सुखावणारी 'महानंदा'

विजय तरवडे
सोमवार, 16 मार्च 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

जयवंत दळवींच्या ‘महानंदा’ची कथा परिचित आहे. सांगण्यात मजा नाही, पण सवड असेल तेव्हा कुठूनही सुरुवात करून वाचण्यात नक्की ‘मजा’ आहे. पहिल्यांदा ती वाचली त्याला चाळीस-पंचेचाळीस वर्षे लोटली असतील. १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महानंदा’च्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. तिच्या कथेवर मराठी, हिंदी चित्रपट आणि ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक येऊन गेले. यातले मी काहीच पाहिले नाही. त्यामुळे माझ्या मनात लेखकाने चितारलेला बाबूल, कल्याणी, महानंदा, दमयंती यांचे अबोध चेहरे आहेत. वाचनागणिक चेहरे कधीकधी बदलत असतात. आवडलेल्या कथेवरचा सिनेमा पाहूच नये. कथेने आपल्या मनात साकारलेली पात्रे आणि पडद्यावरची चित्रे एकमेकांशी जुळतीलच असे नाही. माझ्या बाबतीत याला अपवाद ‘देवदास’. 

 महानंदाचे तसे नाही. नोकरी लागल्यावरच्या सुरुवातीच्या काळात घरापासून दूर औरंगाबादला राहत असताना ती वाचली गेली. रूम पार्टनरसह मी त्यातल्या घटनांवर रात्री तासनतास गप्पा मारल्या आहेत. पुस्तक वाचताना त्यातल्या बाळ ठाकुरांनी काढलेल्या चित्रांमुळे बाबूलच्या मामाच्या गावाला गेल्याचा भास होई आणि त्यात लेखकाची चित्रदर्शी शैली. बाबूलचे वय आणि आमची वये तेव्हा जुळत असल्याने आम्ही बाबूलच्या भूमिकेत शिरून ती कथा वाचत गेलो. बाबूलच्या सुखदुःखात, रागलोभात समरस झालो. पहिल्या भेटीत दिसलेला पन्नाशीतल्या कल्याणीचा देह स्तंभित होऊन न्याहाळला. 
मग

दुसऱ्या दिवशी कल्याणीची मुलगी महानंदा दुरून मासे धुताना दिसते. दिसते म्हणजे फक्त तिची मेंदी लावलेली पावले आणि तेलकट तांबूस चेहरा. तिसऱ्या भेटीत संध्याकाळी ती जुईच्या कळ्या खुडता खुडता मंजूळ आवाजात ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा, एका पायाने देव बाई लंगडा’ गाताना दिसू-ऐकू येते. बाबूल देवदर्शन घेऊन पुन्हा येतो, तेव्हा ती तुळशीसमोर 'शुभं करोती’ म्हणत असते. प्रसंगांची ही माळ - एकाच वेळी धार्मिक वातावरण आणि ‘ती’च्याबद्दल ‘त्या’ला वाटणारे आकर्षण यांची सरमिसळ अतिशय देखणी आहे. महानंदाचे हे तिसरे दर्शन असले, तरी एका अर्थी संपूर्ण असे प्रथमदर्शन आणि त्या दर्शनी बाबूलसंगे आपणही तिच्या प्रेमात पडतो. आपल्या घरासमोर अशीच तुळस असावी, तुळशीपुढे दिवा लावून तिने 'शुभं करोती' म्हणावे असे वाटते. कल्याणी त्या दोघांना आतल्या खोलीत बसवते. बाबूल खाटेवर आणि महानंदा जमिनीवर बसून जुईचा गजरा गुंफत असताना जुजबी गप्पा मारतात. पुढच्या भेटीची नाजूक मुहूर्तमेढ रचली जाते. बाबूल धाडसाने खडा टाकतो की मानूला मुंबईला पाठवा. कल्याणी हसून नकार देते. निरोप घेताना मानू त्याला जुईची वेणी देते. महानंदामधली मला उत्कट वाटलेली ही पहिली भेट - 'माझ्यासमोर मानू उभी राहिली, तर तिचे डोके माझ्या छातीपर्यंत आले.'

पुढच्या घटना द्रुत गतीने घडत जातात. कल्याणीला दोघांचे लग्न धार्मिक कारणास्तव मान्य नाही. पण ती बाबुलच्या मामांची आश्रित आहे. त्यांच्या मीलनाच्या आड येत नाही. पण त्यांचे लग्न होऊ देणार नाही. मानू बाबुलसह पळून जायला रुकार देते. त्या प्रसंगी तो तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडतो आणि ती चक्क अंगाई गीत गाते. दिवाळीच्या दिवशी दोघे शरीराने एकत्र येतात. बाबूल लग्नासाठी देवापुढे कौल मागतो. कौल मिळत नाही. पण जत्रेच्या दिवशी दोघे अट्टहासाने एकत्र येतात. मनोमन लग्न करतात. 

कल्याणीच्या डावपेचांमुळे दोघांचे लग्न होऊ शकत नाही. मधे वर्षे जातात. वीस वर्षांनी मामांचे निधन झाले म्हणून नाइलाजाने बाबूल गावी येतो. उलगडे, खुलासे होतात. महानंदा ही कल्याणीला मामांपासूनच झालेली मुलगी. महानंदाबद्दल कल्याणीने करून दिलेले गैरसमज खोटे. महानंदा पवित्र आणि बाबूलशीच एकनिष्ठ होती हे बाबूलला आत्ता समजते. तिला बाबूलपासून झालेली मुलगी दमयंती हुबेहूब बाबूल आणि महानंदाची प्रतिमा आहे. डावपेच खेळणाऱ्या कल्याणीला दुर्धर आजार झाला आहे. 

आता इतक्या उशिरा महानंदा आणि बाबूल एकत्र येऊ शकणार नाहीत. पण भाविणीच्या जिण्यातून दमयंतीची सुटका करायची म्हणून बाबूल तिला आपल्याबरोबर न्यायचे ठरवतो. दोघांना बंदरावर निरोप द्यायला आलेली मानू मुलीच्या कानात पुटपुटते, 'त्यांना हाताने जेवण करून वाढ, बाबा म्हणून हाक मार. आई कुठेय म्हणून कोणी विचारले, तर लहानपणीच मेली म्हणून सांग.'

दोघे बोटीत बसतात. बोट हालते. दमयंतीने बरोबर दोन डबे आणले आहेत. एक फराळाचा आहे. दुसऱ्या डब्यात महानंदाने वीस वर्षांपूर्वी संसाराची स्वप्ने बघितली, तेव्हा विणलेली काचेची तोरणे आणि उशीचे अभ्रे आहेत. ती बघून - माझ्या डोळ्यांतून घळघळ पाणी गळले. बोट सरकत होती. मानूचा ठिपका विरघळला होता. अजून तो बंगला मात्र धुरकट धुरकट दिसत होता. तोच मी बघत होतो. 

हे सगळे वाचताना मनात जे वाटते ते पडद्यावर उतरले असेल का? रंगमंचावर हे हळवेपण साकारले असेल का? खात्री नव्हती म्हणूनच मी ते चित्रपट आणि नाटक बघण्याचे धाडस करू शकलो नाही. शकणार नाही. हातातली पुस्तकाची प्रत मला केव्हाही त्या काळात, त्या कथेत घेऊन जाते. पुस्तक उघडले की बाबूल, महानंदा, दमयंती माझ्यासाठी जिवंत होतात. मला सुखावतात. रडवतात.

संबंधित बातम्या