मिरच्यांच्या खळ्यावर 

विजय तरवडे 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

आठवणीतील अक्षरे
आपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन

लेखकानं पहिलं पुस्तक लिहावं, ते विनोदी असावं, विनोद दर्जेदारही असावं आणि वाचकांना हसू आणणारंही असावं, पुस्तकाला पुलंची प्रस्तावना असावी आणि पुस्तक मुख्य प्रवाहातल्या मातब्बर प्रकाशकानं प्रकाशित करावं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या कोणाही मराठी लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला आणखीन काय हवं? पण या सर्व गोष्टी लाभूनही एक पुस्तक आणि त्याचे लेखक विस्मरणाच्या गर्तेत गेले. आज त्यांचं नाव किती लोकांच्या स्मरणात आहे, ठाऊक नाही. त्यांच्या एकुलत्या एका पुस्तकाची प्रत पुण्यातल्या ग्रंथालयात मिळू शकली नाही. महत्प्रयासानं मुंबईच्या गणेश मतकरी यांनी त्याची जीर्ण प्रत उपलब्ध करून दिली, पण त्याचं मुखपृष्ठ आणि पुलंनी लिहिलेल्या प्रस्तावनेची पानं गायब आहेत.  

बाजीराव पाटील यांचं ‘मिरच्यांच्या खळ्यावर’ हे विनोदी पुस्तक १९६५ मध्ये ठोकळ प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले. आम्ही पन्नास वर्षांपूर्वी शाळेच्या पेटी वाचनालयात ते वाचले. पुस्तक तिथे ठेवण्याजोगे होते याचा अर्थ त्यात ‘प्रौढांसाठी’ विनोद नव्हते! लेखक बाजीराव पाटील हे पेशानं शेतकरी असावेत. खळे म्हणजे पिकाची मळणी करून धान्य काढण्याची जागा. मिरच्यांवर अशी प्रक्रिया होत नाही. तेव्हा पाटील यांनी ‘मिरच्यांची मळणी’ करून आभासी खळे उभारले आणि तिथे नेऊन वाचकांना ठसका लागेतो हसवले आहे. पुलंनी प्रस्तावनेत पुस्तकाचे तोंड भरून - किंवा पाने भरून - कौतुक केले होते. आम्ही शाळेत असताना मराठीच्या अच्युतसरांनी ती प्रस्तावना वर्गात वाचून दाखवली आणि रसग्रहण कसे लिहायचे ते त्यातून शिकण्याचा सल्ला दिला होता. शिवाय प्रस्तावनेतला काही भाग त्यांनी आम्हाला ‘शुद्धलेखन’ म्हणून घातला होता.  

मिरच्यांच्या या खळ्यावर भेटणाऱ्या लेखांची शीर्षके चाकोरीबद्ध वाटतात. पण आतला विनोद मात्र ताजा टवटवीत आहे. आज पन्नास वर्षांनी हे पुस्तक वाचतानादेखील दोनेक डझन ठिकाणी खुदकन हसू आले. पुस्तकभर अगणित शाब्दिक कोट्या आहेत. ‘माझे पार्टी पर्यटन’ या लेखात कोट्यांचा कहर केला आहे. लहानपणी हुरडा पार्टी वगैरे पाहिल्यामुळे पार्टी फक्त खाण्याचीच असू शकते असा ग्रह असलेल्या लहान मुलाला कम्युनिस्ट पार्टी शब्द वाचून कम्युनिस्ट हा खाद्यपदार्थ वाटतो. पुढे कूळकायद्यामुळे गावात दोन पार्ट्या पडतात. गावात नवीन नर्स आल्यामुळे पार्ट्या पडतात. तमासगिरांच्या पार्ट्या तर गावच्या जत्रेचे व्यवच्छेदक लक्षण असतात. रामानंद वर्टी हा पार्टीमानव लोकांकडून पार्टी उकळण्यात पटाईत आहे. दिरंगाईचे अंगाई गीत गाताना हिंदू धर्मात गाई पूज्य असल्या तरी दिरंगाई त्याज्य मानली आहे असे पाटील सांगतात. रेल्वेच्या गाड्या नियमितपणे इतकी दिरंगाई करतात की त्यांच्या ‘रुळीरुळी’ दिरंगाई रूळल्यासारखे वाटते. संस्कृत भाषेत दारूला ‘कादंबरी’ म्हणतात हे ‘संस्कृत भाषेतील दारू मराठी मुलखात येताच एखाद्या परभाषिक व्यापाऱ्याप्रमाणे मोठमोठ्या इमारती बांधते’ अशा कोटीबाज वाक्यात लेखक सांगतात. संत तुकारामांना प्लांचेटवर बोलावण्याचा प्रयोग केल्यावर तुकारामांऐवजी एका दूरच्या भांडखोर नातलगाचा आत्मा येतो आणि तो मंबाजीचे कौतुक करून जातो ही ग्रामीण ठसक्यात लिहिलेली अद्‍भुतिका मुळातूनच वाचण्याजोगी आहे. वेगवेगळे देव भक्तांच्या अंगात येतात. दिवंगत साहित्यिक कोल्हटकर चाहत्या वाचकांच्या अंगात आले तर काय करतील हा कल्पनाविलास एका कथेत आहे. 

