वाट चुकल्याचा आनंद 

विजय तरवडे
सोमवार, 27 एप्रिल 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन.

प्रत्येक लेखकाकडे स्वतःची अशी एक उत्कट प्रेमकथा असतेच असे म्हणतात. प्रत्यक्ष किंवा लेखकाच्या मनात घडलेली. तेवढी कथा तो मन लावून लिहितो. त्यात कोणतीही भाषिक कारागिरी, शैलीचा परिचित ठसा आढळत नाही. रमेश मंत्री यांनी भरपूर विनोदी लेखन केले. प्रवासवर्णने लिहिली. त्या सर्व पुस्तकांहून निराळे असे एकच पुस्तक म्हणजे ‘महानगर’. या एकाच पुस्तकात त्यांची शैली नेहमीची वाट चुकली. वाचकांना या वाट चुकण्याचा आनंद लाभला. 

पन्नासच्या दशकात मंत्री लंडनला पत्रकारितेच्या पदविकेसाठी गेले. तेव्हाचे लंडन, पत्रकारिता प्रशाला, लेखक आणि चित्रकारांचे वर्तुळ, तरुणांची विविध विषयावरची मते, सामाजिक वातावरण ‘महानगर’मध्ये तपशीलवार उतरले आहे. श्रीकांत हा पुण्यातला तरुण पत्रकारितेच्या पदविकेसाठी इकडून तिकडून शंभर पौंड उभे करून लंडनला येतो. तिथे एका ट्यूब रेल्वे स्टेशनवर त्याची ॲना या डच मुलीशी औपचारिक ओळख होते. सुरुवातीला ती त्याला टाळते. पण योगायोगाने पुन्हा त्यांच्या भेटी होतात. मैत्री होते. ओळख, औपचारिक मैत्री, जवळची मैत्री आणि ‘तो-तिचे प्रेम’ यातल्या सीमारेषा धूसर असल्याने गोंधळ होतो. आपण विवाहित असल्याचे श्रीकांत तिला सुरुवातीला सांगायला संकोचतो. मग ते राहूनच जाते. अचानक दोघे खूपच जवळ येतात, तेव्हा तो ते सांगायचे टाळतो. ॲनाने लग्नाचा प्रस्ताव मांडल्यावर जुजबी कारणे सांगून नकार देतो. ती निघून गेल्यावर त्याला खोटेपणाचा पश्चात्ताप होतो. पुन्हा ॲनाला भेटून तो सर्व कबुली देतो आणि तिची माफी मागतो. 

‘महानगर’ कादंबरी लेखकाने ॲना नावाच्या डच मैत्रिणीलाच अर्पण केली आहे! कादंबरीचा नायक श्रीकांतदेखील सीकेपी आहे. कादंबरी बांधेसूद वगैरे नाही. त्यात निवेदनाचे कोणतेही वेगळे तंत्र-प्रयोग नाही, आलंकारिक, ‘काव्यमय’ भाषा नाही. लंडनमध्ये शिकायला गेल्यावर अभ्यासाखेरीज नायकाने काय काय केले ते जसेच्या तसे आडपडदा न ठेवता सांगितले आहे. तरीही वाचताना कंटाळा येत नाही. ‘तुला माझ्या मित्राची हकिकत सांगतो’ असे म्हणून कोणीतरी आपल्याला भडाभडा सांगतोय असे वाटून आपण लक्षपूर्वक वाचत रहातो. 

‘महानगर’ वाचताना तत्कालीन लंडनला जाऊन तिथल्या माणसांना भेटल्याची, त्यांच्यात मिसळल्याची प्रचिती येते. साधारण याच सुमारास पु.ल.देखील लंडन आणि इतरत्र होते. पण ‘अपूर्वाई’ वाचताना पु.ल. पानोपानी आपले एक बोट धरून वारंवार पुण्याला घेऊन येतात. मुलीच्या लग्नाची चिंता करणाऱ्या आंग्ल स्त्रीची लिपस्टिक पाहून त्यांना तशीच चिंता करणाऱ्या मराठी आईची कुंकवाची आडवी चिरी आठवते. स्कॉटलंडमधल्या पिटलॉक्रीला रपेट करताना सह्याद्रीमधल्या भटकंतीचे आणि हायलंडमध्ये फिरताना लोणावळ्याच्या ‘टायगर्स लीप’चे स्मरण होते. बॉबी पाहून हवालदार आठवतो. ती शैली आणि ‘महानगर’ यात पूर्ण फरक आहे. ‘महानगर’चा श्रीकांत पुण्याचा फक्त एकदा उल्लेख करतो. लंडनला गेला की तो लंडनचाच होतो. 

