात्मा’ आला. 

मारिओ पुझोचे आयुष्य त्याच्या पन्नाशीपर्यंत हलाखीत गेले होते. त्याने वयाच्या तिशीत ‘द डार्क अरेना’ आणि नंतर ‘द फॉर्च्युनेट पिलग्रिम’ या दर्जेदार कादंबऱ्या लिहून फक्त समीक्षकांची वाहवा मिळवली होती. आर्थिक यश नाही. मधल्या काळात तो मॅगेझिन मॅनेजमेंट कंपनीत संपादक-लेखक म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करीत होता. एकदा तिथे मित्रांबरोबर गप्पा मारीत असताना मारिओच्या तोंडून माफिया विश्वाचे ऐकीव किस्से ऐकून मित्रांनी त्याला या विषयावर कादंबरी लिहायचा आग्रह केला. त्या वेळी मारिओच्या मनात एका अभिजात कादंबरीचा विषय घोळत होता. मित्रांच्या आग्रहाखातर त्यानं ‘द गॉडफादर’ आधी लिहायला घेतली. ती पूर्ण होऊन त्याच्या पन्नासाव्या वर्षी बाजारात आली. तिने त्याला अमाप लोकप्रियता आणि पैसा मिळवून दिला. 

‘द गॉडफादर’चे कथानक सर्वज्ञात आहे. पुन्हा सांगण्यात हशील नाही. तिला मराठीत एवढं मोठं यश कसे मिळाले? इंग्रजीत याआधी बेस्टसेलर ठरलेल्या शृंगार-हिंसाचारयुक्त अनेक कादंबऱ्या होऊन गेल्या. हेरॉल्ड रॉबिन्सच्या सुपरहिट कादंबऱ्यांचे साक्षात ग. वा. बेहेऱ्यांनी स्वैर अनुवाद केले होते. आज त्यांची नावेदेखील स्मरणात नाहीत. जेम्स हॅडली चेसच्या गुन्हेगारी कथा, पेरी मेसनच्या रहस्यकथा अनेकांनी मराठीत नकलल्या. निक कार्टरच्या काही सुंदर कथांची अनंत मनोहर यांनी स्वैर रूपांतरे केली. पण यातली एकही कलाकृती काळाच्या ओघात टिकली नाही. ‘द गॉडफादर’च्या अगणित मूळ (आणि कदाचित पायरेटेड) आवृत्त्या दुकानात आणि रस्तोरस्ती दिसत राहिल्या. मराठीत दोनजणांनी तिचे अनुवाद केले. 

कॉलेजमधली वर्षे आणि नंतरची नोकरीतली चाळीसेक वर्षे मी अनेकांच्या संग्रहात ‘द गॉडफादर’ची प्रत पाहिली. त्यातील एकाची सोप्या भाषेतली प्रतिक्रिया बोलकी आहे - ‘बॉसशी किंवा कोणाशी भांडण झाल्यावर प्रत्युत्तर देता येत नसेल तेव्हा ‘द गॉडफादर’ वाचून डोके शांत होते.’ बहुतेक वाचकांना मायकेल, त्याने थंडपणे सर्वांचे हिशेब चुकते करणे आवडलेले असते. ‘द गॉडफादर’मध्ये धसमुसळा सॉनी, शहाणा टॉम, हॉलिवूडमध्ये यश मिळालेला जॉनी फॉन्टेन आहेत. सेक्सची वर्णने आहेत. पण अन्यायग्रस्त वाचकांना आवडलाय तो फक्त मायकेल आणि विविध प्रसंगी त्याचे व्यक्त होणे, वागणे. 

‘द गॉडफादर’ मुळात मारिओ पुझो नावाच्या वयाची पन्नास वर्षे गरिबीत काढलेल्या कुटुंबवत्सल माणसाने पोटासाठी लिहिलेली कादंबरी आहे. माफियांचे विश्व आणि गुन्हेगारी त्यात नाइलाजाने आले आहेत. कुठल्याशा हिंसाचारात स्पष्टवक्तेपणामुळे अनाथ झालेला डॉन कॉर्लियोन एकच धडा अंगीकारतो आणि प्रतिपादतो. मनातला राग चेहऱ्यावर दिसू देऊ नका. धमकी देऊ नका. शक्य असेल तर सूड घ्या. त्याला यश मिळते. त्याचे अवाढव्य माफिया साम्राज्य उभे राहते. पण हा डॉन घरात, खासगी आयुष्यात कसा आहे? तो बायकोचा पती आणि तीन मुलांचा बाप आहे. पराकोटीचा सनातनी आहे. त्याला कुटुंबाबाहेर नाती नाहीत, मैत्रिणी, प्रेयसी नाहीत. तत्कालीन हिंदी सिनेमात किंवा चेस वगैरेंच्या इंग्रजी कादंबऱ्यांमधले टोळीप्रमुख बारमध्ये मदनिकांच्या सहवासात वावरताना दिसतात तसे करताना डॉन दिसत नाही. त्याला फक्त मित्र हवेसे वाटतात. गाववाला अमेरिगोशी त्याला मैत्री हवी आहे. अमेरिगोच्या मुलीवर अत्याचार करणारे गुंड कोर्टातून सहीसलामत सुटतात तेव्हा मुलीच्या बापाची वेदना डॉन जाणतो आणि त्या गुंडांना बेदम मारहाण करवतो. इथला हिंसाचार असो की इतर घटना, सर्वांना कारणमीमांसा आहे, तर्कशुद्ध परिणती आहे. 

एवंच, आपल्या मनातली मध्यमवर्गीय मूल्ये कुरवाळणाऱ्या आणि मनात वेळोवेळी उफाळणाऱ्या रागाचे विधिवत शांतवन - कॅथार्सिस - करणाऱ्या ‘द गॉडफादर’चे मराठी मुलखात दोन अनुवाद आणि अनेक आवृत्त्या, पुनर्मुद्रणे झाली. मनातल्या हिंसेला वाट करून देणारा नवा प्रवाह रूढ झाला. अनिल बर्वे यांच्या ‘अकरा कोटी गॅलन पाणी’, ‘डोंगर म्हातारा झाला’, ‘थँक यू मिस्टर ग्लाड’, ‘तिसरा डोळा’ या कलाकृतीदेखील असा अनुभव देतात. सहजी प्रसन्न न होणाऱ्या माधव मनोहरांनीदेखील ‘थँक यू मिस्टर ग्लाड’वर लिहिताना समीक्षकाची वस्त्रे उतरवली आणि रसिकांच्या नजरेतून भारावून गेल्यासारखे उत्कटपणे लिहिले आहे.

संबंधित बातम्या