माणूसपणाच्या मर्यादा 

विजय तरवडे
सोमवार, 6 जुलै 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

‘द  गॉडफादर’ नंतर आलेल्या छोट्यामोठ्या इंग्रजी सूडकथा वाचनात आल्या आणि विस्मरणात गेल्या. त्याच काळात ‘इयर ऑफ द इंटर्न’ ही इंटर्नशिप करीत असताना डॉक्टरला येणाऱ्या अनुभवांवर आधारित रॉबिन कुकची कादंबरी आली आणि गेली. तिच्या अपयशानंतर कुकने व्यावसायिक क्लृप्त्यांचा नीट अभ्यास करून 'कोमा' लिहिली. नंतर द ब्रेन, द शॉक आणि इतर कादंबऱ्या. रूढार्थाने या सूडकथा नव्हत्या. वैद्यकीय थरारकथा आपल्या कादंबऱ्यांमधून होत्या. सामान्य वाचकांना वैद्यक विश्वातील घटनांची-बाबींची माहिती व्हावी, त्यात रस निर्माण व्हावा, वाचकांचे थोडेसे शिक्षण व्हावे अशी अपेक्षा कुकने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. याच वेळी मराठीत अरुण लिमये यांच्या ‘क्लोरोफॉर्म’ पुस्तकाने वाचकांच्या मनात धडकी भरवली होती. तोवर ‘डॉक्टर जास्त बिल लावतात, मोठे दुखणे नको रे बाबा,’ इतकीच भाबडी धारणा असलेले वाचक लिमयेंचे पुस्तक वाचून हादरले होते. लिमयेंनी उभ्या केलेल्या प्रश्नांवर उत्तर काय हे कोणालाच ठाऊक नव्हते.   

याच काळात अरुण गद्रे यांनी ‘घातचक्र’ लिहिली. पण ती दहाहून अधिक वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये प्रकाशित झाली. ‘घातचक्र’मध्ये तीन गोष्टींचे अद्‌भुत मिश्रण आहे. ‘द गॉडफादर’ मधल्या मायकेलप्रमाणे इथे संतप्त तरुण अमोल रहाळकर आहे. जे. बी. हॉस्पिटलमधल्या भ्रष्ट न्यूरोसर्जन डॉक्टर व्हीजीएसचा थंड डोक्याने काटा काढतो. पोलीस चौकीवर जाऊन कबुली देतो, 'मी ग्लोव्हज घातले, नाईफ पकडली आणि त्याला म्हटले, ही तुझी सर्जरी मी कशी करणार, सांगू? हा लेफ्ट सबकोस्टल इन्सिजन, ही स्प्लीन कापली. हा पोस्टेरियर व अपवर्ड डायरेक्शनमध्ये डायफ्रॅम... मग मिडीएस्टीनम व मग शेवटी धडधडणारे हृदय... क्षणात सर्जरी उरकून टाकली. यस, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट असाच येईल.' 

पण कादंबरीच्या सुरुवातीलाच हा सुडाचा खून झाल्यानंतर घातचक्र रॉबिन कुकप्रमाणे एक वेगळे विश्व उलगडून दाखवायला सुरुवात करते. व्हीजीएसने स्वतःच्या मुलाला सुवर्णपदक मिळण्यासाठी आणि एरव्हीही अनेक मुलांचे करिअर उद्ध्वस्त केले आहे. त्यांना आयुष्यातून उठवले आहे. एकात एक गुंफलेली विविध दुष्टचक्रे आपल्या डोळ्यांसमोर येतात. राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपाचा वापर करून आणि काही वेळा स्वतःच्या जोरावर डीन आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी औषध खरेदी, डॉक्टर्सच्या बदल्या, बढत्या, नेमणुका, व्हायव्हा यांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांचे आणि सहकारी प्राध्यापकांचे केलेले आर्थिक शोषण, लैंगिक शोषण, अवैध कमाई आणि इतर कृष्णकृत्ये लहानलहान प्रसंगांतून सनसनाटी भाषेत समोर येत जातात. मधल्या काळात व्हीजीएसचा खून करणारा अमोघदेखील आत्महत्या करतो. 

