समृद्ध अनुभवांची कावड 

विजय तरवडे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन
विजय तरवडे

मागच्या शतकातले मला आवडलेले-आदरणीय आणखीन एक लेखक-संपादक म्हणजे अनंत भालेराव. ‘कावड’ हे त्यांचे मी सर्वात आधी वाचलेले पुस्तक आणि त्यामुळे त्याविषयी मनात विशेष प्रेम आहे. आजारपणामुळे ‘मराठवाडा’ दैनिकात सक्रिय नसतानाच्या काळात म्हणजे १९८९-९० च्या दरम्यान त्यांनी दर शनिवारी ‘कावड’ नावाचा स्तंभ लिहिला. रोजच्या संपादकीय कामाची दगदग नसल्यामुळे त्यांनी या साप्ताहिक लेखनात सगळा जीव ओतलेला दिसतो. इथे गेल्या शतकातला सांस्कृतिक मराठवाडाच भेटतो.

‘कावड’मध्ये विषयांची वैविध्यता आहे आणि प्रत्येक लेखात समृद्ध अनुभवांचे तपशील, वाचनातले दर्जेदार संदर्भ ठासून भरलेले आहेत. अवघी सव्वा दोनशे पाने असली तरी शांतपणे सलग तीन-चार दिवस वाचण्याजोगे, त्यातले आवडलेले भाग टिपून ठेवण्याजोगे पुस्तक आहे.

नमनाच्या हलक्याफुलक्या लेखात ओसरी, माजघर, ढाळण, विहिरीतून पोहऱ्याने पाणी शेंदणे, शिंकाळे, गुऱ्हाळ, चुलांगण, खळे, मदन, मोट वगैरे शब्द विस्मृतीत गेल्याची नोंद आहे, पण ती नोस्टॅल्जिक नाही. “प्रगतीच्या अनिवार्य वाटचालीत असे होतच राहणार, नव्याचे आपण मोकळेपणाने स्वागतच केले पाहिजे व जे मरण्याजोगे आहे ते मरू दिले पाहिजे, अशा पडझडीची खंत बाळगून चालणार नाही,” असे ते बजावतात.

प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांच्या आत्मचरित्राचे सार एका लेखात चपखल बसवले आहे. कम्युनिस्टांच्या सर्व राजकीय चुका, डांगे आणि रणदिवे यांचे व्यक्तिमत्त्वदर्शन, आपल्याला ठाऊक नसलेली कम्युनिस्ट पक्षाच्या ‘कम्युन’ची आर्थिक रचना वगैरे तपशील आणि ऊर्ध्वरेषे यांच्या भ्रमनिरासाची कारणे, सर्व काही.

‘सटॅनिक व्हर्सेस’च्या निमित्ताने तसेच अनुभव आलेल्या कझान झाकिसच्या ‘द लास्ट टेंप्टेशन’वर विस्ताराने लिहिलेल्या लेखात विविध देशातील धर्मांधांच्या भूमिकांचे विदारक दर्शन घडते. एस.एम. जोशींच्या निधनाच्या निमित्ताने ‘हे मृत्यो, तुलाच अपवाद का नाही?’ या लेखात मृत्यूवर चिंतन आहे. आचार्य नरेंद्र देव, लोहिया, जयप्रकाश यांच्या मांदियाळीत अण्णाही असेच गेले. समाजवादी ब्रीदाला जागून त्यांनी मालमत्ता ठेवली नाही, कसलेच स्वामित्व नाही. आर्थिक लिप्ततेचे पाश नाहीत... बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडली त्या घटनेवर लिहिताना जगातील इतर भिंतींचे धावते दर्शन घडवले आहे. मंडेलांवर लिहिताना समारोपात ते म्हणतात, “धर्मावर आधारित राष्ट्र उभारणाऱ्यांचे मनसुबे जगभर जमीनदोस्त झाले.

दक्षिण आफ्रिकेत सगळे ख्रिश्चन, पण ते एकाच पातळीवर आले नाहीत, इराण-इराक दशकभर लढत राहिले. अफगाणिस्तानात एकाच धर्माच्या लोकांचे संघर्ष चालू आहेत...”