‘महानगर’मध्ये भरपूर विषयांतरे आणि छोटी छोटी उपकथानके आहेत. विविध देशातून आलेले श्रीकांतचे वर्गमित्र-मैत्रिणी स्वतःच्या हकिकती सांगतात. श्रीकांतचा एक चित्रकार मित्र आणि त्याची बायको नाताळची मेजवानी देतात, तेव्हा त्यांची कहाणी येते. ॲनाची स्वतःची बालपणापासूनची हकिकत येते. ॲना त्याला एक अनुभव कथेप्रमाणे रंगवून सांगते. दोघेजण एक डच चित्रपट बघतात. त्याचे कथानक आहे. या सगळ्या घटनांच्या गर्दीतून हळूहळू श्रीकांत आणि ॲनाची मैत्री येते. त्यांचे प्रेम डोकावते. काही वर्णने लेखकाने इतकी मनापासून केली आहेत, की लेखक आणि श्रीकांतच्या अद्वैताचा भास व्हावा. श्रीकांत-ॲना फिरायला जातात तेव्हाचे वर्णन - ते दोघे चालतच निघतात. टेम्स नदीच्या काठावरून, नदीतून तुरळक नावा हळूहळू जात होत्या. मालाने भरलेले दोन बार्ज अधिकच मंद गतीने जात होते. रस्त्यावरून नदीच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी अधूनमधून पायऱ्या केल्या होत्या. त्यावर प्रेमिक जोडपी बसली होती. 

दोघे जत्रेत जातात. दोनशे फूट उंच पाळण्यात बसण्याचा ॲना आग्रह धरते. त्या खुर्चीवर बसल्यानंतर उंचावरून पाळणा जोरात खाली येतो तेव्हा - आपण खाली पडणार असे त्याला वाटू लागते. लहान मुलाने संकटकाळी आईला घट्ट बिलगून राहावे तसे त्याने ॲनाला घट्ट पकडले आणि भीतीने डोळे मिटून घेतले. त्याची केविलवाणी धडपड पाहून तिला अतिशय हसू लोटले आणि मुलाला आईने पदराखाली घ्यावे तसे ममतेने, विश्वासाने त्याला जवळ घेतले. ती मिठी प्रेमाची नव्हती, उन्मादाची नव्हती... 

कॉलेजमध्ये असताना शहराजवळच्या निसर्गरम्य ठिकाणी सहलींना सगळेजण जातातच. वाटेत गाण्यांच्या भेंड्या खेळतात. आपल्या आपल्या पिढीतली ठराविक गाणी-कविता कोरसमध्ये गातात. धाडसी मुले ट्रेकिंगला जातात. गडकिल्ल्यांची भटकंती करतात. लंडनची तत्कालीन तरुण मुले हिच हायकिंगला जातात. त्याची अशी समांतर वर्णने, त्यांच्या ओठांवरची गाणी आणि कविता मुळातून वाचण्याजोगी आहेत. फिरताना त्यांना छोटी छोटी गावे लागतात. सगळी गावे एकसारखी आहेत - चारआठ घरांनंतर एखादे वाणसामानाचे दुकान, पाचपंचवीस घरांनंतर एखादा मद्याचा बार, अधूनमधून पसरलेली वर्तमानपत्रांची दुकाने... सर्व गावांवर एक आळसावलेली सुस्ती पसरली होती. मात्र हा आळस विलासी होता. कामचुकारपणाचा नव्हता. पहिलीच्या वर्गातला मुलगा चार अक्षरे गिरवून दमतो नि मग तेवढ्याशाच अभ्यासाने दमून आळसतो, तसा गावाचा नूर दिसत होता...  

एकमेकांना स्वातंत्र्य देणारा समाज, स्वतःचे निर्णय स्वतः घेताना बंधने न मानणारी आणि तरीही स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेणारी तरुणाई आणि त्या प्रगल्भ सामाजिक प्रवाहात स्वतःला सैल सोडून देणारे श्रीकांत-ॲना, शेवटी मनाविरुद्ध काठावर आलेला श्रीकांत यांच्या प्रेमाची ही उत्कट गोष्ट मिळाली, तर आवर्जून वाचण्याजोगी. कारण पुस्तकाच्या प्रती कुठे उपलब्ध नाहीत.

संबंधित बातम्या