रस्त्यावर जडीबुटीची, झाडपाल्याची औषधे विकणारे अतिशय कसबी बोलबच्चन असतात. भोवती गर्दी जमवतात. गर्दीत त्यांनी आपली माणसे पेरलेली असतात. गोड भाषेत गप्पा मारून आणि औषधांचे अतिशयोक्त वर्णन केल्यावर त्यांनी गर्दीत पेरलेली बोगस गिऱ्हाइके खरेदी करतात. त्यांचे बघून गर्दीतली इतर माणसे औषधे विकत घेतात. ‘रस्त्यावरचा डॉक्टर’ कथेत सूटबूट परिधान केलेला डॉक्टर डफ वाजवून एक सुंदर गाणे गातो आणि गर्दी जमवतो. मग स्वतः दंतवैद्य असल्याचे जाहीर करतो. गर्दीत पेरलेल्या  बोगस गिऱ्हाइकांचे तिथेच उभ्या उभ्या आणि त्यांना वेदना न होता दात काढून दाखवतो. गर्दीचा विश्वास असा संपादन केल्यावर तो दात भक्कम होण्यासाठी म्हणून स्वतःचे दंतमंजन खपवतो!   

एक भाबडा वाचक लेखकाला मानधनाचा आकडा विचारतो. लेखाला पंधरावीस रुपये मिळतात आणि महिन्याभरात एक-दोन लेख लिहून होतात हे ऐकून वाचक म्हणतो, “माझ्यासारख्याले हे येत होतं तर एका दोन वर्सातच म्या बारा बैलांची इस्टेट केली असती. सकाळी उठल्याउठल्या एक लेख लेह्याचा, न्याहरी केली की दुसरा लेख लेह्याले. दिवसाचे चारपाच लेख लेहेले कि एक हिरवी नोट... की मंग टेर झोपले...”

पेशाने शेतकरी असलेल्या पाटील साहेबांचा विनोद ठसकेबाज आणि रांगडा आहे. ओबडधोबड आहे. पण अश्लीलतेकडे झुकत नाही. ‘गणिताचा पाठ’ या कथेत गुरुजी मुलांना प्रश्न घालतात. त्या काळी स्त्रियांना बालमजुरांच्या दुप्पट आणि पुरुषांना स्त्रियांच्या दुप्पट मजुरी मिळायची. गुरुजी विचारतात, “आठ पुरुष, दोन बायका व सहा मुले एक काम चार दिवसात करतात. हे काम करायला किती मुले लागतील? यासाठी काय करावे लागेल?”

“गणित करावे लागेल,” एक मुलगा उत्तर देतो. 

“आधी आपल्याला पुरुषांच्या बायका कराव्या लागतील, चला, पटपट बायका करा,” असे सांगून गुरुजी बाहेर चक्कर मारून येतात. मुले आठ पुरुष गुणिले दोन हे गणित सोडवतात. त्यात एक मुलगा तक्रार करतो, “गुरुजी, हा माझ्या बायका बघतो.”

यथावकाश बायकांच्या संख्येला दोनने गुणून मुलांची संख्या काढली जाते आणि गणिताचा तास संपतो. कथेतले सगळे विनोद इथे देणे स्थलाभावी अशक्य आहे. 

* * *
उपरोक्त पुस्तक कुठेच सहजी मिळत नाही म्हटल्यावर त्याची शिफारस काय करणार. पण कोणे एके काळी या पुस्तकाने मनमुराद हसवले आणि आता पुनर्भेटीतदेखील निराश केले नाही याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
* * *

संबंधित बातम्या