विविध व्यक्तींवरच्या प्रासंगिक लेखांमध्ये वाचकांच्या आईनस्टाईन, गांधी, गीताबाई चारठाणकर, चर्चिल, चार्ली चॅप्लिन, जगन्नाथराव बर्दापूरकर, दादासाहेब मावळंकर, केशवराव देशपांडे, नेहरू, बी.टी. रणदिवे, मनोहर सोनदे, मंडेला, मॉम, लोहिया, श्यामराव बोधनकर, सेतू माधवराव पगडी आणि अनेकांशी भेटी घडतात. नावांची यादी अकारविल्हे दिली आहे. यातील अनेकांच्या प्रत्यक्ष सहवासातले आपल्याला ठाऊक नसलेले रोचक प्रसंग (किस्से नव्हेत) इथे वाचायला मिळतात. अनंत भालेरावांच्या स्वातंत्र्य संग्रामातील समृद्ध कारकिर्दीची, लोकसंग्रहाची आणि विपुल वाचनाची साक्ष पटते. या पुस्तकात विनोबांची भेट मात्र अगदी चुटपुटती– ओझरत्या उल्लेखातून - होते.

गांधींना या पुस्तकात झुकते माप मिळाले आहे. कुसुमाग्रजांच्या अवतरणाचा संदर्भ घेऊन ते गांधीजींबद्दल म्हणतात, “विश्वव्यापी मानवतेने स्वतःचा सारांश करायचे ठरवले आणि तो गांधींच्या रूपात व्यक्त झाला.” जमनालालजी एकदा विनोबांना म्हणाले, “माणसाचे चित्र काढून दाखवा.” विनोबांनी पाटीवर गांधींचे चित्र काढले. गांधी गेल्यानंतर काही वर्षांनी अमेरिकन लघुकथांचा एक संग्रह प्रकाशित झाला. त्यातील एका कथेमधले जोडपे गांधींच्या हत्येमुळे अस्वस्थ होत जाते आणि काही दिवसांनी त्यांना त्यात ख्रिस्ताचे मरण दिसू लागते. गांधींच्या सहवासात भारतासह जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती आल्या. त्यांच्या काही आठवणी आहेत. आईनस्टाईन, चॅप्लिन, टॉलस्टॉय, मंडेला, लोहियांबद्दल ते लिहितात, “एरव्ही अत्यंत बेदरकार व कलंदर वाटणारे लोहिया गांधीजींच्या बाबतीत भावनाकुल आणि नम्र असत.” गांधीजी इंग्लंडला गेल्यावर हॉटेलमध्ये न उतरता एका गरीब वस्तीत उतरले होते. चार्ली चॅप्लिनने तिथे जाऊन घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचे तपशील एका लेखात आले आहेत. गोएंका पुरस्काराच्या निमित्ताने भालेराव दिल्लीत गेलेले असताना गांधीजींची नात सुमित्रा कुलकर्णी यांच्या भेटीचे हृद्य वर्णन आहे.

समाजमाध्यमातून होणाऱ्या ट्रोलिंगवर आपण अनेकदा बोलतो. समाजमाध्यमे नसतानादेखील ट्रोलिंग – वेगळ्या स्वरूपात - होत होते. अनंत भालेरावांचे पुढील उद्रगार ट्रोलिंग प्रथेला लागू पडतात – “निंदेचा हा धंदा आपण मराठी माणसे इतरांइतक्याच इमानेइतबारे चालवीत आलो आहोत. हा विकार इतरांना जडलेला आहे व आपण त्यातून मुक्त आहोत असे प्रत्येकालाच वाटत असते, परंतु हे सत्य नसते. आपण सगळेच या विकाराने ग्रस्त असतो.” रोमॉन अ क्ले पद्धतीने लिहिलेल्या एका मराठी कादंबरीत अनंत भालेराव यांच्यासह मराठीतील अनेक मान्यवरांची थेट किंवा साधर्म्य असलेली नावे घेऊन भरपूर कुचेष्टा केलेली आहे. पण लेखकाची पुण्याई अशी की कादंबरीला भरघोस पुरस्कार लाभले, तिच्यावर परिसंवाद संपन्न झाले आणि अर्थातच भरपूर आवृत्त्या निघाल्या. वाचकांच्या आवडीला औषध नाही.  

संबंधित बातम्या