मारिओ पुझो आणि कुकच्या या शैलींमध्येच गद्रे यांनी करुणेचा धागा गुंफला आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून एमडी होईपर्यंतच्या विश्वात व्हीजीएस आणि त्याची शोषण करणारी टोळी एका बाजूला, दुसरीकडे त्यांना विरोध करणारे आणि भावनेच्या भरात स्वतःच्या करिअरचे नुकसान करून घेतलेले अमोघ, सतीश, निशा, विकास वगैरेसारखे विद्यार्थी, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा पत्रकार राजीव आहेत. तिसऱ्या कोनात मानवतावादी डॉ. शेणॉय आहेत. त्यांची वेगळी हकिकत आहे. अनाथाश्रमात वाढलेले सुरेंद्र शेणॉय कष्ट करून डॉक्टर - सायकियाट्रीस्ट होतात. विदेशी जातात. तिथे कॅथरीन नावाच्या कृष्णवर्णीय परिचारिकेशी विवाह करतात. ती त्यांना समजून घेणारी महत्त्वाची व्यक्ती. पण दुर्दैवाने दोघांना अपत्यसुख लाभत नाही. कॅथरीनचे अकाली निधन होते. शेणॉय जेबी हॉस्पिटलमध्येच नोकरी करतात. सायकियाट्री वॉर्ड असल्याने सर्वांपासून वेगळे पडतात. त्यांना आपल्या विभागाच्या विकासासाठी पुरेसे बजेट मिळू शकत नाही. अन्याय होणाऱ्यांविषयी सहानुभूती असली, तरी ते त्यांच्यासाठी काही करू शकत नाहीत. 

 ज्या भ्रष्टाचारी व्हीजीएसचा खून झाला त्याच्या बायकोची, मुलाचीही मनःस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. डॉ. शेणॉय हा सर्व परस्परविरोधी प्रवाहांना करुणेच्या एकाच धाग्यात जोडणारा दुवा आहे. कादंबरीच्या शेवटी ते अमोघच्या स्मरणार्थ रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतात आणि विकास, निशा या ध्येयवेड्या मुलांच्या हातात त्याचा निधी सोपवतात. मात्र, मेजवानी आयोजित केल्यावर व्हीजीएसच्या खुनाला नकळत निमित्त झालेल्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या रोषाला पात्र झालेल्या जितेंद्रलादेखील आवर्जून बोलवतात. त्याचा अपमान होऊ देत नाहीत. 

व्हीजीएसचा खून होतो, तेव्हा त्याला उद्देशून मनातच म्हटलेले डॉ. शेणॉयचे एक रूपकात्मक स्वगत आहे... ''व्हीजीएस, तुझ्या डीनला विचार, कॅन्सरचं पहिलं लक्षण कोणतं... तो सांगील. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली नॉर्मल पेशी पाहिल्या, तर इंटर सेल्युलर ब्रिज दिसतो - दोन पेशींमधील एक अतिसूक्ष्म संवेदनाक्षम, स्पर्श करणारा पूल. कॅन्सरचं पहिलं लक्षण म्हणजे हे पूल नाहीसे होतात. व्हीजीएस, वेड्या, ज्या क्षणी तू तुझे हे जगाला जोडणारे पूल आवरते घेतलेस, त्याच क्षणी तुझा मृत्यू अटळ होता. यस... आपला पूल असा आपल्याच हातानं ओढून घेणं, एकेक करत... सगळेच पूल. इंटर सेल्युलर ब्रिज.''    

एस (सुलोचना देशमुख) आणि बाबा आमटे यांनी कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेतही डॉ. शेणॉयची आवर्जून खास दखल घेतलेली आहे. एस म्हणतात - माणसाच्या माणूसपणाच्या मर्यादा ओळखून त्याला समजून घेणाऱ्या डॉ. शेणॉयची धडपड ही या कादंबरीची दिशा आहे. ती वाचकांना समजावी अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी डॉ. शेणॉय तरी काय, दिशा फक्त दाखवू शकतात. त्या दिशेने जायचे की नाही हे चालणाराच ठरवीत असतो.  

संबंधित बातम्या